Friday 14 October 2011

आपले शहर आणि आपल्या विकास योजना



 
 
 
महान शहारांमध्ये, जागा तसंच ठिकाणं नियोजन करुन बांधलेली असतात: सार्वजनिक ठिकाणी चालणे, पाहणे, हा जेवढा त्या नियोजनाचा भाग किंवा हेतू आहे तेवढाच आत राहणे, खाणे, झोपणे, तुमच्या पादत्राण्यांची देशभाल करणे, प्रेम करणे किंवा संगीत ऐकणे हा देखील त्याचा भाग आहे. नागरिक या शब्दाचा संबंध शहरांशी आहे आणि आदर्श शहर नागरिकतेभोवती आणि सार्वजनिक जीवनातील सहभागाभोवती रचलेले असते.”… रिबेका सॉलनिट.

महान नियोजक रिबेका सॉलनिट यांनी केलेले हे आदर्श शहराचे वर्णन आहे. पण जेव्हा आपण आपल्या प्रिय शहराचे वर्णन करतो तेव्हा या विषयाचा विविध अंगांनी विचार करण्यात आला आहे का? वर्तमानपत्रामध्ये आपण डीपी (डेव्हलपमेंट) म्हणजे विकास नियोजन हा शब्द अनेक वेळा दिसतो त्यामुळे अगदी पाच वर्षांच्या मुलापासून ज्याने नुकतीच वाचायला सुरुवात केली आहे, ते वयोवृद्धापर्यंत जो आता वाचन थांबवण्याच्या बेतात आहे त्या सगळ्यांना डीपी शब्द माहिती असतो! मात्र त्यापैकी किती जणांना त्याचा खरा अर्थ किंवा त्यामागचे कारण कळाले आहे? कुठल्याही शहरासाठी डीपी हा शब्द अतिशय महत्वाचा आहे कारण तो शहराचे भविष्य ठरवणार आहे. आता बरेच जण म्हणतील त्यात काय मोठसं, आपलं पुणे शहर कुठलंही विकास नियोजन नसताना भरभराटीला आलं नाही का, अशा सुविधा नसतानाही आयटी किंवा ऑटोमोबाईल कंपन्या इथे येणं थांबणार आहे का? उत्तर आहे हो!  ते लगेच थांबणार नाही मात्र शहराच्या विकासाची व्यवस्थित योजना नसताना, शहर अतिरिक्त भार सहन करु शकणार नाही आणि सांडपाणी, पाणी, रस्ते यावर अतिरिक्त ताण पडल्याने ही व्यवस्था कोलमडून पडेल! यापैकी रस्त्यावरील वाढलेल्या वाहनांसारख्या अनेक बाबींचा आपल्याच आधीच अनुभव येत आहे. आपण कितीही मोठे रस्ते बांधले तरीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले नाही आणि शहराचा विकास नियोजित पद्धतीने केला नाही तर खाजगी वाहनांसाठी रस्ते कधीही पुरेसे पडणार नाहीत! व्यवस्थित डीपी नसण्याचा आणि त्याचवेळी त्याची अंमलबजावणी न करण्याचा हा परिणाम आहे.
विकास नियोजन हे शहराचे भविष्य दाखवणाऱ्या आरशासारखे असते आणि त्यासाठी तुम्ही केवळ पीएमसीलाच दोष देऊ शकत नाही, कारण डीपी ही बहुआयामी बाब आहे. यामध्ये समजातील प्रत्यक घटकाचा समावेश असतो आणि त्याने योगदान देणे अपेक्षित असते. इथे मी तुम्हाला साधे उदाहरण देईन, काही वर्षांपूर्वी पीएमसीने पावसाच्या पाण्याच्या जलसंधारणाचे धोरण जाहीर केले आणि त्यासाठी सार्वजनिक सूचना मागवल्या . तुम्ही विचार करु शकता का, केवळ एक सूचना आली आणि ती सुद्धा क्रेडेई म्हणजेच तेव्हाच्या पीबीएपीकडून, जी पुण्याच्या बांधकाम व्यावसायिकांची संघटना होती! यातून सामान्य माणसाला या महत्वाच्या विषयाबद्दल फारसे काहीच माहिती नाही हे दिसून येते आणि शहरातील निकृष्ट राहणीमानाविषयी आपण एकमेकांना दोष देतो! सामान्य माणसाला याविषयी माहिती नसल्याबद्दल मी दोष देत नाही कारण त्यांना त्याविषयी कधीही माहिती देण्यात आलेली नाही! हे यंत्रणेचे अपयश आहे कारण विकास नियोजन करण्याची प्रक्रिया अधिक खुली करुन त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना समाविष्ट करुन घेणे हे तिचे प्रमुख काम आहे. अनेक स्वयंसेवी संस्था याविषयी जागरुक आहेत, ही सकारात्मक बाब आहे आणि डोंगर आणि बीडीपी आरक्षणाच्याबाबतीत आपण त्याचा परिणाम पाहिला आहे, आपल्या सार्वजनिक परिवहनाच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. मात्र विकास योजना म्हणजे डोंगर, रस्ते, सांडपाणी आणि पाणी याबाबतीतच असते का?

इथेच समस्येचा केंद्रबिंदू आहे; वरील अवतरणात शहराचे किती पैलू असतात ज्याच्या वैशिष्ट्यांमुळे ते शहर चांगले आहे किंवा वाईट आहे हे ठरवले जाते आणि आपण शहराच्या दर्जाच्या बाबतीत कुठे आहोत किंवा केवळ शहराचे काही पैलूच चांगले आहेत हे समजून घेण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे हे सांगितले आहे.  जेव्हा आपण म्हणतो पुणे वाढत आहे आणि ती भविष्यातील देशाची आयटी किंवा शैक्षणिक राजधानी होईल तेव्हा ते शहराच्या प्रत्येक आघाडीवर दिसून यायला हवे, त्यानंतरच आपल्याला स्वतःचा अभिमान वाटेल.

हिरवळ आणि सुरक्षिततेसोबत शहरामध्ये चांगल्या पायाभूत सुविधा हव्यात ज्यामुळे ते राहण्यासाठी एक चांगले शहर होईल. अशा सर्व गोष्टींचा विकास नियोजन करताना विचार होणे आणि नंतर त्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यापैकी काही मुद्द्यांवर आपण इथे चर्चा करणार आहोत आणि केवळ पुणेच नाही तर कुठलेही गाव, शहर किंवा महानगराचा विचार करतांना या विषयांचा विचार होणे आवश्यक आहे. रस्त्यांचे जाळे, पाणी किंवा डोंगर अशा महत्वाच्या विषयांशिवाय आपण पाच मूलभूत गोष्टींचा विचार करु आणि त्या आहेत खाजगी बस स्थानक, कचरापेट्या, सार्वजनिक शौचालये, माहिती केंद्रे आणि फटाक्याची दुकाने किंवा अगदी गणपती अथवा इतर सणांसाठी घातलेले मंडप अशी मोसमी केंद्रे!

शहराला उद्योगांसाठी कामगारांना घरापासून कामाच्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या खाजगी वाहनांची जुनी परंपरा आहे. टेल्को, बजाज यांनी सर्वप्रथम अशी सेवा सुरु केली आणि अनेक कॉल सेंटर्सपासून ते आयटी उद्योग आणि शाळेच्या बस अशी ही समांतर वाहतूक व्यवस्था आहे जी खाजगी तत्वावर चालवली जाते. मात्र त्यासाठी कुठलेही निश्चित थांबे किंवा प्रवाशांना घेण्यासाठी स्थानक नाही. याचा परिणाम म्हणून या बस कुठेही रस्त्यात मध्येच थांबतात त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. या वाहनांचे पार्किंग ही सुद्धा एक समस्या आहे. विकास नियोजनामध्ये त्यांचे महत्व लक्षात घेऊन त्यांचा विचार करणे आणि त्यांचा समावेश करुन घेणे आवश्यक आहे.

त्यानंतर येतात कचरापेट्या, कुठल्या ना कुठल्या स्वरुपात कचरा निर्माण करण्यामध्ये आपल्या सगळ्यांचाच सहभाग असतो मात्र कुणालाच त्यांच्या आवारात कचरापेटी नको असते. त्याचे कारण स्वाभाविक आहे ज्या पद्धतीने त्यांचे व्यवस्थापन केले जाते, त्यामुळेच बहुतेक कचरापेटया रस्त्यावर असतात किंवा पदपदाथाची जागा अडवतात. हे दृष्य आपण आजच नाही तर अनेक वर्षांपासून पाहतोय आणि कचरापेट्यांसाठी योग्य जागा शोधण्याची आणि या कचरापेट्या त्रासदायक न बनता त्या ज्यासाठी बसवण्यात आल्या आहेत तो हेतू पूर्ण होईल हे पाहण्यासाठी एक यंत्रणा बसवण्याची तीव्र गरज आहे. यासाठी आपण भूतकाळातील चुकांपासून शिकून त्यांचे नियोजन योग्य पद्धतीने करु शकतो.

केवळ महिलांसाठीच्याच नाही तर पुरुषांसाठीच्या सार्वजनिक शौचालयांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. अतिशय निकड असेल तेव्हाच शहाणा माणूस या अशा दर्जाच्या सुविधा वापरेल आणि इथेच या यंत्रणेचे अपयश आहे. त्यांची चुकीची रचना आणि खराब देखभाल यामुळे लोकांना त्यांच्या जवळपास ती नको असतात. आपण याबाबतीत जरा चाकोरीबाहेर विचार केला पाहिजे. दुबईमध्ये रेस्तराँ किंवा दुकान अशा प्रत्येक व्यावसायिक उपक्रमासाठी मग ते कितीही लहान असेल तरीही शौचालयाची सुविधा असणे आवश्यक आहे आणि ती सर्वांसाठी खुली असते. यामुळे जागा वाचते आणि सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीचा खर्च वाचतो. आपल्याकडच्या लोकसंख्येचा विचार करता हे आवश्यक आहे हे मान्य आहे मात्र ४ कोटींची लोकसंख्या असताना सार्वजनिक शौचालये किती आहेत याचा आपण विचार करायला हवा, हे गंभीर आहे, प्रत्येक शहराने आपल्या नागरिकांना देणे आवश्यक असलेल्या चांगल्या नागरी पायाभूत सुविधांमध्ये हा महत्वाचा घटक आहे.

तुम्ही कधीही सिंगापूरला गेलात तर आकर्षक रंगाची, स्वच्छ आणि स्वागत करणारी माहिती केंद्र ठिकठकाणी दिसतात जी पर्यटकांना किंवा अगदी नागरिकांनाही शहराविषयी आणि त्यांच्या सेवांविषयी आवश्यक असलेली माहिती देतात. काही दिवसांपूर्वी स्थानिक प्रशासनाने काही प्रमुख रस्त्यांवर अशी माहिती केंद्र उभारली मात्र ती दोन बाबतीत  अपयशी ठरली एक म्हणजे त्यांची संख्या अतिशय कमी होती आणि दुसरे म्हणजे ते भेट देणाऱ्यांना देत असलेल्या सुविधा. बहुतेक ठिकाणी पुरेसे कर्मचारी नव्हते किंवा साधने नव्हती आणि त्या केंद्रांमध्ये बाहेरच्या व्यक्तिला किंवा भेट देणाऱ्याला हवी असलेली माहिती नव्हती. तिथे इंटरनेट आणि शहरातील महत्वाच्या ठिकाणांबद्दल सर्व माहिती हवी विक्रीसाठीचे नकाशे व्यवस्थित मांडून ठेवलेले पाहिजेत, या केंद्रांवरही आपण शौचालयाची तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा देऊ शकतो. विकास योजनेमध्ये शहरात सर्वत्र अशा केंद्रांची सोय हवी.

पुणे हे अतिशय सामाजिक आणि सांस्कृतिक शहर आहे आणि हाच या शहराचा कणा आहे! याच कारणामुळे शहरात वर्षभर विविध सार्वजनिक उपक्रम होत असतात मग तो गणेशोत्सव असो, रमझान , दुर्गापूजा किंवा श्रावणातली पुंढरपूरची वारी, सर्व सणांना अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. गणपतीचे दिवस आले की त्यांचे मंडप आणि त्यामुळे रस्तावरील लोकांना होणारा त्रास यावर चर्चा सुरु होते. दिवाळीच्या फटाक्यांच्या दुकानांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे, ही दुकाने पदपदावर आणि रस्त्यांवर दसऱ्यापासूनच अतिक्रमण करतात. आता अनेक वर्षांच्या अनुभवातून आपल्याला ही दुकाने काही काळासाठी उभारली जातात हे माहिती आहे मग आपण त्यांना कायमची एक जागा का देत नाही त्यामुळे त्यांना त्याची जागा निश्चित करण्यात अडचण येणार नाही आणि दरवर्षी हा त्रास होणार नाही? प्रत्येक वर्षी शेकडो दुकाने म्हात्रे पुलाजवळच्या नदीजवळच्या रस्त्यावर थाटली जातात, यामुळे केवळ या रस्त्यावर प्रवास करणेच अवघड होत नाही तर सुरक्षिततेच्या दृष्टीने फटाक्यांसारखे स्फोटक पदार्थ उघड्या रस्त्यावर विकणे धोकादायक आहे!

असे अनेक लहान मुद्दे जेव्हा आपण एकत्र मांडतो तेव्हा त्यांची एक मोठी समस्या बनते आणि इथेच नियोजनाची भूमिका महत्वाची असते म्हणजे लहान समस्यांचा आधी विचार करुन त्यांना अधिक मोठे बनू न देणे आवश्यक असते. असे झाले तरच आपले भविष्य आनंदी आणि आरोग्यपूर्ण असेल. शहरासोबतच लोकसंख्या वाढतेय आणि समस्याही आणखी वाढत जातील म्हणूनच विकास नियोजन शहरासाठीच नाही तर शहरातील प्रत्येक नागरिकासाठी महत्वाचे आहे. म्हणूनच आपण याबाबतीत जागरुक होऊन आपले मत व्यक्त केले पाहिजे. तरच आपल्याला आदर्श नागरिक असल्याचा, आपल्या शहराचा अभिमान वाटेल.

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स
एन्व्हो-पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारसरणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!

संजीवनीची सामाजिक बाजू!
http://www.flickr.com/photos/16939159@N05/sets/72157626002106936/

शहराविषयीच्या तुमच्या कुठल्याही तक्रारींसाठी, खालील लिंकवर लॉग-ऑन करा
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx

हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा

www.sanjeevanideve.com
     

No comments:

Post a Comment