Monday 2 May 2011

नदी आणि स्थावर मालमत्ता



 
 
 
चुका करणे हा मनुष्याचा स्थायीभाव आहे, मात्र त्या पुन्हा करणे हा मूर्खपणा आहे रिस्टॉटल
जेव्हा मी रोज वर्तमानपत्र वाचतो तेव्हा या महान विचारवंताचे हे विधान आठवल्याशिवाय राहत नाही! विशेषतः शहरातून वाहणाऱ्या नद्यांवर होणाऱ्या अतिक्रमणाच्या बाबतीत अशीच परिस्थिती आहे मग ती मुंबईची मिठी नदी असो किंवा पुण्यातील राम नदी. पूर्वापार काळापासून स्थावर मालमत्तेच्या विकासावर नदीचा मोठा प्रभाव राहिला आहे, अर्थात तेव्हा रिअल इस्टेट हा शब्द आणि बिल्डर नावाची जमात अस्तित्वात नव्हती. मात्र सामाजिक विकासाच्या सुरुवातीपासूनच नदीच्या जवळपास राहणे मानवाला आरामदायक आणि सोयीचे वाटत आले आहे. सिंधुच्या खोऱ्यात वसलेली हडप्पा-मोहेंजोदडो संस्कृती तसेच इजिप्शियनांनी वसाहतींसाठी केलेली नाईल नदीची निवड अशी जगभरातील शेकडो उदाहरणे यासाठी देता येतील. तुम्ही कुठलेही मोठे शहर पहा, ते मोठ्या आणि बारमाही नदीच्या किनारी वसलेले आहे.

तेव्हापासून आतापर्यंत मानवाला नेहमीच नदीच्या किनारी राहणे आरामदायक आणि सोयीचे वाटत आले आहे आणि ते स्वाभाविकही आहे कारण नदीमुळे खात्रीशीर पाणीपुरवठा होतो जी कुठल्याही समाजाची मूलभूत गरज आहे तसेच पाणी हे कृषी आणि परिवहनाचे स्त्रोत आहे. ज्याप्रमाणे स्वच्छतेसाठी नदीच्या पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आपल्याकडे अजून सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प नसल्याने वाहती नदी या सांडपाण्यालाही आपल्यासोबत नेते.

वर्तमानकाळाचा विचार करता सध्या जागेची अतिशय कमतरता आहे, त्यामुळे आपण प्रत्येक जागेचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल हे पाहतो अशा वेळी शहरातील कुठलाही जलाशय किंवा नदी जी केवळ पावसाळ्यात वाहते ती आसपास राहणाऱ्या माणसांचे साहजिकच लक्ष्य बनते! नदीकाठी राहणारे आपले पूर्वज आणि आपल्यामध्ये इथेच सर्वात मोठा फरक आहे. त्यांनी नद्यांचे महत्व ओळखले होते आणि ते त्यांचे काळजीपूर्वक संरक्षण करीत, ते केवळ नद्यांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत नसत. त्यांनी त्यांच्या प्रदूषणाचे प्रमाण नियंत्रणात ठेवले, पाण्याचा वापर नियंत्रित केला आणि नदीवर कधीही अतिक्रमण केले नाही, किंबहुना त्यांनी नदीला पवित्र मानले तिला देवाचा दर्जा दिला, त्यामुळे नदीचे दैवत झाले! यामुळे त्यांना नदीशी योग्य नाते कायम राखण्यात मदत झाली, याठिकाणी नाते हा शब्द अतिशय महत्वाचा आहे कारण कुठलेही नाते केवळ घेऊन टिकत नाही, आपल्याला काही द्यावेही लागते. आणि नेमके हेच आपण विसरले आहोत! आपण सोयीस्करपणे या नात्यातला दुसरा भाग म्हणजे नद्यांना काहीतरी देणे विसरलो आहोत, ज्यांच्याकडून आपण सतत काहीतरी घेत असतो. 
नदीची आपल्याकडून काय अपेक्षा असते? फार काही नाही, तिच्या काठांची थोडीशी काळजी तसेच आपण आपल्या कृतींनी तिला प्रदूषित करु नये एवढेच. त्याच वेळी केवळ आपणच नदीवर अवलंबून नाही, तिच्यावर माशांपासून पक्षांपर्यंत तसेच अनेक वनस्पती अशा इतर अनेक प्रजाती अवलंबून असतात, ज्या नदी स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतात. सर्व त्याच नदीवर जगतात आणि तिच्यावर त्यांचाही तेवढाच हक्क आहे, ज्याची आपण स्वतः आठवण करुन द्यायला हवी. मात्र आपण नदी प्रदूषित करतो आणि इतर प्रजाती आपण केलेली घाण स्वच्छ करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. आपण स्वतःला सर्वात हुशार प्रजाती म्हणवतो, मात्र जेव्हा नदीबाबत जबाबदारी दाखवण्याची वेळ येते तेव्हा आपली हुशारी कुठे जाते, असा प्रश्न मला नेहमी पडतो?
 आपल्या प्रिय पुण्यातील नद्यांवर झालेल्या अतिक्रमणाबाबत वर्तमानपत्रामध्ये नुकत्याच बऱ्याच बातम्या आल्या होत्या, यातली बरीचशी अतिक्रमणे ही विकासकांनी केलेली होती (असे बातम्यांमध्ये सांगण्यात आले). ठीक आहे, मात्र यामागे काय कारण आहे आणि असे का होत आहे याचा आपण कधी विचार केला आहे का? बऱ्याच जणांसाठी उत्तर सोपे आहे, हाव पूर्ण करण्यासाठी! काही बाबतीत ते खरे आहे पण मग आपण त्याविरुद्ध काय करणार आहोत आणि त्यासाठी खरंच विकासकच जबाबदार आहेत का? आता मी याच व्यवसायातला असल्यामुळे पुन्हा पक्षपाती विचार मांडत नाही, पण आपल्या नद्या सुरक्षित ठेवण्याबाबत आपण खरंच गंभीर आहोत का? हा प्रश्न स्वतःलाच विचारा मग आपल्याला समजेल की आपण नदीच्या काठावर तिच्या सीमा रेषाही आखलेल्या नाहीत त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे तर बाजूलाच राहू द्या. जेव्हा आपण अतिक्रमणाविषयी बोलतो तेव्हा सर्वप्रथम आपल्या त्याच्या सीमारेषांविषयी स्पष्ट असले पाहिजे आणि ते कुणाचे काम आहे?
शहरातील ज्या नदीबाबत सर्वाधिक बोलले जाते ती आहे राम नदी, यातील विनोद म्हणजे ती नदी आहे की नाला हे आपण अजून स्पष्ट केलेले नाही! अर्थात तो नाला आहे की ती नदी आहे हा वाद नाही कारण कुठलाही जलस्त्रोत आपल्यासाठी तितकाच महत्वाचा आहे आणि त्याचे नैसर्गिक पद्धतीने संरक्षण करणे महत्वाचे आहे. सत्य आहे की आपल्याला जबाबदारी घ्यायची नसते आणि म्हणूनच सर्व संबंधितांकडून अतिक्रम सुरु असते कारण बिचारी नदी स्वतः बोलू शकत नाही. मात्र हे खरे नाही, नदीच का, प्रत्येक जलस्त्रोत स्वतःच्या पद्धतीने बोलत असतो; गेल्या पावसाळ्यात आपल्याला शहरात याचा अनुभव आला! प्रत्येक नाला, ओढा, नदी दुथडी भरुन वाहत होता आणि मार्गातील प्रत्येक गोष्टीवर आदळत होता, यालाच आपण अचानक आलेला पूर म्हणतो! ते खरे आहे आहे का? आपल्याला माहित होते की काय येणार आहे आणि तरीही यावर्षी चित्र बदललेले नाही. यामुळे मला पंचतंत्रातल्या माकडाच्या गोष्टीची आठवण येते, जो प्रत्येक पावसाळ्यात म्हणायचा की मी पुढच्या वर्षी घर बांधेन आणि त्याने कधीच बांधले नाही आणि शेवटी त्याचा पावसानंतर आलेल्या हिवाळ्यात मृत्यू झाला! आपण माकडाचे पूर्वज आहोत हे मान्य केले तरी आपण नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहोत किमान आपण स्वतःला तसे मानतो!
सर्वप्रथम आपण सर्व नैसर्गिक जलस्त्रोतांची सीमारेषा केवळ कागदोपत्रीच नाही तर प्रत्यक्ष निश्चित करायला हवी. हे पृष्ठभागावरील रस्त्यांची आखणी करण्यासारखेच आहे. यामुळे या जलस्त्रोतांच्या जवळ राहणाऱ्यांना त्यांची अचूक सीमारेषा समजेल, म्हणूनच सध्या आपण अतिक्रमणाविषयी बोलत आहोत. त्यांची सीमा काँक्रिटच्या खाबांसारख्या कायम टिकणाऱ्या आणि एकाच स्थितीत राहणाऱ्या मार्गाने निश्चित केली पाहिजे. त्यानंतर आपण त्या जलस्त्रोताचे रक्षण कसे करणार आहोत हे ठरवू शकतो. बऱ्याच प्रगत देशांमध्ये नदी शहरातून वाहत असेल तर त्यांचे काठ अतिशय चांगल्या पद्धतीने बांधण्यात आले आहेत उदाहरणार्थ पॅरिसमधील सीन किंवा सिंगापूरची नदी. निसर्गप्रेमींना कदाचित आवडणार नाही मात्र शहरीकरण हे तथ्य आहे आणि बहुतेक झोपडपट्ट्या नदीजवळ बांधल्या जातात आणि कचरा आणि सांडपाणीही नदीतच सोडले जाते म्हणूनच नदीच्या काठांवर भिंत बांधल्यास त्यामुळे हानी कमी करता येईळ. या भिंतींच्या आत आणि नंतर नदीच्या पात्रात आपल्याला हरित पट्टा किंवा भाग तयार करता येईल. ठराविक कालावधीने आपल्याला देखभालीसाठी नदीच्या किंवा नाल्याच्या मुख्य पात्रात जाता यावे कारण मी बऱ्याच ठिकाणी पाहिले आहे की ज्याठिकाणी नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूने भिंती बांधण्यात आल्या आहेत तिथे नदीच्या पात्रात स्वच्छतेसाठी जेसीबीसारखी देखभालीसाठीची उपकरणे नेणे अशक्य होते!
दुसरा महत्वाचा घटक म्हणजे नैसर्गिक जलस्त्रोतांच्या आसपास वाढते शहरीकरण ज्यामुळे मातीची शोषून घेण्याची क्षमता कमी झाली आहे आणि जास्त पाऊस झाल्यास आपण ज्याला रनऑफ म्हणतो, पाणी थोड्याच कालावधीत या जलस्त्रोतांकडे येते ज्यामुळेच अचानक पुरसदृश परिस्थिती निर्माण होते. इथे प्रत्येक गृहनिर्माण संस्था आणि विकासकाने आपल्या गृह प्रकल्पांमध्ये पावसाच्या पाण्याचे जलसंधारण करावे आणि केवळ प्रकल्पाच्या परिसरात पडणारे पावसाचे पाणी झिरपवण्याचा प्रयत्न करावा. मोठी वाढणारी झाडे जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करावा, कारण त्यांची मुळे माती घट्ट धरुन ठेवतात आणि हीच माती पावसाचे पाणी धारण करते. नद्यांमध्ये सांडपाणी सोडणे ही देखील आणखी एक अतिशय चिंतेची बाब आहे कारण त्यामुळे नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या इतर प्रजातींच्या अस्तित्वावर थेट परिणाम होतो. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या पुरेशा प्रकल्पांची आवश्यकता आहे ज्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरच ते नद्यांमध्ये टाकले जाईल आणि यासाठी त्यानुसार धोरणे आवश्यक आहे.  
वाढती लोकसंख्या हा देखील आणखी एक महत्वाचा घटक आहे आणि सर्व वर्गातील लोकांना घरे पुरवण्याच्या आपल्या असमर्थतेमुळे ते केवळ नद्यांवरच नाही तर शहरातील जी मोकळी जागा आहे त्यावर अतिक्रमण करतात. कुठेतरी आम्ही विकासक म्हणून आणि यंत्रणाच केवळ या परिस्थितीसाठी जबाबदार आहे. या दृष्टीकोनातून आपले प्रकल्पांचे नियोजन करण्यासाठी आपले स्वयंप्रशासन हवे.

मला असे वाटते की, कुणाची जबाबदारी आहे हे पाहण्याऐवजी, नदीबाबत माझी काय जबाबदारी आहे असा विचार करु? त्यामध्येच बिचाऱ्या नदीसाठी काही आशा आहे!


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!


संजीवनीची सामाजिक बाजू!



हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा