Monday 30 December 2013

ग्राहक राजाच झाला तक्रारदार !























ग्राहक राजाच झाला तक्रारदार !

तुमच्या सर्वात जास्त नाराज ग्राहकांकडून तुम्हाला सर्वाधिक शिकता येतेबिल गेट्स.

या अवतरणाच्या लेखकाची ओळख देण्याची गरज नाही, त्याने त्याच्या उद्योगातील ग्राहक सेवेला एका नव्या पातळीवर नेऊन पोहोचवले; सॉफ्टवेअरसारख्या गुंतागुंतीच्या उत्पादनासाठी यूजर फ्रेंडली हा शब्द प्रचलित केला, आता अगदी पाच वर्षांच्या मुलापासून ते ऐंशी वर्षांच्या आजीपर्यंत सर्वजण संगणक हाताळू शकतात, याचे श्रेय अर्थातच मायक्रोसॉफ्टला जाते! ग्राहक सेवेचा विचार करायचा झाला तर दुर्दैवाने आपल्या देशातील रिअल इस्टेट उद्योगाने गेट्स यांच्या अवतरणाचा केवळ पहिला भागच घेतल्याचे दिसते! नवीन वर्षात प्रवेश करताना प्रत्येक जण अर्थव्यवस्थेबाबत व आपल्या पुढ्यात काय येऊ घातले आहे याविषयी सावध आहे, रिअल इस्टेटही त्याला अपवाद नाही. या उद्योगातील उत्पादनाचे स्वरुपच असे आहे की पुरवठ्यापेक्षा मागणी नेहमीच अधिक असते, विक्रीविषयी बोलायचे झाले तर वर्षानुवर्षे रिअल इस्टेट उद्योगाची त्यामध्ये मक्तेदारी राहिली आहे! या पार्श्वभूमीवर आपण भविष्यातील महानगर असलेल्या पुण्यातील रिअल इस्टेट उद्योगावर नजर टाकू. अलिकडेच वर्षाअखेरिस एक सर्वेक्षण करण्यात आले होते व त्याचे निष्कर्ष सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आले होते. ते सर्वेक्षण जिल्हा ग्राहक मंचात २०१३ साली दाखल झालेल्या तक्रारींचे होते व त्यामध्ये रिअल इस्टेट उद्योगाविरुद्धच्या तक्रारी सर्वाधिक होत्या हे सांगायची गरज नाही. एकूण ५६० तक्रारींपैकी २१७ तक्रारी म्हणजे जवळपास ४०% पुण्यातील व आसपासच्या भागातील बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध होत्या!
आता बरेच जण म्हणतील त्यात काय मोठेसे? बांधकाम व्यावसायिक त्यांच्या ग्राहकांना फसवतात हे आपल्याला माहिती नाही का, किंबहुना दुसरा एखादा व्यवसाय या सर्वेक्षणात सर्वोच्च स्थानी असता तरच आपल्याला आश्चर्य वाटले असते! यासाठी आपण सर्वेक्षणाला दोष देऊ शकत नाही, कारण रिअल इस्टेटचे नाव सतत चुकीच्या कृत्यांसाठी मथळ्यांमध्ये झळकत असते हे तथ्य आहे. त्याची अनेक कारणे असतील मात्र सामान्य माणसांच्या मनात बांधकाम व्यवसायिकांची प्रतिमाच तशी आहे, मात्र नेमके सत्य काय आहे? हा उद्योग पूर्वी फारसा ग्राहकाभिमुख किंवा कस्टमर फ्रेंडली नव्हता मात्र घरांच्या संख्येच्या तुलनेतील उलढालीचा नेमका आकार पाहा, तसेच वार्षिक व्यवहारांमध्ये गुंतलेला पैसा व त्यामध्ये किती मोठा वर्ग समाविष्ट आहे हे पाहा! कोणत्याही संस्थेने दरवर्षी किती सदनिका विकल्या व त्यातून किती पैसे मिळाले याची नेमकी नोंद ठेवलेली नसली तरीही ती कोणत्या ग्राहकोपयोगी उत्पादनापेक्षा म्हणजे अगदी ऑटोमोबाईल क्षेत्रापेक्षाही जास्त आहे असा माझा अनुभव सांगतो. या उद्योगात व्यावसायिकपणाचा अभाव आहे कारण जमीन व पैसा हातात असलेला कुणीही बांधकाम व्यावसायिक होऊ शकतो, अशा लोकांना कोणतीही पार्श्वभूमी नसते व ग्राहकांना कसे हाताळायचे याचे प्रशिक्षण नसते. तुम्ही सर्वेक्षणाचे विश्लेषण केल्यास लक्षात येईल की त्यातील ब-याचशा तक्रारी बांधकाम व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या किंव्या एखाद्या प्रकल्पापुरते काम करणा-या बांधकाम व्यवसायिकांविरुद्ध आहेत. या तक्रारींचे स्वरुपही बरेचसे सारखेच आहे की ताबा वेळेत दिला नाही किंवा ज्या सुविधांचे आश्वासन दिले होते त्या दिल्या नाहीत व बांधकामाचा सुमार दर्जा. या उद्योगामध्ये स्पष्टपणे सांगायचे तर दर्जासाठी कोणतीही मानके निश्चित करण्यात आलेली नाही, अजूनही बरीचशी कामे मजूर करतात उदाहरणार्थ टाईल बसविणे, लाकूडकाम व रंगकाम. फारसे ग्राहक या कामाचा दर्जा; टिकाऊपणा मजबूती याआधारे तपासत नाहीत, तर प्रकल्पाचे एकूण बाह्य स्वरुप कसे आहे यावरुन निर्णय घेतात.

व्यवहार झाल्यानंतर विकसक व ग्राहकादरम्यान वाद होण्याचे व तक्रारी केल्या जाण्याचे मुख्य कारण म्हणजे संवादाचा अभाव, दोघांमध्ये सदनिका आरक्षित करतेवेळी संवाद होत नाही तसेच बांधाकामादरम्यानही होत नाही! तुम्ही वादाचे मुद्दे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की व्यवस्थित संवाद साधला असता तर हा वाद टाळता आला असता, व यासाठीच विकसकांनी आपल्याबाजूने ग्राहकांशी संवाद साधणे अतिशय महत्वाचे आहे. आजकाल संकेतस्थळे, ईमेल, वॉट्सऍप, छायाचित्रे दाखवण्यासाठीची संकेतस्थळे व इतर अनेक साधने उपलब्ध आहेत, ज्याद्वारे तुम्ही ग्राहकांना जिथे सदनिका आरक्षित केली आहे त्या बांधकाम स्थळाविषयी सतत ताजी माहिती देऊ शकता. बहुतेक लोकांच्या सेलफोनवर नेट उपलब्ध असते त्यामुळे माहितीची देवाणघेवाण सहजपणे होऊ शकते. रिअल इस्टेटच्या बाबतीत माझा अनुभव असा आहे की हा उद्योग अजूनही जुनाट पद्धतीने काम करतो. बहुतेक ग्राहकांना कंपनीच्या मुख्य व्यक्तिच्या म्हणजे मुख्य प्रवर्तक किंवा बांधकाम व्यावसायिकाच्या संपर्कात राहायचे असते. बांधकाम व्यावसायिक जर वर सांगितलेल्या माध्यमातून स्वतः उपलब्ध झाला किंवा संघटनेमध्ये दुस-या फळीतील भक्कम नेतृत्व उभे केले जे ग्राहकांचे अगदी लहान लहान प्रश्न हाताळू शकेल तर मग कोणत्याही समस्या येणार नाहीत. सरते शेवटी सामान्य ग्राहकाला असे वाटते की त्याचे कुणीतरी ऐकावे व त्याच्या गरजा पूर्ण व्हाव्यात. मान्य आहे की प्रत्येक वेळी त्याच्या मागणीप्रमाणे कृती करता येणार नाही मात्र ग्राहकास नकार देताना तो नम्रपणे दिला जावा व त्याची व्यवस्थित कारणे दिली जावीत! ग्राहकांनी कोणत्याही अपेक्षा ठेवणे चूक नाही कारण हा ग्राहकांचा जमाना आहे व रिअल इस्टेट उद्योगही त्याला अपवाद नाही!
इथेच ग्राहक व बांधकाम व्यावसायिकातील संवाद अतिशय महत्वाचा आहे, कारण ग्राहकाने केलेल्या तक्रारीला आपण कारणांसहित उत्तर देऊ शकतो व दिलेल्या वेळेत कृती करु शकतो, असे झाले तर कोणतेही वाद होणार नाहीत. असे दिसून येते की बहुतेक वेळा बांधकाम व्यवसायिक ग्राहकाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतो कारण त्याला त्याची काळजी नसते किंवा ब-याचदा तक्रारीमध्ये काही तथ्य नसते किंवा काही वेळा तक्रारीची दखल घेणे किंवा त्यानुसार दुरुस्त करणे विकसकाच्या क्षमतेबाहेर असते. उदाहरणार्थ एखाद्या सदनिकाधारकाने ताबा घेतल्यानंतर बाथरूमच्या अंतर्गत रचनेत काही बदल केले व खालील सदनिकेमध्ये गळायला सुरुवात झाली तर तो ग्राहक स्वाभाविकपणे बांधकाम व्यवसायिकाकडे येईल. इथे बांधकाम व्यवसायिकाची चूक नाही हे मान्य असले तरीही त्याने ज्या सदनिकाधारकास त्रास होतोय त्याला भेटणे टाळू नये किंवा जबाबदारी झटकू नये, तर दोन्ही सदनिकाधारकांशी एकत्रपणे बोलून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे किमान त्रस्त सदनिकाधारकाच्या मनात बांधकाम व्यवसायिकाची प्रतिमा चांगली होईल. लक्षात ठेवा कोणत्याही समस्येकडे पाठ फिरवुन ती सोडवता येणार नाही तर समस्येला समोरे जाणे हा सर्वोत्तम मार्ग आहे!

आपण बांधकामाच्या टप्प्यापासूनच ज्या ग्राहकांनी त्या प्रकल्पामध्ये सदनिका आरक्षित केली आहे त्यांचे स्नेहसंमेलन आयोजित करु शकतो. यामुळे ग्राहकांमध्ये सुरुवातीपासूनच एक स्नेहबंध निर्माण होईल व त्यामुळे सदनिकेचा ताबा मिळाल्यानंतर तिथे प्रत्यक्ष राहायला सुरुवात केल्यानंतर एकमेकांशी अधिक चांगल्याप्रकारे संवाद साधण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग होईल. अशा परस्पर संवादातून आपण ग्राहकांना बांधकामाच्या ठिकाणी कोणती तंत्रे वापरतो याविषयी माहिती देऊ शकतो तसेच भविष्यात येणा-या देखभालीच्या समस्यांविषयीही जागरुक करु शकतो, उदाहरणार्थ प्लास्टरमध्ये बारिक भेगा किंवा पावसाळ्यात भिंतीना ओल येणं , अशा प्रकारचे दोष!

ग्राहकाची भूमिका तेवढीच महत्वाची आहे कारण कोणताही संवाद एकतर्फी होऊ शकत नाही, आपण विकसकाकडून प्रकल्पाविषयी तसेच त्याच्या पूर्ण झालेल्या प्रकल्पांविषयी शक्य तेवढी अधिक माहिती घेतली पाहिजे, त्यामुळे आपल्याला भविष्यातील अनेक कटू अनुभव टाळता येतील. अनेक तक्रारी सुविधा किंवा ताबा देण्याच्या तारखेची आश्वासने पूर्ण न करण्याविषयी असतात. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी विकासकाचा भूतकाळ जाणून घेण्याचा प्रयत्न करा, त्यातून त्या कंपनीचे संपूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहील, त्यामुळे फार उशीर होण्यापूर्वी चौकशी करणे चांगले आहे! बरेच लोक जाहिरातींमध्ये किंवा माहिती पत्रकात लिहीण्यात आले आहे त्यावर विश्वास ठेवतात जी चुकीची पद्धत आहे. विकसकाच्या सध्याच्या ग्राहकांशी तसेच त्याच्या मुख्य व्यक्तिशी बोला, त्यांची व्यवसायिक मूल्ये व दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न करा. अशा बाबींमुळे तुम्ही योग्य व्यक्तिंशी व्यवहार करत आहात व तुमचे पैसे सुरक्षित हातांमध्ये आहेत याची खात्री होईल. सामान्य माणसाने रिअल इस्टेट उद्योगाकडे आदराने पाहावे असे आपल्याला वाटत असेल तर पारदर्शकता व विश्वास यासारख्या बाबी केवळ पुस्तकात राहू नयेत तर प्रत्यक्षात उतरवल्या जाव्यात. काळ झपाट्याने बदलतोय व तंत्रज्ञानामुळे लोकांना जगभरातील चांगल्या पद्धतींची माहिती होत आहे. जमीन ही अतिशय दुर्मिळ बाब आहे त्यामुळे बांधकाम व्यवसायिकांचा इतर कोणत्याही व्यवसायाच्या तुलनेत वरचष्मा असतो मात्र त्यामुळे त्यांची जबाबदारी देखील वाढते!

सरकारने देखील रिअल इस्टेटच्या विशेषतः बांधकाम व्यवसायिक व ग्राहकांमधील वाद किंवा जमीनीच्या मालकी हक्काविषयीचे दावे अशा समस्या सोडवण्यासाठी विशेष लवाद स्थापन केला पाहिजे. सध्या दिवाणी न्यायालये तसेच महसूल विभागावर कामाचा प्रचंड ताण असल्याने अशी प्रकरणे निकाली निघायला वेळ लागतो. लवाद स्थापन झाला तर लोक कायद्याचा आदर करतील कारण म्हणतात ना, जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड (उशीरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो)! विकसकांच्या क्रेडाईसारख्या संघटनांचा तक्रार निवारण कक्ष आहे जो तक्रारी हाताळतो मात्र याविषयीची माहिती जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत तसेच सध्याच्या ग्राहकांपर्यंत पोहोचली पाहिजे. संघटनांनी त्यांच्या सदस्य विकसकांना चांगल्या व्यवसायिक नैतिक मूल्यांचे व ग्राहकाभिमुख होण्याविषयीचे प्रशिक्षण दिले पाहिजे. कारण ग्राहक तक्रारींच्या यादीत सर्वोच्च स्थान मिळवणे हे काही चांगले लक्षण नाही! केवळ आपल्या कृतीतूनच आपण हा लौकिक बदलू शकू, तरच आपण स्वतःला विकसक म्हणू शकू, विकसक म्हणजे केवळ भिंती बांधणे व त्या विकून पैसा मिळवणे नाही, तर आपण माणसांचा समाज विकसित करणे, ज्यामध्ये चांगले संस्कार जोपासले जातील व वृद्धिंगत होतील!

संजय देशपांडे



संजीवनी डेव्हलपर्स

Sunday 15 December 2013

घर झालं, भावना हरवल्या !





















घर झालं, भावना हरवल्या !
 घर खरेदी करणे हे एक शाश्वत व अतिशय मोठे काम आहेकेनी ग्विन
केनिथ कॅरोल केनी ग्विन हा एक अमेरिकन व्यावसायिक, शिक्षणतज्ञ व राजकीय नेता होता. घर खरेदी करण्याविषयीचे त्याचे विधान, तो केवळ एक व्यावसायिक किंवा राजकीय नेता म्हणूनच नाही तर एक शिक्षणतज्ञ म्हणून किती विशेष होता हे दाखविते! खरच कुणाही व्यक्तिसाठी घर खरेदी करणे ही अभिमानाची गोष्ट आहे व तुम्ही जेव्हा त्याच्या मालकाला घराचा ताबा देता तेव्हा त्याला होणारा आनंद अनुभवण्यासारखा असतो!

बोलता बोलता , खरं तर लिहिता लिहिता असं म्हणायला पाहिजे , सकाळ वास्तूच्या टीम सोबत एक वर्ष झालपण , म्हणजे अजून एक वर्ष अस मला म्हणायचंय , या वर्षाचा आढावा घेताना जे जाणवेल तेच आज तुमच्याशी शेअर करतोय

अभियंता म्हणून मी अनेक घरे बांधली आहेत व त्यांच्या मालकांना दिली आहेत, मात्र प्रत्येक वेळी एक नवीन घर असते, त्यामागची गोष्ट नवीन असते व चेहरेही नवीन असतात! मात्र प्रत्येक वेळी एक गोष्ट सारखी असते म्हणजे त्यामधील भावना. खरेतर जेव्हा लोक त्यांच्या घरांचा ताबा घ्यायला येतात तेव्हा मी त्यांना फक्त घर नावाच्या चार भिंती देतोय असे मला वाटत नाही तर सदनिका धारकांना या भावना सुपूर्त करतोय असे वाटते. घराचा ताबा देण्याच्या कार्यक्रमाला लोक एखाद्या लग्न किंवा कौटुंबिक सोहळ्याप्रमाणे नवीन कपडे व दाग-दागिने घालून येतात, सोबत मित्रांचा लवाजमा असतो, मग घराची किल्ली घेताना छायाचित्रे घेतली जातात! त्यावेळी तुम्हाला जाणीव होते की तुम्ही घर नाही तर भावना देत आहात! या देशातील बहुतेक लोक आयुष्यात एकदाच घर खरेदी करतात, त्यामुळे त्याचे भावनिक मूल्य प्रचंड मोठे असते. एक विकासक/बांधकाम व्यावसायिक म्हणून ग्राहक जे घर खरेदी करणार आहेत त्यामागच्या त्यांच्या भावना समजावून घेणे अतिशय महत्वाचे आहे.
दुर्दैवाने रिअल इस्टेटमध्ये ही भावना नाहीशी होत चालली आहे, त्यामुळे प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, विश्वास, नैतिक मूल्ये, नातेसंबंध व अशा आशयाचा कुठलाही शब्द आल्यास या उद्योगाकडे अविश्वासाच्या नजरेने पाहिले जाते. कारण सरते शेवटी जिथे या भावना अस्तित्वात असतात तिथेच हे शब्द वापरले जातात व माणसाचे या शब्दांशिवाय अस्तित्व ते काय? मात्र आजचे रिअल इस्टेट हे ऐषाराम, शेजारी नसलेले घर, प्रायवसी , भविष्यातील घर यासारख्या शब्दांवर आधारित आहे, त्यामध्ये भावनांचा लवलेशही नाही. किंबहुना बरेच विकासक व  एजंट्स घरांचा उल्लेख माल असा करतात. काहीजण म्हणतील की त्यात काही चूक नाही कारण ती देखील एक ग्राहकोपयोगी वस्तूच आहे, त्याला वेगळे स्थान देण्याची काय गरज आहे! इथे मला मुन्नाभाई एमबीबीएस नावाच्या सिनेमातील एक संवाद आठवतो की वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांना सांगत असतो की, त्यांनी आपल्या रुग्णांवर कधीही प्रेम करु नये”! त्यामागचा तर्क असा की रुग्णामध्ये भावनिकदृष्ट्या गुंतल्यास तुम्ही त्याला देत असलेल्या उपचारावर परिणाम होऊ शकतो. वैद्यकीय व्यवसायाबद्दल तर मला माहिती नाही मात्र हा विचार रिअल इस्टेटमध्ये मात्र नक्कीच स्वीकारण्यात आलाय, परिणामी या व्यवसायात आपल्या उत्पादनावर व आपल्या ग्राहकांवर प्रेम करणा-या लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होतेय, त्यामुळे रिअल इस्टेट उद्योगामध्ये विविध क्षेत्रात तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत! घर बांधणीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तिला त्यातून किती पैसा मिळेल यातच फक्त स्वारस्य असते, किंबहुना तशीच प्रतिमा या व्यवसायाची तयार झालीये.  
बांधकाम व्यावसायिक व घराच्या ग्राहकातील नाते हरवले आहे किंवा अस्तित्वातच नाही. अनेक बांधकाम व्यावसायिक प्रत्यक्ष वापरकर्त्यांना कधीच भेटलेले नाहीत, आता तर कंपनीचे विक्री कर्मचारी देखील नसतात तर संपूर्ण प्रकल्पाचे मार्केटींगचे कंत्राटच दुस-या कुणाला तरी दिलेले असते व त्यामुळे ग्राहक व प्रत्यक्ष बांधकाम व्यावसायिक तसेच प्रकल्पाशी निगडित चमू यांच्यात कोणताही संवाद होत नाही. आता वेळ घेऊन बांधकामाच्या ठिकाणी भेट दिली जाते व त्यांना केवळ प्रकल्प दाखविण्यासाठी व माहिती देण्यासाठी एक स्वतंत्र चमू असतो. प्रकल्पाच्या जाहिरातीपासून ते करारापर्यंत ग्राहक संबंध हाताळण्यासाठी तिसराच पक्ष असतो व बहुतेक बांधकाम व्यावसायिकांना ही व्यवस्था अगदी सोयीची वाटते कारण त्यांना घराच्या ग्राहकांना भेटावे लागत नाही व त्यांच्या घराविषयीच्या लहान-सहान प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत नाहीत. मी अशा अनेक बांधकाम व्यावसायिकांना ओळखतो जे एकाही ग्राहकाशी न बोलता एवढे प्रकल्प पूर्ण केले, तेवढे प्रकल्प विकले असे अभिमानाने सांगतात! आता याला व्यावसायिक यश म्हणायचे की भावनिक पातळीवरील अपयश हे मला कधीही  समजलेले नाही? इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की बांधकाम व्यावसायिकांसाठी त्यांनी किती चौरस फूट बांधकाम केले व त्या चौरस फूट क्षेत्रातून त्यांची किती उलाढाल झाली एवढेच महत्वाचे असते का? आपण किती कुटुंबांना त्यांचे स्वप्नातील घर प्रत्यक्ष साकार करण्याचा आनंद दिला व आपण या घरांचा ताबा देण्याच्या प्रक्रियेत किती नाती तयार केली यातील आनंद अनुभवायचे विसरलो आहोत का? ग्राहकांना विशेष वागणूक देताना किंवा सर्व ऐषआराम देताना किंवा त्या सर्व जबाबदा-यांपासून मोकळे होताना आपण घर बांधण्याच्या व खरेदी करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेतील मानवी स्पर्श हरवत चाललो आहोत.
पूर्वी बंगल्यांच्या जमान्यात अनेक लोकांचे बांधकाम व्यावसायिक सर्वेसर्वा असायचे म्हणजे ते वास्तुविशारद, कंत्राटदार व अभियंता अशी सर्व कामे करायचे. घर संयुक्त प्रयत्नांनी, सातत्याने संवाद करुन बांधले जायचे, सरते शेवटी त्यामध्ये सहभागी सर्वांचे स्नेहसंमेलन व्हायचे व बंगल्याच्या मालकाच्या कुवतीप्रमाणे कामावरील सर्व मजूरांना सुद्धा काही ना काही भेटवस्तू दिली जायची व वर्षानुवर्षे ही नाती जपली जायची, त्यांना उजाळा दिला जायचा. मला अशा अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या गोष्टी माहिती आहेत की त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामाचा फायदा त्यांच्या वारसांना झाला; तर मग आता रिअल इस्टेटमधून या सर्व चांगल्या प्रथा कुठे हरवल्या आहेत?
दुसरीकडे यामध्ये ग्राहकांचाही तितकाच दोष आहे, कारण एखादा चांगला बांधकाम व्यावसायिक जे काही करतो त्यातली केवळ भौतिक बाजू ते पाहतात व त्यात काय मोठेसे आम्ही त्यासाठी बाजार भावाने पैसे मोजले आहेत, तर तशी सेवा देणे ही बांधकाम व्यावसायिकाची जबाबदारी नाही का अशी त्यांची प्रतिक्रिया असते?  त्यांना त्यांच्या घराचे नियोजन व अंमलबजावणीमागील मेहनत जाणून घेण्यात रस नसतो. जे लोक केवळ वरवरच्या सोयीसुविधांना भुलतात व ऐषआरामाच्या सुविधांचा दिखावा करण्यात आनंदी असतात, ते त्यापलिकडे कधीही विचार करत नाहीत, त्यांचा विकासक समाजामध्ये काय चांगले काम करत आहे व तत्सम बाबींचे कौतुक करत नाहीत. आजकाल मी ग्राहकांचे पाहिले आहे की त्याची घराबाबत किंवा बांधकाम प्रक्रियेबाबत काही गैरसोय झाली, मग तो काही देखभालीचा मुद्दा असेल किंवा कायदेशीर मुद्दा असेल, तर ते लगेच त्याविषयी प्रतिक्रिया देतात, मात्र विकासक किंवा त्याच्या चमूने केलेल्या चांगल्या कामाचे क्वचितच कौतुक करतात किंवा त्याविषयी चांगले बोलतात. अर्थात आपल्या संपूर्ण समाजालाही सर्व आघाड्यांवर अशीच सवय झाली आहे, कुणाही विषयी चांगले बोलणे निषिद्ध झाले आहे! दुसरीकडे कुणावरही टीका करणे हे आपले आवडते काम झाले आहे. आपले शेजारी कोण आहेत याची आपण चौकशी करत नाही व आपण राहायला येण्यापूर्वी त्यांच्याशी ओळख करुन घेत नाही, तर मग ज्या घरात आपण आपले संपूर्ण आयुष्य घालवणार आहोत त्याचे कंत्राटदार किंवा पुरवठादारांविषयी जाणून घेणे तर फार दूरची बाब झाली! माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला फारफार तर दोन किंवा तीन ग्राहक भेटले असतील, ज्यांनी ज्या प्रकल्पामध्ये घर आरक्षित केले आहे तिथल्या बांधकाम मजूरांच्या राहण्याची सोय पाहण्यात स्वारस्य दाखवले! त्यामुळे दिवाळीदरम्यान बांधकाम मजूरांना मिठाई देण्यासारख्या साध्या गोष्टींनी त्यांना मदत करणे याचा विचारही आपण करु शकत नाही. शेवटी त्यांचे हातच तुमच्या घराच्या चार भिंती उभारणार असतात, आपण त्यांना काही चांगले क्षण देऊ शकत नाही का? आपण वास्तुविशारदाला किंवा कंत्राटदाराला, आपल्याला घर पाहून आनंद झाला, ते आवडले आहे व आपले स्वप्नातील घर प्रत्यक्ष साकार करण्यासाठी कौतुकाचे किंवा आभाराचे चार शब्द लिहीण्याचीही तसदी घेत नाही! घराचा ताबा घेतल्यानंतरही असाच दृष्टीकोन असतो व त्याचा परिणाम म्हणजे आजकालच्या इमारतींमधील तणावपूर्ण संबंध. सदस्यांमध्ये पार्किंगसारख्या लहानसहान बाबींवरुन वादावादी होते मग त्याला हिंसक वळण मिळते किंवा प्रकरण न्यायालयात जाते, असे वाद सामंजस्यांने परस्परांशी चर्चा करुन सहज सोडवता येऊ शकतात! मात्र त्यासाठीही मानवीय दृष्टीकोन व नातेसंबंधांसारखे शब्द महत्वाचे आहेत. हे सर्व सुरुवातीपासूनच रुजवणे आवश्यक आहे; जर बांधकाम व्यावसायिक त्याविषयी फारसा उत्सुक नसेल किंवा त्याला त्याची जाणीव नसेल तर ग्राहकाने तशी मागणी केली पाहिजे कारण शेवटी हा ग्राहकांचा जमाना आहे. म्हणूनच जर काही चुकीच्या पद्धती प्रचलित असतील तर त्यासाठी कुठेतरी ग्राहकही स्वतः जबाबदार आहे!
दुर्दैवाने या सर्व प्रक्रियेमध्ये रिअल इस्टेटमधून एक महत्वाची गोष्ट हरवत चालली आहे ती म्हणजे बांधकाम व्यावसायिक व ग्राहक या दोन दुव्यांमधील संवाद! मी जेव्हा बांधकाम व्यावसायिक म्हणतो तेव्हा घराच्या बांधकामात काम करणारा संपूर्ण चमू असा अर्थ अभिप्रेत आहे; मग ते बांधकामावरील मजूर असतील, विपणन कर्मचारी असतील किंवा बाहेरील कामे हाताळणा-या संस्था असतील. यासाठी साध्या व सोप्या मार्गांनी बरेच काही करता येईल, उदाहरणार्थ बांधकामाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात स्नेहसंमेलन आयोजित करुन या दोन दुव्यांची भेट घडवून आणता येईल. नेहमी काहीतरी वेगळे करण्याचीही गरज नाही,  संकेतस्थळ किंवा मेलद्वारे आपल्या कामाविषयी ग्राहकाला माहिती देता येईल. तुम्ही त्यांना रिअल इस्टेट उद्योगात चाललेल्या घडामोडींची माहिती देऊ शकता. वाळूच्या उपशावर काही काळ बंदी घालण्यात आली होती, यासारख्या बातम्या त्यांना सांगून तुमच्या चमूला त्यामुळे कशाप्रकारे समस्यांना तोंड द्यावे लागले हे सांगा, विकासकडून एखाद्या लहानशा पत्राद्वारे या बाबी कळवता येतील. शेवटी हा देखील एक प्रकारचा संवादच आहे व या संवादातूनच ग्राहक व बांधकाम व्यावसायिकातील भावनिक नाते निर्माण होत असते. शेवटी दोघांसाठीही हा व्यवसाय आहे हे मान्य केले तरीही त्यातील उत्पादन इतर उत्पादनांप्रमाणे नाही, कोणतेही घर भाव-भावनांशिवाय कसे घडू शकेल!
रिअल इस्टेटच्या भावनिक संस्कृतीचे जतन करण्याची जबाबदारी आपली आहे, कारण कोणतेही चांगले संस्कार हे एखाद्या झाडाप्रमाणे आहेत, ते आधी रुजवावे लागतात व मग आपल्या स्वतःच्या कृतींनी त्यांना वाढवावे लागते ! नवीन अर्श सुरु होतंय , या नवीन वर्षात या बदलाची फक्त अपेक्षा न करता निर्धार करत सरत्या वर्षाला निरोप देऊ आणि नवीन वर्षाचे स्वागत करू !

संजय देशपांडे

smd156812@gmail.com


संजीवनी डेव्हलपर्स

Sunday 8 December 2013

वाघ न दिसण्यातला आनंद !






















जंगल मला नेहमीच थक्क करते. ते मला निसर्गाची कल्पनाशक्ती माझ्या कल्पनाशक्तीपेक्षा कित्येक पटीने मोठी आहे याची जाणीव करुन देते. मला अजूनही ब-याच गोष्टी शिकायच्या आहेत ….गंटेर ग्रास


गंटेर विलहेल्म ग्रास हा जर्मन लेखक, कवी, नाटककार, चित्रकार, ग्राफिक कलाकार, शिल्पकार व १९९९चा नोबेल पुरस्कार विजेता आहे. तो जर्मनीचा आज हयात सर्वात प्रसिद्ध लेखक मानला जातो. त्याने केलेली जंगलांची व्याख्या पाहिल्यानंतर तो सर्वात प्रसिद्ध लेखक का आहे याविषयी मनात यत्किंचितही शंका उरत नाही. मी गंटेरशी पूर्णपणे सहमत आहे, कारण माझ्या आयुष्यातील काही सर्वोत्तम क्षण मी जंगलांमध्ये अनुभवले आहेत! माझी कान्हा, पेंच व ताडोबा या माझ्या आवडत्या जागांची अलिकडेच झालेली आठवडाभराची सफर मला असेच अनुभव देऊन गेली! कुणाचीही सुटीची यापेक्षा चांगली व्याख्या काय असू शकते! डिसेंबर महिन्याची सुरुवात असूनही कान्हामध्ये नेहमी जशी गोठवणारी थंडी असते तशी यावेळी नव्हती तर आल्हाददायक थंडी होती, याचे श्रेय आंध्र किनारपट्टीवर नुकत्याच आलेल्या हेलेना चक्रिवादळाच्या परिणामांना जाते. जंगलातील सफारीचे प्रवेश शुल्क, जिप्सीचे शुल्क यांचा कान्हात येणा-या पर्यटकांना निश्चितच फटका बसला आहे. त्याशिवाय ऑनलाईन आरक्षण प्रक्रिया व प्रत्येक पर्यटकाची ओळख पटवण्यासारखे प्रवेशाचे कडक नियम, समूह आरक्षणामध्ये कोणतेही बदल करण्यास परवानगी न देणे यासर्वांचा पर्यटकांच्या संख्येवर परिणाम होत आहे. गाईड, ढाबेवाले, जिप्सीचे मालक व रिसॉर्टमधील लोक उघडपणे नाही पण कुजबुजत, पर्यटकांच्या घटत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करतात. सामान्य लोकांमध्ये जंगलांची आवड निर्माण करणे आवश्यक आहे व जंगल सफारींचा खर्च निश्चितच चिंतेची बाब आहे, सध्याच्या दरांमुळे त्या केवळ समाजातील उच्च वर्गापुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. जंगले टिकावीत अशी आपली इच्छा असेल तर ती सामान्यांना परवडतील अशी व्हायला हवीत, तरच हा वर्ग जंगलांबाबत अधिक जागरुक होईल. विशेषतः शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना लक्ष्य करायला हवे, त्यांच्यासाठी सवलतीच्या दरातील पॅकेज तयार करावे, अशी माझी वनविभागाच्या लोकांना व राज्यकर्त्यांना विनंती आहे.
नेहमीप्रमाणे कुणीही कितीही नकार दिला तरीही जंगलाचा फेरफटका मारताना प्रत्येकाची नजर वाघ शोधत असते. जंगलामध्ये इतरही बरीच चित्तथरारक दृश्ये पाहायला मिळतात, मात्र वाघांचे महत्व कायम आहे. माझ्या जंगल सफारींदरम्यान मला अनेकदा जंगलाचा राजा पाहण्याचा योग आला, तर ब-याचदा माझी संधी हुकली, मात्र तरीही संधी हुकली याचा मला आनंदच होता! बरेच जण म्हणतील की हे खोटे आहे, मात्र मला त्या बदल्यात जे पाहायला मिळाले ते तेवढेच किंवा त्यापेक्षाही अधिक थरारक होते. हिंदी चित्रपटांच्या चित्रणाच्या वेळी जसे टेक घेतले जातात तशाच टेकच्या स्वरुपात मी हे अनुभव तुम्हाला सांगणार आहे!
टेक वन
नेहमीप्रमाणे दूर पुढील मार्गावर चितळाने वाघाच्या आगमनाची सूचना दिली होती पण, माझ्या गाईडने उंच साल वृक्षावरील एका घरट्याकडे बोट दाखवत, ते गिधाडाचे असल्याचे सांगितले. गिधाड दिसणे हे वाघ दिसण्यापेक्षाही दुर्मिळ होत चाललेले असताना, घरट्यात बसलेले गिधाड पाहायला मिळणे खरोखरच अवर्णनीय होते, म्हणूनच मी चालकाला थांबायला सांगितले व पक्षाची छायाचित्रे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकदा प्रयत्न करुन, जिप्सी योग्य ठिकाणी लावूनही मला हवे तसे छायाचित्र मिळाले नाही, म्हणून आम्ही पुढे निघालो. पुढे १०० मीटरवर एक नाला होता व आम्ही त्या नाल्याजवळ येताच एक वाघीण तिथून उठली व क्षणार्धात रस्ता ओलांडून झाडीत गडप झाली! मी केवळ तिच्या चपळाईचे कौतुक करु शकलो! गाईड म्हणालासाहेब गिधाडावर उगीच वेळ घालवलात”, मात्र मी क्षणभर वाघाला विसरलो होतो म्हणून वाघाचे  फोटो न घेता आल्याचे अजिबात वाईट वाटले नाही, कारण त्या विसरण्यातही आनंद होता!
टेक टू:
पेंचमधला ओरिएंटल डव्हबाबतचा (पौर्वात्य कबुतराबाबतचा) अनुभवही असाच होता, हा एक लहान मात्र अत्यंत आकर्षक पक्षी आहे व माझ्याकडे आत्तापर्यंत त्याचे एकही स्पष्ट छायाचित्र नाही. त्यामुळेच मला या पक्षांची एक जोडी अगदी जवळून पाहायला मिळाली, तेव्हा मी एक चांगले छायाचित्र मिळेपर्यंत पटापट छायाचित्रे घेऊ लागलो. मी झुम लेन्सने त्याच्या मानेवरील करड्या रंगाचा गोंदलेल्या पट्ट्यासारख्या अगदी लहानात लहान गोष्टींचे सौंदर्य न्याहाळत होतो. यामध्ये किती वेळ गेला याकडे माझे लक्ष नव्हते तेवढ्यात समोरुन एक जिप्सी आली व त्यातील लोकांनी, जवळच रस्त्याच्या बाजूला वाघ उभा आहे व त्यांना किती सुंदर छायाचित्रे मिळाली हे सांगितले. मी कशाची छायाचित्रे घेत आहे हे समजल्यानंतर त्यांच्या चेह-यावरील भाव नक्कीच छायाचित्र घेण्यासारखे होते! पुन्हा माझा गाईड कुजबुजला काय साहेब कबुतरासाठी वाघ पाहण्याची संधी हुकवलीत! पण त्याला माहिती नव्हते की मी वाघ पाहण्याची संधी आनंदाने हुकवली होती! त्या ओरिएंटल डव्हच्या सौंदर्याने मी काही काळ आजूबाजूचे सर्व काही विसरुन गेलो होतो!
टेक थ्री:
वाघ पाहण्याची संधी हुकणे ताडोबातही सुरुच होते. जिप्सीत प्रवास करताना, इतर जिप्सींच्या टायरमुळे उडालेल्या धुराळ्यात मला अचानक कोळ्याच्या मोठ्या जाळ्यात अडकलेले हिरवे पान दिसले. त्यानंतर मला जाणवले की ते पान नसून तो एक हिरवा नाकतोडा आहे, ज्याचा आकार कोळ्यापेक्षाही दुप्पट आहे, मी त्यांच्या हालचाली पाहण्यासाठी थांबलो. मिनिटभरात त्या बिचा-या नाकतोड्याचे बचावाचे शेवटचे प्रयत्न थांबले व कोळी आपले काम करु लागला. मी ५०० च्या झुम लेन्सने पाहिले तेव्हा, मला आश्चर्य वाटले की एक लहान नारंगी रंगाचा कोळी मोठ्या कोळ्यावर चढत होता; जंगलांचा अभ्यासक असलेल्या माझ्या मित्राने अतुल धामणकरने मला माहिती दिली की मोठा कोळी मादी होती व तिच्यापेक्षा आकाराने लहान असलेला नर कोळी होता, मादी जेव्हा तिचे भक्ष्य खाण्यात गुंग असते तेव्हाच नर तिच्या जवळ येऊ शकतो, नाहीतर मादी त्याला खाऊन टाकते! मला नेहमी प्रश्न पडायचा की दात नसतानाही कोळी त्यांचे भक्ष कसे खातात? त्यावर अतुलने माहिती दिली की मादी तिच्या नांगीने (फँग) भक्ष्याच्या शरीरात विष सोडते व ते विष एवढे जहाल असते की भक्ष्याच्या शरीरातील सर्व स्नायुंचे तसेच हाडांचेही द्रवात रुपांतर होते. मादी तो द्रव शोषते व वाळलेले शरीर टाकून देते, जे उडून जाते! हे ऐकायला अतिशय क्रूर वाटेल मात्र जंगलाच्या जगण्यासाठी मारणे, या तत्वज्ञानातील ते एक तथ्य आहे! जंगलात अशा अनपेक्षित गोष्टी घडतात व मी या घटनेची छायाचित्रे घेण्याच्या नादात पुन्हा वाघ पाहण्याची संधी घालवली जी इतर जिप्सींना मिळाली. मात्र मला जे काही पाहायला मिळाले ते तितकेच रोमहर्षक असल्याने मी अतिशय आनंदी होतो. कारण या लहान प्रजातीच जंगल जिवंत ठेवतात व आपल्यापैकी बरेच जण मोठे प्राणी पाहण्याच्या नादात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात!

टेक फोर:
जंगलात भटकताना एखादा असाही दिवस येतो की तुम्हाला वाघही दिसत नाही किंवा काही वेगळे अथवा चित्तथरारकही दिसत नाही व अस्वस्थ मनाने तुम्ही तुमच्या खोलीत परत येता. कान्हामध्ये असताना माझ्याबाबतीतही एकदिवस असेच झाले, रात्री मी माझ्या कॉजेटच्या व-हांड्यात उभा होतो, बाहेर अतिशय थंड वारा वाहात होता व मी रिसॉर्टमध्ये काम करणा-या दोन मुलांना माझ्या कॉटेजला लागून असलेल्या कॉटेजपुढे उभे असलेले पाहिले. ते काही पाहुण्यांच्या ऑर्डरची वाट पाहात होते ज्यांची पार्टी सुरु होती, ते बहुदा वाघ पाहायला मिळाल्याचा आनंद साजरा करत होते! त्या मुलांकडे गरम कपडे नव्हते व ते थंडीमध्ये कुडकुडत होते. मी व्यवस्थापकाला बोलावले व रिसॉर्टमध्ये अशी किती मुले काम करतात हे विचारले? त्याने उत्तर दिले बहुधा ८-१० जण काम करत असतील. मी त्याला जवळपासच्या गावातील दुकानात जाऊन १० स्वेटर आणायला सांगितले आणि रिसॉर्टमध्ये काम करणा-या सर्व मुलांना दिले! त्या मुलांच्या चेह-यावर मी जो आनंद पाहिला त्यामुळे माझी दिवसभराची मरगळ पळून गेली आणि हो त्या रात्रीही वाघ पाहण्याची संधी मी आनंदाने हुकवली!

मला वाघ पाहायलाच मिळाला नाही असे नाही, पण इतर सर्व पर्यटकांना जेव्हा वाघ पाहायचा आहे म्हणून इतर कोणत्याही प्राण्यावर वेळ घालवायचा नव्हता तेव्हा मी इतर प्राणी पाहण्याचा आनंद उपभोगत होतो.

टेक पाच:
ताडोबातल्या एका वाघाचे नाव आहे स्कारफेस, इतर नर वाघांसोबत झालेल्या स्थानिक झटापटींमुळे त्याच्या चेह-यावर जे व्रण आहेत त्यामुळे त्याचे हे नाव पडले आहे; तो भारतील कोणत्याही जंगलांमधील मोठ्या नर वाघाच्या तोडीचा आहे, धिप्पाड...! तो ताडोबाच्या जंगलाचा खरा थलाईवा किंवा बॉस आहे!
आम्हाला सकाळच्या फेरफटक्यात त्याच्या मोठ्या पंजाच्या खुणा आढळल्या व तीन तास शोध घेतल्यानंतर व वाट पाहिल्यावर त्याची छायाचित्रे घेण्यासाठी त्याचा पाठलाग केला; जंगलात पाहण्यासारखे बरेच काही असते मात्र जंगलात वाघाचा पाठलाग करण्यासारखा थरार कशातच नाही, तो शब्दांपलिकडचा आहे. अथक प्रयत्नांनंतर जेव्हा तुम्हाला तो प्राणी दिसतो त्यानंतर आपण केवळ निःशब्द होतो एवढेच मी सांगू शकतो!

आता या टेकनंतर जंगलात भटकंती करणा-यांनी तुम्ही जिथे राहता त्याच्या आजूबाजूला कोणत्या गोष्टी आवर्जुन पाहायला पाहिजेत त्याविषयी बोलू! जंगलातला सकाळचा आणि संध्याकाळचा फेरफटका झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात पायी फिरण्याची माझी सवय आहे, त्यामुळे मला जंगलाच्या परिसरात राहणा-या गावक-यांच्या जीवनाची तुलना करता येते. कान्हातील खटिया व पेंचमधील तुरियाच्या विरुद्ध परिस्थिती ताडोबाच्या मोहर्लीमध्ये होती. जेव्हा मी अशाप्रकारे पायी फेरफटका मारायला निघतो तेव्हा ताजी हवा व हिरवाईचा सुंगध वातावरणात भरलेला असतो. मात्र मोहर्लीमध्ये शौचाचा व घाणीचा वास येत होता, कारण गावकरी जंगलातील रस्त्यांच्या कडेला प्रातर्विधी करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गावासाठी एक समुदाय केंद्र बांधण्यासाठी निधी दिल्याबद्दल एका स्थानिक नेत्याचे अभिनंदन करणारा फलक मोहर्लीत लावण्यात आला होता मात्र तिथे सार्वजनिक     शौचालयांसारखी जीवनाआवश्यक गोष्ट नव्हती; त्यामुळे गावकरी त्यासाठी रस्त्यांचा वापर करत होते. ताडोबात वाघ पाहायला मिळत असल्याने ते राष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांचे आकर्षण आहे व असे दृश्य नक्कीच अभिमानाची बाब नाही. प्रवेशद्वारापाशी असलेल्या वनविभागाच्या शौचालयांचीही दयनीय स्थिती आहे. वनविभाग त्यांच्या निधीतून किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गावासाठी नक्कीच काही चांगली शौचालये बांधू शकते. या बाबतीत काही मदत करणे ही पर्यटकांचीही जबाबदारी आहे. कान्हा व पेंच येथील जंगलांमध्ये तुम्हाला हॉटेलसारखी स्वच्छ व व्यवस्थित शौचालये दिसतात मात्र ताडोबा या बाबतीत मागे आहे. स्वच्छता व टापटिप या बाबतीत बरेच काही करण्याची गरज आहे. ताडोबातील गाईड जवळपास मुके व बहिरे आहेत येवढेच मला सांगावेसे वाटते! गाईड हा जंगल आणि पर्यंटकांमधला दुवा असतो मात्र इथे पर्यटकांना जंगलाचे बारकावे समजावून सांगण्याऐवजी दुर्दैवाने बहुतेक गाईड तंबाखू खाण्यात व चालकाशी गप्पा मारण्यात गुंग होते. अशा दृष्टीकोनामुळे पर्यटकाचे जंगलाशी नाते जोडले जात नाही व स्वाभाविकपणे मग वाघ दिसला नाही की ती सफर निराशाजक होते. मग सगळा दोष जंगलाला दिला जातो, ज्याची त्यात काहीच चूक नसते. ताडोबामध्ये बसलेला आणखी एक धक्का म्हणजे २५० मिमी पेक्षा अधिक रेंजची लेन्स असलेल्या कॅमे-यासाठी आकारले जाणारे शुल्क! अशा कॅमे-यासाठी ५०० रुपये आकारले जातात, म्हणजे जर जिप्सीमध्ये असे ४ कॅमेरे असतील तर तुम्हा एका सफरीमागे २००० रुपये द्यावे लागतात, ही रक्कम जिप्सीतून फेरफटका मारण्यापेक्षाही अधिक आहे! देशातल्या इतर कोणत्याही अभयारण्यात   कॅमे-यासाठी शुल्क आकारले जात नाही, ही अक्षरशः लूट आहे व वाघांमुळे प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्याच्या लोकप्रियतेचा चुकीचा फायदा घेणे आहे. यातील मूर्खपणाचा भाग म्हणजे तुम्ही जास्त रेंज असलेल्या लेन्स नाकारल्या तर पर्यटक कमी रेंजच्या कॅमे-याने प्राण्याचे छायाचित्र घेण्यासाठी त्याच्या अधिक जवळ जातील! आपल्या वन विभागाने अशा धोरणांचे तपशीलाने विश्लेषण करणे आवश्यक आहे व आपल्या अभायरण्यांची इतर राज्यातील अभयारण्यांशी तुलना केली पाहिजे व त्यांच्या चांगल्या धोरणांची अंमलबजावणी केली पाहिजे, ज्यामुळे पर्यटकांना समाधानकारक अनुभव मिळेल. मुख्य म्हणजे अभयारण्यांच्या वेळा, आरक्षण शुल्क इत्यादींसाठीची धोरणे संपूर्ण राज्यात सारखीच असली पाहिजेत म्हणजे पर्यटकांचा गोंधळ टाळता येईल.

मित्रांनो आपल्याला जंगलाने जे आनंदाचे क्षण दिले आहेत त्याबाबतची आपली जबाबदारी जंगलातून बाहेर पडल्यानंतर संपत नाही तर सुरु होते. आपण केवळ छायाचित्रे व वाघाच्या चित्तथरारक आठवणीच नाही तर जंगलाबाबतच्या जबाबदारीची जाणीव घरी घेऊन जायला पाहिजे.
आता शेवटच्या टेकमध्ये तुम्ही जंगलात नसला तरी तुम्ही काय करु शकता याचे वर्णन पाहा आणि माझ्यावर विश्वास ठेवा ते वाघ पाहण्यापेक्षाही कित्येक पटीने आनंददायक आहे!
टेक सिक्स:
पुण्यामध्ये, अनुज खरे यांची नेचर वॉक, संजीवनी डेव्ह व पुणे वनविभागाने मध्यप्रदेशातील पेंच अभयारण्यातील काही आदिवासी व वन विभागाच्या कर्मचा-यांना, पर्यटन व स्थानिक लोक एकमेकांसोबत कसे काम करु शकतात, या विषयावर पाहणी करण्यासाठी बोलावले होते. पेंचचे संचालक श्री. आलोक कुमार व मध्य प्रदेश वनविभागाचे पार्क गेम रेंजर श्री. तिवारी व पुणे वनविभागाचे सीसीएफ सुनील लिमये यांचा या कार्यक्रमात पुढाकार होता, याच हेतूने त्यांनी दांडेली अभयारण्याला भेट दिली होती व परत येताना आम्ही त्यांना पुण्याला आमंत्रित केले होते. आम्ही पुण्यातल्या वैशाली या प्रसिद्ध उपहारगृहात त्यांना जेवण व काही भेटवस्तू दिल्या. यामुळे ते आदिवासी लोक अतिशय खुश झाले कारण त्यातल्या कुणीच मोठे शहर पाहिले नव्हते, ते कधीच रेल्वेत बसले नव्हते किंवा मसाला डोसा म्हणजे काय असतो हे त्यांना माहिती नव्हते! आम्ही त्यांना काही विरंगुळ्याचे व आनंदाचे क्षण देऊ शकलो याचे समाधान वाटले कारण हीच माणसे आमच्यासाठी जंगलांचे संरक्षण करतात!
माणसाच्या अनेक कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे काम जंगले करतात व त्यांचे संरक्षण झाले नाही तर त्या कल्पना केवळ कल्पनाच राहतील व आपले आनंदाचे क्षण आपणच उध्वस्त केले म्हणून पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरणार नाही!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स