Tuesday 22 January 2013

भविष्य रीअल इस्टेटचे



https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhiqt4YlcLdqRrJ3ZfKN4s8pdeLDBOj8rm4JE8dphgQRWemRw-8BK8rvhWYFTZSRbifeNpDQ_xqM3miIg4CuCQMdjs13jYPqhE4LIjjt-mEXRSBkcMnWUmrDMQPbPeIpu1pesXNLeueaGw/s320/block2b.jpg 
 
 
 
  

सामूहिक प्रयत्नांमध्ये वैयक्तिक बांधीलकी असल्यास- 
संघ, कंपनी, समाज व संस्कृती चांगल्याप्रकारे काम करु 
शकतात...व्हिन्स लोम्बार्डी

हे एका महान अमेरिकन फुटबॉल प्रशिक्षकाचे अवतरण आहे, जो स्वतः एखाद्या व्यवस्थापकीय संस्थेप्रमाणे होता; मात्र आता बरेच जण बुचकळ्यात पडतील की याचा रिअल इस्टेट क्षेत्राशी काय संबंध? मात्र रिअल इस्टेट क्षेत्रातील अत्यंत दुर्लक्षित पैलू, जो थेट या उद्योगाच्या कामगिरीशी तसेच उद्योगाच्या प्रतिमेशी संबंधित आहे, तो म्हणजे या उद्योगातील विविध कंपन्या/संस्थांमधील सदस्यांची बांधीलकी. इथे मला काही नुकतेच आलेले वैयक्तिक अनुभव सांगायचे आहेत, त्यानंतर आपण त्याच्या पार्श्वभूमीविषयी चर्चा करु किंवा परिस्थितीचे व त्याचा संपूर्ण उद्योगावर काय परिणाम होईल याचे विश्लेषण करु. हे माझे वैयक्तिक अनुभव असले तरी ते काही जगावेगळे नाहीत. या उद्योगात काम करणा-या आपल्यापैकी ब-याच जणांना अशा प्रकारचे अनुभव आले असतील किंवा दररोज येत असतील!

प्रसंग १: आमच्या कार्यालयाला २०१२ च्या दिवाळीत चार दिवस सुट्टी होती. कार्यालय पुन्हा सुरु झालं तेव्हा आमच्याकडे गेल्या सहा महिन्यांपासून काम करणारे बांधकाम स्थळावरील दोन अभियंते कामावर गेलेच नाहीत व गैरहजर राहणार असंही कळवलं नाही. आम्ही त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला मात्र त्याला उत्तर मिळालं नाही, त्यांच्या घरी संपर्क साधायचा प्रयत्न केला मात्र कुटुंबीयांनी त्यांना माहिती नाही असं उत्तर दिलं. व्यवस्थापनाला ४-५ दिवसांनी काय झालं असावं हे समजलं व नवीन अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली. हे सांगायची गरज नाही की त्या अभियंत्यांनी कळवण्याची तसदी न घेता नोकरी सोडली.

प्रसंग २: आमच्या नियोजन विभागामध्ये आठ महिन्यांपासून दोन तरुण वास्तुविशारद होते, ज्यांना चांगला पगार होता. एक दिवस ते माझ्या भागीदाराला भेटले, ज्याच्यावर अभियांत्रिकी विभागाची जबाबदारी आहे व नोकरी सोडायची असल्याचे कळवलं. त्याने त्यांना कारण व कधीपासून जाणार असं विचारलं? त्यांनी सांगीतलं की त्यांना अधिक चांगली संधी शोधायची होती व त्यासाठी लगेच निघायचं होतं. माझ्या भागीदारानं त्यांना विचारलं की त्यांच्या हातात ज्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्याचं काय? त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. त्यांनी कसंबसं महिना अखेरीपर्यंत काम केलं व चित्रांच्या फाइल क्रमवार लावण्याचीही तसदी न घेता नोकरी सोडली. मला त्यांचा पगार थांबवावा लागला, त्यांच्याकडील काम व्यवस्थितपणे सोपवण्यासाठी बोलवावं लागले व त्यानंतरच त्यांचा पगार देण्यात आला.

प्रसंग ३: माझ्या एका चांगल्या मित्रानं मला विनंती केली की मी त्याच्या स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी व ब्रिटनमध्ये व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या मुलीला अनुभवासाठी नोकरी देऊ शकेन का? मी त्या मुलीला माझ्या कार्यालयात लगेच रुजू करुन घेतलं, दोन महिन्यातच ती माझ्याकडे आली व म्हणाली की मला नोकरी सोडायची आहे, तोपर्यंत तिला ग्राहकांनी सदनिकेमध्ये मागीतलेली अतिरिक्त कामं करण्यासारख्या लहान गोष्टींची जबाबदारी हाताळणंही शिकायचं होतं. मी तिला विचारलं का, तिने सांगीतलं की तिला एका बहुराष्ट्रीय कंपनीत चांगली संधी मिळत आहे, ज्यात तिला तिच्या आवडीचं काम करता येईल ते म्हणजे प्रकल्पाचं व्यवस्थापन. मी तिला म्हणालो ग्राहकांसोबतच्या संपर्काचे तपशील सहाय्यक
कर्मचा-यांकडे दे व महिनाअखेरीस जा. ती बरं म्हणाली व त्यादिवशी निघून गेली, त्यानंतर तिचा मोबाईलवर संदेश आला की ती दुस-या दिवशीपासूनच येणार नाही व तिने सर्व फाइल म्हणजे तिच्या कामाची जबाबदारी तिच्या सहका-यांना दिली आहे! ती दुस-या दिवसापासून आली नाही!

प्रसंग ४: आम्ही अभियंत्यांसाठी मुलाखती घेत होतो व त्यातून काही उमेदवार निवडले. अंतिम फेरीनंतर आम्ही काही जणांची निवड केली व त्यांना नियुक्तीचं पत्र दिलं. एकानं नियुक्तीचं पत्र घेतलं व तो कोणत्या तारखेपासून रुजू होईल हे सांगीतलं. त्या दिवशी तो रुजूही झाला नाही व त्याच्याकडून काही संदेशही आला नाही. आमच्या प्रशासकीय विभागानं वारंवार पाठपुरावा घेतल्यानंतर त्याने केवळ संदेश पाठवला की त्याला अधिक पगाराची नोकरी मिळाली आहे व तो आमच्या कंपनीत काम करु शकत नाही.

मी त्यांच्यापैकी कुणाचीही नावे दिलेली नाहीत कारण ती महत्वाची नाहीत कारण आपण त्यांच्या नावांविषयी नाही तर दृष्टीकोनाविषयी चर्चा करणार आहोत. मला खात्री आहे की आमच्या बांधकाम व्यवसायात ब-याच जणांना असे अनुभव आले असतील व ते म्हणतील की त्यात काय एवढं? बहुतेक आता माझं वय होत चालल्यानं अशा गोष्टींचा मला जास्त त्रास होतो किंवा त्यामुळे मी वैतागतो असं असेल. विशेषतः ज्या पिढीचा व्यावसायिक जगातील प्रवास नुकताच सुरु झाला आहे तिनं अशा प्रकारचा दृष्टीकोन ठेवणं योग्य आहे का? बांधीलकी, सांघिक काम, मूल्ये, जबाबदारी, हातातील काम, अनुबंध व नाते इत्यादी शब्द कुठे आहेत! विकासक सर्वात चांगला पगार देत नाहीत हे मान्य आहे. मात्र आता रिअल इस्टेट उद्योगातील अभियांत्रिकी किंवा विपणन क्षेत्रातल्या व इतर कुठल्याही उद्योगातल्या नवोदितांना सारखाच पगार मिळतो. रिअल इस्टेट उद्योगातल्या एकाच मालकाच्या किंवा भागीदारी कंपन्यांच्या विकासाला मर्यादा असतात हे खरं असलं तरीही, नवोदितांना तिथे सर्वोत्तम अनुभव मिळतो, कारण त्यांना कमी मनुष्यबळामध्ये बहुतेक कामं करायची असतात व सर्व कामांचा अनुभव मिळवण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे. मी नवोदित असतानाचे दिवस मला आठवले तेव्हा माझ्यावर बांधकामाच्या ठिकाणी देखरेख करायची जबाबदारी होती, माझा मित्र मोठ्या कंपनीमध्ये मेकॅनिकल अभियंता होता व माझ्यापेक्षा चौपट पगार होता व कामचे तास माझ्या ३/४ होते. तो मला कामाच्या तासांबद्दल चिडवायचा; मी त्याला सांगायचो की तू तुझ्या कारखान्यात गेला नाहीस तर ती बंद होणार नाही मात्र मी बांधकामाच्या ठिकाणी गेलो नाही तर तिथलं काम नक्कीच थांबेल. लहान ठिकाणी काम करायचा असा फायदा असतो.

लहान कंपनी किंवा बहुराष्ट्रीय कंपनी असो, हातातल्या कामाविषयी बांधीलकी व व्यवस्थापनाने आपल्यावर सोपवलेली जबाबदारीचा हा मुद्दा होता. नवोदितांच्या दृष्टीकोनातून पाहिले तर आम्हाला मिळालेली नोकरी हे आम्ही जे शिकलो ते प्रत्यक्ष वापरण्याची संधी होती व त्या संधीचा जास्तीत जास्त वापर करुन घेण्यास आम्ही उत्सुक होतो. केवळ मीच नाही तर आमची पूर्ण पिढी तशी होती, आम्ही घड्याळाकडे न बघता काम करायचो, माझं काम काय आहे किंवा मी काय करतोय किंवा मला हे कुणी सांगीतलेले नाही मग मी का करतोय असे प्रश्न आम्हाला पडायचे नाहीत. केवळ थोड्याशा पगार वाढीसाठी आम्ही नोकरी बदलण्याचा विचार करायचो नाही व एका समूहात काम करताना इतर संधी शोधत राहायचो नाही.  आम्ही कदाचित आजच्या तरुणांच्या नजरेत मूर्ख होतो. कारकिर्दीचा विचार करताना विकासाचं किंवा मोठं लक्ष्य बाळगण्यात गैर काहीच नाही मात्र किमान सुरुवातीच्या दिवसात तरी प्रत्येक संस्था ही एक प्रशिक्षण संस्था असते हे समजून घेणं महत्वाचं असतं जे आम्ही घेतलं.

मग जेव्हा नोकरीचा विषय येतो तेव्हा तरुण पिढी आतासारखी का वागते असा प्रश्न मला पडतो. मानसिकतेचा पाया इतका उथळ असेल तर त्यांच्यावर मोठ्या जबाबदा-या कशा देणार, शेवटी हे आमच्या उद्योगाचे भविष्य आहेत! इथे पुन्हा बरेच जण आरोप करतील की बांधकाम उद्योगातील विकासक किंवा मालक त्यांना चांगली वागणूक देत नाहीत. मात्र ते दिवस गेले जेव्हा बांधकाम व्यावसायिक चांगले पैसे द्यायचे नाहीत व कर्मचा-यांसाठी स्थैर्य ही एक समस्या होती, आता परिस्थिती बदलली आहे. रिअल इस्टेटमधील ब-याच मोठ्या समूहांना कामाचा संघ कायम ठेवणं महत्वाचं असल्याचं समजलं आहे, कारण तुमच्या संघात सातत्य असेल तर ब-याच समस्या टाळता येतात. प्रामुख्यानं रिअल इस्टेट उद्योगामध्ये बांधकाम स्थळाच्या निरीक्षणापासून ते ग्राहक हाताळण्यापर्यंत वैयक्तिकपणे पाहणे महत्वाचं आहे कारण अजूनही हा उद्योग इतर उद्योगांप्रमाणे संगणकीकृत किंवा यांत्रिक नाही. उदाहरणार्थ बांधकाम स्थळावरील अभियंत्याला तुम्ही प्लास्टर लावणं, फरशी बसवणं, रंगकाम यासारख्या अंतिम कामांचा दर्जा पाहण्यासाठी प्रशिक्षित केलेलं असते, तो अतिशय कामाचा असतो. पुढच्या प्रकल्पात तुम्ही त्याला काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर तिथे नियुक्त करुन त्याच्या कौशल्यावर विसंबून राहू शकता. त्याने अचानक नोकरी सोडली तर तुम्हाला दुसरा माणूस शोधायला लागतो, तुमच्या कामाचा दर्जा त्याला समजावून द्यावा लागतो व तो प्रशिक्षित होईपर्यंत त्याच्या चुका स्वीकाराव्या लागतात. इतर उद्योगांप्रमाणे इथे केलेली गोष्ट मागे घेता येत नाही. एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने पूर्ण झाल्यानंतर ती तोडावी लागते व पुन्हा करावी लागते, त्यामध्ये वेळ व पैसा दोन्ही वाया जातात.

या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित लोकांचा सातत्यपूर्ण संघ असणं सर्वात महत्वाचं आहे. मात्र कोणतीही बांधीलकी न मानण्याच्या वाढत्या दृष्टीकोनामुळे, रिअल इस्टेट उद्योगात दिवसेंदिवस गोष्टी अवघड होत चालल्या आहेत. आयटी उद्योगानंतर रिअल इस्टेट उद्योगात मनुष्यबळाची सर्वाधिक ये-जा सुरु असते जे उद्योगासाठी चांगले लक्षण नाही. एखादा कर्मचारी किंवा संघ हा कोणत्याही संस्थेचा चेहरा असतो. हा चेहरा सारखा बदलत असेल तर स्वाभाविकपणे त्याचा थेट परिणाम तुमच्या ग्राहकांसोबतच्या तुमच्या नात्यावर, तसेच तुम्ही तयार करत असलेल्या उत्पादनाच्या दर्जावर होणार आहे.

इथे विकासकाची भूमिका अतिशय महत्वाची आहे कारण मी वर उल्लेख केलेले बांधीलकी, नैतिकता, मूल्ये, विश्वास इत्यादी शब्द केवळ तुमच्या शब्दसंग्रहापुरते किंवा पुस्तकापुरते मर्यादित नको, तर ते प्रत्यक्षात उतरले पाहिजेत जे केवळ तुमच्या स्वतःच्या कृतीतून शक्य आहे. आयुष्यभर एकाच कंपनीमध्ये काम केल्याचं गौरवानं सांगायचे दिवस गेले हे आपल्याला स्वीकारणं भाग आहे. ती बांधीलकी मानणारी संस्कृती होती व तरुणांना त्या वातावरणातच प्रशिक्षित केलं जायचं. त्याशिवाय तरुणांचा नोकरीविषयी असा दृष्टीकोन होण्यामध्ये थोडीफार आपलीही चूक आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. आपण त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलायला हवं व त्यांच्यात बांधीलकीचा अर्थ रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण मोकळेपणानं विचार करायला हवा;अधिक देवाण घेवाण करायला हवी, कर्मचा-यांच्या कल्याणाच्या योजना राबवायला हव्यात, ज्यामुळे त्यांना सुरक्षित व आपल्याला महत्व दिले जात असल्याचं वाटेल. शेवटी बांधकाम व्यावसायिक म्हणून आपण केवळ इमारतीच बनवत नाही तर या तरुणांची कारकिर्दही घडवतो जे भविष्यात केवळ आपला समूह किंवा कंपनीचाच नाही तर या उद्योगाचा चेहरा बनतील.
त्याचवेळी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्येही तरुणांच्या या मानसिकतेची दखल घ्यायला हवी व त्यासंदर्भातील काही विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करायला हवा. यामुळे विद्यार्थ्यांना शिकत असतानाच बांधीलकीसारख्या शब्दांचे महत्व समजेल.

या संदर्भात मी तुम्हाला झेनमधील एक गोष्ट सांगतो; एक मुलगा झेन प्रशिक्षकांकडे तलवारबाजी शिकण्यासाठी गेला व विचारलं की मला तलवारबाजीत तरबेज होण्यासाठी मला किती दिवस लागतील? प्रशिक्षकानं उत्तर दिलं दहा वर्षे. ते ऐकून मुलगा म्हणला माझ्याकडे एवढा वेळ नाही, मी सगळं काही सोडून देईन व माझा पूर्ण वेळ तलवारबाजीच्या प्रशिक्षणासाठी देईन, मग चांगला योद्धा होण्यासाठी मला किती वर्षे लागतील?  प्रशिक्षकानं उत्तर दिलं, २० वर्षं! आश्चर्यचकित झालेल्या मुलानं विचारलं असं कसं? प्रशिक्षकानं उत्तर दिलं तू तुझं जीवन नेहमीप्रमाणे जगून तलवारबाज व्हावंस असं मला वाटतं, सर्व काही सोडल्यामुळे तू चांगला तलवारबाज होशील असं नाही. मात्र मी जे शिकवतो ते पूर्ण समर्पणानं शिकलास तर कमीत कमी वेळात तुला तुझं लक्ष्य गाठता येईल.”  

मला वाटतं या गोष्टीनं डोळे उघडतील व ज्या नवोदितांना किंवा तरुणांना रिअल इस्टेट क्षेत्रात कारकिर्द घडवायची आहे त्यांना मला सांगायचं आहे की केवळ झटपट पैसे कमावण्याच्या मागे लागू नका कारण तो जेवढ्या वेगानं तुमच्याकडे येतो तेवढ्याच वेगानं निघूनही जातो. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्यात खरं कौशल्य किंवा प्रावीण्य मिळवलं तर पैसे तुमच्याकडेच येतील. मात्र त्यासाठी व्यक्ती संयमी, मेहनती व बांधीलकी मानणारी असायला हवी. तुम्ही येत्या काही वर्षात कुठे असाल हे या दृष्टीकोनाद्वारेच ठरेल. एके दिवशी तुम्ही वरिष्ठ किंवा एखाद्या समूहाचे मालक असाल, त्यादिवशी तुम्हाला, आपण कोणत्या संस्कृतीला खतपाणी घातलंय असा पश्चाताप करावा लागू नये!






संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!

संजीवनीची सामाजिक बाजू    http://www.flickr.com/photos/65629150@N06/sets/72157628805700569/

शहराविषयीच्या तुमच्या काही तक्रारी असतील, तर खालील लिंकवर क्लिक करा

http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx

www.sanjeevanideve.com

No comments:

Post a Comment