Monday 8 August 2011

शहरातील रस्त्यावरून पायी चालताना (walk through the city)



 
 
 
तुम्हाला वेळ असेल तर कुठलंही अंतर पायी जाण्यासारखंच असतं.  ~स्टीव्हन राईट 

सध्या खांद्याला थोडीशी दुखापत झाल्यामुळे मी बॅडमिंटन खेळू शकत नाही आणि म्हणूनच रोज सकाळी माझ्या मित्रांसोबत चहा पिण्यासाठी माझ्या घरापासून वैशालीपर्यंत (माझ्या अनेक मित्रांना भेटायचं ठिकाण) चालत जातोय आणि खरंच चालणं किती मस्त अनुभव आहे! आपल्या जेष्ठांचं म्हणणं किती खरंय, की जर तुम्हाला एखादं शहर खरोखर जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या रस्त्यांवरुन चाला! अनेक वर्ष त्याच रस्त्यावरुन ये-जा करत असला तरी तुम्ही त्यावरुन चाललात तर आसपासच्या सगळ्याच गोष्टी किती वेगळ्या वाटतात. रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांचा रोजचा परिपाठ, पादचाऱ्यांच्या अडचणी अशा रस्त्यावरच्या अनेक लहान-सहान गोष्टी समजतात! रस्त्याच्या अगदी ४ किलोमीटरच्या टप्प्यातही नेहमीच्या गोष्टींसोबत रोज काहीतरी नवीन असतंच! त्यामुळेच असाच एकदिवस फेरफटका मारायला गेल्यावर काय झालं हे लिहायचा विचार केला...

आधी माझ्या घराजवळ म्हणजे पटवर्धन बाग, नदीजवळ १०० डीपी रस्ता, इथे शहरातील सर्वोत्तम पदपथ आहे, मात्र सालकलस्वार आणि पादचारी असे दोघेही तो वापरत असल्यामुळे त्यावर नेमका हक्क कुणाचा असा गोंधळ नेहमी होतो? म्हणजेच सायकलस्वारांनी वाट द्यावी की पाचदाऱ्यांनी! मात्र या मार्गावर बरेच चढ-उतार असल्यामुळे बहुतेक वेळा पादचाऱ्यांचा विजय होतो आणि सायकलस्वार मुख्य रस्त्यावरुन जाणेच पसंत करतात. लोक सायकलसाठीच्या मार्गाचा वापर का करत नाहीत असं कुतुहल मला वाटायचं आणि पायी चालताना त्याचं उत्तर मला मिळालं.

त्यानंतरचा पुढचा टप्पा कोथरुडमधला सर्वात गर्दीचा रस्ता म्हणजे मेहेंदळे गॅरेजचा रस्ता, या रस्त्यावर त्याच्या क्षमतेच्या कित्येक पट जास्त रहदारी असते, त्यामुळेच अनेक ठिकाणी पदपथ अतिशय लहान आहेत, काही ठिकाणी तर -४इतके लहान आहेत आणि त्यातही मध्येच एमएसईबीचे ट्रांसफॉर्मर, झाडे, बस थांबे असल्यामुळे पाचदाऱ्यांना किमान तेवढा टप्पा तरी रस्त्यावरुनच चालावं लागतं. मात्र या दोन्ही टप्प्यातली पादचाऱ्यांना दिलासा देणारी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तिथे किमान अतिक्रमण तरी झालेलं नाही. मेहेंदळे रस्ता पश्चिमेतील सर्वात गजबजलेल्या चौकाला येऊन मिळतो आणि तो ओलांडण्यासाठी जमीनीखालून एक रस्ता आहे. हा रस्ता खरोखर अतिशय सोयीचा आहे मात्र त्याच्या दोन्ही बाजूला दरवाजे आहेत आणि वॉचमन ते रात्री का बंद करुन ठेवतो हे माहिती नाही. त्यापैकी एक दरवाजा तुटला आहे आणि जेव्हा तुम्ही या रस्त्याने जाऊ लागता आणि दुसऱ्या बाजूला दार तुटल्यामुळे ते बंद करण्यात आल्याचं तुम्हाला समजतं तेव्हा खरंच त्रास होतो, आणि रस्ता ओलांडण्यासाठी पुन्हा वर जाऊन कर्वे रस्त्याच्या बाजूला जावं लागतं. दुसरी एक महत्वाची अडचण म्हणजे इथे ग्रानाईटच्या फरशा लावण्यात आल्या आहेत, त्या चांगल्या दिसतात याबद्दल शंका नाही, मात्र पावसाळ्यात त्या फार निसरड्या होतात. त्यामुळे अशा सार्वजनिक कामांचे प्रमाणभूत तपशील हवेत म्हणजे प्रत्येक व्यक्ति त्याच्या/तिच्या इच्छेप्रमाणे काम करणार नाही, हे मलाही असा अनुभव आल्यानंतर जाणवले.

त्यानंतर मी पुन्हा रस्त्यावरील एका मोठ्या पादपथावर आलो जो नळ स्टॉप ते म्हात्रे पुलाला जोडतो. इथे अजून स्थायी स्वरुपात अतिक्रमण झालेलं नाही मात्र अलिकडे बऱ्याचदा इथे सिग्नलपाशी भिकारी, फुल विक्रेते बसलेले असतात. हे लोक अंघोळीपासून खाण्यापर्यंत सर्व विधी पादपथावर करतात त्यामुळे या भागातून चालणे अशक्य होऊन जाते. रस्त्याच्या या भागात नेहमी पोलीस असतात मात्र त्या लोकांवर कोणीही आक्षेप घेत नाही आणि उपहास म्हणजे या रस्त्याला लागून असलेल्या चर्चच्या भितींवर एका कंपनीने संदेश रंगवलायहरित पुणे, स्वच्छ पुणे ”!  जाहिरात नक्कीच चांगली आहे, मात्र त्याच्यासमोर अगदी त्याच्या विरुद्ध चित्र दिसतं! हे लोक आपले सर्व विधी फुटपाथवर उरकतात त्यामुळे उरलेल्या अन्नापासून ते त्यांच्या सांडपाण्यापर्यंत सगळंकाही इथे पसरलेलं असतं! 
त्यानंतर कर्वे रस्त्याचा महान टप्पा येतो, जिथे रस्त्यावर सोनाराच्या दुकानाशेजारी खाण्याची दुकानं दिसून येतात. सकाळच्या वेळेत दुकानदार त्यांची दुकानं स्वच्छ करण्याच्या गडबडीत असतात आणि स्वच्छता करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणदे दुकानातील कचरा पदपथावर टाकून देणे!  त्याचप्रमाणे बसथांबेही पदपथावरच आहेत आणि रिक्षाचालक त्यांच्या ग्राहकांसाठी अगदी बसथांब्याजवळ वाट पाहतात त्यामुळे पीएमटीच्या बस बसथांब्यापासून थोड्या दूर उभ्या राहिल्याने मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते आणि त्यामुळे वाहनांमधून अधिक प्रदूषित वायू बाहेर पडतो आणि पादचाऱ्यांशिवाय या सगळ्याचा त्रास कुणाला सर्वाधिक होणार! कर्वे रस्त्यावरुन कितीतरी पोलीस, वाहतूक पोलीस जा-ये करत असतात मात्र पीएमटी बसची बसथांब्यावर कोंडी करणाऱ्या या रिक्षा चालकांची कुणीही दखल घेत नाही. बसही थोड्या आतल्या बाजूला का थांबू शकत नाहीत ज्यामुळे बससाठीही जागा राहील आणि पादचाऱ्यांनाही विना अडथळा चालण्यासाठी जागा मिळेल. अशा प्रकारची सोय विदेशात बहुतेक सगळीकडे दिसून येते. खाण्याची दुकानेही या कोंडीला तितकीच जबाबदार आहेत, कारण त्यांचे ग्राहक पदपथावर उभे असतात त्यामुळे चालण्यासाठी जी थोडीफार जागा उरली आहे ती अडवली जाते! ही दुकानं चालवणाऱ्यांना थोडी शिस्त लागू शकणार नाही का किंवा त्यांच्यामध्ये तसंच रस्त्यावर उभं राहून चहाचा आस्वाद घेणाऱ्या लोकांमध्ये पादचाऱ्यांविषयी थोडा आदर नाही का? हा प्रश्न मला नेहमी सतावत असतो.

त्यानंतर डेक्कन आणि एफसी रस्त्याचा टप्पा येतो. पुण्यात राहणारे लोक दिवसातून किमान एकदा तरी स्वतःच्या किंवा घरच्या कामासाठी या भागातून ये-जा करतात, त्यामुळे हा भाग नेहमी गजबजलेला असतो. इथले पदपथही गजबजलेले असतात, त्यावरच वाहने लावली जातात, कापड विक्रेते, पुस्तक विक्रेते, चांभार असं सर्व काही तुम्हाला इथे मिळेल आणि त्यामध्येच पादचारीही असतात! या पदपथावर नुकत्याच सिरॅमिकच्या टाईल्स लावण्यात आल्यात आणि पावसात त्यावरुन जी व्यक्ती यशस्वीपणे चालू शकेल तिला जिमनॅस्टिक्समध्येही भाग घेता येईल! वैशालीच्याच अलिकडे पदपथावर एक कचरापेटी सतत भरलेली असते, त्यामुळेच पादचाऱ्यांना एफसी रस्त्याच्या एका बाजूने येणाऱ्या गर्दीत उतरावे लागते. 

आपल्या देशातील सर्व महानगरांची अशीच परिस्थिती आहे. सार्वजनिक जागेवर करण्यात आलेले कायमस्वरुपी बांधकाम म्हणजेच केवळ अतिक्रमण करण्यात आले आहे असे नाही, हा भाग ज्या कारणासाठी बनवण्यात आला आहे त्यासाठी तो लोकांकरता मोकळा ठेवण्यात आला पाहिजे! हा विचार रुजला पाहिजे.
माझ्या संपूर्ण फेरफटक्यात मला किमान ७०% तरी पदपथावरुन खाली उतरुन चालावं लागलं. आपण आपल्या शहराबद्दल आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा आपण त्यावर मात करण्यासाठी विविध मार्गांबद्दल बोलतो. मात्र आपल्याकडे ज्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत त्यातून काय करता येईल यावर आपण लक्ष्य केंद्रित करायला हवं! एका शहाण्या माणसानं म्हणल्याप्रमाणे तुम्ही कुठेही चालत जाऊ शकता पण तुम्हाला कुठेही चालत जावेसे वाटले पाहिजे!
या सर्व गोष्टी मला माझ्या कारमधून अनुभवता आल्या नसत्या, त्यामुळेच मी माझ्या खाद्यांच्या दुखापतीचे आभार मानतो आणि मित्रांसोबत चहाचा आस्वाद घेण्यासाठी तयार होतो!

--
संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!


संजीवनीची सामाजिक बाजू!



हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा


No comments:

Post a Comment