Thursday 24 October 2013

कुशल , प्रशिक्षित बांधकाम अभियंते बनविणे !






















जी व्यक्ती कसे शिकायचे व बदलायचे हे शिकते तिलाच ख-या अर्थाने शिक्षित म्हणता येईल... कार्ल रॉजर्स

कार्ल रॅनसम रॉजर्स हा एक अतिशय प्रभावी अमेरिकी मानसतज्ञ होता व मानवीय मानसशास्त्र या शाखेच्या संस्थापकांपैकी एक होता. अशा महान व्यक्तिंविषयी मला अतिशय आदर वाटतो कारण अतिशय सोप्या शब्दात ते अतिशय किचकट विषयही सोपा करुन सांगतात. वर दिलेल्या अवतरणात कार्ल यांनी आपल्या जीवनात शिक्षण आणि त्याची नेमकी भूमिका विषद करुन सांगितली आहे! अलिकडेच मी जेव्हा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणा-या किंवा तो ठरविणा-या चमूचा एक भाग होतो तेव्हा मला शिक्षण व शिकणे याविषयीचे हे शब्द आठवले. बरेच जण नेहमीप्रमाणे विचार करतील की याचा आपल्या मुख्य विषयाशी म्हणजेच रियल इस्टेट किंवा बांधकाम उद्योगाशी काय संबंध आहे. त्यासाठी आपल्याला बांधकाम उद्योगाची सध्याची स्थिती पाहावी लागेल.

बांधकाम उद्योग हा देशातील सर्वाधिक रोजगार निर्मिती करणा-या उद्योगांपैकी एक आहे व आपल्यासारख्या विकसनशील देशांमध्ये हाच उद्योग मूलभूत पायाभूत सुविधांचीही निर्मिती करतो. घर बांधणी असो, रस्ते बांधणी असो, धरणे किंवा कारखाने बांधायचे असोत आपल्याला त्यासाठी प्रचंड मनुष्य व यांत्रिक बळ लागते, त्याशिवाय या माणसांवर व यंत्रांवर देखरेख करण्यासाठी आपल्याला प्रशिक्षित व तांत्रिकदृष्ट्या कुशल लोक लागतात. मात्र या आघाडीवर चित्र कसे आहे? एकीकडे हजारो अभियांत्रिकी तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालये आहेत ज्यांच्या जागा पूर्ण भरल्या जात नाहीत व दुसरीकडे बांधकाम व्यवसायाला सतत तांत्रिकृष्ट्या प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता जाणवते!

आता शिक्षण हा देखील एक व्यवसायच झाला आहे, आणि या क्षेत्राने बांधकाम व्यवसायाच्या गरजा काय आहेत हे जाणून घेणे व त्यानुसार आपले उत्पादन म्हणजेच कुशल प्रशिक्षित अभियंते तयार करणे आवश्यक आहे! मी सहभागी झालो होतो त्या बैठकीत बांधकाम क्षेत्रातील तसेच शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती होत्या व बांधकाम उद्योगाला खरोखर उपयोगी पडतील असे व्यावसायिक तयार करण्यासाठी अभ्यासक्रमात नेमके कोणते बदल करणे आवश्यक आहे हा चर्चेचा मुख्य विषय होता. महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला कोणताही अभियंता कितीही हुशार असला तरीही त्याला बांधकामाच्या ठिकाणच्या सर्व तांत्रिक बाबी माहिती असतील अशी अपेक्षा कुणीच करत नाही. कारण प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणचा अनुभव तिथेच घ्यावा लागतो, मात्र तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित व्यक्ती असल्यास त्याला बांधकामाच्या ठिकाणी काम शिकण्यासाठी कमीत कमी वेळ लागेल. बांधकाम व्यवसायाच्या तरुण अभियंत्यांकडून असलेल्या अपेक्षा आणि हे अभियंते करत असलेले काम यातील दरी दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे लोक नवोदितांना ठेवायला फारसे उत्सुक नसतात; शिक्षण क्षेत्रासाठी हे फारसे चांगले लक्षण नाही! जर कुणीच नवोदितांना घेणार नसेल तर त्यांना अनुभव कसा मिळेल? अनुभव हा वर्षांमध्ये मोजता येत नाही, तर तुम्ही जे शिकता व त्यातून तुम्ही अधिक चांगला परिणाम साध्य करता त्याला अनुभव म्हणतात! माझ्यासाठी अनुभव म्हणजे बदल स्वीकारणे व आपले काम अधिक चांगल्याप्रकारे करण्यासाठी त्याचा उपयोग करणे, ज्याचा आपल्या उत्पादनास फायदा होईल!

म्हणूनच याठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाची रचना करण्यामध्ये किंवा त्यातील विषय ठरविण्यामध्ये बांधकाम उद्योगातील व्यावसायिकांची भूमिका महत्वाची आहे.
उद्योगातील तज्ञांनी महाविद्यालयातून नुकतेच शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांच्या दृष्टीकोनाविषयी चिंता व्यक्त केली, कारण नव्या संकल्पना स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते तसेच हातातील काम किंवा त्यांना देण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करताना ते स्वतःचे डोके वापरत नाहीत. सध्याचे बहुतेक स्थापत्य अभियंते यंत्रमानवासारखे वागतात म्हणजे त्यांना मिळालेल्या आदेशाचे विश्लेषण न करता केवळ त्याचे पालन करतात. मी आधीच उल्लेख केल्याप्रमाणे, बांधकाम उद्योगाला अजूनही काँक्रिटीकरण, प्लास्टरीकरण, टाईल्स बसविणे व इतर अशा बांधकामाच्या ठिकाणावरील ब-याच कामांसाठी प्रचंड मनुष्यबळ लागते. या सर्व कामांचा दर्जा राखण्यासाठी त्यांच्यावर मानवी देखरेख अतिशय महत्वाची आहे व इथे पर्यवेक्षकाची किंवा आपण ज्याला अभियंता म्हणतो त्याची भूमिका महत्वाची आहे, कारण तिथे त्याला बांधकाम ठिकाणाच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन, स्वतःचे कौशल्य वापरावे लागते. याला मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करणे म्हणतात, यामध्येच तरुण पिढी अतिशय कमी पडते व इथे समस्या त्यांच्या दृष्टीकोनाची आहे, पदवीची किंवा ज्ञानाची नाही.

दुसरी एक मोठी समस्या म्हणजे संवाद कौशल्ये, केवळ तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित असल्याने तुम्ही यशस्वी अभियंता होत नाही, चांगले काम करण्यासाठी तुमच्याकडे केवळ तुमच्या वरिष्ठांनाच नाही तर तुमच्यासोबत काम करणा-या चमूलाही समजावून सांगण्याची हातोटी हवी. प्रत्येकाने संवाद साधण्यासाठी नेहमी तयार असायला हवे व त्याला किंवा तिला आपल्या कल्पना समजावून सांगण्यासाठी तार्किक बैठक हवी व त्याबद्दल आत्मविश्वास हवा. केवळ तांत्रिकदृष्ट्या अचूक असून उपयोग नाही तुम्हाला तुमच्या क्षमतांविषयी लोकांना पटवून देता आले नाही तर तुम्ही लवकरच निराश होण्याची शक्यता असते. या घटकाविषयीही चर्चा करण्यात आली व इतर अभियंत्यांशी संवाद साधण्याचा दृष्टीकोन विकसित व्हायला हवा असा विचार मांडण्यात आला.


नवोदित अभियंत्यांची अजून एक समस्या म्हणजे ज्ञानाचा तर्कशुद्ध वापर. इथे ब-याच जणांच्या हे लक्षात येत नाही की इमारतीचे, रस्त्याचे किंवा एखाद्या प्रकल्पाचे बांधकाम असो, जिथे माणसे किंवा यंत्रे काम करत असतात तिथे अनेक बाबी अनपेक्षितपणे घडतात. उदाहरणार्थ काँक्रिटीकरण सुरु असते तेव्हा अचानक पावसाला सुरुवात होते; अशावेळी तिथे देखरेख करणा-या अभियंत्याने तर्कशुद्ध विचार करुन परिस्थितीला योग्य प्रतिसाद देणे आवश्यक असते व अशावेळी केवळ पुस्तकी गोष्टींचा उपयोग होत नाही. कोणत्याही व्यक्तिची सामान्य प्रतिक्रिया काम थांबवणे ही असेल, मात्र पावसासाठी तयार असणे व दर्जाशी तडजोड न करता पावसातही काम सुरु ठेवणे हे अभियंत्यांकडून अपेक्षित आहे! पुस्तकांमध्ये जे शिकले आहे ते नक्कीच महत्वाचे आहे, मात्र प्रत्यक्ष काम करताना ते जसेच्या तसे वापरता येत नाही. इथे खरे तर तुम्ही जे शिकला आहात त्यावर विचार करणे व ते परिस्थितीच्या गरजेनुसार वापरणे हे महत्वाचे आहे! दुर्दैवाने नवोदित पिढी तर्कशुद्ध विचार करण्यात कमी पडते. इथे कुठेतरी गुणांवर आधारित शिक्षण पद्धती यास जबाबदार आहे यावर सर्वांचे एकमत झाले. याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ उत्तरे पाठ करण्याची व प्रश्न विचारल्यानंतर ती देण्याची सवय असते व त्या उत्तरांमागील तार्किक विचार ते आत्मसात करत नाहीत.


त्यानंतर मुद्दा येतो तो नेतृत्व गुणांचा, अभियंत्यांमध्ये तांत्रिक ज्ञानासह हे गुणही विकसित करणे आवश्यक आहे. अभियंता हा बांधकामाच्या ठिकाणाचा बॉस असतो, त्याने त्याचे स्थान समजावून घेणे आवश्यक आहे व ते त्याच्या वर्तनातून जाणवले पाहिजे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनापासूनच यासाठी प्रशिक्षित करणे आवश्यक आहे कारण एखाद्या ठिकाणाचा प्रभारी असणे हे केवळ एक पद नाही, ती जीवनशैली आहे जी व्यक्तिला स्वीकारावी लागते व त्या पदासोबत येणा-या जबाबदा-या समजून घेणे आवश्यक असते!

सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे हातात असलेल्या कामाबाबत प्रामाणिकपणा व एकनिष्ठा हवी; मात्र आजकाल अभियंत्यांमध्ये न कळवता सुट्ट्या घेणे किंवा थोड्याशा पगारवाढीसाठी नोकरी बदलणे असा कल दिसून येतो. यामुळे कामाचे नुकसान होते तसेच एखाद्या चमूचा प्रभारीच नोकरी सोडून गेल्यास संपूर्ण चमूचे धैर्य खचते. चांगल्या भवितव्याची आशा मनात बाळगण्यात गैर काहीच नाही मात्र त्याचवेळी हातात असलेल्या कामाविषयीची आपली जबाबदारी समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे. अधिक चांगले भवितव्य म्हणजे केवळ अधिक चांगला पगार नाही; विविध काम करण्याची संधी तसेच जबाबदारी यातून ते घडू शकते. तरुण पिढीला शिक्षण घेतानाच हे समजावणे आवश्यक आहे . एक चांगला अभियंता एक चांगली व्यक्तिदेखील असला पाहिजे “, जो केवळ त्याच्या कामाचीच नाही तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचीही जबाबदारी घेईल!

देशातील बांधकाम उद्योगाला चांगले अभियंते हवे आहेत व ते एका दिवसात जन्माला येत नाहीत, अनुभवी अभियंते घडविण्यासाठी तरुणांवर अतिशय मेहनत घ्यावी लागते. यासाठी उद्योगातील लोकांनी आपल्या अनुभवाचे योगदान शिक्षण क्षेत्राला देणे आवश्यक आहे जे दुर्दैवाने होताना दिसत नाही. शैक्षणिक संस्था ज्या बांधकाम उद्योगासाठी अभियंते घडवित आहेत त्यातील नव्या संकल्पना मोकळेपणे स्वीकारल्या पाहिजेत व उद्योगाची नाडी जाणून घ्यायला हवी. विशेषतः रियल इस्टेट क्षेत्राला कुशल लोक नेतृत्व करण्यासाठीही हवे आहेत केवळ पर्यवेक्षक म्हणून नव्हे. खरी गरज आहे ती उद्योजक घडविण्याची कारण तेच देशातील लाखो गरजूंसाठी घरे बांधणार आहेत. ते चांगले अभियंते असतील तर ते प्रत्येक वेळी चांगलेच बांधकाम करतील, अधिकाधिक लोक या उद्योगात यावेत व त्यांनी त्यांच्या बांधकामाची जबाबदारी घ्यावी यापेक्षा रियल इस्टेट उद्योगाला अधिक काय हवे!


https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif
संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स



No comments:

Post a Comment