Tuesday 10 April 2012

पाणी पाणी ,पाणी



 
 
 
 
 
पाणी सांभाळून वापरले, तर कुणालाच त्रास होणार नाही... मार्क ट्वीन.

हे शब्द आपल्याकडच्या परिस्थितीला इतके तंतोतंत लागू होतात की मला वाटते की लेखकाने इथेच जन्म घ्यायला हवा होता! आपण हे शब्द केवळ वाचायला नको तर त्यांचे पालन करायला हवे. अगदी काही वर्षे पूर्वीपर्यंत कुणीही प्रश्न विचारला असता की पुण्याच्या वाढीचे मुख्य कारण काय, तर इथे मुबलक पाणी उपलब्ध आहे असे उत्तर ब-याच जणांनी दिले असते, कारण या एका शहराला पाच धरणांचे पाणी मिळते! विचार करा हे शहर किती भाग्यवान आहे. माझ्यासारख्या विदर्भातून आलेल्या माणसासाठी, जिथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, २४ तास पाणी मिळत असल्यामुळे पुणे स्वर्गासारखे होते. अजूनही माझ्या गावी उन्हाळा तर सोडाच हिवाळ्यातही रोज अर्धा तासच पाणी येते! पाणी एक अशी बाब आहे की ज्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्ती एका पातळीवर येतात, तुम्ही लक्षाधीश असाल पण एखाद्या कामगाराला मूलभूत गरजा पुरविण्यासाठी जेवढे पाणी लागते तेवढेच तुम्हालाही लागते!

मी काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये एका चर्चासत्राला उपस्थित होतो, इस्रायली उच्चायुक्तांनी त्याचे उद्घाटन केले. त्यावेळी ते म्हणाले होते की भारतात एवढे पाणी उपलब्ध असूनही तो स्वतः गरीब का मानतो हे मला समजत नाही? ब-याच जणांना त्यावेळी तो विनोद वाटला असेल, पण आता परिस्थिती पाहा! एकाबाजूला आपण माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, ऑटो उद्योग यामुळे संपन्न होत आहोत आणि दुस-या बाजूला आपल्याला आपल्या जीवनशैलीसाठी पुरसे पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत! हे काय दर्शवते? काही वर्षांपूर्वी आपल्याकडे एवढीच धरणे होती, पाउसही एवढाच पडायचा आणि शहराला पाणीपुरवठा होण्यात काहीही समस्य नव्हती. पण आता अचानक उन्हाळा आला की आपल्याला एकच समस्या भेडसावायला लागते, ती म्हणजे पाणी! आपले शहर खरोखरच मजेशीर आहे; शहराप्रमाणे आपल्या समस्याही बदलत असतात! कधी वाहतुकीची समस्या असते तर कधी महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांची तर कधी पावसाळ्यामध्ये रस्त्यांच्या स्थितीची आणि पुराचीही आणि आता समस्या आहे पाण्याची. एक समस्या निर्माण झाली की आपण दुसरी विसरतो आणि हे चक्र वर्षभर सुरु राहते.

आता कुणी विचारेल की याचा बांधकाम व्यवसायाशी काय संबंध आहे. खर तर पाणी रिअल इस्टेटचा सर्वात महत्वाचा घटक आहे!  मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे पाउस तेवढाच पडतो, धरणेही तेवढीच आहेत, मग समस्या काय आहे? वाढती लोकसंख्या आणि शहराचा वाढता विस्तार ही त्यामागची कारणे आहेत. आता इथे बरेच जण म्हणतील की त्यामध्ये नवीन काय आहे ते आम्हाला सर्वांना माहिती आहे! यासंदर्भात मी आपल्याला एका बौद्ध भिक्खूची गोष्ट सांगतो...
एके दिवशी एका श्रीमंत माणसाने बौद्ध भिक्खूस विचारले आनंदी जीवनाचे रहस्य काय आहे?". भिक्खू म्हणालातुला जेव्हा झोप येईल तेव्हा झोप आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा खा". त्यावर तो श्रीमंत माणूस म्हणाला यात काय विशेष आहे, अगदी पाच वर्षांचे मूलही हे सांगू शकते! भिक्खू हसला आणि म्हणाला पाच वर्षांचा मुलगा हे सांगू शकतो मात्र अगदी शंभर वर्षांची व्यक्ती हे मिळवू शकत नाही! या गोष्टीचे सार म्हणजे आपल्या गरजा समजावून घेऊन त्यानुसार वागावे. नेमके हेच आपल्या शहरात होत नाही! आपण केवळ आपल्या समस्यांविषयी तक्रार करतो मात्र त्यावर काहीच पावले उचलत नाही. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये आपण कोणाचे पाणी घेतले याविषयी चर्चा होते आणि आरोप प्रत्यारोप होतात, पीएमसी/पीसीएमसीमध्ये तुलना होते आणि प्रसिद्धी माध्यमे टँकर व पाण्यासाठी असलेल्या रांगांची छायाचित्रे प्रसिद्ध करतात, बस तेवढ्यापुरतेच. /३ महिन्यांनी उन्हाळा संपल्यावर हा विषयही संपतो, त्यानंतर पुन्हा देवाने दिलेल्या पाण्याचा आपण उपभोग घेतो आणि पुढील उन्हाळ्यासाठी सज्ज होतो! या मुद्दयाला बरेच रंग दिले जातात व ब-याचदा ते राजकीय असतात, याच्या तांत्रिक बाबींचा विचार कधीच केला जात नाही. आता अशी चर्चा होत आहे की निवडणुकीमुळे पाणी भरपूर दिले जायचे आणि निवडणुका झाल्यावर टंचाई सुरु झाली. शहरातील एखाद्या विशिष्ट प्रकल्पाकडे पाणी वळवण्याचेही आरोप होतात! या सर्वांमुळे सामान्य माणूस गोंधळून जातो आणि ख-या समस्यांकडून लक्ष विचलित होते.

शहर वाढतेय याचा आपण स्वीकार करु, पण आपण त्याविषयी काय करतोय? आपण नव्या प्रकल्पांच्या जाहिराती पाहिल्या आहेत का त्यामध्ये २४ तास पाणी पुरवठ्यावर मुख्य भर दिलेला असतो. जाहिरातीसाठी हा चांगला मुद्दा आहे पण तसे करणे खरोखरच योग्य आहे का? २४ तास पाणी देणे ही एक बाब झाली पण ते २४ तास वापरल्यामुळे पाण्याची नासाडी होऊ शकते हे आपण विसरतो. कुठलीही चांगली सुविधा जेव्हा मिळते तेव्हा तिच्यासोबत एक जबाबदारीही असते. त्यामुळे मुबलक पाण्यासोबत ते काळजीपूर्वक वापरण्याची जबाबदारी आपल्यावर येते आणि याची सदनिकाधारकांना कोण आठवण करुन देणार? अशा वेळी स्थानिक संस्थाही घाई करुन अपरिपक्वता दाखवतात. उदाहरणार्थ, मधे एक बातमी आली होती की पीएमसी नव्या बांधकामांना पाणी देणे बंद करणार आहे? त्यामुळे नवी बांधकामे थांबणार आहेत का? बोअर वेल, टँकरचे पाणी असे बरेच पर्याय असतात, एकदा बांधकामाला परवानगी दिल्यानंतर त्याला पाणी पुरवठा करायची आपली जबाबदारी नाही का? बांधकामाच्या ठिकाणी हजारो मजूर काम करत असतात, त्यांना पिण्यासाठी आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पाणी कुठून मिळणार? किंवा नव्या बांधकामांना परवानगी देणेच बंद करा!  म्हणजे आपल्याला नवीन बांधकाम हवे आहे पण त्याला सुविधा द्यायला नकोत. आणि या नव्या इमारती कुणासाठी बांधल्या जात आहेत? विकासक नक्कीच सर्व सदनिका स्वतःसाठी ठेवणार नाही? या शहरातल्या नागरिकांनाच या घरांची आवश्यकता असते!

विकासक म्हणून निवास संकुलात पाण्याची बचत करायची सोय करण्याची आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपल्याला काय नियम आहेत हे पाहायची गरज नाही! घराच्या प्रत्येक शौचालयात दुहेरी फ्लश टाकी जरी बसवली तरी हजारो लिटर पाणी वाचू शकते, कारण ते विविध कारणांसाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरते. पाणी काढणे, पाणी साठवण्यासाठी टाक्यांची रचना आणि पावसाच्या पाण्याचे संधारण याबाबतही अशाच प्रकारे विचार झाला पाहिजे. या सर्व बाबींमुळे पीएमसीकडून
मिळणा-या पिण्यायोग्य पाण्याचा वापर कमी होईल. त्याचवेळी रहिवाशांना पाण्याच्या वापराबाबत जागरुक करणेही तेवढेच महत्वाचे आहे. मी माझ्या आधीच्या कंपनीच्या प्रकल्पामध्ये एक साधी कल्पना अंमलात आणली, वरील टाकीतून पाणी खाली वाहून नेणा-या वाहिन्यांवर पाण्याची मीटर बसवली. यामुळे सोसायटीमध्ये पाण्याचा वापर किती आहे याची कल्पना येऊ शकते आणि ही माहिती मिळाल्यावर आपण त्यानुसार पाण्याची बचत करु शकतो. कारण लोकांना आम्हाला कमी पाणी मिळत आहेअशी तक्रार करायची सवय असते, मात्र आपण किती पाणी वापरत आहोत हे ते पाहत नाहीत.

इथे नेमके कुठे चुकत आहे याचे प्रशासकीय संस्थांनी विश्लेषण करायची आणि सामान्य माणसाचा उद्रेक होण्यापूर्वी योग्य पावले उचलायची वेळ आलेली आहे. अजूनही बरेच प्रश्न अनुत्तरितच आहेत ते म्हणजे या शहराला नेमके किती मिळते आणि किती पाणी प्रत्यक्ष वापरकर्त्यापर्यंत पोहोचते. आपल्याला किती पाणी मिळते आणि किती पाण्याचे वितरण होते हे नेमके मोजण्यासाठी प्रभावी यंत्रणा नाही. पावसाच्या पाण्याचे संधारण ४-५ वर्षांपासून सक्तिचे आहे याची आपल्याला कल्पना आहे मात्र त्यातून नेमके किती लिटर ताजे पाणी वाचले आहे? जर पुरवठ्यावर आधारित मीटर पूर्वी अपयशी ठरली असतील तर विजेप्रमाणेच पाण्यासाठीही जेवढा वापर असेल तेवढेच पैसे का आकारले जात नाहीत? सामान्य माणसाला टीएमसी या संज्ञेचा नेमका काय अर्थ होतो हे माहिती आहे का? याचा अर्थ होतो हजार दशलक्ष क्यूबिक फिट, म्हणजे अंदाजे २८ दशलक्ष क्यूबिक मीटर आणि एक क्यूबिक मीटर पाणी म्हणजे १००० लीटर पाणी. आपण पुण्याची लोकसंख्या ४० लाख मानली तर दररोज दरडोई १५० लीटर या हिशेबाने आपल्याला ६० कोटी लीटर पाणी दररोज लागेल. आपण पुरवठा, वापर आणि मागणी यातील तूट शोधण्यात असमर्थ आहोत! हे सर्व योग्य तंत्रज्ञान वेळेत न वापरल्यामुळे आहे. 

प्रशासकीय संस्थेला काही आणीबाणीच्या घोषणा कराव्या लागतात यात शंका नाही पण आपण तात्पुरता उपाय शोधण्याऐवजी कायमचा तोडगा का काढू शकत नाही? सध्यातरी पाण्याचा कुठलाही नवीन स्रोत उपलब्ध नाही व लोकसंख्या वाढतच जाणार आहे हे सत्य आहे. त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्यात ही समस्या अधिकच बिकट होत जाणार आहे. पाण्यावर पुनर्प्रक्रिया हा एक उपाय आहे पण त्यासाठी यंत्रणा बसवणे, विजेचा खर्च आहेतच. पाण्यावर प्रक्रिया करणारे बरेचसे प्रकल्प विजेवर चालतात त्यामुळे त्यांचा खर्च गृहनिर्माण संस्थांना परवडणारा नसतो. सरकार कृषी पंपांना मोफत वीज देते पण पुनर्प्रक्रिया प्रकल्पांना व्यावसायिक दराने वीज देते हा एक विनोद आहे!

अशा प्रकारचा विरोधाभास दूर केला पाहिजे आणि कारण हा कुण्या एका व्यक्तिचा प्रश्न नाही तर संपूर्ण शहराचा प्रश्न आहे.  एकीकडे आपण स्वतःला माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणवतो आणि दुसरीकडे सर्व आधुनिक तंत्रज्ञान हाताशी असताना पाणी समस्या सोडवण्याचे धाडस दाखवत नाही हे दुर्दैवी आहे! नागरिकांनीही केवळ पीएमसीवर आरोप करण्यापेक्षा स्वतःही पाणी वाचवून यामध्ये हातभार लावायला हवा, पाणी वाचवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, हे कसे करायचे समजत नसेल तर तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा! कुठल्याही मानवी वसाहतीसाठी पाणी हा सर्वात महत्वाचा घटक आहे कारण त्याशिवाय कोणताही समुदाय वाढू शकत नाही. आपण वाढतोय त्यामुळे भविष्यात जे घडणार आहे ते अटळ आहे. वरील अवतरणाप्रमाणे आपण पाण्याच्या बाबतीच योग्यवेळी पावले उचलली नाहीत तर आपल्याला त्याचा सर्वाधिक फटका बसेल आणि तो फटका बसेल कसे हे सांगता येत नाही
 संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!


संजीवनीची सामाजिक बाजू!

http://www.flickr.com/photos/65629150@N06/sets/72157628805700569/शहराविषयीच्या तुमच्या काही तक्रारी असतील, तर खालील लिंकवर क्लिक करा
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx


हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा








No comments:

Post a Comment