Sunday 16 June 2013

कान्हा येथील जीवन !
















जगणं म्हणजे वारंवार पडणं आणि पुन्हा पुन्हा उभं राहाणं. जेव्हा गोष्टी सहजपणे घडत असतात व तुमच्या आजूबाजूला हिरवळ असते तेव्हा सभ्यपणे वागणं सोपं असतं. मात्र जेव्हा जमीन रखरखीत असते, करपलेली असते तेव्हा देखील लोक फसवून ती तुमच्याकडून घेऊ पाहतात....        नॅन्सी टर्नर.


मी प्रत्येक वेळी कान्हाला भेट देतो तेव्हा या महान लेखिकेचे शब्द माझ्या कानात गुंजत असतात. कारण मी केवळ जंगलालाच भेटत नसतो तर त्या जंगलाच्या परिसरात राहणा-या लोकांनाही भेटत असतो, या लोकांवरच तर आपल्यासाठी ते जंगल जिवंत ठेवण्याची जबाबदारी असते व त्यांचं जीवनही या जंगलावर अवलंबून असतं. त्यातल्या ब-याच जणांना हे माहिती आहे व ते जंगलाला पूर्णपणे समर्पित आहेत; तिथलं जीवन खरोखर अतिशय अवघड आहे मात्र ही माणसं चिवटपणानं लढत असतात. जंगल आपल्याला प्रत्येक भेटीत, प्रत्येक सफारीत नवीन काहीतरी द्यायला तयार असतं, मात्र आपण ते घ्यायची तयारी ठेवली पाहिजे. बहुतेक पर्यटक तिथे वाघाला बघायला येतात व त्यात काही गैर नाही कारण या प्राण्याच्या व्यक्तिमत्वाचा रुबाबच तसा असतो. माझ्या आत्तापर्यंतच्या भारतभरातील अनेक सहलींमध्ये मी शेकडोवेळा वाघ पाहिला आहे, मात्र प्रत्येक वेळा तो पाहण्याचे आकर्षण, थरार काही वेगळाच असतो. या वेळच्या कान्हा सफरीनंही मला निराश केलं नाही मला कान्हामध्ये अत्यंत दुर्मिळपणे दिसणारं, वाघीण व तिचे बछडे असं अप्रतिम दृश्य पाहायला मिळालं. सर्वसाधारणपणे सहा महिन्यांपर्यंतचे बछडे क्वचितच उघड्यावर येतात व त्यांना असं पाहणं हा एक विलक्षण अनुभव होता. प्रत्येक सहलीतून तुम्हाला पुन्हा एकदा येण्याची तीव्र इच्छा होते व हेच खरं जंगलाचं सौंदर्य आहे. आपण अतिशय संयम राखणंही आवश्यक आहे, आपण जंगलाकडून संयम राखण्याशिवाय दुसरी चांगली गोष्ट काय शिकू शकतो की संयम राखा व जंगलाला सूत्रधाराची भूमिका पार पाडू द्या. मग ते वाघाचे वछडे असतील किंवा एखादा ब्लू फ्लाय कॅचर सारखा छोटा पक्षी, प्रत्येकाला पाहण्याचा थरार व सौंदर्य वेगळं आहे, किंबहुना पक्षांचा माग काढणं अधिक अवघड आहे कारण त्यांचा वाघासारखा तो येताना मिळणारा इशारा किंवा पाउलखुणा काहीच नसतं.

अनेकदा वाघ पाहिल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली आहे की ठिपकेदार हरिण, लंगूर, सांबर किंवा अगदी कावळे हे वाघाची चाहूल लागताच जे इशारे देणारे आवाज काढतात त्यातून वाघाचा माग काढणं त्याला पाहण्यापेक्षाही अधिक चित्तथरारक असतं. जंगलातल्या वातावरणात केवळ एका प्राण्याच्या अस्तित्वामुळे सर्वजण सावधान होतात व त्यांची वागणूक बदलते ही केवळ अनुभवण्याची गोष्ट आहे. मला वाटतं यामुळेच पर्यटक व संपूर्ण यंत्रणा चालत राहते. सर्वोच्च न्यायालयाने वन्यजीव पर्यटनासाठी घालून दिलेल्या नियमांनंतरही राष्ट्रीय अभयारण्ये आवडती पर्यटनस्थळे होत आहेत. एकीकडे शहरी लोक वन्य जीव संरक्षणाविषयी जागरुक होत आहेत ही चांगली बाब आहे मात्र त्यापैकी खरोखर किती जणांना जंगलांविषयी खरोखर काळजी वाटते हा अभ्यासाचा विषय आहे. गेल्या काही वर्षांपासून मी केवळ जंगल किंवा प्राण्यांचा अभ्यास करत नाही तर वर उल्लेख केल्याप्रमाणे जंगलाच्या विशेषतः वाघाभोवती फिरणा-या संपूर्ण यंत्रणेविषयी अभ्यास करत आहे. कट्टर वन्यजीव प्रेमींना हे आवडणार नाही, मात्र तथ्य नाकारुन तोडगा काढण्याऐवजी, आहे ते तथ्य स्वीकारुन त्यावर तोडगा काढायला हवा. सफारीपूर्वी धाब्यावर होणा-या पहिल्या चहापासून, ते जिप्सी ते तिकीट खिडकीपर्यंत, चालकांपासून ते गाईडपर्यंतच सर्वांची एकच चर्चा सुरु असते "कल किधर साइटिंग हुई?" म्हणजे काल कुणी व कुठे वाघ पाहिला? त्यानुसार कुठल्या रस्त्यानं जायचं हे ठरतं. या धडपडीत मुख्य विषयकडे दुर्लक्ष होतं मात्र पर्यटकांच्या वाघ पाहण्याच्या तीव्र इच्छेचा वापर आपण त्यांना ते जंगल प्रेम कसे टिकवून ठेवता येईल याविषयी जागरुक करण्यासाठी वापरु शकतो.

त्यासाठी आपण ही जंगलाची संपूर्ण यंत्रणा पर्यटकांना व्यवस्थित दाखवायला हवी, म्हणजे त्यांना जंगल अधिक व्यापक अर्थानं समजून घेता येईल व ते केवळ एक पर्यटक न राहता, जंगलाच्या संरक्षणामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असेल. माझ्या या लेखात मी यावरच लक्ष केंद्रित करणार आहे धाब्यावर चहा बनवणारा चायवाला, तिथे काम करणारा पो-या, जिप्सीचा चालक, गाईड, जंगलातील रक्षक, रेंजर व संचालक यासारखे वरिष्ठ अधिकारी; हे या ना त्या प्रकारे जंगलाच्या रक्षणासाठी व पर्यटकांना ते पाहण्यास मदत करण्यासाठी जबाबदार आहेत. आपण जेव्हा जंगलाला भेट देतो तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की अशा ठिकाणांना 3- 4 दिवस भेट देणं वेगळी गोष्ट आहे व वर्षानुवर्षे तिथेच राहणं वेगळी गोष्ट आहे. मी कान्हामध्ये भेटलेल्या काही व्यक्तिंची उदाहरणं आपण पाहू म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं समजेल.

मंगलू हा १६ वर्षांचा मुलगा, खटीया द्वारावरील धाब्यावर चहा बनवतो. द्वार पहाटे ५.३० वाजगा उघडतं व चालक, पर्यटक, गाईड व जंगलाच्या द्वारावरील कर्मचारी यांची वर्दळ पहाटे ४.३० वाजल्यापासूनच सुरु होते. त्यामुळे त्याला ३.३० वाजताच तयार होऊन चहासाठी तयार राहावं लागतं. त्याला जवळच्या गावतला १० वर्षांचा संतराम मदत करतो. संतराम स्थानिक जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो, मात्र उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे थोडेफार पैसे कमवण्यासाठी त्यानं हे काम घेतलं आहे. या थोड्याफार पैशांनीच त्याच्या गावातल्या कुटुंबाला मदत होईल. जेव्हा शहरातली मुलं आपल्या पालकांसोबत सुट्टी घालवत असतात किंवा आळसावून अंथरुणावर पहुडली असतात तेव्हा या दोघांना पहाटे ३.३० वाजता उठून जंगलाशी संबंधित सगळ्यांना गरम गरम चहा देण्यासाठी मेहनत करावी लागते. ते स्वतः जंगलात कधीही फिरलेले नाहीत कारण सफारीचे दर त्यांना परवडत नाहीत! त्यांच्याकडे कान्हातल्या कडाक्याच्या थंडीत उब देणारे चांगले कपडेही नाहीत. अनेक हॉटेलमध्ये नाश्ता बनवणा-या मुलांचीही हिच परिस्थिती आहे. त्यांना रात्री उशीरापर्यंत जागून पर्यटकांच्या रात्रीच्या जेवणानंतर साफसफाई करावी लागते व पुन्हा सकाळी त्यांना सगळ्या मिळाव्यात यासाठी लवकर उठावं लागतं.

पर्यटकांना सफारीवर घेऊन जाणा-या प्रताप किंवा अनुप या चालकांचीही अशीच कहाणी आहे. जिप्सीच्या चालकांना पर्यटकांना त्यांच्या हॉटेलवरुन जंगलांच्या प्रवेर द्वारापाशी वेळेत आणावं लागतं, पहाटेच्या वेळी वाघ नजरेला पडण्याची शक्यता अधिक असते. यासाठी त्यांना पहाटे ३ वाजता उठून, वाहनं व्यवस्थित आहेत ना हे तपासून मग हॉटेलवर यावं लागतं, त्यानंतर त्यांना जंगलात प्रवेशाचे अर्ज गोळा करणं व सर्व औपचारिकता पूर्ण करणं अशी सगळी कामं करावी लागतात, ज्यामुळे पर्यटकांना जंगलात जाता येतं. त्यानंतर तासंतास प्रतिकूल वातावरणात, कान्हातल्या ओबडधाबड रस्त्यांवर कोणताही अपघात होऊ नये यासाठी अतिशय काळजीपूर्वक वाहन चालवावं लागतं.

अशोक, पंकज, मल्लासिंग या गाईड्सची गोष्टही काही वेगळी नाही. त्यांना त्यांचं दैनंदिन जीवन अभयारण्याच्या वेळांनुसार बदलावं लागतं, उघड्या जिप्सींमध्ये तासंतास बसून, सभोवतालच्या प्राणी व पक्षांच्या हालचालींवर लक्ष ठेवावं लागतं व ते पर्यटकांना समजावून सांगावं लागतं. त्याचवेळी वाघ पाहण्यासाठीच्या पर्यटकांच्या अतिउत्साहाला तोंड द्यां लागतं व तो पाहायला मिळाला नाही तर त्यांच्या रागाला तोंडही द्यावं लागतं. हे जंगल हजारो किलोमीटरवर पसरलं आहे व त्यामध्ये एक वाघ शोधणं हे सोपं काम नाही, मात्र त्यांना अथकपणे हे करावं लागतं, कारण पर्यटकांना असं वाटतं की त्यांनी गाईडला २०० रुपये दिले तर त्याच्यावर त्यांची मालकी आहे व त्यांना वाघ दाखवणं हे त्याचं कामच आहे!

त्यानंतर येतात तोमर किंवा मंगलसिंह यासारखे रक्षक, यापैकी काही जंगलात असतात तर काही द्वारापाशी असतात. माहुताचाही विचार करायला हवा तो हत्तीवर बसून वाघ व इतर प्राण्यांवर नजर ठेवतो. हे सर्व लोक जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य बजावत असतात कारण केवळ वाघच हल्ला करु शकत नाही तर साप चावू शकतो, तसंच रानगवा व अस्वलासारखे प्राणीही जंगलात धोकादायक असू शकतात. त्याशिवाय पिण्याच्या पाण्यातून होणारा संसर्ग किंवा जंगलात डास प्रचंड प्रमाणात असल्यामुळे होणारा मलेरिया यामुळे नेहमी आजारी पडण्याची भीती असते. बहुतेक रक्षकांची कामाची पाळी २४ तासांची असते तेवढा पूर्ण काळ त्यांना एकटं घनदाट जंगलात राहावं लागतं, त्यावेळी वॉकी-टॉकीनं म्हणजेच वायरेल रेडियोनंच त्यांचा जगाशी संपर्क होऊ शकतो. विचार करा घनदाट जंगलातल्या काळोख्या रात्री तुम्ही एकटे आहात, मला वाटतं एकही पर्यटक तशा परिस्थितीत राहू शकणार नाही, मग त्यातली मौज अनुभवणं तर दूरच सोडा.

वरिष्ठ वन अधिका-यांचं आयुष्यही सोपं नसतं कारण त्यांना अनेक घटनांसाठी उत्तर द्यावं लागतं, उदाहरणार्थ जंगलांमध्ये लागलेले वणवे, जंगलांमधल्या प्राण्यांचा मृत्यू, किंवा प्राण्यांचा शेजारच्या गावातल्या गावक-यांवर हल्ला. प्रसिद्धी माध्यमं अतिशय संवेदनशील झाली आहेत त्यामुळे कान्हासारख्या ठिकाणी अगदी छोटीशी घटनाही जागतिक होऊ शकते व त्यामुळे त्या अधिका-याला नोकरी गमवावी लागू शकते!  

मला भेटलेल्यांपैकी केवळ काही व्यक्तिंची ही नावं आहेत, तिथे असे शेकडो मंगलू, संतराम, अशोक, प्रताप व तोमर आहेत जे आपलं कर्तव्य पार पाडताहेत व त्यासाठी त्यांचे कुणी आभार मानत नाही. वर्षानुवर्षे कोणत्याही सुट्टीशिवाय ते हे काम करतात कारण त्यांना सुट्टी परवडत नाही. बरेच जण म्हणतील त्यात काय मोठंसं त्यांच्या कामासाठी त्यांना पैसे मिळत नाहीत का? होय मिळतात मात्र त्यांना ज्या प्रकारचं काम करावं लागतं त्यासाठी त्यांना मिळणारा मेहनताना किती आहे ते पाहा? चहाचा एक कप ५ रुपयांना विकला जातो व विचार करा मंगलू व संतरामला  केवळ चांगलं शिक्षण व कपडे मिळण्यासाठी असे किती चहाचे कप विकावे लागतील. आवर्तन (रोटेशन) पद्धत असताना एक गाईड त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण एका ट्रिपमागे मिळणा-या २०० रुपयांवर कसं करु शकेल. आवर्तनामुळे प्रत्येक गाईडला त्याची पाळी दररोज येईल किंवा नाही याची खात्री नसते, त्यामुळे त्याला महिनाभर दररोज २०० रुपये मिळतीलच याची खात्री नसते! जंगलाच्या रक्षकांना किती पगार मिळतो किंवा काय पायाभूत सुविधा मिळतात ते पाहा, त्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून शिकारी व गावक-यांपासून वाघांचं रक्षण करण्याचं मोठं काम करावं लागतं! मला वाटतं पर्यटकांनी केवळ वाघ पाहण्याविषयी प्रश्न न विचारता हे प्रश्न स्वतःला विचारायला हवेत. असं झालं तरंच आपण जंगल संरक्षणाच्या आपल्या जबाबदारीविषयी विचार करु शकू. ऑनलाईन सफारीचं आरक्षण करणं, चांगल्या हॉटेलात राहाणं, घालायला उबदार कपडे, वाफाळणारा चहा, सोबत व्यवस्थित न्याहारी, न्यायला जिप्सी, जंगलाविषयी समजून सांगायला गाईड हे सगळं मिळवणं सोपं आहे कारण तुम्हाला केवळ आजूबाजूला पाहून जंगलाचं सौंदर्य न्याहाळण्याचं काम उरतं!
मित्रांनो तुम्ही केवळ जंगलात आलात, वाघांची छायाचित्र काढली व परत जाऊन सगळं काही विसरलात तर मी म्हणेन तुम्ही खरं जंगल पाहिलंच नाही. खरं जंगल म्हणजे केवळ वाघ पाहाणं नाही तर खरं जंगल या लोकांमध्ये दडलं आहे, ज्यांच्यामुळे तुम्हाला वाघ पाहाणं शक्य होतं. हे लोक पडद्यामागे जे कष्ट घेत असतात त्यामुळे आपली जंगलाची सहल स्मरणीय होते, असं असताना त्यांचं जीवन थोडंफार चांगलं व्हावं यासाठी आपणही हातभार लावायला नको का? तुम्ही त्यांच्यासाठी काय करु शकता हे विचारु नका मात्र तुम्हाला जंगलाची ही बाजू खरोखर समजली आहे का हे विचारा? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यावर इतर गोष्टी आपोआप होतील. ही गोष्ट केवळ कान्हाची असली तरी देशातील सर्व जंगलांना व अभयारण्यांना ती लागू होते. अनेक मंगलू व अशोकना मदतीचा हात हवा आहे म्हणजे त्यांना जाणीव होईल की जंगलांना वाचवण्याच्या लढ्यात ते एकटे नाहीत!  नॅन्सी टर्नरनं म्हटल्याप्रमाणे या लोकांसाठी जमीन होरपळली आहे, आता त्यांच्यासाठी ती हिरवी बनवण्याची जबाबदारी आपली आहे. असं झालं तरच आपल्याला जंगलाचं सौंदर्य पाहण्याचा हक्क असेल. काहीच न करता आपण जंगल नष्ट करणा-यांच्या गटात समाविष्ट होऊ, जे आपल्यासाठी जंगलाचं संरक्षण करणा-यांसाठी काहीच करत नाहीत!
(
हे वाचून एखादी व्यक्ती अधिक पुढाकार घेईल म्हणून हे लिहीले आहे. आम्ही संजीवनीमध्ये या मोहिमेत आपली जबाबदारी उचलण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो व यावेळी आम्ही कान्हाच्या रक्षकांना रेनकोट दिले. यापूर्वीही आम्ही जंगलातील कर्मचा-यांना सेफ्टी शूज, गरम कपडे देणे असे उपक्रम केले आहेत. कान्हातल्या गाईडनाही अशाच प्रकारची मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे)

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स


No comments:

Post a Comment