Wednesday 2 October 2013

वीज आणि रिअल इस्टेट
























आत्मा काय असतो? तो वीजेसारखा असतो- तो नक्की काय असतो ते आपल्याला माहित नसते, पण ही शक्ती खोली प्रकाशित करू शकते – रे चार्ल्स

रे चार्ल्स रॉबिन्सन अमेरिकी गायक-गीतकार, संगीतकार होता आणि; तो आत्मिक संगीतप्रकाराचा निर्माता होता आणि त्याच्या विचारांवरूनच कळते तो एक चांगला विचारवंतही होता! आणि बांधकाम व्यवसायामध्ये अनेक विकासकांना या इतक्या महत्त्वाच्या घटकाबद्दल, वीजेबद्दल त्याचे मत पटत  नक्कीच असेल! त्यात त्यांचाही काही दोष नाही कारण अनेक अनुभवी स्थापत्य अभियंत्यांना  सुद्धा विद्दुतशास्त्राविषयी फारशी माहिती नसते, याचे कारण दुहेरी असू शकते, एकतर हा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा विषय नसतो आणि दुसरे म्हणजे सध्याच्या वेगवेगळ्या भागात काम करण्याच्या पद्धतीमुळे, बहुतांश स्थापत्य अभियंते कामाच्या ठिकाणी विदयुतविषयक कामे हि त्यांच्या कामाचा भाग आहे, असे मानतच नाहीत.

दीर्घ काळापासून आपल्या देशाने जगण्याच्या तीन मुख्य गरजा असल्याचे स्वीकारले आहे आणि त्या आहेत, रोटी, कपडा और मकान म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा; या तीन गोष्टी आपल्या सुसंस्कृत जगण्याचे तीन निकष मानले जातात, त्याशिवाय आयुष्य पूर्ण होऊच शकत नाही! अलिकडे या निकषांमध्ये आणखी एका गोष्टीची भर घालण्याची गरज निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे वीज! विचार करा, एखाद्याकडे तिन्ही गोष्टी आहेत, म्हणजे रोटी, कपडा आणि मकान पण वीज नाही आणि आपण कल्पना करू शकतो की या चौथ्या निकषाशिवाय आयुष्य किती खडतर होऊन जाईल!  दुर्दैवाने बांधकाम व्यवसाय आणि सरकार, ज्यांनी पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजेत, त्यांनी नेहमीच या महत्त्वाच्या निकषाकडे दुर्लक्ष केले आहे अन्यथा आज आपण या विषयावर चर्चा केली नसती. आजूबाजूला पहा आणि तुम्हाला दिसेल की विशेषतः गावांमध्ये आणि खेड्यांमध्ये बहुतांश विनोद हे एमएसईबीवर, आपल्या सरकारी विद्युतपुरवठा संस्थेवर केलेले असतात. मंडे टू संडे इलेक्ट्रीसिटी बंद असा फुलफॉर्म करण्यापासून या विद्युतपुरवठा सेवेवर अनेक विनोद केलेले आढळून येतील. विनोद बाजूला सोडला तरी अशा विनोदांना मिळणारी लोकप्रियता सर्वसामान्यांचे आयुष्य विजेवर किती अवलंबून आहे, हेच दर्शवते.
विशेषतः शहरी जीवनात आपण विजेवर खूप अवलंबून असतो, नपेक्षा तिचे गुलाम असतो. आपले मोबाईल चार्ज करण्यासाठीही आपल्याला विजेची गरज भासते. बांधकाम व्यवसाय वाढत आहे कारण वाढत्या लोकसंख्येला घरांची गरज आहे, आणि या घरांना विजेची गरज आहे ही वस्तुस्थिती आहे. आपल्याकडे विद्युत पुरवठ्याची कमतरता आहे आणि उपलब्ध असलेला प्रत्येक युनिट नेमकपणाने आणि काळजीपूर्वक वापरावे  लागतो. विजेचा विषय असतो, तेव्हा दोन पैलूंकडे लक्ष द्यावे लागते आणि ते म्हणजे सुरक्षा आणि बचत! सामान्य माणसाला विजेबाबत फारसे काही कळत नाही, त्यामुळे साहजिकच तिचा वापर करताना अपघात होण्याची शक्यता असते आणि आपला अपघातांचा इतिहास असे सांगतो की त्यापैकी बहुसंख्य जीवघेणे असतात. तुम्ही आगींच्या इतिहासाचा अभ्यास केला तर व्यावसायिक किंवा रहिवासी इमारतींना आग लागण्यामागे मुख्य कारण हे इलेक्ट्रीक वायरिंग वाईट दर्जाचे असल्याचे दिसते आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट होते आणि लक्षात घ्या वीज ही फार निर्दयी गोष्ट आहे असते! वायरिंग चुकीचे किंवा सदोष असेल तर तिथे दयामाया नसते आणि आपण तारा आणि बटणांसारख्या प्राथमिक गोष्टींमध्ये बचत करण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याच्या कैकपट गमावू शकतो. तरीही अनेक विकासक निव्वळ दुर्लक्षापोटी बांधकामामध्ये इलेक्ट्रिकल सामानाच्या दर्जामध्ये तडजोड करतात ही वस्तुस्थिती आहे.

नपेक्षा तुम्ही बांधकाम व्यवसायातला कल पाहिला, तर काही अपवाद वगळता, बहुतांश बिल्डर्स विजेशी संबंधित संपूर्ण काम आउटसोर्स करतात, त्यामुळे त्यांचे या कामाच्या दर्जावर काही नियंत्रण राहत नाही. त्यांना असे वाटते की, आउटसोर्स केल्यामुळे वायरिंगच्या कामाच्या जबाबदारीपासून मुक्ती मिळते पण हा चांगला मार्ग नाही. तुम्ही आउटसोर्स केले तरी विद्युतकामाचे विशेष तपशील आणि डिझाईन याबद्दल तुम्ही आग्रही असले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही तांत्रिकदृष्ट्या पात्र नसला तर उत्तम उपाय म्हणजे तुमच्या प्रकारच्या प्रकल्पांचा अनुभव असलेला इलेक्ट्रिकल कन्सल्टन्ट नेमणे. बांधकाम व्यवसायाबद्दल आणखी एक दुर्दैवी बाब म्हणजे ते ज्ञानी क्वचितच ओळखतात, त्याचा आदर करणे तर दूरच राहिले! या परंपरेला जागूनच क्वचितच एखादा बिल्डर इलेक्ट्रिकल कन्सल्टन्टची नेमणूक करतो आणि बहुतांश जण इलेक्ट्रिक कंत्राटदाराच्या सल्ल्याने काम करतात, अनेकदा हा कंत्राटदारच तांत्रिकदृष्ट्या पात्र नसतो! हा कल बदलत आहे आणि अनेक मोठ्या प्रकल्पांसाठी विशेष इलेक्ट्रिकल कन्सल्टन्ट नेमले जातात, ते पात्र असतात आणि त्यानुसार संपूर्ण वायरिंगचे काम करतात. पण हे प्रमाण फार कमी आहे.
इलेक्ट्रिकल कन्सल्टन्ट केबल आणि वायरच्या आकारानुसार सुरक्षित डिझाईनच तयार करतात असे नाही तर ते विद्युतगळतीही रोखतात. कंत्राटदार तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसला तर सदोष आकाराच्या केबल निवडू शकतो, भविष्यात होऊ शकणाऱ्या अपघातांचे ते एक मुख्य कारण असू शकते.  तसेच वायरिंगची आकृती, केबलचा मार्ग आणि वर्कमॅनशिपचे तपशीलही महत्त्वाचे असतात. तसेच सर्व वायरिंगसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिकल लेआउट आखणे आवश्यक असते. यामुळे विद्युतकाम तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण होईल आणि बिल्डिंग कोणत्याही अपघातापासून सुरक्षित राहील. यामुळे विजेच्या वापरातही बचत होईल, कारण विशिष्ट जागेसाठी किती प्रकाश आवश्यक आहे याचा अभ्यास आवश्यक असतो आणि ते जागेचे उद्दिष्ट किंवा वापर यासारख्या विविध निकषांवर अवलंबून असतो. सारख्याच क्षेत्रफळासाठी व्यावसायिक इमारतींमध्ये प्रकाशाची वेगळी गरज असेल आणि रहिवासी इमारतींमध्ये वेगळी. कन्सल्टन्ट इमारतीच्या इलेक्ट्रिकल डिझाईनिंगचे असे सर्व पैलू लक्षात घेतो. आपल्या देशात ऊर्जा महाग आहे आणि ती नेमकेपणाने वापरली पाहिजे आणि त्यासाठी इलेक्ट्रिकल वायरिंगचे योग्य डिझाईनिंग आवश्यक आहे.
विजेच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे एमएसईडीसीएलबरोबर, म्हणजे एमएसईबीच्या अधिकाऱ्यांबरोबर संबंध ठेवणे, कारण राज्यात वीज या संस्थेमार्फतच मिळते. आज मंडळावर (एमएसईबीचे लोकप्रिय नाव) समाजाच्या सर्व घटकांना वीजपुरवठ्याच्या मोठ्या मागणीची पूर्तता करण्याचा खूप दबाव आहे. स्रोत मर्यादित आहेत आणि त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभ्या करण्याचा खर्च प्रचंड मोठा आहे. यामुळे पुरवठा विरुद्ध मागणी या समीकरणावर फरक पडतो, विशेषतः पुण्यासारख्या शहरांमध्ये आणि तुम्हाला प्रतिमीटर विद्युत दर खर्चावरून अधिकारी आणि विकासकांदरम्यान संघर्ष होताना दिसेल! इथे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरची भूमिका महत्त्वाची असते कारण अनेक कन्सल्टन्ट एमएसईबीकडून लोड मंजूर करून घेण्याची जबाबदारी घेत नाहीत. सध्या कोणत्याही प्रकल्पासाठी लोड मंजुरीचे निश्चित नियम नाहीत, पण ते क्षेत्रफळाप्रमाणे वीजेच्या उपलब्धतेनुसार आणि त्या भागात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांप्रमाणे बदलतात. बांधकाम उद्योगासाठी ही खचितच निरोगी स्थिती नाही. कारण, विद्युतपुरवठ्यासाठी येणाऱ्या खर्चाबाबत पारदर्शकता नसते आणि त्याचा अंतिम फटका फ्लॅटच्या मालकालाच बसतो, कारण त्यालाच सर्व खर्च पेलावा लागतो. इलेक्ट्रिकल कंत्राटदारांच्या संघटनेने पुढाकार घ्यावा आणि लोड मंजुरीच्या नियमांबाबत सौहार्दाने उपाय शोधण्यासाठी मंडळ व विकासकादरम्यान पूल बनावे. एखाद्या विशिष्ट भागात होऊ घातलेले प्रकल्प एकत्र येऊन त्या भागापुरता एमएसईबीचा पायाभूत सुविधांचा खर्च वाटून घेऊ शकतात आणि या ठिकाणी इलेक्ट्रिकल कंत्राटदार/कन्सल्टन्टची असोसिएशन महत्त्वाची भूमिका बजावू शकते. तसेच लोड कॅलक्युलेशनसंबंधी आणि ती कशी करतात यासंबंधी खूप जागृतीची गरज आहे कारण अनेक विकास कंत्राटदाराच्या सांगण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि  ते सांगतील तसे करतात. या ठिकाणी कन्सल्टन्ट नक्की मदत करू शकतात कारण ते विद्युत कामाच्या दर्जावर देखरेखही ठेवू शकतात.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्युत कामासंबंधी स्थापत्य अभियंते किंवा साईट पर्यवेक्षकाचा दृष्टीकोन; असे दिसते की त्यांना विद्युतकामाबद्दल काहीही घेणेदेणे नसते. आतापर्यंतच्या शिक्षणामध्ये त्यांना वीजेसंबंधीचे फारसे ज्ञान मिळालेले नसते हे मान्य पण प्रत्येकाने चौकस असले पाहिजे आणि प्रश्न विचारले पाहिजे तरच त्या गोष्टीचे ज्ञान मिळेल! इथेही बऱ्याच प्रशिक्षणाची गरज असते आणि इलेक्ट्रिकल कंत्राटदार तसेच कन्सल्टन्ट एखादा प्रशिक्षण वर्ग घेऊ शकतात. अखेर साईटच्या प्रमुखालाच साईटवरच्या कामाला मान्यता देणारा अंतिम अधिकार असतो.
आणखी एक दुर्लक्षित बाब म्हणजे ऊर्जाबचत करणाऱ्या उपकरणांच्या आणि त्यासंबंधीच्या तंत्रज्ञानाच्या जागृतीचा अभाव, कारण ही काळाची गरज आहे. पण इथेही दोन्ही बाजू म्हणजे कंत्राटदार तसेच विकासक या दोघांनाही पुरेशी माहिती नसते आणि वीजेचा मुद्दा आला म्हणजे आपण अजूनही पारंपरिक पद्धती आणि उपकरणांचा वापर करतो. ऊर्जाबचत करणाऱ्या एलईडीसारख्या वस्तूंसाठी परिपूर्ण वायरिंग नेटवर्क डिझाईनची गरज असते अथवा देखभालीचा खर्च फार जास्त वाढतो. तसेच बॅटरीवर चालणारी वाहने हा भविष्यकाळ आहे त्यामुळे आपल्या इलेक्ट्रिकल योजना डिझाईन करताना आपल्याला अशी वाहने चार्ज करण्यासाठी लागणारा लोड, तसेच चार्जिंगची सुविधा यांचाही विचार करावा लागणार आहे. तसेच इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर अंतर्गत व बाह्य वायरिंगसाठी या सर्व योजनांची नोंद केली पाहिजे आणि रहिवाशांना दिली पाहिजे, म्हणजे कधी काही दुरुस्तीची वेळ आल्यास त्यांना समस्या येणार नाही. शेवटच्या वापरकर्त्यालाही या महत्त्वाच्या पैलूची माहिती असली पाहिजे आणि यासंबंधीचे विशिष्ट तपशील विकासकाला विचारून घेतले पाहिजेत, कारण ही बाब म्हणजे थेट इमारतीच्या सुरक्षेशी संबंधित आहे.
फक्त भरपूर इलेक्ट्रिक पॉइंट्स दिले म्हणजे आपण चांगले काम केले असे होत नाही, कारण उद्गारात म्हटल्याप्रमाणे त्याने फक्त खोल्या प्रकाशमान होतील पण आपल्याला या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे चेहरे आणि त्यांचे भविष्यही उजळवायचे आहे. तरच आपण म्हणू शकतो की, हो आम्हाला वीज ही संज्ञा कळली आहे!

संजय देशपांडे


संजीवनी डेव्हलपर्स

No comments:

Post a Comment