Thursday 6 December 2012

भरतपूर, रणथंबोर, आजचा स्वर्ग भविष्यातील काय?



 
 
 
 
 
पक्षी हे वन्य जगताचा अतिशय महत्वाचा घटक आहेत. आपण त्यांना दाणा-पाणी देतो, पाळतो व आपल्याला असं वाटतं की आपण त्यांना ओळखायला लागलो आहोत. मात्र ते ज्या जगात राहतात ते खरंच विस्मयकारक आहे....                       डेव्हिड अटेनबरो

मी सात वर्षांपूर्वी भरतपूर इथल्या केवळादेव अभयारण्याला भेट दिली तेव्हा मला पक्षांविषयी फारशी माहिती नव्हती. मात्र नुकतेच हिवाळ्यात तिथे गेल्यानंतर मला अजूनही पक्षांविषयी किती कमी माहिती आहे याची जाणीव झाली! महान निसर्गतज्ञाचे वर काढलेले उद्गार किती समर्पक आहेत हे पुन्हा एकदा पटलं. आपण केवळ त्यांचं निरीक्षण करुन परमेश्वरानं त्यांच्यावर जी सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे तिचं कौतुक करु शकतो. मी गेल्या वेळी भरतपूरला उन्हाळ्यात गेलो होतो. तिथे जाण्यासाठी तो सर्वात चांगला काळ नाही. मात्र त्यावेळी मला तिथे जे दृश्य पाहायला मिळालं त्यावरुन हिवाळ्यातलं दृश्य कसं असेल याची कल्पना आली, कारण याच काळात ब-याच स्थलांतरित पाहुण्यांचं तिथे आगमन होतं! मला तेव्हापासून भारतातल्या या पक्षांच्या स्वर्गाला पुन्हा भेट द्यायची होती, मात्र काही ना काही कारणांनी उशीर होत गेला. या हिवाळ्यात मी सगळी कामं बाजूला टाकली, मला उत्तरेतली थंडी फारशी सहन होत नाही, मात्र त्याकडेही दुर्लक्ष केलं, बॅगेत सगळे गरम कपडे भरले आणि माझा मित्र नितीन याच्यासोबत भरतपूरला जाण्यासाठी तिकीट काढलं! तिथे कडाक्याची थंडी सहन करावी लागली मात्र जो अनुभव मिळाला तो अविस्मरणीय होता!
एखाद्या घरात दैनंदिन कार्यक्रम सुरु असतात मात्र काही मंगल कार्य असेल तर त्याच घराचा जसा संपूर्ण कायापालट होतो तसं काहीसं तिथलं चित्रं होतं! जगाच्या कानाकोप-यातून आलेले लाखो स्थलांतरित पाहुणे व झाडा-झुडपांच्या विविध रंगी छटांची सगळीकडे पखरण झाली होती! सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आकाशाच्या विविध छटा दिसत होत्या. आकाशात मुक्तपणे संचार करणारे पक्षी म्हणजे एखाद्या मोठ्या कॅनव्हासवर अनेक कुंचल्यांनी एकाच वेळी फटकारे मारल्याप्रमाणे दिसत होते! ते दृश्य पाहून तिथे येणा-या प्रत्येक पर्यटकाची मनोवस्था विस्मयचकित अशीच असते!

या अभयारण्याची सगळ्यात चांगली बाब म्हणजे इथे वाहनांना पूर्ण बंदी आहे. तुम्ही सायकल किंवा सायकल रिक्षा घेऊ शकता. मात्र साधारण ३५ चौरस किलोमीटरचं हे अभयारण्य पाहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पायी फिरणं. वाहनांवर बंदी घालण्याच्या धोरणामुळे इथे शांतता आहे, जी पक्षांना मुक्त स्वातंत्र्य मिळण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. या अभयारण्यामध्ये ब-याचशा भागांत मोठ मोठे तलाव आहेत, जिथे हिवाळ्यात स्थलांतर करणारे अनेक पक्षी राहतात. या तलावांमधलं पाणी उथळ असल्यामुळे सूर्यप्रकाश तळापर्यंत पोहोचतो, त्यामुळे त्यामध्ये शेवाळं तयार होतं. हे शेवाळं अनेक कीटकांचं व कीटक पक्षांचं खाद्य असतात. अशा प्रकारे हे जीवनचक्र सुरु राहतं.
पक्षी मार्गदर्शक आणि एक चांगली दुर्बिण घेऊन तुम्ही भटकंतीला सुरुवात करु शकता. दुर्बिणीतून पक्षांचं सौंदर्य न्याहाळताना वेळ कसा जातो हे कळणातही नाही. किंवा एखाद्या सायकल रिक्षामध्ये कॅमेरा घेऊन जा व अगदी कॅमे-याची बॅटरी संपेपर्यंत पक्षांची छायाचित्रे काढत राहा! थकलात तर अभयारण्यात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या मचाणांवर चढून भोवतालचा परिसर पाहा. विस्तीर्ण, ओलसर हिरवीकंच जमीन, निळंशार आकाश व हिवाळ्यातला सौम्य सूर्यप्रकाश, अशा वातावरणात मध्येच दलदलीत आढळणारा गरुड पक्षांना इशारा देत असतो. आकाशाचे रंग अचानक बदलून करड्या, जांभळ्या व पांढ-या छटा पसरतात व त्यात एकाचवेळी हजारो बदकांचा जथ्था उडत जातो! सूर्यास्ताच्यावेळी बदकापासून ते करकोच्यापर्यंत अनेक आकारांच्या व रंगांच्या पक्षांनी आसमंत फुलून जातो! मी तीन संध्याकाळी केवळ सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर उडणा-या पक्षांची छायाचित्रे घेण्यात घालवल्या. त्यात खरोखर अतिशय मजा आली; कारण काही वेळा पक्षी अतिशय उंच किंवा कमी उंचीवरुन उडत होते. माझ्यासोबत अनेक जण असाच प्रयत्न करत होते, शेवटी मला हवी तशी काही छायाचित्रं मिळाली!

वन्यप्रेमींसाठी हे अतिशय आशादायक चित्रं आहे, मात्र या अभयारण्याला वाढत्या शहरीकरणामुळे धोका निर्माण झाला आहे. अभयारण्यालगत महत्वाचा राज्य महामार्ग आहे व भरतपूर शहरही गेल्या सात वर्षात वेगानं वाढलं आहे. यातलं एक महत्वाचं नुकसान म्हणजे सात वर्षांपूर्वी मी आलो तेव्हा संध्याकाळच्या वेळी अनेक घरांवर मोर दिसायचे! आम्ही एक रिक्षा केली होती, जसवंत सिंह नावाच्या रिक्षावाल्याला मी विचारलं त्या मोरांचं काय झालं? त्यानं उत्तर दिलं, " इंसानो ने खदेड दिया बाबुजी उन्हे " म्हणजे माणसांनी त्यांना शहरातून बाहेर काढलं! वाढती लोकसंख्या, वाहनांचं प्रदूषण, वृक्ष तोड, त्यामुळे परिणामी पक्षांची घरं कमी होत आहेत! त्यामुळे पक्षांची रवानगी अभयारण्यात करण्यात आली आहे! दुर्दैवाने अधिकारी केवळ अभयारण्याचाच विचार करतात व त्याच्या आजूबाजूला होणा-या घडामोडींचा विचार करत नाहीत! अभयारण्यात राजीव गांधींच्या नावाने एक सुंदर वास्तू आहे. ती वाचनालय, स्मरणिका विक्री केंद्रं व केवळादेव अभयारण्य तसंच सभोवतालच्या परिसराचा इतिहास सांगण्यासाठी आहे. मात्र तिथे माहिती देण्यासाठी कुणीही नव्हतं, वाचनालय व स्मरणिका विक्री केंद्रंही उघडं नव्हतं! पर्यटनाविषयीचा आपला दृष्टीकोन अशा प्रकारचा आहे. तिथे मला ज्युराँग पक्षी अभयारण्याची आठवण झाली, खरं तर ते एक बंदिस्त प्राणी संग्रहालय आहे मात्र त्याचं जोरदार विपणन करण्यात आल्यामुळे लाखो पर्यटक तिथे जातात. तिथे स्मरणिकांची अनेक दुकानं, चांगली उपाहारगृहं आहेत, तिथे भेट देणारा प्रत्येक जण आठवण म्हणून काही तरी घेतोच. भरतपूर ज्युराँगपेक्षा बरंच मोठं आहे व नैसर्गिक ठिकाण आहे, त्यामुळे त्याची क्षमताही अधिक आहे! मात्र आपल्याकडच्या ब-याच ठिकाणांप्रमाणेच अधिकारी जे चाललं आहे त्यातच खुश आहेत, त्यांना परिस्थिती सुधारण्यात रस नाही. तिथे सुधारणा करण्यासाठी लागणा-या दूरदृष्टीचा अभाव आहे. अभयारण्यात केवळ चहा आणि कॉफी विकणारं लहानसं दुकान आहे! तुम्ही अभयारण्यात काही दिवस राहायचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमची सोय करावी लागते.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे तिथल्या रिक्षावाल्यांची दयनीय अवस्था, त्यांच्यामुळेच खरंतर हे अभयारण्य टिकून आहे. कडाक्याची थंडी असो किंवा कडकडीत उन्हाळा, ते तुम्हाला अभयारण्याच्या ओबडधोबड वाटेवरुन अतिशय उत्साहानं घेऊन जातात, कधी कधी या उत्साहामुळे सुद्धा तुम्ही वैतागू शकता. ते तासाला केवळ ७० रुपये घेतात; तुम्हाला थोडेसे अधिक पैसे देऊन मार्गदर्शक मिळू शकतात, मात्र ब-याचशा रिक्षावाल्यांना पक्षी व अभयारण्याविषयी बरीच माहिती असते. आमचा रिक्षावाला जसवंत सिंह सकाळी कडाक्याच्या थंडीत चप्पल घालायचा व दुपारी शूज घालायचा! ते पाहून नितीननं त्याला एकदा विचारलं, असं का? त्यानं हसून उत्तर दिलं "बाबुजी मेरा नंबर दोपहर मे आता है " म्हणजे सकाळी त्याला मुलगा शूज घालून शाळेत जातो व तो परत आल्यानंतरच त्याला शूज मिळतात! तिथल्या रिक्षावाल्यांची आर्थिक स्थिती कशी आहे हे सांगण्यासाठी ही लहानशी घटना पुरेशी आहे! आपण त्यांना पुरेशी बक्षिशी दिली तरी काहीतरी कायमस्वरुपी तोडगा काढणं आवश्यक आहे हे सांगायची गरज नाही, कारण ते सुखी व समाधानी असतील, तर पर्यटक व अभयारण्यामध्ये एक नातं निर्माण करण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे प्रयत्न करु शकतील.

अभयारण्यात येणा-या पर्यटकांचं वर्तनही महत्वाचं आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा समूहात शांतता राखणं आपल्याला जमत नाही. इथे आपण विदेशी पर्यटकांकडून बरंच शिकण्यासारखं आहे, ते शांतपणे पक्षांचं निरीक्षण करत असतात व ओरडून इतरांना तुम्ही काय पाहिलं आहे हे सांगायचा प्रयत्न करण्यापेक्षा, त्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेतात! भरतपूर एकदा तरी पाहायलाच हवं, प्रवेश शुल्क, प्रवेश यंत्रणा अगदी सोपी आहे. मला केवळ एक बाब कधीच समजलेली नाही की विदेशी पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क जवळपास दहा पट अधिक आहे, इतर देशांमध्ये कुठेही असं दिसत नाही!

या पार्श्वभूमीवर रणथंबोरला जाणं एक वेगळाच अनुभव होता. अधिका-यांना अभयारण्याविषयी काय वाटतं हे माहिती नाही मात्र त्यांनी प्रवेश प्रक्रिया एवढी कडक केली आहे की तुम्हाला एखाद्या अणुकेंद्रात प्रवेश करत असल्यासारखं वाटेल! तुम्ही सफारीचं आरक्षण करण्यासाठी दिलेल्या ओळखपत्रांची ऑनलाईन पडताळणी झाल्यानंतरही तुम्हाला प्रवेशाच्या वेळी व प्रवेशद्वारापाशी मूळ कागदपत्रं दाखवावी लागतात, तिथून तुम्हाला संगणकाद्वारे मार्ग नेमून दिला जातो. एवढंच नाही तर सफारी आरक्षित करताना नाव दिलेल्या मंडळींपैकी कुणी एखाद्या कारणामुळे येऊ शकलं नाही तरी त्यांची ओळखपत्रंही दाखवावी लागतात, असं का हे मात्र माहिती नाही! आरक्षण यंत्रणेनुसार ज्या व्यक्तींनी ऑनलाईन आरक्षण केलं आहे त्यांना मार्ग नेमून देण्यासाठी, त्यांनी पहाटे ५ वाजता आरक्षण खिडकीपाशी उपस्थित असणं आवश्यक आहे! हे जाचक आहे व ही संपूर्ण पद्धत सोपी करणं आवश्यक आहे. कारण अशा वेळी स्थानिक प्रतिनिधी, हॉटेलमध्ये काम करणारी मुले व आरक्षण अधिका-यांचं साटंलोटं असतं व पर्यटकांना आरक्षण निश्चित करण्यासाठी त्यांच्यापुढे गुडघे टेकून पैसे द्यावे लागतात.

मी देशातली जवळपास सर्व अभयारण्य पाहिली आहेत व रणथंबोरच्या सफारी सर्वात महाग आहेत! त्या एवढ्या महाग आहेत की स्वतंत्र जिप्सीद्वारे सफारी केवळ विदेशी पर्यटकांनाच परवडते, इतरांना १५-२० जणांना घेऊन जाणा-या गाडीनेच (कँटर) प्रवास करावा लागतो! एवढं असूनही सफारीची वेळ इतर अभयारण्याच्या तुलनेत कमी आहे. याविषयी विचारणा केली असता उत्तर मिळालं "बाबुजी सबको साथ मे लेके चलना पडता है " म्हणजे आरक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक अधिका-याला व घटकाला पैसे द्यावे लागतात!

एवढा त्रास सोडला तर रणथंबोरचं जंगल पाहण्यासाठी हा सर्वोत्तम कालावधी आहे. मात्र कुणाला फक्त वाघ पाहायचे असतील तर हिवाळ्यात जाऊ नये कारण या काळात ते फारसे दिसत नाहीत. संपूर्ण अभयारण्यात पुरेसं पाणी असतं, रणथंबोरची रचना अशी आहे की अनेक पाट व चर असल्यामुळे वाघ पर्यटकांचा त्रास न होता विश्रांती घेऊ शकतात. केवळ वाघांसाठीच नाही तर उपजीविकेसाठी जंगलांवर अवलंबून असलेल्या अनेक लोकांना भेटायची संधी मिळते, म्हणून मला या जंगलांना भेट द्यायला आवडतं. त्यांचे अनुभव ऐकणं म्हणजे एकाचवेळी अनेक जंगलं वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्यासारखं असतं. रणथंबोरमध्ये असाच एक अवलिया भेटला, रईस खान! तो गेली ३० वर्षं रणथंबोरमध्ये राहात आहे, एवढ्या प्रदीर्घ अनुभवामुळे तो त्याच्या पंचेद्रियांनी अशा गोष्टी अनुभवू शकतो ज्या अत्याधुनिक साधनांनीही पाहता येणार नाहीत! त्याच्याकडून जंगलाविषयी माहिती घेणं हा अनोखा अनुभव होता व अशा भेटींमधूनच जंगलांची सफर अधिक रोचक होते. दुर्दैवानं आपल्या यंत्रणेसाठी तांत्रिक ज्ञान व नावापुढे पदवी असणं आवश्यक आहे नाही तर रईस भाईंसारखी माणसं आपल्या यंत्रणेत सर्वोच्च पदी असती! हा निरक्षर माणूस जंगलावर आपल्या घरासारखं जीवापाड प्रेम करतो व अगदी वन अधिका-यांनाही वाघांचं व विविध प्रजातींच्या वृक्षांचं संवर्धन करण्याविषयी मार्गदर्शन करतो!

भरतपूर किंवा रणथंबोरसारख्या जंगलांमधून परत येताना जे समाधान मिळतं ते शब्दांच्या पलिकडचं असतं. जंगलांमध्ये मला काय वाटतं हे मी नेमकं शब्दात व्यक्त करु शकत नाही, मात्र प्रत्येक भेटीमुळे झाडं, पक्षी, प्राणी व त्या जंगलांचा भाग असलेल्या माणसांविषयी अधिक जाणून घ्यावसं वाटतं! मला वाटतं हीच भावना आपल्याला चालना देते. मित्रांनो जगभरातली जंगलं व मी वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्याशी निगडीत घटक धोक्यात आहेत. रईसभाई अतिशय भावूक होऊन म्हणाले, " साब ३० साल बीत गये ये जंगल को देखते, पर डर लगता है सोच के की ज्यादा दिन नही टिकेगा ये सब, ऐसेही चलता रहा तो " ( मी, ३० वर्षं हे जंगल पाहत आहे, मात्र आता मला भीती वाटते की जर असंच चालत राहीलं तर हे सगळं फार काळ टिकणार नाही).
आपल्याला केवळ रणथंबोरमध्येच नाही तर प्रत्येक गावात, शहरात, आपल्या प्रत्येकामध्ये एक रईसभाई असायला हवा, तरंच जंगलं, त्यातील पक्षी व प्राण्यांचं काही भवितव्य आहे!

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!


संजीवनीची सामाजिक बाजू!


शहराविषयीच्या तुमच्या काही तक्रारी असतील, तर खालील लिंकवर क्लिक करा

http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx


No comments:

Post a Comment