Monday 26 September 2011

शेगाव व वनी आपली धार्मिक स्थळे !





















तुम्ही कितीही धार्मिक पुस्तकं वाचली, त्याविषयी बोललात, तरी तुम्ही ती प्रत्यक्ष कृतीत आणली नाहीत तर त्यांचा तुम्हाला काय उपयोग?- गौतम बुद्ध

धार्मिक स्थळांना भे देण्याच्या बाबतीत मी काही फारसा भाविक वगैरे नाही. असं म्हणतात की तुमचा योग असेल तर त्या िकाणाहून तुम्हाला बोलावणं येतं आणि सगळ्या गोष्ी अनुकूल घडतात. असाच एक अनुभव मला नुकताच आला जेव्हा मी एकाच आवड्यात दोन धार्मिक स्थळांना भेट दिली. या दोन्ही स्थळांमधलं अंतर भरपूर होतं, हा अनुभव मला तुम्हाला सांगावासा वाटतोय! दोन्ही ठिकाणांचं भक्तगणांसाठी विशेष महत्व आहे आणि दररोज हजारो लोक परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी इथे येतात. एक आहे शेगाव जे संत गजानन महाराज यांच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि दुसरं आहे वणी जे अर्धे शक्तिपीठ आणि सप्तश्रृंगी देवीचे निवासस्थान मानले जाते.

पुण्याच्या तुलनेत विचार करायचा झाला तर शेगाव हे विदर्भातलं एक लहानसं, पाण्याचं दुर्भिक्ष आणि गरीबी असलेलं गाव आहे. इथे भेट देणाऱ्यांपैकी बरेच जण गरीब असतात आणि गेल्या काही वर्षांपर्यंत इथे सार्वजनिक सोयी सुविधा फारशा नव्हत्या. मात्र इथल्या मंदिराच्या विश्वस्त मंडळाने जागेचा कायापालट केला आहे, त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव घेण्यासाठी या जागेला भेट द्यायला हवी. शिर्डी किंवा तिरुपतीसारखं हे देवस्थान श्रीमंत नाही, तरीही त्यांना भक्तांकडून जे मिळेल त्याची पै-पै तिथल्या सुविधांसाठी वापरण्यात आली आहे. सर्वप्रथम त्यांनी बस आणि रेल्वे स्थानकापासून भाविकांना नेण्यासाठी मोफत वाहतूक व्यवस्था पुरवली आहे. बहुतेक लोक हे इथे बस किंवा रेल्वेने येतात, आधी रिक्षावाले आणि खाजगी वाहनचालक पर्यटकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे मागायचे आणि पर्यटकांसमोर ते पैसे देण्यावाचून काही पर्याय नसायचा कारण हातात सामान घेऊन २-३ किलोमीटर चालणे शक्य नसायचे. आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाची या बससेवेमुळे अतिशय चांगली सोय झाली आणि ही सेवा थोड्या-थोड्या वेळाने दिवस-रात्र सुरु असते. मंदिर तुमच्यासाठी काय करतंय याची एक झलक इथेच तुम्हाला मिळते.
निवासाची गरज लक्षात घेऊन मंदिराच्या विश्वस्तमंडळाने मंदिराच्या भोवताली भक्तनिवासाच्या स्वरुपात शेकडो खोल्या बांधल्या आहेत आणि त्या भक्तांना अतिशय नाममात्र दरात उपलब्ध करुन दिल्या जातात. त्या फार आरामदायक नाहीत मात्र त्या राहण्यायोग्य आहेत आणि त्यामुळे गरज पूर्ण होते. याठिकाणी केवळ ४०/- रुपये दराने थाळी दिली जाते ज्यामुळे भाविकांचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात आणि शेगावसारख्या लहान ठिकाणी मिळणारे हे सर्वोत्तम जेवण आहे! मंदिराच्या आवारात आरोग्य सुविधाही उपलब्ध आहे, त्यामुळे भाविकांना काही आरोग्य समस्या असेल तर तिचा लाभ घेता येतो. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयांची सोय करण्यात आली आहे, जी आपल्या देशात अपवादानेच दिसते. ही शौचालये अतिशय स्वच्छ असून त्यामध्ये पुरेसे पाणीही उपलब्ध असते. भक्तनिवासाच्या प्रत्येक मजल्यावर गरम पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे, त्यामुळे भाविकांना बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत नाही. प्रत्येक ठिकाणी मंदिराचे विश्वस्त मंडळ भक्तांची काळजी घेते आणि त्यासाठीच शेगाव मंदिर संस्थान वैशिष्टपूर्ण ठरते.

देवस्थानाने ४०० एकर जागेवर “आनंदसागर” नावाची विस्तीर्ण बाग तयार केली आहे, तिलाही आवर्जून भेट द्यावी कारण तिचे वर्णन शब्दात करता येणार नाही. ही बाग भक्तांना ध्यान किंवा साधना करण्यासाठी आहे. अनेक वर्षांपासून पडलेल्या या ओसाड जमीनीवर अक्षरशः जादू करण्यात आली आहे. आता ते सर्व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे, त्यातून उत्पन्नही मिळते आणि मंदिराला भेट दिल्यानंतर इथे भेट देणे सार्थ ठरते. बागेमध्ये मंदिरे, तलाव, झरे,
महाराष्ट्राची सांस्कृतिक तसेच आध्यात्मिक प्रगती करणाऱ्या विविध संतांचे पुतळे, विस्तीर्ण मोकळी जागा आणि भरपूर हिरवळ आहे. पाणी आणि हिरवळ यांची कमतरता असलेल्या विदर्भात ही जागा म्हणजे अनेक जीव आणि वनस्पती यांचे निवासस्थान आहे. बागेत, भक्तनिवासात आणि मंदिरामध्येही निवासाच्या सोयीविषयी माहिती आणि महत्वाच्या ठिकाणांसाठी रेल्वेचे वेळापत्रक लावण्यात आले आहे. यातून मंदिर, पर्यटकांची किती काळजी घेते हे दिसून येते. आपल्या देशात पर्यटकांना व्यावसायिक पद्धतीने सोयी दिल्या जात नाहीत तेव्हा अशा सोयी पाहिलं की खूप बरं वाटतं.या सर्वात आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे तिथली स्वच्छता! समाजाच्या सर्व स्तरातील हजारो लोक इथे भेट देतात मात्र तुम्हाला कचरा क्वचितच पहायला मिळतो! स्वयंसेवकांचा एक गट इथे सतत स्वच्छता करण्यात गुंतलेला असतो आणि सर्व कचरापेट्या लगेच स्वच्छ केल्या जातात. लोकांचे तंबाखू आणि पानाविषयीचे प्रेम पाहता इथे तंबाखू किंवा पानाच्या पिचकाऱ्यांचे एकही डाग दिसत नाहीत हे उल्लेखनीय आहे. प्रशासकीय संस्थेने मनावर घेतले तर ती किती चांगले काम करु शकते हे केवळ इतर मंदिरेच नाही तर नगरपालिका आणि खाजगी क्षेत्रही, इथून शिकू शकतात! मला असं वाटतं इथल्या स्वच्छतेचा अनुभव घेण्यासाठी शेगाव मंदिराला भेट दिली पाहिजे! इथे आढळणारी आणखी एक अपवादात्मक बाब म्हणजे शेवगावमध्ये प्रवेशासाठी कुठलाही कर नाही किंवा पथकर नाही.
या पार्श्वभूमीवर मी जेव्हा नाशिक जवळच्या आणखी एका महत्वाच्या देवस्थानाला, वणीला भेट दिली तेव्हा प्रचंड फरक जाणवला. तिथे रस्ता दाखवणाऱ्या कुठल्याही खुणा नव्हता, मंदिर डोंगरावर आहे त्यामुळे पायथ्यापासून डोंगरावर मंदिरापर्यंत जाण्यासाठी खाजगी वाहनाने किंवा चढून जावे लागते. वणी देवस्थानाचा पूर्ण आदर राखून सांगावेसे वाटते की सगळीकडे कचरा, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी असे दृश्य दिसते. येणाऱ्या पर्यटकांसाठी पार्किंग, निवास किंवा शौचालयांचीही सोय नाही. राहण्याची जी काही थोडीफार सोय उपलब्ध आहे त्यामध्ये सांडपाण्याची नीट व्यवस्था नाही, गटारे उघडी आहेत. गर्दीच्या वेळी पाणी मिळणे अवघड होते कारण पाणी पुरवठ्याचा कायमचा स्त्रोत नाही, एवढ्या सगळ्या गैरसोयींनंतर आपल्याला प्रवेशासाठी कर भरावा लागतो तेव्हा आपण हा का देत आहोत असा विचार येतो?
आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे नैसर्गिक स्त्रोतांचा वापर, शेगावमध्ये भक्तनिवासापासून ते आनंदसागरपर्यंत पाणी उकळण्यासाठी सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यात आली आहे कारण या परिसरात सौर ऊर्जा मुबलक उपलब्ध आहे. वणीमध्येही पवन ऊर्जेचा वापर करण्याचा विचार केला जाऊ शकतो कारण हे ठिकाण उंचावर आहे. आपण तिथे देवीच्या दर्शनासाठी जातो हे मान्य असले तरी भाविकांच्या भावनांचा पूर्ण आदर राखून एक प्रश्न विचारावासा वाटतो जर शेगावमध्ये हे शक्य होऊ शकते तर वणीमध्ये का नाही? एक चांगली बाब म्हणजे वणी देवस्थानाला परिस्थिती बदलायची आहे आणि त्यासाठी ते कृती आराखडा तयार करत आहेत, म्हणून इच्छा आहे तेथे मार्ग आहे!

मी नुकताच एक अहवाल वाचला की महाराष्ट्रात गेल्या वर्षी ५ कोटी पर्यटकांनी भेट दिली आणि त्यापैकी बहुतेक भाविक होते आणि आपण त्यांना काय सुविधा दिल्या हे पाहिले तर त्यांच्या मनात आपल्या धार्मिक स्थळांची कशी प्रतिमा निर्माण झाली असेल याचा विचार करायला हवा! शेगाव आणि वणी या दोन्ही ठिकाणी स्थानिक प्रशासकीय संस्था, मंदिर व्यवस्थापनाच्या तुलनेत निष्क्रिय आहेत. शेगावमध्येही व्यवस्थित रस्ते किंवा रेल्वे अथवा बसस्थानकापासून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशा दाखवणारे फलक नाहीत, पार्किंग सुविधा किंवा सुसज्ज माहिती केंद्र या फारच दूरच्या गोष्टी झाल्या. वणीला जाताना घाटातील रस्ता चांगला करण्यात आला असला तरी अजूनही बरीच सुधारणा करायची गरज आहे आणि ही केवळ स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. शेगावमध्ये मंदिर व्यवस्थापन मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करते मात्र मंदिराच्या आवाराबाहेर वणीसारखीच किंवा राज्यातील इतर ठिकाणांसारखीच परिस्थिती आहे. याबाबत कुणी काही बोलत नाही किंवा तक्रार करत नाही याचं वाईट वाटतं! बऱ्याच लोकांना असं वाटतं की दर्शन घेताना कष्ट झाले तर अधिक पुण्य मिळतं मात्र आपण विसरतो की देवाला सुद्धा अशा परिस्थितीत रहायला आवडणार नाही आणि विशेषतः ती मानवनिर्मित असेल तर अजिबात नाही!

महान बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे दानपेटीमध्ये दान करण्याऐवजी किंवा अभिषेक करण्याऐवजी प्रत्येक पर्यटकाने आपला वाटा उचलला पाहिजे तरच आपल्या प्रार्थनेला अर्थ असेल आणि ती देवापर्यंत पोहोचेल!


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

      

Friday 23 September 2011

अविस्मरणीय कोकण (Konkan, fogotten treasure! )



 
 
 
आपण सौंदर्य शोधण्यासाठी जगभर प्रवास केला, तरी ते आपण स्वतःपाशीच बाळगलं पाहिजे किंवा त्याचा शोध घेऊ नये.....राल्फ वॅल्डो इमर्शन

काही वेळा तुम्ही थोडे अनिच्छेने सुटीवर जाता आणि तो तुमच्यासाठी सर्वोत्तम विरंगुळा ठरतो, जो  भरपूर नियोजन करुनही मिळाला नसता! माझ्या बॅडमिंटनच्या ग्रूपसोबत नुकत्यात झालेल्या कोकण सहलीत मला असाच अनुभव आला. मी जंगलप्रेमी आहे आणि मला मोकळा वेळ मिळेल तेव्हा सुटीमध्ये बहुतेकवेळा जंगलात गेलो आहे. त्यामुळे जेव्हा कोकणाची सहल आयोजित करण्यात आली तेव्हा मी फारसा उत्सुक नव्हतो, कारण तिकडे काय बघायचं असा माझा दृष्टीकोन होता. मला मान्य आहे की माझ्या या प्रश्नावर बरेचजण नाक मुरडतील मात्र एका मद्याच्या जाहिरातीत विचारलेल्या हॅव आय मेड इट लार्ज या प्रश्नाप्रमाणे माझं मन प्रश्न विचारत होतं  खरोखरच तिथे जायलाच हवं का?" मात्र मला माझ्या अपेक्षेच्या उलट अतिशय चांगला अनुभव आला, तिथे केवळ एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा भेट देण्यासारखे आहे, पण तिथल्या मूलभूत सोयी सुविधांविषयी मला वाईट वाटलं. सरकारी निरुत्साह, तसंच निसर्ग सौंदर्याच्या या खाणीकडे स्थानिक प्रशासनाच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्याला म्हणावी तशी चालना मिळत नाही!
आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये उतरलो होतो ते अलिबाग ते मुरुड या समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या रस्त्याला लागून होतं आणि ते इको-सॅव्ही (निसर्गास पूरक) असल्याचा दावा करतं. हा पूर्ण रस्ता किनाऱ्याला लागून आहे आणि या किनाऱ्यांना लागून असलेली सर्व संपत्ती खाजगी मालकीची आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या रांगा आणि दाट जंगल आहे. हिरवाईच्या विविध छटांमध्ये एका डोंगरावर हे रिसॉर्ट वसलेले आहे. इथल्या बहुतेक मालमत्ता खाजकी मालकीच्या असलेल्यामुळे त्या भागातल्या समुद्र किनाऱ्यांवर  सामान्य लोकांना जाता येत नाही. याचे फायदे तसेच तोटेही आहेत. फायदा म्हणजे हे समुद्र किनारे जनतेसाठी खुले नसल्याने ते तुलनेने बरेच स्वच्छ आहेत मात्र त्याचवेळी तोटा म्हणजे ते केवळ पाहुणे आणि पर्यटकांपुरतेच मर्यादित राहतात! पूर्ण सहलभर मी इको-टुरिझम आणि सरकारने त्याविषयी केलेल्या घोषणेविषयी कुठे काही बघायला मिळतंय का हे बघत होतो. कारण याविषयी वृत्तपत्रांमध्ये आणि प्रसिद्धीमाध्यमांमध्ये बरंच काही वाचलं होतं आणि पाहिलं होतं. पण दुर्दैवानं मला त्याची झलकही पहायला मिळाली नाही त्यामुळे इको-टुरिझमचा प्रयोग पाहणं तर लांबच राहिलं! आपण आपल्याकडे पर्यटन विभाग असल्याचं म्हणतो मात्र त्या विभागाविषयी पूर्ण आदर बाळगून मला असं सांगावसं वाटतं की ते कुठे कमी पडताहेत हे त्यांना माहिती नाही! सर्वात महत्वाची अडचण म्हणजे  रस्तांची वाईट परिस्थिती, पुणे ते अलिबाग-काशिद हा रस्ता १५०  किलोमीटरपेक्षा अधिक नसावा आणि तेवढं अंतर पार करायला आम्हाला साडेचार तासांहून अधिक वेळ लागला, आणि सतत गाडीचं काहीतरी नुकसान होईल ही टांगती तलवार होतीच. सुस्थितीतील रस्ते ही पर्यटनाची अतिशय मूलभूत आणि प्राथमिक गरज आहे हे आपण बहुतेक विसरले आहोत. जेव्हा लोकांनी आपल्याला भेट द्यावी असे आपल्याला वाटते तेव्हा त्यांचा तिथपर्यंतचा प्रवास सोपा आणि कमीत कमी त्रासाचा व्हावा, याचा इथे विचार झालेला दिसत नाही. तुम्हाला जिथे जायचे आहे त्या रस्ताचे मार्गदर्शन करणारे फलक दिसत नाहीत, तुम्ही त्या ठिकाणी काय काय पाहू शकाल याविषयी काहीही माहिती उपलब्ध नाही. तुम्हाला स्थानिकांचा सल्ला किंवा तिथे आधी जाऊन आलेल्या एखाद्या व्यक्तिचे मत यावरच अवलंबून रहावे लागते. आपण अशा प्रकारची माहिती व्यवस्थित नकाशासहित देणारी केंद्रं रस्त्यावर ठिकठिकाणी का सुरु करु शकत नाही? त्यामुळे पर्यटकांना होणारा बराचसा त्रास कमी होईल. युरोप किंवा अमेरिकेमध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी प्रसाधनगृह, पेट्रोल पंप, उपहारगृह असतात, तशाच प्रकारे आपल्याकडे असावं अशी मी अपेक्षा करत नाही, मात्र किमान माहिती देणारी केंद्रं असणं आवश्यक आहे. पर्यटन खातं रस्तांच्या खराब स्थितीविषयी संबंधित खात्याला जाब का विचारत नाही आणि अशा परिस्थितीमुळे पर्यटक पुन्हा येत नाहीत त्यामुळे त्यांचा महसूल बुडत असल्याबद्दल त्यांना दोषी का धरत नाही, कारण एखाद्या ठिकाणी पोहोचायला उशीर झाल्याने साहजिकच पर्यटकाच्या मनात त्या ठिकाणाविषयी फारशी चांगली प्रतिमा निर्माण होत नाही!

रस्त्याला लागून असलेल्या काही विश्रामगृहांमध्ये एमटीडीसीशी (महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग) संलग्न असे फलक लावलेले दिसतात पण ते केवळ नाममात्र आहेत! त्याठिकाणी फोन किंवा आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांची यादी अशा मूलभूत सुविधाही नाहीत! स्वच्छतेकडे आपल्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, मात्र पर्यटक पुन्हा पुन्हा आणि नियमितपणे यावेत असे वाटत असेल तर स्वच्छतेचा विशिष्ट दर्जा राखणे आवश्यक आहे. चांगले आणि स्वच्छ शौचायल ही अशा ठिकाणांची मूलभूत गरज आहे जिचा बऱ्याच ठिकाणी अभाव आहे. आजूबाजूच्या ठिकाणांविषयीच्या माहितीबाबतही अशीच परिस्थिती आहे, यजमानांनी त्याविषयी माहिती नसते, त्यामुळे ते पर्यटकांना मार्गदर्शन करु शकत नाहीत, त्यामुळे त्यांची  नकारात्मक प्रतिमा निर्माण होते.
या समुद्र किनाऱ्याला अतिशय उत्तम आणि घनदाट जंगल लाभलं आहे, कोकण यासाठीच प्रसिद्ध आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की त्याची प्रसिद्धी होत नाही आणि वन व पर्यटन या सरकारी विभागांनी  याठिकाणच्या संधी शोधण्यासाठी काहीही केलेलं नाही. गोवा महामार्गावर असलेलं कर्नाळा पक्षी अभयारण्य वगळता पर्यटकांना याभागातील अभयारण्ये बघण्यासाठी कुठलीही सोय उपलब्ध नाही. वन आणि पर्यटन खात्याने एकत्रितपणे पर्यटकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यामुळेच उत्पन्नात मोठी वाढ होईल, तसेच लोकांना समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या जंगलाची, त्यातील संपन्न जैवविविधतेची जाणीव होईल. मध्यप्रदेश, कर्नाटक किंवा उत्तरांचल या राज्यांनी कान्हा, बांदीपूर किंवा कॉर्बेट यासारख्या अभयारण्यामधून त्यांच्या वनसंपत्तीचे उत्तम प्रदर्शन केले आहे! आपल्याकडे इतकी नैसर्गिक संपन्नता असूनही आपण पर्यटकांसमोर त्याला व्यवस्थित सादर करु शकत नाही हे आपलं दुर्दैव आहे. पर्यटक ही ठिकाणे कशी पाहू शकतील याची माहिती कुठेही उपलब्ध नाही किंवा त्यांचा मागोवा घेण्यासाठीही काही पर्याय नाही. रस्त्याच्या एका बाजूला असलेली घनदाट हिरवाई आणि समुद्र किनाऱ्यावर घिरट्या मारणाऱ्या समुद्री गरुडाचे क्वचित होणारे दर्शन यावरच पर्यटकांना समाधान मानावे लागते. वनखात्याने पुढाकार घेऊन कोकणाला भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी ही निसर्गसौंदर्याची खाण खुली केली पाहिजे म्हणजे त्यांनाही आजूबाजूच्या निसर्गाविषयी जाणून घेता येईल. हेच ठिकाण जर सिंगापूर किंवा मलेशियासारख्या देशामध्ये असतं तर त्याचं प्रसिद्ध पर्यटन ठिकाण करण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले असते याची मी कल्पनाही करु शकत नाही!
दुसरी अतिशय दुःखी करणारी बाब म्हणजे पर्यटक स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि दारुच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या असा कचरा इथे टाकतात. बहुतेक स्थानिक प्रशासनांच्या पायाभूत सुविधा अतिशय कमकुवत आहेत आणि हा अतिरिक्त कचरा त्यांच्यावरचं ओझं आणखीनंच वाढवतो, त्यामुळे रस्त्याच्या कडेला तसेच सार्वजनिक समुद्र किनाऱ्यांवर प्रचंड कचरा साचतो. हे प्रसिद्ध पर्यटक ठिकाण आहे कारण आपल्या शहरी भागात आढळणार नाही असं स्वच्छ आणि शुद्ध निसर्ग सौंदर्य इथे आहे, त्यामुळे ते टिकवण्यासाठी आपण इथली स्वच्छता कायम राखली पाहिजे हे आपल्याला विसरुन चालणार नाही. आपण हे जर विसरलो तर आपण आपलीच नैसर्गिक संपत्ती नष्ट करु आणि मग आपल्याला सरकारवर चांगल्या मूलभूत सुविधा न पुरवल्याचा आरोप करण्याचा काही हक्क राहणार नाही! वॅल्डो इमर्सनने म्हटल्याप्रमाणे, निसर्ग आपल्याला जो आनंद देतो त्याबदल्यात काहीही मागत नाही, केवळ तो निसर्ग तसाच ठेवावा एवढीच अपेक्षा असते!


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स
एन्व्हो-पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारसरणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या

संजीवनीची सामाजिक बाजू!
http://www.flickr.com/photos/16939159@N05/sets/72157626002106936/

शहराविषयीच्या तुमच्या कुठल्याही तक्रारींसाठी, खालील लिंकवर लॉग-ऑन करा
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx

हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा

www.sanjeevanideve.com