Friday 28 June 2013

देवभूमी मध्ये आलेली नैसर्गिक आपत्ती


















जगात युद्ध, नैसर्गिक आपत्ती, व रोग यासारख्या वाईट गोष्टी होतात. मात्र अशा परिस्थितींमधूनच सामान्य लोकांच्या असामान्य कामगिरीच्या गोष्टी बाहेर येतात...डार्यन कागन

अमेरिकेतील टीव्ही पत्रकाराने नैसर्गिक आपत्ती किंवा संकटांचा परिणाम अतिशय समर्पक शब्दांमध्ये मांडला आहे, आपण त्या टाळू शकत नाही मात्र आपण त्यांना कसे सामोरे जातो यावरुनच आपण कोण आहोत हे ठरते! दुर्दैवाने उत्तर भारतातील सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणची परिस्थिती नेमकी या अवतरणाच्या विरुद्ध आहे. सर्व माध्यमे, वृत्तपत्रे टीव्ही वाहिन्यांवर, उत्तराखंड व हिमाचल प्रदेशातील परिस्थितीविषयी सतत काहीतरी बातम्या येत असल्याचे आपण पाहात आहोत. प्रत्येक राजकीय पक्ष मग तो सत्ताधारी असो किंवा विरोधी, सगळे केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंग असल्याचे आपण तिथल्या नैसर्गिक संकटानंतर पाहिले. त्याचवेळी सर्व बड्या राजकीय नेत्यांमध्ये आपल्याला प्रभावित लोकांची किती काळजी आहे व त्यांना आपण कशी सर्वतोपरी मदत करत आहोत हे दाखवण्याची चढाओढ लागली आहे.
काही नेते केवळ त्यांच्याच राज्यातील यात्रेकरुंना सोडवत आहेत अशा बातम्या पेरण्यासाठी प्रभावी माध्यम व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली होती, व त्यांची प्रतिमा रँबोप्रमाणे करण्याचे प्रयत्न करण्यात आले! वाचवण्यात आलेले लोक कुणाच्या विमानातून प्रवास करतील यावरुन आंध्रातील काही नेत्यांमध्ये वाद झाले व कार्यकर्त्यांनी त्या बिचा-या प्रवाशांचे बोर्डिंग पास अक्षरशः फाडून टाकल्याच्या बातम्या आपण वाचल्या! माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी सूचना दिली की तथाकथित अति महत्वाच्या व्यक्तिंनी या भागांत जाऊ नये कारण त्यामुळे मदत कार्यात अडथळा येतो, मात्र चोवीस तासात त्यांच्याच पक्षाच्या बड्या नेत्यांनी तिकडे जायचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना आपले शब्द परत घ्यावे लागले! मला आठवण करुन द्यावीशी वाटते की आपण इथे राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांविषयी बोलत आहोत! मला आश्चर्य वाटते की आपण कशा देशात राहात आहोत जिथे प्रत्येक कृती मतपेटीवर डोळा ठेवून केली जाते, मग अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढायचे असो किंवा आपत्ती टाळण्यासाठी धोरण तयार करायचे असो!
त्याशिवाय आत्तापर्यंत बहुतेक प्रसिद्ध व्यक्तिंनी या आपत्तीविषयी टिप्पणी केली आहे व त्या भागातील लोकांना वाचविण्यासाठी करण्यात आलेले धाडसी प्रयत्नही आपण पाहिले आहेत. मी काही आपत्तीविषयक तज्ञ नाही किंवा राजकीय टीकाकार नाही, मी या लेखात जे लिहीले आहे ती परिस्थिती सर्वांना दिसतेच आहे, मी केवळ माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. काही तथाकथित तज्ञांनी या आपत्तीचा इशारा दिला होता मात्र सरकारने त्याकडे कसे दुर्लक्ष केले अशा आशयाच्या अनेक बातम्या सध्या माध्यमांमध्ये येत आहेत. त्याचशिवाय मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली, दिल्लीतल्या बड्या बांधकाम व्यावसायिकांनी, हॉटेल व्यावसायिकांनी चुकीची बांधकामे केली, रस्ते बांधले, अशाप्रकारे वर्षानुवर्षे निसर्गाची हानी होत राहिली व सरतेशेवटी निष्पाप लोकांना त्याची किंमती मोजावी लागली अशा बातम्याही आपण वाचल्या.
सामान्य माणूस प्रसिद्धी माध्यमांच्या बातम्यांनी वहावत जातो, कारण त्याच्यासाठी घटनास्थळावरील परिस्थिती जाणून घेण्यासाठी केवळ तोच एक स्रोत असतो, माध्यमांना हे माहिती असल्याने ते त्याचा पुरेपूर फायदा घेतात व ताज्या बातम्या झळकवत असतात! व या बातम्यांना खतपाणी घालणारे नेतेहीभरपूर आहेत. इथे मला जपानमधील त्सुनामीच्या नैसर्गिक आपत्तीचा उल्लेख करावासा वाटतो, ज्यांनी त्याविषयीच्या बातम्या पाहिल्या असतील त्यांना त्या व आपल्याकडच्या बातम्यांमधला फरक जाणवेल, तिथल्या बातम्यांमध्ये तपशील होते व माध्यमे प्रभावित लोकांना परिस्थितीची माहिती देत होती. त्यात कोणत्याही व्यक्तिचा उदोउदो नव्हता किंवा हानीची खोटी छायाचित्रे किंवा चुकीचे आकडे कधीच दाखवण्यात आले नाहीत. यातून आपली तयारी किती अपुरी आहे व एक समाज म्हणून आपण अशा आपत्ती हाताळण्यास किती अपरिपक्व आहोत हे दिसून येते!
प्रचंड प्रमाणात झालेल्या हानीचे, कारणांचे विश्लेषण केले जाईल, त्यासाठी नेहमीप्रमाणे एक समिती स्थापन केली जाईल, ही समिती म्हणजे अप्रत्यक्षपणे संबंधित सर्व लोकांच्या चुका झाकण्याप्रमाणेच आहे. बंधनकारक असूनही आपत्ती व्यवस्थापन समितीच अस्तित्वात नव्हती किंवा ब-याच पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी कोणतीही पर्यावरणविषयक परवानगी घेण्यात आली नव्हती, परिणामी हानी व मृत्यू अधिक झाले असे अनेक मुद्दे आहेत. हा वादविवाद सुरुच राहील, काही अधिकारी निलंबित केले जातील व परिस्थिती निवळवल्यावर त्यांचे निलंबन पुन्हा रद्द केले जाईल. भारतीयांसाठी या सगळ्या गोष्टी किती सवयीच्या झाल्या आहेत तरीही आपल्याला दरवेळी काहीतरी वेगळे होईल असे वाटते! मला हाच मुद्दा उपस्थित करायचा आहे, अमेरिकेकडे पाहा एकदा तिथे मोठा अतिरेकी हल्ला झाल्यानंतर गेल्या महिन्यातील बोस्टन मॅरेथॉनमधील स्फोट सोडला तर दहा वर्षात एकही अतिरेकी हल्ला झालेला नाहीत्सुनामी किंवा झंझावातसारख्या घटना मानवाच्या नियंत्रणात नाहीत, तरीही जपान, अमेरिका व इतर देशांनी त्यासाठी इशारा देणा-या यंत्रणा बसवल्या आहेत ज्यामुळे लाखो लोकांचे जीव व मालमत्ता वाचल्याचे आपण अगदी अलिकडच्या काळातच पाहिले आहे.

एखाद्या आपत्तीचे काय कारण आहे ही एक बाब झाली व आपण तिला कसे सामोरे जातो ही दुसरी बाब झाली. आपण आपल्या देशात यामध्येच वारंवार अपयशी ठरलो आहोत. आपत्ती मग ती मानव निर्मित असो किंवा नैसर्गिक असो किंवा दहशतवादी कारवाई असो, आपण ती थांबवू शकलो नाही तरी एका शिस्तबद्ध पर्यायी व्यवस्थेद्वारे आपण तिचा परिणाम निश्चितच कमी करु शकतो. उत्तराखंड किंवा हिमाचलप्रदेशसारख्या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक तसेच यात्रेकरु येतात, त्यांची संख्या तिथल्या स्थानिक लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. असे असताना कोणतीही आपत्ती आल्यास काय खबरदारी घेण्यात आली आहे, हा अतिशय स्वाभाविक प्रश्न कोणत्याही संबंधित व्यक्तिने कधीही विचारलेला नाही. कोणत्याही आपत्तीच्या वेळी सार्वजनिक आरोग्य किंवा वैद्यकीय सुविधांचीच मुख्य समस्या असते व नुकत्याच आलेल्या आपत्तीच्या वेळी या सुविधा अजिबात व्यवस्थित नव्हत्या. त्याशिवाय अशा परिस्थितींमध्ये संपर्काच्या पर्यायी साधनांचा विचारही कधी करण्यात आला नव्हता व त्यामुळे बचाव कार्य अधिक अवघड झाले. हा डोंगराळ भाग असल्यामुळे रस्ते बांधण्याचे काम अतिशय कठीण आहे, अनेक ठिकाणी केवळ एकच रस्ता होता व तो देखील वाहून गेल्याने त्या भागांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला. अन्न व औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तुंचा साठा पुरेसा नव्हता, त्यामुळेही अनेक मृत्यू झाले.

इथे मला असे वाटते की पर्यटकांचीही थोडीशी चूक आहे की जास्त सामान होऊ नये म्हणून त्यांनी अतिरिक्त अन्न किंवा औषधे ठेवली नाहीत किंवा अगदी मोबाईलच्या चार्जरसारख्या वस्तू न ठेवण्याचा निष्काळजीपणा दाखवला, परिणामी त्यातल्या अनेकांना जीव गमवावा लागला. आपत्कालीन स्थितीमध्ये व्यवस्थितपणे बाहेर पडता येण्याचे प्रशिक्षण घेण्याचा आपण स्वतःहून विचार करत नाही. आपण वाचले की गावांना पुरांचा फटका बसल्याने बाहेर पडण्याचा इशारा मिळाल्यानंतर बरेच पर्यटक निवासाच्या ठिकाणांहून, केवळ अंगावरच्या कपड्यांनिशी बाहेर पडले; मात्र आपण उघड्यावर कसे जगू याचा त्यांनी एकदाही विचार केला नाही! सरकार लोकांना अशा बाबींसाठी प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत नाही आपणही स्वतःहून त्यासाठी खबरदारी घेत नाही. इथे आपण पुन्हा जर जपानी लोक भूकंप झाल्यास किती शिस्तबद्धपणे त्यांच्या इमारती मोकळ्या करतात हे आठवले तर, मी काय म्हणत आहे हे तुम्हाला समजेल!
या आपत्तीमुळे दोन्ही राज्यांच्या पर्यटनावर सखोल परिणाम होणार आहे, यामुळे संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्था डळमळीत होणार आहे जी पर्यटकांवर अवलंबून आहे. याचे परिणाम अतिशय भयंकर आहेत. मला असे वाटते की अशा आपत्तींमुळे दोन प्रकारचे परिणाम होतात, एक म्हणजे शारीरिक याचा अर्थ जीवित तसेच संपत्तीची हानी व दुसरा म्हणजे मानसिक. दुसरा परिणाम दिसत नसला तरी दीर्घकालीन आहे व स्थानिक लोकांची जी मानसिक हानी झाली आहे त्याची अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. अशा बिकट परिस्थितीस आपण अतिशय खंबीरपणे तोंड देणे आवश्यक आहे, दुर्दैवाने आपत्तीग्रस्त राज्येच नाही तर संपूर्ण देशात याचीच कमतरता आहे!
मात्र या सर्व गोंधळामध्ये लष्कर व हवाईदलाने दाखवलेली शिस्तबद्धता व समर्पण अतिशय कौतुकास्पद होते! ख-या वीरास तो वीर आहे हे इतरांना सांगण्याची गरज नसते, आपल्या सैन्यदलांनीही हेच दाखवून दिले. आत्तापर्यंत हवाईदल प्रमुखांच्या एक-दोन पत्रकार परिषदा सोडल्या तर जवान पार पाडत असलेल्या अवघड जबाबदारीविषयी एकही बातमी सैन्यदलांतर्फे प्रसारित करण्यात आली नाही! त्यांनी बचावकार्यात किती लोकांची सुटका केली किंवा त्यांच्या सैनिकांना किती अडचणींचा सामना करावा लागला, किंवा हे मदतकार्य किती अवघड होते याविषयी ते अवाक्षरही बोलले नाहीत, खरोखर त्यांनी निरपेक्ष भावनेने काम केले! मला वाटते केवळ आपल्या नेत्यांनीच नाही तर आपणही आपल्या सैन्य दलांच्या दृष्टीकोनातून बरेच काही शिकण्यासारखे आहे, कारण आपल्या सर्वांनाच अगदी लहानशा विजयासाठीही मोठ्या कोडकौतुकाची सवय असते, मात्र जे खरोखर काही तरी साध्य करतात ते त्यांच्या विजयाबद्दल, पराक्रमाबद्दल बोलत नाहीत. डार्यन कागनने म्हटल्याप्रमाणे सामान्य माणसांच्या धैर्यास सलाम करुयात, जे असामान्य हिमतीने व बळाने परिस्थितीविरुद्ध लढा देत आहेत व आपल्या कृतींमधून त्यांना बळ देऊ, अशा आपत्तींना तोंड देण्याचा व त्यातून शिकण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे!

संजय देशपांडे

Smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!






No comments:

Post a Comment