Saturday 12 November 2011

आदर आणि रिअल इस्टेट



 

तुम्ही तुमच्या देशातील नागरिकांचा विश्वास गमावल्यानंतर त्यांचा आदर आणि सन्मान कधीच परत मिळवू शकत नाही.... अब्राहम लिंकन
     एवढ्यात मी आमच्या एका सहकाऱ्याचा लेख वाचला, त्याने अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला होता, तो म्हणजे समाजाचा बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांबद्दलचा दृष्टीकोन! समाज बांधकाम व्यावसायिकांकडे शत्रूत्वाच्या भावनेने का पाहतो, मित्रत्वाच्या भावनेने का पाहू शकत नाही! मला खात्री आहे की बरेच जण यावर नाक मुरडतील आणि म्हणतील की पहा तुमच्या व्यवसायाने कसा नावलौकिक मिळवला आहे! याविषयी दुमत नाही की बहुतेक लोकांना बांधकाम व्यवसायातला पैसा किंवा प्रसिद्धी आवडते, मात्र त्यासोबत येणारी धूळ नको असते. कुणीही व्यावसायिक अभिमानाने म्हणू शकत नाही की मी बांधकाम व्यावसायिक आहे आणि तो तसे म्हणाला तरी समाज त्यांना इतर व्यवसायांना किंवा पेशांना दिला जाणारा आदर देत नाही हे सत्य आहे! काही कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून समाज आणि बांधकाम उद्योगात सौहार्द राहिलेले नाही आणि मी त्यासाठी समाजाला दोष देणार नाही. बऱ्याच सहकाऱ्यांना हे विचार आवडणार नाहीत मात्र जे सत्य आहे त्यापासून पाठ फिरवूनही, सत्य बदलणार नाही!
     नारायण मूर्ती, अझिम प्रेमजी, टाटा आणि अगदी मुकेश अंबानी, सुनील मित्तल आणि मी बिल गेट्स वगैरे इतर देशातल्या लोकांची नावेही घेत नाही ही यादी अतिशय मोठी आहे! आदर मिळवण्यासाठी तुम्ही माहिती तंत्रज्ञान उद्योगाशी संबंधितच असायला हवे असे नाही, बजाज आणि महिंद्रा ही ऑटो उद्योगातील नावे आहेत आणि हॉटेल उद्योगात ओबेरॉय यांचे नाव आहे. समाजाच्या नजरेत केवळ त्यांनाच नाहीत तर त्यांच्या व्यवसाय/पेशालाही आदर मिळालेला आहे, जो बांधकाम व्यवसायातील लोकांना मिळालेला नाही. या लोकांनी जे मिळवले ते कसे मिळवले याचे बांधकाम उद्योग म्हणून आपण मूल्यमापन केले पाहिजे. बांधकाम उद्योगाला, उद्योगाचा दर्जा मिळालेला नाही, घरांची कमतरता असताना, हा उद्योग देशातील लाखो लोकांना घरे पुरवतो. भारतामध्ये दुसरी कुठलीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी घर खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते आणि ते खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते! प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रम कौन बनेगा करोडपती पाहिला, तर अमिताभ बच्चनने स्पर्धकांना जिंकलेल्या रकमेचे काय करणार असे विचारल्यानंतर ९०%  लोकांनी कुटुंबासाठी घर खरेदी करणार असे उत्तर दिले! कुणीही बक्षिसाच्या रकमेने कार किंवा आय-फोन किंवा लॅपटॉप खरेदी करणे किंवा पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणे असे उत्तर दिले नाही! घरे बांधण्यासोबतच बांधकाम उद्योग पायाभूत सुविधांनंतर रोजगार देण्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि मिस्त्री, फिटर यासारख्या अनेक लहान पातळीवरील उद्योगांना चालना देतो, ही यादी आणखी मोठी आहे.
      या उद्योगाच्या उत्पादनांना एवढी मागणी आहे मात्र या उद्योगातील लोकांबद्दल इतका कमी आदर का! “बात कुछ हजम नही हुई!” विनोदाचा भाग सोडला तर ही केवळ घरमालक किंवा शासनकर्ते किंवा उद्योगाशी संबंधित लोकांची बाब नाही. अभियांत्रिकीच्या स्थापत्यशास्त्र विभागातील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा त्याला कशात करियर करायचे आहे, तो कधीही बांधकाम कंपनी सुरु करायची आहे असे उत्तर देणार नाही! तो पायाभूत सुविधा, किंवा सल्लागार कंपनी किंवा संगणक क्षेत्रात जाईल. वास्तुविद्येच्या नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या गुणवान विद्यार्थ्याला विचारा, त्याला मोठ्या सार्वजनिक इमारतींची किंवा रिसॉर्टची रचना करायची असते मात्र एखाद्या बांधकाम व्यवसायिकासोबत काम करुन मध्यम वर्गासाठी गृहनिर्माण वसाहतीची रचना करायची नसते. बांधकाम व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कुठल्याही कर्मचाऱ्याला विचारा ते कुठे काम करतात, टेल्को किंवा विप्रो, किंवा पर्सिस्टंट किंवा इन्फोसिस यासारख्या कंपनीत काम करतो हे सांगण्यामध्ये लोकांना जो अभिमान वाटतो तो एका बांधकाम कंपनीत काम करतो हे सांगायला वाटत नाही! तुम्हाला जर असे वाटत असेल की मी अतिशयोक्ती करतोय तर तसे नाही हे मी स्वतः अनुभवले आहे. काही वर्षांपूर्वी मी दिल्लीमध्ये पर्यावरण विषयक परिषदेत माझ्या कंपनीचे प्रतिनिधित्व करत होतो, स्वागत कक्षातील मुलीने माझा तपशील विचारला आणि जेव्हा मी सांगितले की मी बांधकाम व्यावसायिक आहे तिने मला दारुबंदी मोर्चामध्ये विजय माल्यांना पाहिल्यानंतर व्हावा तसा चेहरा केला! एक बांधकाम व्यावसायिक पर्यावरण विषयक परिषदेत सहभागी होतोय अशी तिची प्रतिक्रीया होती! पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासाठी मी जबाबदार आहे मग मला अशा परिषदेला का बोलावण्यात आले आहे! अर्थात या घटनेला बरीच वर्ष झाली तरी तिची प्रतिक्रीया मला अजूनही आठवते आणि म्हणूनच मी जेव्हा सहकाऱ्याचा तो लेख वाचला मला जाणीव झाली की वर्ष सरली असली तरी समाज आणि बांधकाम व्यवसायातील लोकांमधली दरी वाढत आहे. आता ती कमी करायची वेळ आली आहे, त्यासाठी बांधकाम उद्योगातील लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत कारण त्यांची प्रतिमा धोक्यात आहे.
     अनेक वर्षांपासून बांधकाम उद्योगातील लोक त्याला उद्योगाचा दर्जा देण्याची सतत मागणी करत आहेत मात्र सरकारने या मागणीकडे कानाडोळा केला आहे. कुठेतरी याचे कारण आहे की सामान्य माणसाच्या नजरेत या उद्योगाची प्रतिमा आदराची नाही त्यामुळे या मागणीने सरकारला पुरेसे हलवलेले नाही. उद्योगाचा दर्जा मिळण्यासाठी इतर उद्योगांसारखीच प्रतिके आपल्याकडे पाहिजेत, मात्र ती खरोखरच हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच आहेत, म्हणूनच आपण जेव्हा वर्तमानपत्र उघडतो तेव्हा “नव्या मुख्यमंत्र्यांनी बांधकाम व्यावसायिकांना मंत्रलयात प्रवेश करण्यास मनाई केली” अशा बातम्या वाचायला मिळतात. आम्ही गुन्हेगार आहोत का मग आम्हाला मंत्रालयासाख्या सार्वजनिक जागेत प्रवेश करण्यास कशी मनाई केली जाते? मुकेश अंबानी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात गेले तर त्याची बातमी होते, किंवा एखादा उद्योगपती मुख्यमंत्री किंवा उच्च पदावरील अधिकाऱ्यास भेटायला गेला ही बातमी होते. याचे कारण ते समाजाच्या विकासाबाबत किंवा तत्सम विषयाबाबत चर्चा करायला आले असतात, मग बांधकाम व्यावसायिक जे खरोखर समाजाचा विकास करतात त्यांच्याबाबत असे का होत नाही. याचे कारण आहे लोकांचा असा विश्वास आहे की बांधकाम व्यवसायातील लोक समाजाच्या फायद्यासाठी नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी या लोकांना भेटतात! कुठलाही व्यवसाय केवळ एका पक्षाचा फायदा होत असेल तर टिकणार नाही आणि दुर्दैवाने बांधकाम व्यावसायिकांना केवळ स्वतःच्याच फायद्यात स्वारस्य असते या भावनेमुळे लोक बांधकाम व्यवसायाला आदर देत नाहीत तर शंकेने पाहतात. आपण सामान्य माणसाचा विश्वास गमावलाय आणि म्हणूनच आपण चांगल्या भावनेने काही करायला गेलो तरी ते फेटाळले जाते. उदा. पुण्यातील बीडीपी म्हणजे डोंगरांच्या बाबतीतला मुद्दा, माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही बांधकाम व्यावसायिकाने अधिकृतपणे डोंगरावर बांधकाम केलेले नाही. जुन्या मर्यादेनुसारही डोंगर माथा आणि डोंगर उतारावर ४% एफएसआयला परवानगी होती, मात्र तिथे आधीपासूनच झोपडपट्टी होती, तरीही बीडीपीच्या मुद्याविषयी बांधकाम व्यासायिकांकडेच बोट दाखवले जाते! विनोद म्हणजे कुणाही बांधकाम व्यावसायिकाने त्याविरुद्ध आवाज उठवलेला नाही! आरोप चुकीचे असले तरी त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हिम्मत हवी आणि ती स्वतःच्या वर्तनातूनच मिळेल. मला वाटते आपल्या वर्तनाचे विश्लेषण करणे ही काळाची गरज आहे. पीबीएपी आणि एमबीव्हीपी सारख्या संघटना आहेत मात्र हे क्षेत्र अतिशय असंघटित आहे आणि शेकडो लहान व्यावसायिक या संघटनांचे सदस्य नाहीत. हा विषय केवळ पुणे शहरापुरता मर्यादित नाही, तो देशातल्या सर्व शहरांमधील बांधकाम व्यवसायाच्या विकासाशी संबंधित आहे. तुम्ही दोन ऑटो उद्योगांमध्ये फारसा फरक करु शकत नाही मात्र ज्या पद्धतीने हा उद्योग कार्य करतो त्यामुळे देशात सर्वत्र समाजाच्या नजरेत त्यांना समान आदर मिळतो.

     बांधकाम उद्योगासाठीही आपल्याला हेच मिळवायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला मुळापासून सुरुवात करायची गरज आहे. सीआरईडीआय ही बांधकाम क्षेत्रातील लोकांची राष्ट्रीय पातळीवरची संघटना आहे मात्र त्याशिवाय प्रत्येक विकासकाने स्वतः सुधारणा घडवून आणण्याचा दृष्टीकोन ठेवायला हवा. कुठलीही संस्था त्यामध्ये कशा प्रकारचे लोक असतात त्यावर अवलंबून असते आणि ते त्यांच्या वर्तनाने संपूर्ण उद्योग सुधारण्यास मदत करतात. इथे व्यवसाय म्हणजे केवळ पैसा कमावणे नाही तर त्याही पलिकडे जाण्याची आणि चांगल्या गोष्टी संपूर्ण समाजासोबत वाटण्याची गरज आहे. याचा अर्थ केवळ घरांच्या किंमती कमी करणे किंवा परवडण्यासारखी घरे पुरवणे असा होत नाही. तर एक बळकट समाज निर्माण करायला मदत करणे आणि समाजातील गरजूंपर्यंत पोहचण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणे असा अर्थ होतो. सामाजिक आघाडीवर असो, क्रीडा, संस्कृती, शिक्षण किंवा सार्वजनिक आरोग्य, देशात अनेक क्षेत्रामध्ये कमतरता आहे आणि बांधकाम व्यवसायातील लोक त्यांच्याकडील साधन संपत्तीद्वारे त्यातील बरीचशी दरी कमी करु शकतात. पारदर्शक व्यवहार, आश्वासनांचे पालन या आपण आपल्या ग्राहकाला देऊ शकू अशा अतिशय मूलभूत गोष्टी आहेत, आणि याचसाठी केवळ व्यवसाय न करता समाजाच्या इतर घटकांसाठी कार्य करणे आवश्यक आहे.
     समाज हा आपल्या कार्याचा आरसा आहे! आपण संशयास्पद काम करत असू तर आपल्याकडे त्याच नजरेने पाहिले जाईल आणि आपण विश्वासाने काम करत असू तर आपल्याकडे विश्वासाने पाहिले जाईल! आपण हे समजून घेतले आणि त्यानुसार कार्य केले तर बांधकाम व्यवसायालाही लवकरच आदर मिळेल. कारण बेघर कुटंबाला घर देण्यासारखे काम नाही, जी आपल्या देशातील एक मुख्य गरज आहे. स्वतःच्या घरामुळे व्यक्तिचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याचे परिणाम सर्वपातळीवर दिसून येतील कारण सर्वजण देशाच्या भल्यासाठी काम करतील आणि आपल्याला यापेक्षा अधिक काय पाहिजे!


संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे
संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!
संजीवनीची सामाजिक बाजू!

No comments:

Post a Comment