Sunday 8 December 2013

वाघ न दिसण्यातला आनंद !






















जंगल मला नेहमीच थक्क करते. ते मला निसर्गाची कल्पनाशक्ती माझ्या कल्पनाशक्तीपेक्षा कित्येक पटीने मोठी आहे याची जाणीव करुन देते. मला अजूनही ब-याच गोष्टी शिकायच्या आहेत ….गंटेर ग्रास


गंटेर विलहेल्म ग्रास हा जर्मन लेखक, कवी, नाटककार, चित्रकार, ग्राफिक कलाकार, शिल्पकार व १९९९चा नोबेल पुरस्कार विजेता आहे. तो जर्मनीचा आज हयात सर्वात प्रसिद्ध लेखक मानला जातो. त्याने केलेली जंगलांची व्याख्या पाहिल्यानंतर तो सर्वात प्रसिद्ध लेखक का आहे याविषयी मनात यत्किंचितही शंका उरत नाही. मी गंटेरशी पूर्णपणे सहमत आहे, कारण माझ्या आयुष्यातील काही सर्वोत्तम क्षण मी जंगलांमध्ये अनुभवले आहेत! माझी कान्हा, पेंच व ताडोबा या माझ्या आवडत्या जागांची अलिकडेच झालेली आठवडाभराची सफर मला असेच अनुभव देऊन गेली! कुणाचीही सुटीची यापेक्षा चांगली व्याख्या काय असू शकते! डिसेंबर महिन्याची सुरुवात असूनही कान्हामध्ये नेहमी जशी गोठवणारी थंडी असते तशी यावेळी नव्हती तर आल्हाददायक थंडी होती, याचे श्रेय आंध्र किनारपट्टीवर नुकत्याच आलेल्या हेलेना चक्रिवादळाच्या परिणामांना जाते. जंगलातील सफारीचे प्रवेश शुल्क, जिप्सीचे शुल्क यांचा कान्हात येणा-या पर्यटकांना निश्चितच फटका बसला आहे. त्याशिवाय ऑनलाईन आरक्षण प्रक्रिया व प्रत्येक पर्यटकाची ओळख पटवण्यासारखे प्रवेशाचे कडक नियम, समूह आरक्षणामध्ये कोणतेही बदल करण्यास परवानगी न देणे यासर्वांचा पर्यटकांच्या संख्येवर परिणाम होत आहे. गाईड, ढाबेवाले, जिप्सीचे मालक व रिसॉर्टमधील लोक उघडपणे नाही पण कुजबुजत, पर्यटकांच्या घटत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करतात. सामान्य लोकांमध्ये जंगलांची आवड निर्माण करणे आवश्यक आहे व जंगल सफारींचा खर्च निश्चितच चिंतेची बाब आहे, सध्याच्या दरांमुळे त्या केवळ समाजातील उच्च वर्गापुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. जंगले टिकावीत अशी आपली इच्छा असेल तर ती सामान्यांना परवडतील अशी व्हायला हवीत, तरच हा वर्ग जंगलांबाबत अधिक जागरुक होईल. विशेषतः शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना लक्ष्य करायला हवे, त्यांच्यासाठी सवलतीच्या दरातील पॅकेज तयार करावे, अशी माझी वनविभागाच्या लोकांना व राज्यकर्त्यांना विनंती आहे.
नेहमीप्रमाणे कुणीही कितीही नकार दिला तरीही जंगलाचा फेरफटका मारताना प्रत्येकाची नजर वाघ शोधत असते. जंगलामध्ये इतरही बरीच चित्तथरारक दृश्ये पाहायला मिळतात, मात्र वाघांचे महत्व कायम आहे. माझ्या जंगल सफारींदरम्यान मला अनेकदा जंगलाचा राजा पाहण्याचा योग आला, तर ब-याचदा माझी संधी हुकली, मात्र तरीही संधी हुकली याचा मला आनंदच होता! बरेच जण म्हणतील की हे खोटे आहे, मात्र मला त्या बदल्यात जे पाहायला मिळाले ते तेवढेच किंवा त्यापेक्षाही अधिक थरारक होते. हिंदी चित्रपटांच्या चित्रणाच्या वेळी जसे टेक घेतले जातात तशाच टेकच्या स्वरुपात मी हे अनुभव तुम्हाला सांगणार आहे!
टेक वन
नेहमीप्रमाणे दूर पुढील मार्गावर चितळाने वाघाच्या आगमनाची सूचना दिली होती पण, माझ्या गाईडने उंच साल वृक्षावरील एका घरट्याकडे बोट दाखवत, ते गिधाडाचे असल्याचे सांगितले. गिधाड दिसणे हे वाघ दिसण्यापेक्षाही दुर्मिळ होत चाललेले असताना, घरट्यात बसलेले गिधाड पाहायला मिळणे खरोखरच अवर्णनीय होते, म्हणूनच मी चालकाला थांबायला सांगितले व पक्षाची छायाचित्रे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकदा प्रयत्न करुन, जिप्सी योग्य ठिकाणी लावूनही मला हवे तसे छायाचित्र मिळाले नाही, म्हणून आम्ही पुढे निघालो. पुढे १०० मीटरवर एक नाला होता व आम्ही त्या नाल्याजवळ येताच एक वाघीण तिथून उठली व क्षणार्धात रस्ता ओलांडून झाडीत गडप झाली! मी केवळ तिच्या चपळाईचे कौतुक करु शकलो! गाईड म्हणालासाहेब गिधाडावर उगीच वेळ घालवलात”, मात्र मी क्षणभर वाघाला विसरलो होतो म्हणून वाघाचे  फोटो न घेता आल्याचे अजिबात वाईट वाटले नाही, कारण त्या विसरण्यातही आनंद होता!
टेक टू:
पेंचमधला ओरिएंटल डव्हबाबतचा (पौर्वात्य कबुतराबाबतचा) अनुभवही असाच होता, हा एक लहान मात्र अत्यंत आकर्षक पक्षी आहे व माझ्याकडे आत्तापर्यंत त्याचे एकही स्पष्ट छायाचित्र नाही. त्यामुळेच मला या पक्षांची एक जोडी अगदी जवळून पाहायला मिळाली, तेव्हा मी एक चांगले छायाचित्र मिळेपर्यंत पटापट छायाचित्रे घेऊ लागलो. मी झुम लेन्सने त्याच्या मानेवरील करड्या रंगाचा गोंदलेल्या पट्ट्यासारख्या अगदी लहानात लहान गोष्टींचे सौंदर्य न्याहाळत होतो. यामध्ये किती वेळ गेला याकडे माझे लक्ष नव्हते तेवढ्यात समोरुन एक जिप्सी आली व त्यातील लोकांनी, जवळच रस्त्याच्या बाजूला वाघ उभा आहे व त्यांना किती सुंदर छायाचित्रे मिळाली हे सांगितले. मी कशाची छायाचित्रे घेत आहे हे समजल्यानंतर त्यांच्या चेह-यावरील भाव नक्कीच छायाचित्र घेण्यासारखे होते! पुन्हा माझा गाईड कुजबुजला काय साहेब कबुतरासाठी वाघ पाहण्याची संधी हुकवलीत! पण त्याला माहिती नव्हते की मी वाघ पाहण्याची संधी आनंदाने हुकवली होती! त्या ओरिएंटल डव्हच्या सौंदर्याने मी काही काळ आजूबाजूचे सर्व काही विसरुन गेलो होतो!
टेक थ्री:
वाघ पाहण्याची संधी हुकणे ताडोबातही सुरुच होते. जिप्सीत प्रवास करताना, इतर जिप्सींच्या टायरमुळे उडालेल्या धुराळ्यात मला अचानक कोळ्याच्या मोठ्या जाळ्यात अडकलेले हिरवे पान दिसले. त्यानंतर मला जाणवले की ते पान नसून तो एक हिरवा नाकतोडा आहे, ज्याचा आकार कोळ्यापेक्षाही दुप्पट आहे, मी त्यांच्या हालचाली पाहण्यासाठी थांबलो. मिनिटभरात त्या बिचा-या नाकतोड्याचे बचावाचे शेवटचे प्रयत्न थांबले व कोळी आपले काम करु लागला. मी ५०० च्या झुम लेन्सने पाहिले तेव्हा, मला आश्चर्य वाटले की एक लहान नारंगी रंगाचा कोळी मोठ्या कोळ्यावर चढत होता; जंगलांचा अभ्यासक असलेल्या माझ्या मित्राने अतुल धामणकरने मला माहिती दिली की मोठा कोळी मादी होती व तिच्यापेक्षा आकाराने लहान असलेला नर कोळी होता, मादी जेव्हा तिचे भक्ष्य खाण्यात गुंग असते तेव्हाच नर तिच्या जवळ येऊ शकतो, नाहीतर मादी त्याला खाऊन टाकते! मला नेहमी प्रश्न पडायचा की दात नसतानाही कोळी त्यांचे भक्ष कसे खातात? त्यावर अतुलने माहिती दिली की मादी तिच्या नांगीने (फँग) भक्ष्याच्या शरीरात विष सोडते व ते विष एवढे जहाल असते की भक्ष्याच्या शरीरातील सर्व स्नायुंचे तसेच हाडांचेही द्रवात रुपांतर होते. मादी तो द्रव शोषते व वाळलेले शरीर टाकून देते, जे उडून जाते! हे ऐकायला अतिशय क्रूर वाटेल मात्र जंगलाच्या जगण्यासाठी मारणे, या तत्वज्ञानातील ते एक तथ्य आहे! जंगलात अशा अनपेक्षित गोष्टी घडतात व मी या घटनेची छायाचित्रे घेण्याच्या नादात पुन्हा वाघ पाहण्याची संधी घालवली जी इतर जिप्सींना मिळाली. मात्र मला जे काही पाहायला मिळाले ते तितकेच रोमहर्षक असल्याने मी अतिशय आनंदी होतो. कारण या लहान प्रजातीच जंगल जिवंत ठेवतात व आपल्यापैकी बरेच जण मोठे प्राणी पाहण्याच्या नादात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात!

टेक फोर:
जंगलात भटकताना एखादा असाही दिवस येतो की तुम्हाला वाघही दिसत नाही किंवा काही वेगळे अथवा चित्तथरारकही दिसत नाही व अस्वस्थ मनाने तुम्ही तुमच्या खोलीत परत येता. कान्हामध्ये असताना माझ्याबाबतीतही एकदिवस असेच झाले, रात्री मी माझ्या कॉजेटच्या व-हांड्यात उभा होतो, बाहेर अतिशय थंड वारा वाहात होता व मी रिसॉर्टमध्ये काम करणा-या दोन मुलांना माझ्या कॉटेजला लागून असलेल्या कॉटेजपुढे उभे असलेले पाहिले. ते काही पाहुण्यांच्या ऑर्डरची वाट पाहात होते ज्यांची पार्टी सुरु होती, ते बहुदा वाघ पाहायला मिळाल्याचा आनंद साजरा करत होते! त्या मुलांकडे गरम कपडे नव्हते व ते थंडीमध्ये कुडकुडत होते. मी व्यवस्थापकाला बोलावले व रिसॉर्टमध्ये अशी किती मुले काम करतात हे विचारले? त्याने उत्तर दिले बहुधा ८-१० जण काम करत असतील. मी त्याला जवळपासच्या गावातील दुकानात जाऊन १० स्वेटर आणायला सांगितले आणि रिसॉर्टमध्ये काम करणा-या सर्व मुलांना दिले! त्या मुलांच्या चेह-यावर मी जो आनंद पाहिला त्यामुळे माझी दिवसभराची मरगळ पळून गेली आणि हो त्या रात्रीही वाघ पाहण्याची संधी मी आनंदाने हुकवली!

मला वाघ पाहायलाच मिळाला नाही असे नाही, पण इतर सर्व पर्यटकांना जेव्हा वाघ पाहायचा आहे म्हणून इतर कोणत्याही प्राण्यावर वेळ घालवायचा नव्हता तेव्हा मी इतर प्राणी पाहण्याचा आनंद उपभोगत होतो.

टेक पाच:
ताडोबातल्या एका वाघाचे नाव आहे स्कारफेस, इतर नर वाघांसोबत झालेल्या स्थानिक झटापटींमुळे त्याच्या चेह-यावर जे व्रण आहेत त्यामुळे त्याचे हे नाव पडले आहे; तो भारतील कोणत्याही जंगलांमधील मोठ्या नर वाघाच्या तोडीचा आहे, धिप्पाड...! तो ताडोबाच्या जंगलाचा खरा थलाईवा किंवा बॉस आहे!
आम्हाला सकाळच्या फेरफटक्यात त्याच्या मोठ्या पंजाच्या खुणा आढळल्या व तीन तास शोध घेतल्यानंतर व वाट पाहिल्यावर त्याची छायाचित्रे घेण्यासाठी त्याचा पाठलाग केला; जंगलात पाहण्यासारखे बरेच काही असते मात्र जंगलात वाघाचा पाठलाग करण्यासारखा थरार कशातच नाही, तो शब्दांपलिकडचा आहे. अथक प्रयत्नांनंतर जेव्हा तुम्हाला तो प्राणी दिसतो त्यानंतर आपण केवळ निःशब्द होतो एवढेच मी सांगू शकतो!

आता या टेकनंतर जंगलात भटकंती करणा-यांनी तुम्ही जिथे राहता त्याच्या आजूबाजूला कोणत्या गोष्टी आवर्जुन पाहायला पाहिजेत त्याविषयी बोलू! जंगलातला सकाळचा आणि संध्याकाळचा फेरफटका झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात पायी फिरण्याची माझी सवय आहे, त्यामुळे मला जंगलाच्या परिसरात राहणा-या गावक-यांच्या जीवनाची तुलना करता येते. कान्हातील खटिया व पेंचमधील तुरियाच्या विरुद्ध परिस्थिती ताडोबाच्या मोहर्लीमध्ये होती. जेव्हा मी अशाप्रकारे पायी फेरफटका मारायला निघतो तेव्हा ताजी हवा व हिरवाईचा सुंगध वातावरणात भरलेला असतो. मात्र मोहर्लीमध्ये शौचाचा व घाणीचा वास येत होता, कारण गावकरी जंगलातील रस्त्यांच्या कडेला प्रातर्विधी करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गावासाठी एक समुदाय केंद्र बांधण्यासाठी निधी दिल्याबद्दल एका स्थानिक नेत्याचे अभिनंदन करणारा फलक मोहर्लीत लावण्यात आला होता मात्र तिथे सार्वजनिक     शौचालयांसारखी जीवनाआवश्यक गोष्ट नव्हती; त्यामुळे गावकरी त्यासाठी रस्त्यांचा वापर करत होते. ताडोबात वाघ पाहायला मिळत असल्याने ते राष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांचे आकर्षण आहे व असे दृश्य नक्कीच अभिमानाची बाब नाही. प्रवेशद्वारापाशी असलेल्या वनविभागाच्या शौचालयांचीही दयनीय स्थिती आहे. वनविभाग त्यांच्या निधीतून किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गावासाठी नक्कीच काही चांगली शौचालये बांधू शकते. या बाबतीत काही मदत करणे ही पर्यटकांचीही जबाबदारी आहे. कान्हा व पेंच येथील जंगलांमध्ये तुम्हाला हॉटेलसारखी स्वच्छ व व्यवस्थित शौचालये दिसतात मात्र ताडोबा या बाबतीत मागे आहे. स्वच्छता व टापटिप या बाबतीत बरेच काही करण्याची गरज आहे. ताडोबातील गाईड जवळपास मुके व बहिरे आहेत येवढेच मला सांगावेसे वाटते! गाईड हा जंगल आणि पर्यंटकांमधला दुवा असतो मात्र इथे पर्यटकांना जंगलाचे बारकावे समजावून सांगण्याऐवजी दुर्दैवाने बहुतेक गाईड तंबाखू खाण्यात व चालकाशी गप्पा मारण्यात गुंग होते. अशा दृष्टीकोनामुळे पर्यटकाचे जंगलाशी नाते जोडले जात नाही व स्वाभाविकपणे मग वाघ दिसला नाही की ती सफर निराशाजक होते. मग सगळा दोष जंगलाला दिला जातो, ज्याची त्यात काहीच चूक नसते. ताडोबामध्ये बसलेला आणखी एक धक्का म्हणजे २५० मिमी पेक्षा अधिक रेंजची लेन्स असलेल्या कॅमे-यासाठी आकारले जाणारे शुल्क! अशा कॅमे-यासाठी ५०० रुपये आकारले जातात, म्हणजे जर जिप्सीमध्ये असे ४ कॅमेरे असतील तर तुम्हा एका सफरीमागे २००० रुपये द्यावे लागतात, ही रक्कम जिप्सीतून फेरफटका मारण्यापेक्षाही अधिक आहे! देशातल्या इतर कोणत्याही अभयारण्यात   कॅमे-यासाठी शुल्क आकारले जात नाही, ही अक्षरशः लूट आहे व वाघांमुळे प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्याच्या लोकप्रियतेचा चुकीचा फायदा घेणे आहे. यातील मूर्खपणाचा भाग म्हणजे तुम्ही जास्त रेंज असलेल्या लेन्स नाकारल्या तर पर्यटक कमी रेंजच्या कॅमे-याने प्राण्याचे छायाचित्र घेण्यासाठी त्याच्या अधिक जवळ जातील! आपल्या वन विभागाने अशा धोरणांचे तपशीलाने विश्लेषण करणे आवश्यक आहे व आपल्या अभायरण्यांची इतर राज्यातील अभयारण्यांशी तुलना केली पाहिजे व त्यांच्या चांगल्या धोरणांची अंमलबजावणी केली पाहिजे, ज्यामुळे पर्यटकांना समाधानकारक अनुभव मिळेल. मुख्य म्हणजे अभयारण्यांच्या वेळा, आरक्षण शुल्क इत्यादींसाठीची धोरणे संपूर्ण राज्यात सारखीच असली पाहिजेत म्हणजे पर्यटकांचा गोंधळ टाळता येईल.

मित्रांनो आपल्याला जंगलाने जे आनंदाचे क्षण दिले आहेत त्याबाबतची आपली जबाबदारी जंगलातून बाहेर पडल्यानंतर संपत नाही तर सुरु होते. आपण केवळ छायाचित्रे व वाघाच्या चित्तथरारक आठवणीच नाही तर जंगलाबाबतच्या जबाबदारीची जाणीव घरी घेऊन जायला पाहिजे.
आता शेवटच्या टेकमध्ये तुम्ही जंगलात नसला तरी तुम्ही काय करु शकता याचे वर्णन पाहा आणि माझ्यावर विश्वास ठेवा ते वाघ पाहण्यापेक्षाही कित्येक पटीने आनंददायक आहे!
टेक सिक्स:
पुण्यामध्ये, अनुज खरे यांची नेचर वॉक, संजीवनी डेव्ह व पुणे वनविभागाने मध्यप्रदेशातील पेंच अभयारण्यातील काही आदिवासी व वन विभागाच्या कर्मचा-यांना, पर्यटन व स्थानिक लोक एकमेकांसोबत कसे काम करु शकतात, या विषयावर पाहणी करण्यासाठी बोलावले होते. पेंचचे संचालक श्री. आलोक कुमार व मध्य प्रदेश वनविभागाचे पार्क गेम रेंजर श्री. तिवारी व पुणे वनविभागाचे सीसीएफ सुनील लिमये यांचा या कार्यक्रमात पुढाकार होता, याच हेतूने त्यांनी दांडेली अभयारण्याला भेट दिली होती व परत येताना आम्ही त्यांना पुण्याला आमंत्रित केले होते. आम्ही पुण्यातल्या वैशाली या प्रसिद्ध उपहारगृहात त्यांना जेवण व काही भेटवस्तू दिल्या. यामुळे ते आदिवासी लोक अतिशय खुश झाले कारण त्यातल्या कुणीच मोठे शहर पाहिले नव्हते, ते कधीच रेल्वेत बसले नव्हते किंवा मसाला डोसा म्हणजे काय असतो हे त्यांना माहिती नव्हते! आम्ही त्यांना काही विरंगुळ्याचे व आनंदाचे क्षण देऊ शकलो याचे समाधान वाटले कारण हीच माणसे आमच्यासाठी जंगलांचे संरक्षण करतात!
माणसाच्या अनेक कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे काम जंगले करतात व त्यांचे संरक्षण झाले नाही तर त्या कल्पना केवळ कल्पनाच राहतील व आपले आनंदाचे क्षण आपणच उध्वस्त केले म्हणून पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरणार नाही!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स


No comments:

Post a Comment