Saturday 21 April 2012

घर आपले आणि त्यांचे





 

 

 

 

जैवविविधेचा वापर कसा करावा हे शिकताना आणि मानव जातीसाठी त्याचे काय महत्व आहे समजून घेताना, तिचा लहानसा भागही आपण अतिशय मूल्यवान म्हणून जपून ठेवला पाहिजे...ई.ओ. विल्सन

गेल्या आठवड्यात मला ए मजेशीर अनुभव आला. आमच्या बिल्डिंगचा वॉचमन एकदिवस मध्यरात्री मला उठवायला आला आणि म्हणाला वॉचमनच्या केबिनपाशी एक मोठा साप आहे, त्याबाबत मला काही करता येईल का? मी टॉर्च घेऊन खाली पळालो आणि रसेल वायपर जातीचा अतिशय सुंदर साप मला दिसला. हा निःसंशयपणे आपल्या देशात सापडणा-या सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. तो घाबरुन अंगाचे वेटोळे करुन बसला होता. पहिल्यांदा माझ्या मनात त्याला मारण्याचा विचार आला, मी गावाकडचा असल्याने सापांची सवय आहे त्यामुळे त्याला सहज काठीने मारु शकलो असतो, पण त्यानंतर माझ्या मनातील वन्य जीवांविषयीचे प्रेम आणि पर्यावरणविषयक पार्श्वभूमी यांनी मला तसे करु दिले नाही.

माझ्याकडे मोबाईलमध्ये पुण्यातील सर्पमित्रांची यादी आणि त्यांचे क्रमांक आहेत, मी काही जणांना फोन लावून पाहिला आणि श्री गणेश नावाच्या अशाच एका सर्पमित्राने मध्यरात्रीनंतरही प्रतिसाद दिला. तो आला आणि सापाला पडकून पुण्यातील सर्पोद्यानात सोडून आला. हे सर्व करताना त्याला मदत केल्याचा मला आनंद झाला, हा अतिशय रोमांचकारक अनुभव होता, कारण तो साप अतिशय चपळ होता आणि विषारीही! हे सर्व करायला एक तासभर लागला, मात्र सर्व साप त्याच्यासारखे भाग्यवान नसतात. जवळच्या रस्त्यावरुन भरधाव जाणा-या वाहनांखाली तो सहज चिरडला जाऊ शकला असता. तो काही अंतरावरुन वाहणा-या नदीतून आला असावा किंवा नदीजवळच्या हरित पट्ट्यात सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाहून आला असेल. सर्पमित्र गणेश यांनी माहिती दिली की आजकाल या जाती अतिशय दुर्मिळ होत चालल्या आहेत!

दररोज आपण विविध प्रजातींबद्दल काहीतरी घटना घडल्याचे पाहतो किंवा ऐकतो, जसे माकड विजेच्या तारांमध्ये अडकले किंवा पक्षी पतंगाच्या मांज्याने जखमी झाला किंवा एखादा प्राणी रस्त्यावरील वाहनामुळे जखमी होतो अशी कितीतरी उदाहरणे आहेत. दुर्दैवाने महानगरांमध्ये तर असे अपघात होण्यासाठीही फारसे प्राणी उरलेले नाहीत! अगदी चिमण्यांसारखा सामान्यपणे सगळीकडे आढळणारा पक्षीही शहरातून नामशेष होत चालल्याचे चित्र आहे आणि म्हणूनच आपल्याला जागतिक चिमणी दिवस साजरा करावा लागतो! त्यांना केवळ या काँक्रिटच्या जंगलांमध्ये थोडीशी हिरवी जागा हवी आहे, ज्याला ते अभिमानाने आपले घर म्हणू शकतील! पण मग बांधकामांसाठी जागाही हव्या असतात त्यामुळे संघर्ष होतो. मी स्वतः बांधकामाच्या ठिकाणातून आणि इमारतींमधून साप बाहेर येताना पाहिले आहे. पक्षी आणि इतर लहान प्रजातींबद्दलही असेच आहे, त्यांना नैसर्गिक निवासस्थान आवश्यक असते आणि शेकडो वर्षे त्यांना त्याची सवय असते (पुण्यामध्ये). मात्र आता पक्षी आणि लहान प्रजातींचा निवास असलेल्या जागा, रस्ते आणि बांधकामांसाठी विकसित केल्या जात आहेत.
 बांधकामासाठी वापरली जात नसलेली कुठलीही ओसाड वाटणारी जमीन खरेतर कधीच मृत नसते. उंदीर, मुंग्या, वाळवी, पाली इत्यादी प्रजाती जमीनीवर दिसून येतात , पक्षी आणि साप त्यांना पकडण्यासाठी टपून असतात.
एकप्रकारे मोकळ्या जमीनीवर प्राण्यांच्या अनेक प्रजातींचे जीवनचक्र दिसून येते आणि आपण त्या जमीनीवर जेव्हाही बांधकाम सुरु करतो तेव्हा आपल्या कामामुळे या जीवनचक्रात खंड पडतो. एक प्रकारे हे त्यांच्या घरावरील अतिक्रमणच आहे आणि आपण त्यांचे जे नुकसान केले आहे त्याची भरपाई करण्याची जबाबदारी आपलीच आहे. मात्र दुर्दैवाने आपण ते विसरत आहोत किंवा त्याकडे दुर्लक्ष करत आहोत किंवा निष्काळजी आहोत.

दिवसेंदिवस साप आणि त्यासारख्या इतर प्रजाती वाढत्या शहरीकरणामुळे नामशेष होत चालल्या आहेत. त्यांचे वसतिस्थान सुरक्षित राहावे यासाठी शहराचे नियोजन करताना हरित पट्ट्यांचा समतोल राखणे गरजेचे आहे, शहरी जीवनातील ही अतिशय मोठी कमतरता आहे ज्याकडे दुर्लक्ष होत आहे, अशा प्रजातींच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे!

पुण्या/मुंबईत राहणारे आपल्यासारखे लोक अशा बातम्या किंवा घटनांकडे एकतर दुर्लक्ष करतात किंवा फेसबुक अथवा ट्विटरवर आपली चिंता व्यक्त करतात आणि पुन्हा अशी एखादी बातमी दिसेपर्यंत त्या घटनेविषयी विसरुन जातात. फेसबुकवरही नेहमीप्रमाणे टिका-टिप्पणीचे युद्ध होते, आरोप होतात आणि हे सर्व तेवढ्यापुरतेच मर्यादित राहते! आता बरेच जण म्हणतील यापेक्षा अधिक आम्ही काय करु शकतो आणि हे आमचे काम नाही, संबंधित लोकांनी यावरील तोडगा शोधावा. उदाहरणार्थ या क्षेत्रात काम करणा-या ब-याच स्वयंसेवी संस्था आहेत आणि त्यांच्या हाताशी काम करायला माणसे आणि पुरेसा वेळ आहे. मी अशाही ब-याच जणांना भेटलो आहे जे प्रतिवाद करतात की काही साप मेले किंवा तुम्हाला शहरात चिमण्या अथवा पक्षी दिसले नाहीत तर काय फरक पडणार आहे!  आपल्यासमोर वाहतुकीची कोंडी, पाणी, सांडपाणी, घरांच्या किमती अशा कितीतरी समस्या आहेत! आपल्यापासून अनेक मैल लांब असलेल्या प्राणी आणि जंगलांबद्दल कशाला डोकेफोड करायची आणि आपण आपल्या स्वतःच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करु! प्राण्यांची काळजी घ्यायला सर्पोद्याने आणि प्राणीसंग्रहालये आहेत, मग जमीनीचा एवढा तुटवडा असताना त्यांच्यासाठी स्वतःच्या खर्चाने जागा तयार करायाची काळजी कशाला करायची? आपल्या घराच्या जवळपास सापासारख्या धोकादायक प्रजातीस राहू देऊन जवळपास खेळणा-या आपल्या मुलांचे आयुष्य कसे धोक्यात आणायचे? असे मुद्दे उपस्थित केल्यानंतर माझ्याकडे खरोखरच योग्य असे प्रत्युत्तर नसते. पण काही प्रश्न विचारावेसे वाटतात. आपण मनुष्य प्राणी स्वतःला सर्वात विकसित मेंदू असलेले मानतो मग आपल्यासारख्या विकसित नसलेल्या प्रजातींबाबत आपले काही कर्तव्य नाही का? आपण शक्तिशाली आहोत मग आपल्यापेक्षा तुलनेने कमजोर असलेल्यांची आपण काळजी घ्यायला नको का? याचे उत्तर जर होय असेल तर मग आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण काय करत आहोत? पक्षांच्या संगीताशिवाय, झाडांच्या सुगंधाशिवाय, फुलपाखरांशिवाय जग कसे असेल अशी आध्यात्मिक संकल्पना बाजूला ठेवा, केवळ आपल्यापेक्षा कमजोर असलेल्यांबद्दल आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण काय करत आहोत याचा विचार करा?

याचे उत्तरही आपल्याजवळच आहे, जे या वादविवादात सहभागी होत नाही किंवा कुठल्याही वादविवादाकडे दुर्लक्ष करतात त्यांच्याकडेही याचे उत्तर आहे. आता बरेच जण म्हणतील की या सर्व बाबींसाठी सरकार असताना आम्ही वैयक्तिक पातळीवर काय करु शकतो? जंगलामध्ये शिकार
करणा-या शिका-यांच्या कृत्यापेक्षाही हे उत्तर वाईट आहे, कारण सरकार म्हणजे आपणच! त्यामुळेच दुसरे काय करणार आहेत यापेक्षा आपण काय करत आहोत हे जास्त महत्वाचे असते. ओशोंची अतिशय प्रसिद्ध गोष्ट मी तुम्हाला इथे सांगणार आहे..." एक बाई होती आणि ती कधीही आरशात बघायची तेव्हा तो तोडून टाकायची, कारण त्यामध्ये तिचा चेहरा विद्रुप दिसायचा! आरशापासून दूर असताना ती आनंदी असायची आणि स्वतःला सुंदर मानायची, मात्र आरशात ती विद्रुप दिसायची!" खरे पाहता ती विद्रुपच होती मात्र तसे न दाखवण्यासाठी ती आरशाला दोष द्यायची! आपणही त्या गोष्टीतल्या बाईसारखे आहोत जी आरशाला घाबरायची. आपल्या निवास संकुलातील गरीब सापासारख्या प्रजातींबाबत आपली काय जबाबदारी आहे याची आपल्याला जाणीव नाही. मनुष्य प्राणी आणि त्याचा हव्यास ज्याला आपण गरजेचे नाव देतो, या दोन्हींच्या कचाट्यात सापडलेल्या सर्व प्रजातींचे प्रतिनिधित्वच तो साप करतो! जीवनाच्या या पैलूचा विचार करणे हे माझे काम नाही असे म्हणून आपण या जबाबदारीकडे कानाडोळा करतो!

इथे बांधकामे थांबवा, किमान काही वर्षांसाठी थांबवा असे म्हणणे टोकाचे होईल, तसेच आपण त्यासाठी तयारही नाही. आपण आपल्या गरजांना सर्वाधिक प्राधान्य देतो आणि एका दृष्टीने हे योग्यही आहे, कारण हजारो लोक योग्य निवा-यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित असताना आपण ती बांधणे कसे थांबवू शकतो!

नष्ट होत असलेल्या जैवविविधतेविषयी आपण बांधकाम व्यावसायिक, विकासक आणि प्रशासनाला अधिक जबाबदार करणे आवश्यक आहे. जर्मनीसारख्या देशांमध्ये असा कायदा आहे की विकसित केलेल्या कुठल्याही जमीनीवरील जैवविविधतेचा तपशील आवश्यक आहे. विकासाच्या प्रक्रियेत नष्ट झालेल्या जैवविविधतेची इतरत्र भरपाई करावी लागते. मला याचे अधिक तपशील माहिती नाहीत, पण एक गोष्ट मात्र नक्की की प्रत्येक शहरी विकासामध्ये अशा जागा असायला हव्यात जिथे केवळ मनुष्य प्राणीच नाही तर इतरही शेकडो प्रजाती शांततेने जगू शकतील. ब-याच देशांनी त्यासाठी कायदे केले आहेत आणि त्यापेक्षाही अधिक महत्वाचे म्हणजे तिथल्या नागरिकांना या विषयाचे गांभीर्य समजले आहे. कायदा मंजूर करुन आणि त्याचे पालन करुन ते प्रतिसाद देत आहेत. अशावेळी मला असा प्रश्न पडतो की दुस-या कुणाचे आयुष्य वाचवण्याबाबत जागरुक होण्यासाठी आपल्याला कायद्याची काय गरज आहे? केवळ स्वतःचे घर बांधताना आपण इतरांच्या घराचा विचार करायची आवश्यकता आहे!  जमीनीच्या एखाद्या लहानशा तुकड्यावर नैसर्गिक हिरवळ ठेवली, एखाद्या तज्ञ व्यक्तिच्या मदतीने परिसराच्या गरजेचा विचार करुन योग्य झाडे लावली तरीही हेतू साध्य होईल! उदाहरणार्थ आपण अनेक शोभेची झाडे लावतो आणि आपल्याकडे काळजीपूर्वक देखभाल केलेली हिरवळ असते, मात्र जैवविविधतेच्या रक्षणासाठी त्यांचा काही उपयोग नाही. विविध प्रजातींना त्यांची नैसर्गिक घरे बनवावी लागतात जी कडुनिंब, वड, पिंपळ अशी देशी झाडे उपलब्ध करुन देतात, ही झाडे अनेक कीटक प्रजातींच्या तसेच पक्षांच्या जीवनचक्राचा आधार आहेत. मातीचे अच्छादन असलेला जमीनीचा लहानसा तुकडा, जिथे पावसाचे पाणी साठून जमीनीत झिरपू शकते, अनेकांचे घर बनू शकतो. या साध्या गोष्टी सांगण्यासाठी आपल्याला कायद्याची वाट पाहायची काय गरज आहे?

केवळ जबाबदार होण्यापलिकडे जाऊन आपण थोडा विचार केला तर या जैवविविधतेमुळे आपल्याला किती आनंद मिळेल. खरोखर विचार करा आपल्या पिल्लाला भरवणारी चिमणी, घरटे बनवणारी बुलबुल किंवा पहिल्या पावसासोबत दिसणारा लाग रंगाचा किडा, उमलत्या फुलांवरील फुलपाखरे असे बरेच काही! ही यादी न संपणारी आहे आणि आपल्या अवती-भोवती हे सर्व घडताना पाहणेच किती आनंददायक आहे, ते पैसे देऊन खरेदी करता येणार नाही. तुम्हाला केवळ अशा प्रजातींसाठी थोडीशी जागा तयार करायची आहे आणि तुमच्या अर्थाजनाच्या वेळेतला थोडासा वेळ त्यासाठी द्यायचा आहे आणि त्याला तुमच्या जीवन शैलीचा एक भाग बनवायचे आहे. हे केवळ विकासक, सरकार किंवा स्वयंसेवी संस्थांचे काम नाही, आपण जेव्हा आपले तथाकथित घर खरेदी करु तेव्हा या इतर प्रजातींसाठी ही जागा मागायची आहे. आपल्या घराच्या चार भितींसोबतच हे दिले गेले पाहिजे तरच बिचा-या रसेल वायपर आणि त्याच्यासारख्या इतरांना भविष्याबद्दल काही आशा असेल! वरील अवतरणाप्रमाणे जैव विविधतेची जाणीव आतून झाली पाहिजे आणि समजली पाहिजे नाहीतर आपल्याला स्वतःला मनुष्य म्हणवण्याचा काहीही अधिकार नाही!


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!


संजीवनीची सामाजिक बाजू!

शहराविषयीच्या तुमच्या काही तक्रारी असतील, तर खालील लिंकवर क्लिक करा
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx


हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा






  



https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/no_photo.png
Click here to Reply or Forward




No comments:

Post a Comment