Monday 11 June 2012

कार पार्किंग



 
 
 
 
आपल्याकडे पार्किंगसाठी थोडी अधिक जागा असेल तर ती पार्किंगसाठी न वापरता तिथे झाडे लावावीत या मताचा मी आहे.... मायकल किंग

आपल्या शहरातील परिस्थिती पाहिली तर भारतीय लोक या आंतरराष्ट्रीय वास्तुविशारदासारखा विचार करणार नाहीत! आपल्यासाठी कार ही अतिशय मौल्यवान वस्तू असते. कारविषयी एक विनोद आहे "एखादा पुरुष बायकोसाठी कारचा दरवाजा उघडत असेल तर समजावे की एकतर बायको नवीन आहे किंवा कार!" विनोदाचा भाग सोडला तरी यातून कारविषयी आपण किती भावनिक असतो व कारविषयी कशी मालक्कीहक्काची भावना असते हे दिसून येते. बहुतेक पुरुषांना विशेषतः भारतीय पुरुषांना विचारले की चांगल्या राहणीमानाविषयी त्यांचे काय स्वप्न आहे, तर त्यामध्ये सुंदर बायको, चांगले घर व स्वतःची कार यांचा समावेश होईल! ९० च्या दशकापर्यंत कार असणे हे प्रतिष्ठेचे मानले जायचे, मात्र मारुती आल्यानंतर अगदी मध्यम वर्गातील सामान्य व्यक्तिही स्वतःची कार घ्यायचा विचार करु लागला. ख-या अर्थाने मारुतीच्या आगमनानंतर देशातील कारविषयक परिस्थिती पालटली. तोपर्यंत केवळ लक्षाधीशच कार बाळगू शकायचे व त्यांच्याकडेच ती पार्क करायला जागा होती. तेव्हा प्रवासासाठी अंतरही अतिशय कमी असायचे त्यामुळे कार ठेवणे हे गरजेपेक्षा प्रतिष्ठेवर आधारित होते.

९० च्या दशकानंतर शहरी भारत वेगाने बदलू लागला. अनेक बहुराष्ट्रीय कार निर्मात्या कंपन्यांचे भारतात आगमन झाले त्यामुळे कार खरेदी करणे केवळ श्रीमंतांसाठी प्रतिष्ठेचे लक्षण राहिले नाही तर ती आपल्या दैनंदिन जीवनाचा आवश्यक भाग बनली. गावाचे शहरात रुपांतर झाले, शहरांचे महानगरामध्ये रुपांतर झाले, त्यामुळे रोजचा प्रवास काही मीटरवरुन काही किलोमीटर झाला. आजही असे बरेच पुणेकर असतील ज्यांनी वर्षानुवर्षे शाळा, भाजी मंडई, सिनेमागृह, त्यांचे कामाचे ठिकाण इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी मुठा पार केली नसेल कारण हे सर्व काही १/२ किलोमीटरच्या टप्प्यातच असते व या सर्व ठिकाणी पायी किंवा फार फार तर सायकलवर जाता येते! त्यावेळी वाडेच जास्त होते, अपार्टमेंटचं प्रस्थ नव्हतं थोडेफार बंगले होते. त्यामुळेच प्रवासासाठी कार व ती पार्क करण्यासाठी जागा यांचा प्रश्नच नव्हता. कार असावी असं प्रत्येकाचच स्वप्न असायचं मात्र ती नसेल तर लोकांना चालायचं!

शहरांचा आकार जसा वाढू लागला तसे अंतरही वाढायला सुरुवात झाली. आता आपण विचार केला तर पुण्यासारख्या शहरामध्ये नागरिकांना रोज २०-३० किलोमीटर प्रवास करावा लागतो. या प्रवासामध्ये ऑफिसला जाणे, मुलांना शाळेत नेणे-आणणे, खरेदीसाठी जाणे इत्यादींचा समावेश होतो. आजकाल कुटुंबही चौकोनी झाल्यामुळे शनिवारी किंवा रविवारी सर्वांना एकत्र फिरायला जायचं असेल तर कारनं जाणं अतिशय सोयीचं होतं. महापालिका शहरातील वाहतुकीसाठी योग्य यंत्रणा व पायाभूत सुविधा देण्यात अपयशी ठरल्यामुळेच कार अधिक सोयीची वाटते. मी माझ्या कुटुंबासोबत सिंगापूरसारखी शहरे पाहून आलो आहे. मला तिथे जवळपास सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणे ८०% अधिक सोयीचे वाटले, त्यामध्ये मेट्रो तसेच बसचा समावेश होता. मी टॅक्सीचा वापर केवळ २०% केला. सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर करुन मी हव्या ठिकाणी वेळेत पोहोचत होतो. मी माझ्या शहरात असा प्रयोग करुही शकत नाही, याच ठिकाणी आपला आजचा विषय समोर येतो तो म्हणजे पार्किंग!  इथे मला माझा आवडता चित्रपट स्पायडर मॅनचा एक संवाद आठवतो महान शक्तिंसोबत मोठी जबाबदारीही येते"! याचप्रकारे व्यक्तिला हव्या त्या ठिकाणी पोहोचता यावे, त्याची प्रतिष्ठा दाखवण्यासाठी कार जर शक्ती असेल तर त्यासोबत कारचे पार्किंग ही जबाबदारी येते!

आता इथे खरा प्रश्न उपस्थित होतो की कार पार्किंगसाठी जागा तयार करणे ही कुणाची जबाबदारी आहे? अलिकडेच एका बातमीकडे आश्चर्यकारकपणे अनेकांचे लक्ष गेले नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी  निवासी सोसायट्यांमधील रहिवाशांनी त्यांच्या सोसायटी बाहेर रस्त्यावर कार पार्किंग केले तर कारवाई करायचे आदेश किंवा निर्देश दिले! याचा अर्थ असा की ज्या रहिवाशांकडे कार आहे त्यांनी इमारतीच्या आवारातच पार्किंग करावे, एकप्रकारे हे योग्यच आहे पण एखाद्या व्यक्तिला कार का खरेदी करावीशी वाटते असा प्रश्न मी विचारेन! अनेक सरकारी संस्थांना भेट देणारे तसंच त्यांचे कर्मचारी इमारतीला लागून बाहेर वाहने पार्क करतात त्याचे काय! अगदी पीएमपीएमएल म्हणजे आपल्या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेच्या बसही रात्रंदिवस रस्तावर पार्क केलेल्या असतात, त्यामुळे रस्त्याचा बराचसा भाग अडला जातो, त्यांच्यावर कोण कारवाई करणार? आता बैठ्या घरांचे दिवस गेले, पूर्वी वास्तुविशारद घराचा आराखडा तयार करताना त्यात पार्किंगसाठी जागा ठेवायचे नाहीत त्यांना तशी गरजही वाटायची नाही, इमारतीसाठीच्या स्थानिक कायद्यांमध्येही तशी तरतूद नव्हती. आपल्या नियोजकांमध्ये दूरदृष्टीचा अभाव होता त्यामुळे ९०च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत कार इमारतीचा एक भाग मानला जायचा नाही. अजूनही ६०% इमारतींमध्ये पुरेसे कार पार्किंग नाही कारण त्या कारवर अवलंबून होण्यापूर्वीच्या काळात बांधलेल्या होत्या. नव्या स्थानिक कायद्यानुसार १बीएचके सदनिकेसाठी कार पार्किंग असणे आवश्यक आहे व ३बीएचके सदनिकेसाठी २ कार पार्किंग व दुचाकीचे पार्किंग आवश्यक आहे. विकासकाने इमारतीच्या प्रकल्पाचे नियोजनच त्यानुसार करायला हवे! विकासकाला व्यवसाय करायचा आहे त्यामुळे ग्राहकांना जे हवे आहे ते तो देईल मात्र त्या मागणीचे दुष्परिणाम काय होतील यांचा दुर्दैवाने तो विचार करणार नाही. मात्र कार पार्किंगची मागणी पूर्ण करण्यासाठी आपण काय किंमत मोजत आहोत याचा आपण विचार केला आहे का? आपली गरज व प्रतिष्ठेची हाव यामुळे कार पार्किंगसाठी आपण इमारतीमधील जवळपास सर्व जमीन, गृहसंकुलाच्या खालील जमीन वापरत आहोत! आता आपल्याकडे बहुमजली कार पार्किंग आहे जे काही वेळा दोन ते तीन मजले जमीनीखालीही असते. या प्रक्रियेमध्ये आपण जमीनीतील पाण्याच्या प्रवाहाची, सापांपासून मुग्यांपर्यंतच्या जैव विविधतेची हानी करतो. ही जैव विविधता गेली अनेक वर्षे जमीनीखाली सुखाने नांदत होती! अनेक जण या मूर्खपणाच्या विचारावर हसतील मात्र कारसाठी अधिकाधिक जागा तयार करण्यामुळे झालेल्या नुकसानाची ही केवळ एक बाजू आहे. कार पार्किंगपर्यंत पोहोचवण्यासाठी रस्ता तयार करायला अनेक झाडे कापली जातात, त्याचवेळी नव्या झाडांसाठी अतिशय कमी जागा ठेवली जाते. आपल्याकडे कारसाठीही कायदे आहेत व झाडांसाठीही कायदे आहेत, मात्र सरतेशेवटी या लढाईत कोण जिंकते हे अगदी लहान मूलही सांगू शकेल!

न्यायालयाच्या निर्णयानंतर विकासक कार पार्किंग विकू शकतो का यावर बरीच चर्चा सुरु झाली आहे? इथे कोण काय विकू शकतो हा मुद्दा नाही, तर प्रत्येकाला त्याची कार पार्क करण्यासाठी जागा आवश्यक आहे हे तथ्य आहे व आपल्या अतिशय मौल्यवान वस्तुच्या प्रेमापोटी लोक ही किंमत द्यायला तयार आहेत. मुंबईमध्ये काही ठिकाणी कार पार्किंगची किंमत एका कारसाठी १० लाख रुपयांच्या वर आहे. कार पार्किंगला ऐवढी प्रचंड मागणी आहे की घर/सदनिका खरेदी करणा-या एखाद्या व्यक्तिला सांगा तिला घरासोबत कार पार्किंग मिळणार नाही व त्यानंतर मिळणारी प्रतिक्रिया पाहा. यामुळे आपल्याला कार पार्किंगची विक्री का होते याचे उत्तर मिळेल! स्वतःच्या कार पार्किंगशिवाय लोक घराचा विचारही करु शकत नाहीत हे सत्य आहे. केवळ कार पार्किंग विकण्याच अधिकार असण्यापेक्षा हीच बाब संपूर्ण समाजासाठी धोकादायक आहे. केवळ कार पार्किंगच नाही तर दुचाकीचे पार्किंगही तेवढेच महत्वाचे आहे कारण त्यांची संख्याही प्रचंड मोठी आहे.
सरकार किंवा प्रशासकीय संस्था पार्किंगच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत, याचे एक उदाहरण म्हणजे नियमांमध्ये बदल करुन पार्किंगच्या संख्या बरीच वाढवण्यात आली आहे, मात्र विकासक तसंच वास्तुविशारदांच्या संघटनांनी वारंवार विनंत्या करुनही पार्किंग इमारतीच्या उंचीमध्ये गृहित धरले जाणार नाही या स्थानिक कायद्यामध्ये बदल झालेला नाही! यामुळे इमारतीच्या आराखड्यामध्ये बहुमजली पार्किंगचा समावेश करणे अतिशय अवघड होते, यामुळेच एकूण बांधकाम अतिशय खार्चिक ब-याचदा अव्यवहार्य होते! विशिष्ट उंचीचे बंधन असताना त्यामध्ये एफएसआय बसवणे व त्याचवेळी तेवढ्या कार त्याच ठिकाणी बसवणे हे अशक्य काम आहे. आपले नियोजक केवळ कारसाठी अधिक जागा उपलब्ध करण्याचा विचार करतात त्यामुळे खाजगी वाहनांना बढावा मिळतो व सार्वजनिक वाहतूक सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जात नाही.
आजकाल सरासरी घरांमध्ये दोन कार, दोन किंवा तीन दुचाकी व शाळेत जाणा-यांसाठी सायकलही असते. आपण या मागण्या कशा पूर्ण करणार आहोत हे खरे आव्हान आहे व आपण म्हणतो घरे महाग होत चालली आहेत. सरतेशेवटी आपल्याला प्रश्न पडतो की या बांधकामाची किंमत कुणाला मोजावी लागत आहे? या सर्व प्रक्रियेमध्ये आपली जीवनशैली कार किंवा खाजगी वाहनावर केंद्रित होत आहे. कार पार्किंगसाठीचे नियम कडक करुन सार्वजनिक/नागरी संस्थांना आपले काम झाले असे वाटते व ते आपली जबाबदारी सोयीस्करपणे झटकण्याचा प्रयत्न करतात! मात्र कार पार्किंगचा नाही तर कारच्या गरजेचा विचार करायला हवा हे आपण विसरतो!

नव्या विकासासाठी नियमात बदल करुन पार्किंगची क्षमता वाढवल्याने समस्या सुटणार नाही, यामुळे केवळ आजची समस्या उद्यावर ढकलली जाईल! आपण जर केवळ कारचा विचार करत असू तर हेच होईल. शहराच्या संपूर्ण नियोजनाचा व त्यांना अगदी लहानशा कामासाठी शहराच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत का प्रवास करावा लागतो याचा विचार करा? आपल्या समाजामध्ये विकेंद्रीकरण हा शब्द अगदी सहजपणे वापरला जातो. खाजगी क्षेत्रात झपाट्याने विकेंद्रीकरण झाले आहे, अनेक जुन्या दुकानांनी उपनगरामध्ये आपल्या शाखा उघडल्या आहेत. मात्र सरकारी पातळीवर विचार केला तर लोकांना अनेक कामांसाठी सरकारी संस्थेच्या मुख्यालयात धाव घ्यावी लागते हे तथ्य आहे. सार्वजनिक संस्थांच्या विभागीय कार्यालयातील कर्मचा-यांचीही हीच परिस्थिती आहे तर सामान्य माणसाची काय अवस्था. /१२ उतारा, वीज बिले किंवा अगदी मालमत्ता कर यासारखी कागदपत्रे १००% ऑनलाईन मिळाली व जमा करता आली तर बराचसा प्रवास कमी होईल. सोसायट्यांच्या समोर रस्त्यावर पार्किंगवर निर्बंध घालणे हा तोडगा नाही तर लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरीच सेवा उपलब्ध करुन दिल्यामुळे कार खरेदी करण्याची गरज कमी होईल, ज्यामुळे पार्किंगसाठीच्या जागेची गरज कमी होईल व पार्किंगसाठी कमी जागा लागेल. प्रशासन जेव्हा एखाद्या व्यक्तिवर सर्व कर आकारुन तिला कार खरेदी करण्याची परवानगी देते तेव्हा ती कार पार्क करण्यासाठी जागाही दिली पाहिजे. केवळ व्यक्तिच्या निवासस्थानीच नाही तर अपरिहार्यतेमुळे ती कारने ज्या-ज्या ठिकाणी जाते तिथे सगळीकडे कार पार्क करायला जागा दिली पाहिजे! कार रस्त्यावर ठेवायला किंवा पार्किंगसाठी प्रति तास भरमसाठ शुल्क द्यायला कुणालाच आवडत नाही, कारण एकीकडे इंधनाच्या किमती दर दिवशी वाढत असताना पार्किंगमुळे खिशावर आणखी भार पडतो व जगणे दिवसेंदिवस अवघड होत जाते!

कार पार्किंगची संख्या कमी करण्यात केवळ नियोजन प्राधिकरण किंवा नागरी संस्थाच नाही तर  सामान्य माणसाची भूमिकाही तितकीच महत्वाची आहे. आपण इतके स्वार्थी झालो आहोत की आपण कारचा सामुहिक वापर (कार पूल) किंवा आपल्या कामाचे नियोजन व्यवस्थित करुन आठवड्यातील किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर करणे विसरत चाललो आहोत! आपले शासनकर्ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची समस्या ज्याप्रकारे हाताळत आहेत त्यामुळे मी सामान्य माणसाला पूर्णपणे दोष देणार नाही, खरोखरच आता देवच यातून वाचवू शकेल. वरील अवतरणाप्रमाणे पार्किंगपेक्षाही हिरवाईकडे अधिक लक्ष दिले पाहिजे असे मला वाटते!
संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!


संजीवनीची सामाजिक बाजू!

शहराविषयीच्या तुमच्या काही तक्रारी असतील, तर खालील लिंकवर क्लिक करा
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx


हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा

wood pecker gray pigmy orange head close.jpg


No comments:

Post a Comment