Wednesday 29 January 2014

कान्हा प्रगणना, जंगलातील वास्तव्य!


























मी लोकांना विचारते की हरिणाचे शीर भिंतीवर का लावता. त्यावर हरिण हा अतिशय सुंदर प्राणी असल्यामुळे असे करतो असे त्यांचे उत्तर असते. आता पाहा. मला माझी आई अतिशय सुंदर वाटते मात्र माझ्याकडे तिची छायाचित्रे आहेत…! एलेन डीजेनेरस.

एलेन डीजेनेरेस ही एक अमेरिकी विनोदवीर, दूरचित्रवाणी सूत्रधार व अभिनेत्री आहे. तिने तिच्या कामासाठी तेरा एमी अवॉर्डस व समाजसेवेच्या प्रयत्नांसाठी इतर अनेक पारितोषिके मिळविली आहेत. तिच्या दूरचित्रवाणीवरील कामासोबतच तिच्या अवतरणामधून प्राण्यांच्या संरक्षणाबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या तिच्या प्रयत्नांविषयी आपल्याला कल्पना येऊ शकते! खरं तरं  हा प्रश्नच आहे की वन संरक्षणाचे यश आपण कसे मोजू शकतो? तर जानेवारीच्या दुस-या आठवड्यामध्ये मला माझे मित्र श्री. जसबीर चौहान, जे कान्हा पार्कचे संचालक आहेत यांच्याकडून संदेश मिळाला की कान्हा राष्ट्रीय अभयारण्यामधील प्रगणनेसाठी मला काही दिवस काढता येतील का? मी म्हणालो, “नेकी और पूछ पूछ!” म्हणजे मला जंगलासाठी यापेक्षा दुसरी आणखी चांगली संधी कोणती मिळू शकली असती? मला प्रगणनेमध्ये काय मदत करता येईल याची खात्री नव्हती, मात्र तो एक अभूतपूर्व अनुभव असेल हे मला माहिती होते! आता प्रगणना म्हणजे काय हे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो की ज्याप्रमाणे आपण माणसांची जनगणना करतो त्याप्रमाणे प्राण्यांची व जैवविविधतेची प्रगणना केली जाते ! ही जंगलामधील वनस्पती, जीव व प्राण्यांविषयी माहिती गोळा करण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये प्रामुख्याने वाघांची संख्या मोजली जाते व ही चार वर्षातून एकदा केली जाते. ही सहा दिवसांची प्रक्रिया असते व जंगलातील सर्व कर्मचारी या कामात सहभागी असतात व वन्यजीव संरक्षणाचा थोडाफार अनुभव किंवा पार्श्वभूमी असलेल्या माझ्यासारख्या बाहेरील लोकांना वनविभाग त्यांना मदत करण्यासाठी बोलावतो!

सहा दिवसांच्या या प्रक्रियेमध्ये आम्हाला पहाटे ५.३० वाजता प्रत्येक सहभागीस नेमून दिलेल्या छावणीवर हजर राहावे लागे! मला सौफ छावणी देण्यात आली होती व विमानांच्या वेळापत्रकामुळे माझा प्रगणनेचा पहिला दिवस चुकला. मात्र रात्रभर प्रवास करुन केवळ २ तास झोपूनही मी पहाटे ५.३० वाजता प्रवेशद्वारापाशी आकाशातील प्रकाशमान चंद्राची छायाचित्रे घेत होतो! मी जंगलात शेकडोवेळा गेलोय मात्र ऐवढ्या पहाटे क्वचितच पोहोचलोय. काळ्याकुट्ट अंधारात जिप्सीच्या दिव्यात केवळ समोरचा रस्ता स्पष्टपणे दिसत होता, व त्यावर वाघाच्या ताज्या पाउलखुणा दिसत होत्या, मला चांगलीच भीती वाटली कारण मला याच रस्त्यावरुन चालत जायचे होते! अचानक ज्या जंगलावर माझे प्रेम आहे ते मला हॉस्पिटलच्या आयसीयूसारखे वाटू लागले होते ज्यात गेल्यावर तुम्हालाच आजारी असल्यासारखे वाटू लागते!  मी विचार करु लागलो की प्रगणनेमध्ये सहभागी होण्यासारखी जोखमी घेणे शहाणपणाचे होते का ? का यातून बाहेर पडण्यासाठी श्री.चौहान यांना काय कारण सांगावे ? त्याचवेळी मला दोन फॉरेस्ट गार्डस दिसले जे बहुतेक त्यांची ज्या छावणीवर नेमणूक झाली आहे तिथे कामासाठी चालले असावेत! त्या बिचारा-यांकडे एखादी विजेरीही नव्हती व माझ्यासारखा त्यांच्याकडे बाहेर जाण्याचा पर्यायही नव्हता! मी विचार केला की मी गेलो किंवा न गेलो तरीही असे सुरक्षा रक्षक दररोज या जंगलाचे रक्षण करण्यासाठी त्यांचा जीव धोक्यात घालत असतील ज्यावर माझे प्रेम आहे, मला ते आवडते असे मी म्हणतो! मी त्यांना केवळ काही दिवस मदत करण्याच्या जबाबदारीतून माघार घेतली तर मला काय नैतिक अधिकार उरेल, कि मला जंगल आवडते म्हणण्याचा ! त्या क्षणाला मी माझा संपूर्ण धीर एकवटला व सौफ छावणीच्या दिशेने निघालो!

तिथे उप रेंज अधिकारी श्री. धनगड व वन रक्षक अशोक झरिया दोन वन मजूरांसह माझी वाट पाहात होते. सौफ छावणी सौफच्या विस्तारलेल्या कुरणांदरम्यान वसली आहे जे आधी एक गाव होते. या कुरणांच्या बाहेरील सीमेलगत जंगलाचा रस्ता आहे व त्यामागील भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे व छावणीच्या मागील बाजूस नदी वाहते. ती भल्या पहाटेची वेळ होती व सगळीकडे दाट धुके होते.  पहिले तीन दिवस मांसभक्षक प्राण्यांच्या प्रामुख्याने वाघाच्या खुणा शोधायच्या होत्या.  आम्ही अग्नी रेषेपासून सुरुवात केली, जंगलातील या पट्ट्यातून झाडे झुडपे साफ केली जातात ज्यामुळे वणवा आजूबाजूच्या भागात पसरत नाही. अशा प्रकारच्या प्रगणनेमध्ये दररोज साधारणतः पंधरा किमी. पट्टा व्यापला जातो, त्यामध्ये त्या-त्या छावणीच्या कार्यक्षेत्रात येणारी अग्नी रेषा, नाले, मोठी नदी व पाऊलवाटांचा समावेश होतो, जेथून सर्वसामान्यपणे वाघ येणेजाणे करतात. वाघांचे पंजे मऊ असतात व म्हणूनच जंगलांच्या ज्या भागात झाडे-झुडुपे कमी असतील अशा मार्गांचा वापर करतात; अशा ठिकाणी कमी पालापाचोळा असल्यामुळे त्यावरुन चालताना फारसा आवाज येत नाही, त्यामुळे सावजाला वाघाच्या येण्याची चाहूल सहजपणे लागत नाही व पंजास ईजा पण होत नाही. प्रगणनेमध्ये या पट्ट्यांमधील वाघांच्या हालचालींच्या खुणा शोधायच्या होत्या उदाहरणार्थ वाघाच्या पंजाचे ठसे, वाघाची विष्ठा, अर्जुनासारख्या झाडावरील त्याच्या नखांच्या खुणा, शिकारीच्या शोधात एखाद्या ठिकाणी बसलेला असताना जमीनीवरील ओरखडे किंवा गवतावरील खुणा. नर किंवा मादी वाघास झाडावर खूण करायची सवय असते, याचे दोन हेतू असतात एक म्हणजे आपला प्रदेश निश्चित करणे व दुसरा म्हणजे नखांना धार देणे. झाडावरील नखांच्या खुणेच्या उंचीद्वारे तसेच पंजाच्या ठशांद्वारे तुम्ही वाघाच्या आकाराचेही अनुमान लावू शकता. विष्ठेचे किती विघटन झाले आहे यावरुन तिची अंदाजे वेळही नोंदवली जाते.

प्रगणनेदरम्यान आम्हाला ब-याचदा वाघाचे आवाजही ऐकू यायचे, एखादी मोठी डरकाळी असल्याशिवाय एखाद्या सामान्य व्यक्तिला हा आवाज सांबर हरिणाप्रमाणे वाटू शकेल, आम्ही असे आवाजही नोंदवले जे आमच्या आमच्या आजूबाजूला वाघाच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष पुरावा होता! एक मनोरंजक बाब म्हणजे वाघाच्या विष्ठेचा अभ्यास करताना त्यामध्ये जे केस आढळतात त्यातून त्याने कोणता प्राणी खाल्ला होता हे देखील आपल्याला दिसू शकते! एकदा आम्हाला वाघाच्या विष्ठेमध्ये सांबराचे खूर म्हणजेच नखाचा भाग दिसला. याशिवाय चित्ता व अस्वलाविषयीही अशाच प्रकारची माहिती आम्ही नोंदवत होतो. एका दिवसात चालत-चालत सुमारे १२-१५ किमीचा टप्पा पूर्ण करत होतो व प्रगणनेचे पहिले तीन दिवस असे सुरु होते. प्रगणनेच्या पाच दिवसात मी शिकलो की पायी चालत जाताना तुम्हाला क्वचितच वाघ दिसतो कारण माणसांना पाहून तो बुजतो व माणूस दिसताच दाट झाडीमध्ये नाहीसा होतो! जंगलामध्ये पायी फिरण्याची भीती हळूहळू कमी होत गेली व मोठ्या आतूरतेने दुस-या दिवसाची वाट पाहू लागलो!

शेवटते तीन दिवस संक्रमणाचे होते ज्यामध्ये आम्हाला चालत असताना दोन किमीवरील ठराविक रेषेवर दोन्ही बाजूने प्रत्येक प्राण्याची हालचाल नोंदवायची होती. येथे आम्हाला अगदी शांतपणे, लपून-छपून हालचाल करावी लागत होती ज्यामुळे प्राणी दूर जाणार नाहीत. आम्ही सांबर, चितळ, मोर, जंगली डुक्कर, भेकरा तसेच बारशिंगा पाहिला! आम्ही तीन तीनच्या गटाने कुरणांमध्ये तसेच दाट जंगलामध्ये सुरुवात करायचो. प्राण्याच्या प्रत्येक ठिकाणी जीपीएसने खूण केली जायची व त्यांची संख्याही नोंदवली जायची. त्यानंतर आम्हाला २०० मीटरच्या खांबापासून १५ मीटरच्या परिघातील प्राण्याची विष्ठा तपासायची होती ज्यामध्ये ससे, रानडुक्कर तसेच जंगली मांजरीचाही समावेश होता! प्राण्यांसोबतच झाडांचे, गवताचे तसेच झुडुपांचे प्रकार नोंदविण्यात आले. ही सर्व माहिती आम्ही संक्रमण रेषेवर दर २०० मीटरवर नोंदवत होतो. मला यामुळे कितीतरी झाडांची झुडपांची तसेच गवतांची सुद्धा नावे समजली व मी त्यांच्याकडे जास्त जाणीवपूर्वक पाहू लागलो जी परिस्थिती आधी नव्हती. आम्ही हे तीन दिवस दोन्ही संक्रमण रेषांवर करत होतो, कुरणे तसेच घनदाट झाडी असलेल्या जमीनीवर डाटा गोळा करत होतो. सर्व चमूंनी गोळा केलेली ही माहिती एकत्र केली जाईल व त्यानंतर कार्यालयातील कर्मचारी, वाघासारख्या प्राण्यांची तसेच झाडे व झुडुपांची अंदाजे संख्या तयार करतील.

मी मागे वळून जेव्हा या पाच दिवसांकडे पाहतो तेव्हा हे केवळ वाघांना मोजण्याचे काम नव्हते तर ते जंगल समजून घेणे होते व खरोखर वनविभागाचे लोक अतिशय थोडक्या संसाधनांमध्ये अतिशय मोठे काम करत आहेत! या छावण्यांमधील सुरक्षारक्षकांचा बाह्य जगाशी अक्षरशः काहीही संपर्क नसतो, वीज नाही, आधुनिक जगातील टीव्ही किंवा वर्तमानपत्रांसारख्या सुविधा तर नाहीतच! त्यांनी मला ओशाळत्या चेहऱ्याने बिन दुधाचा चहा दिल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला की त्यांना जंगलात दूधही मिळत नाही म्हणून कोराच चहा पितात येथे ! इथले जीवन लष्करासारखे खडतर आहे, त्यामुळे अशा छावण्यांमधील कामाचा कालावधी दोन वर्षांपेक्षा अधिक नसावा याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. सर्वात शेवटच्या स्तरातील कर्मचा-यांच्या आधुनिकीकरणाची, त्यांना किमान चांगली विजेरी, कपडे तसेच चांगले राहणीमान देण्याची वेळ आली आहे. आपण इथे उच्च क्षमतेचे इन्व्हर्टर (परिवर्तक) देण्याचा विचार करु शकतो जो प्रवेश द्वारापाशी असलेल्या मुख्य छावणीतून ठराविक काळाने प्रभारित करता येईल. चढण असलेल्या भागामध्ये चांगल्या प्रकारच्या सायकली गस्तीसाठी वापरता येऊ शकतात, तसेच कर्मचा-यांना चांगले सुरक्षा पादत्राणे देणे आवश्यक आहेत जे वजनाने हलके असतील व संरक्षकही असतील. कितीतरी गोष्टी करता येतील व प्रगणनेमध्ये या बाबींचीही दखल घेतली जावी. वरिष्ठ अधिका-यांनीही या छावण्यांमध्ये काही वेळा राहून तिथल्या कर्मचा-यांचे मनोधैर्य उंचावले पाहिजे. सरतेशेवटी हे लोक जंगलाचा अविभाज्य भाग आहेत व त्यांचे संरक्षण करणेही तितकेच महत्वाचे आहे!
सर्वात शेवटचे म्हणजे मी जंगलातून तिथे काम कसे सुरु आहे याविषयी माझ्या मुलाला एक संदेश लिहीला होता, हा संपूर्ण अनुभव मोजक्या शब्दात व  माझ्या भावना मुलांपर्यंत पोचविण्याचा तो एक प्रयत्न होता

प्रिय रोहित,
पहाटेचे ६ वाजलेत व आकाशात चंद्र लख्ख दिसतोय! आम्ही आज सूर्योदयापूर्वीच सुरुवात केली त्यावेळी सौफच्या कुरणावर धुक्याचे दाट आवरण होते, चितळ, सांबर, बारशिंगा व इतर अनेक प्राणी नुकतेच झोपेतून उठले होते! कमरेपर्यंत उंचीचे गवत ओले होते! साजाच्या झाडावर चित्रबलाक पक्षी अजूनही झोपेतच होते व अशा निरव शांततेत कुठेतरी आत घनदाट जंगलात एक वाघ डरकाळी फोडत होता! हा केवळ अनुभवण्याचा विषय आहे! मी आधी जंगले पाहिलेली नाहीत असे नाही मात्र यावेळी मी ते प्रत्यक्ष अनुभवत होतो व माझ्या आणि जंगलामध्ये कोणताही आडपडदा नव्हता व मी ते अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेत होतो; आपण जेव्हा शहरातील एखाद्या रस्त्यावरुन चालत जाताना प्रत्येक तपशील मनात साठवतो तसेच हे होते. तुला सांगू, आता मला जंगल आधीपेक्षाही जास्त आवडू लागले आहे!

नर बारशिंगा आमच्याकडे कसा कुतुहलाने पाहात होता हे मी अनुभवले आहे, बारशिंगा आमच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहात असताना आम्ही जेव्हा त्यांच्या अतिशय जवळ पोहोचलो तेव्हा तो कळप पळून गेला पण नर तसाच उभा होता ! वाघाच्या पंज्याचे ताजे ठसे पाहिल्यानंतर कसे वाटते हे आता मला माहिती आहे व वाघ केवळ काही पावले पुढे आहे हे मी सांगू शकतो, मात्र त्या परिस्थितीतही भीती वर मात करून तुम्हाला पुढे चालत राहावे लागते व आणखी खुणा शोधाव्या लागतात! जेव्हा आजूबाजूच्या झुडपातून वाघाची डरकाळी ऐकू येते मात्र तो दिसत नाही तेव्हा छातीत कसे धडधडते हे आता मला माहिती आहे; आपल्या पावलांना नदीच्या गोठवणा-या पाण्याचा स्पर्श कसा वाटतो हे आता मला माहिती आहे, असे असले तरीही सुरक्षा रक्षकांना त्यांचे काम करण्यासाठी दररोज दिवसंरात्र नदी ओलांडावी लागते! जंगलामधील घाणेरीच्या झुडुपांचा गंध आपल्या फुफ्फुसांमध्ये कसा भरुन राहतो व तिच्या फांद्यांमुळे शरीराच्या उघड्या भागावर कसे ओरखडे उठतात हे मी अनुभवले आहे. त्यामुळे होणारया वेदना केवळ खोलीत परतल्यावर अंघोळ करताना जाणवतात!

जीवनातील ऐषआराम मागे ठेवून जंगलाचे संरक्षण करताना अंधारात पाऊल ठेवण्यासाठी किती मोठे धैर्य हवे हे मला जाणवले आहे! मी आपल्या काँक्रिटच्या जंगलामध्ये परतल्यानंतरही या जंगलांचे संरक्षण करण्याची माझी जबाबदारी आहे हे मला समजले आहे!आता मी ख-या अर्थाने जंगलात जाऊन आलो आहे जंगल मला अधिक चांगल्या प्रकारे समजू लागले आहे असे म्हणू शकतो!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com


संजीवनी डेव्हलपर्स

Tuesday 28 January 2014

पाहिजे एक स्थापत्य अभियंता, रिअल ईस्टेटची गरज !



















जो कसे शिकायचे आहे व बदलायचे आहे हे शिकला आहे त्यालाच ख-या अर्थाने शिक्षित म्हणता येईलकार्ल रॉजर्स

कार्ल रॅनसम रॉजर्स हा एक अतिशय प्रभावी अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता व मानसशास्त्राच्या मानववादी दृष्टिकोनाच्या जनकांपैकी एक होता. ही अशी महान माणसे अतिशय किचकट गुंतागुंतीच्या संकल्पना किती साध्या व सोप्या पद्धतीने समजावून सांगतात हे पाहता मला त्यांच्याविषयी आदर वाटतो. इथे कार्लने शिक्षण व त्याचे आपल्या जीवनातील स्थान काय आहे याची व्याख्या केली आहे! मी अलिकडेच स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या सदस्यांपैकी एक होतो, त्यावेळी शिक्षण व अध्ययनाविषयी मला हे शब्द आठवले. ब-याच जणांना नेहमीप्रमाणे प्रश्न पडेल, याचा आपल्या मुख्य विषयाशी काय संबंध आहे तो म्हणजे रिअल इस्टेट किंवा बांधकाम उद्योग. त्यासाठी आपल्याला उद्योगाच्या सध्याच्या स्थितीवर एक नजर टाकायला हवी.
बांधकाम उद्योग हा देशात सर्वाधिक रोजगार निर्माण करणा-या उद्योगांपैकी एक आहे व आपल्या सारख्या विकसनशील देशात पायाभूत सुविधा निर्माण करणारा उद्योग आहे. मग घरांचे बांधकाम असो किंवा रस्ते, धरणे किंवा कारखाने बांधायचे असोत आपल्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ व यांत्रिक बळ लागते. त्याशिवाय या लोकांवर यंत्रांवर देखरेख करण्यासाठी आपल्या प्रशिक्षित किंवा तांत्रिकदृष्ट्या कुशल लोक लागतात. या संदर्भातील चित्र कसे आहे? एका बाजूला आपल्याकडे शेकडो अभियांत्रिकी तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालये आहेत ज्यांच्या जागा रिक्त आहेत व दुसरीकडे उद्योगामध्ये तांत्रिकदृष्ट्या पात्र मनुष्यबळाचा नेहमीच तुटवडा जाणवतो!

शिक्षण क्षेत्र हा देखील एक व्यवसायच झाला आहे, त्याने बांधकाम उद्योगाची गरज जाणून घेऊन त्यानुसार त्यांचे उत्पादन म्हणजेच कुशल पात्र अभियंते तयार करण्याची वेळ आता आली आहे! पदविका अभ्याक्रमाची रचना करण्यासाठीच्या बैठकीमध्ये बांधकाम उद्योगातील तसेच शिक्षण क्षेत्रातील लोक सहभागी होते व आपण अभ्यासक्रमामध्ये नेमके कोणते बदल करायला हवेत म्हणजे त्यातून तयार झालेल्या अभियंत्यांचा उद्योगाला खरोखर उपयोग होऊ शकेल या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली. महाविद्यालयातून नुकत्याच बाहेर पडलेल्या व्यक्तिस मग ती कितीही चांगली असली तरी बांधकामाच्या ठिकाणची कामाची सर्व तंत्रे माहिती असतील अशी अपेक्षा कुणीच करत नाही. हे काम प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणीच शिकावे लागते मात्र तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित व्यक्तिकडून किमान अपेक्षा असते की बांधकामाच्या ठिकाणी या गोष्टी शिकण्यासाठी त्याला कमीत कमी वेळ लागेल. कुठेतरी बांधकाम उद्योगाच्या तरुण अभियंत्यांकडून असलेल्या अपेक्षा व त्यांचे उत्पादन यातील दरी वाढत चालली आहे व त्यामुळे लोक नवीन उमेदवारांना घ्यायला कचरतात; जे शिक्षण क्षेत्रासाठी निश्चितच चांगले लक्षण नाही! जर कुणीच नव्या उमेदवारांना घ्यायला तयार नसेल तर मग त्यांना चांगला अनुभव कसा मिळेल? तसेच अनुभव वर्षांमध्ये मोजता येत नाही, खरा अनुभव म्हणजे तुम्ही जे शिकता व चांगले परिणाम दाखविण्यासाठी त्याचा प्रत्यक्ष वापर करता! माझ्यासाठी अनुभव म्हणजे बदल स्वीकारणे व आपले काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तो वापरणे ज्याचा फायदा सरतेशेवटी उत्पादनाला होईल!
इथे स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम तयार करण्यामध्ये बांधकाम उद्योगातील व्यवसायिकांची भूमिका महत्वाची ठरते. उद्योगातील तज्ञांनी महाविद्यालयातून नुकत्याच बाहेर पडणा-या तरुणांच्या दृष्टिकोनाविषयी चिंता व्यक्त केली. त्यांची नव्या संकल्पना स्वीकारण्याची तयारी नसते तसेच हातातील काम किंवा त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडताना ते स्वतःचे डोके वापरत नाहीत. सध्याचे बहुतेक स्थापत्य अभियंते यंत्रमानवाप्रमाणे आहेत जे केवळ आदेशांचे पालन करतात व कोणतेही विश्लेषण न करता ते अमलात आणतात. मी आधीच नमूद केल्याप्रमाणे बांधकाम उद्योगामध्ये अजूनही काँक्रिटीकरण, प्लास्टरिंग, टाईल्स बसविणे व इतर ब-याच कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वापरले जाते. या सर्व कामांचा दर्जा नियंत्रित करण्यासाठी मानवी देखरेख अतिशय आवश्यक आहे. इथे पर्यवेक्षक किंवा आपण त्याला अभियंता म्हणू शकतो, त्याच्यावर मोठी जबाबदारी असते कारण बांधकामाच्या परिस्थितीशी जुळवून घेत त्याला त्याची वैयक्तिक कौशल्ये वापरायची असतात. याला ज्ञानाचा वापर करणे असे म्हणतात व इथे हे तरुण अभियंते अतिशय कमी पडतात व यातील खरी समस्या त्यांच्या दृष्टिकोनाची आहे त्याच्या पदवीची किंवा ज्ञानाची नाही.

दुसरी मोठी समस्या म्हणजे संवाद कौशल्ये, केवळ तांत्रिकदृष्ट्या पात्र असल्याने तुम्ही यशस्वी अभियंता होणार नाही, चांगले काम करुन दाखविण्यासाठी तुम्हाला केवळ वरिष्ठांनाच नाही तर तुमच्या हाताखाली काम करणा-या चमूलाही तुम्हाला पटवून देता आले पाहिजे. यासाठी व्यक्तिने चर्चेसाठी नेहमी तयार राहिले पाहिजे, त्याला किंवा तिला त्यांच्या संकल्पनांविषयी जे वाटते ते समजावून सांगण्यासाठी त्यांच्याकडे तार्किक बैठक हवी, व त्याविषयी आत्मविश्वास वाटला पाहिजे. केवळ तांत्रिकदृष्ट्या अचूक असून चालणार नाही तुम्हाला स्वतःच्या क्षमतेविषयी पटवून देता आले नाही तर तुम्हाला लवकरच नैराश्य येईल. या पैलुविषयीदेखील चर्चा झाली व इतर अभियंत्यांशी संवाद साधण्याचा दृष्टिकोन रुजविण्याची अतिशय गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

नव्या अभियंत्यांविषयीची आणखी एक समस्या मांडण्यात आली, ती म्हणजे ज्ञानाचा तार्किक वापर. ब-याच जणांच्या लक्षात येत नाही की इमारत किंवा रस्ता किंवा एखादा प्रकल्प बांधताना, माणसे व यंत्रे काम करत असताना ब-याच गोष्टी अनपेक्षितपणे होतात. उदाहरणार्थ काँक्रिटीकरण सुरु असताना अचानक पावसाला सुरुवात होते; त्यावेळी जो प्रभारी अभियंता असेल त्याला तर्कसंगत विचार करुन त्या परिस्थितीत योग्य तो प्रतिसाद द्यावा लागतो, तिथे केवळ पुस्तकी ज्ञानाचा उपयोग होत नाही. अशा परिस्थितीत काम थांबवणे ही कुणाही सामान्य व्यक्तिची प्रतिक्रिया असेल, मात्र पावसासाठी तयार राहणे व दर्जाशी तडजोड न करता काम सुरु ठेवणे हे अभियंत्याकडून अपेक्षित आहे! पुस्तकांमध्ये शिकलेले नक्कीच महत्वाचे आहे मात्र ते कट-पेस्ट केल्यासारखे वापरता येणार नाही. त्यासाठी विचार करावा लागेल व पुस्तकांमधून शिकलेल्यापैकी काय घेता येईल व परिस्थितीच्या गरजेनुसार बांधकामच्या ठिकाणी वापरता येईल यालाच तर्कशुद्ध विचार म्हणतात! दुर्दैवाने आजच्या पिढीविषयीची सर्वात मोठी चिंता आहे की ती तर्काचा वापर करत नाही. यासाठी कुठेतरी गुणांवर आधारित शिक्षण पद्धती जबाबदार आहे हे सगळ्यांनीच मान्य केले. कारण विद्यार्थ्याच्या मेंदूला केवळ उत्तरे पाठ करायची व प्रश्न विचारल्यानंतर ती द्यायची सवय झालेली असते व त्या उत्तरांमागील तर्क ग्रहण करण्यात तो अपयशी ठरतो.

त्यानंतर येते नेतृत्व कौशल्य, अभियंत्यांमध्ये तांत्रिक ज्ञानासोबतच नेतृत्व कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. एक अभियंता बांधकाम स्थळाच्या राजासारखा असतो व त्याने त्याचे स्थान लक्षात घेणे आवश्यक आहे व ते त्याच्या वर्तनातून दिसून आले पाहिजे. त्यासाठी त्याच्या कॉलेजच्या दिवसांपासून त्याला प्रशिक्षण दिले पाहिजे, कारण एखाद्या ठिकाणी प्रभारी असणे याचा संबंध केवळ पदाशी नाही तर जीवनशैलीशी आहे जी तुम्हाला स्वीकारावी लागते व त्या पदासोबत  येणा-या जबाबदा-या समजून घ्याव्या लागतात!

आणखीन एक दुर्लक्षित घटक म्हणजे प्रामाणिकपणा व हातातील कामाशी एकनिष्ठता; कामावर न कळविताच रजा घेणे किंवा थोड्याशा पगारवाढीसाठी नोकरी बदलणे ही आजकालच्या अभियंत्यांचा कल कसा असतो याची उदाहरणे आहेत. त्यामुळे कामाचे अतोनात नुकसान होते तसेच जर एखाद्या चमुचा प्रमुख असलेला अभियंता अचानक सोडून गेल्यास संपूर्ण चमूचे खच्चीकरण होते. अधिक चांगल्या भविष्याची अपेक्षा करण्यात काहीच चूक नाही मात्र त्याच वेळी आपल्या हातातील काम पूर्ण करण्याची आपली जबाबदारी समजून घेणेही तितकेच महत्वाचे आहे. अधिक चांगले भविष्य म्हणजे अधिक चांगला पगार असे होत नाही; किंबहुना विविध प्रकारच्या कामांचा अनुभव तसेच जबाबदा-या हाताळायला मिळणे यातून ते घडू शकते. तरुण पिढीने हे समजून घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या शैक्षणिक दिवसातच एक चांगला अभियंता चांगला माणूसही असणे आवश्यक आहे ज्याच्यावर केवळ त्याच्या कामाचीच नाही तर त्याच्या आजूबाजूच्या लोकांचीही जबाबदारी आहे हे त्याच्या मनात रुजवणे आवश्यक आहे!

सर्वात शेवटचा व अतिशय महत्वाचा घटक आहे पर्यावरण! मी एक अतिशय चांगले अवतरण वाचले होते ज्यात म्हटले होतेआपण आज जर पुरेशा चांगल्या शाळा बांधल्या तर आपल्याला भविष्यात फारसे तुरुंग उभारावे लागणार नाहीत”! हे अवतरण कुणाचे आहे आठवत नसले तरीही सध्याच्या परिस्थितीत त्याचा विचार केल्यास असे म्हणावे लागेल की आपण शाळांमध्ये पर्यावरणाविषयी योग्य ती शिकवण दिली तर आपल्याला पर्यावरणविषयक (हरित) लवादांवर एवढा खर्च करावा लागणार नाही! अगदी पाचव्या इयत्तेपासून पर्यावरणशास्त्र हा विषय आहे व स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये त्याचा सविस्तर समावेश करण्यात आला आहे, याच क्षेत्रामध्ये विशेष पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. मात्र मला असे वाटते की कुठेतरी तरुण मनांमध्ये पर्यावरण ही संकल्पना रुजवण्यात आपण अपयशी ठरतोय. या विषयाचा अभ्यास केवळ काही शाखांपुरताच मर्यादित नसावा तर माहिती तंत्रज्ञान तसेच संगणक शास्त्राच्या अभ्यासात त्याचा समावेश केला जावा. पर्यावरणाचे संरक्षण हे केवळ काही विशेष शाखेच्या पदवी धारकांचे काम नाही तर ती प्रत्येक व्यक्तिची जबाबदारी आहे. हेच निसर्ग व जैवविविधतेलाही लागू होते; किती विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक कालावधीत जंगलांना भेट दिली आहे व त्यांनी दिली असल्यास या भेटींमधून ते काय शिकले? या पृथ्वीवर केवळ आपणच नाही तर अनेक प्रजाती आहेत व आजूबाजूच्या जैवविविधतेमुळेच जीवन सुंदर आहे हे तरुण पिढीला शिकवले पाहिजे, याशिवाय पर्यावरण शास्त्र दुसरे काय असू शकते? या विषयाचा अभ्यास म्हणजे लाजाळू सारखी लहानशी वनस्पती असो, फुलपाखरे तसेच पक्ष्यांच्या विविध प्रजाती असोत किंवा वाघासारखा प्राणी असो, आपल्या भोवतालच्या परिसराविषयी किंवा पर्यावरणाविषयी जाणून घेणे! शैक्षणिक व्यवस्थेने विद्यार्थ्यांना अधिक संवेदनशील, एक चांगली व्यक्ती बनवले पाहिजे, केवळ पैसे कमावणारे यंत्र नाही व त्यासाठी त्यांची निसर्गाशी मैत्री घडवणे आवश्यक आहे. एकदा तुम्ही निसर्गाला वाचायला लागल्यावर, समजून घ्यायला लागल्यावर तुम्ही स्वार्थी होऊच शकत नाही कारण निसर्गामध्ये सगळे काही गरजेवर आधारित असते हव्यासावर नाही! केवळ मनुष्यप्राणी सोडला तर जीवनाचे हे मर्म बाकी सर्व प्रजातींना समजते.

बांधकाम उद्योगाला चांगल्या अभियंत्यांची गरज आहे व ते एका दिवसात तयार होत नाहीत, तरुणांमधून चांगले अनुभवी अभियंते घडवण्यासाठी त्यांच्यावर मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी उद्योगातील लोकांनी शिक्षण क्षेत्राला त्यांच्या कौशल्याचे योगदान दिले पाहिजे, जे दुर्दैवाने होताना दिसत नाही. त्यासोबत शैक्षणिक संस्थांनीही नव्या संकल्पना स्वीकारल्या पाहिजेत व ज्या उद्योगासाठी त्या अभियंते तयार करत आहेत त्याची नस ओळखली पाहिजे. विशेषतः रिअल इस्टेट क्षेत्रास कुशल लोक केवळ पर्यवेक्षक म्हणून नाही तर या क्षेत्राचे नेतृत्व करण्यासाठी, उद्योजक म्हणूनही हवे आहेत, कारण हेच लोक देशातील लाखो गरजू लोकांसाठी घरे उभारणार आहेत. जर ते एक चांगला अभियंता असतील तर ते काहीही चांगलेच उभारतील व अधिकाधिक लोकांनी या क्षेत्रात यायला हवे जे त्यांनी केलेल्या बांधकामाची जबाबदारी घेतील, रिअल इस्टेट उद्योगालाही यापेक्षा आणखी काय वेगळे हवे आहे!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स



Wednesday 15 January 2014

लाजाळूचे रोप व पर्यावरणविषयक परवानगी!
























 “हा तुमचा देश आहे. तुमच्या मुलांसाठी व तुमच्या मुलांच्या मुलांसाठी हे नैसर्गिक चमत्कार, नैसर्गिक स्रोत, इतिहास व रोमांचक कथा एक पवित्र परंपरा म्हणून जतन करा. स्वार्थी किंवा लोभी लोकांना तुमच्या देशाचे सौंदर्य, समृद्धता किंवा रोमांचक कथा हिरावू देऊ नका.”…थिओडोर रुझवेल्ट

थिओडोर "टी.आर." रुझवेल्ट, ज्युनिअर हे अमेरिकेचे २६ वे अध्यक्ष होते. ते त्यांचे उत्साही व्यक्तिमत्व, विविध गोष्टींमधील स्वारस्य व कामगिरी व पुरोगामी चळवळीच्या नेतृत्वासाठी ओळखले जात. त्यांच्या या कामगिरीशिवाय अगदी एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीसारख्या काळातही पर्यावरणाविषयीच्या त्यांच्या जागरुकतेमधून पृथ्वीच्या भवितव्याविषयी विशेषतः जैवविविधतेच्या आघाडीवर त्यांची दूरदृष्टी दिसून येते! त्यांनी अमेरिकेबाबत जे म्हटले होते ते आज प्रत्येक देशाच्या बाबतीत विशेषतः आपल्यासारख्या सुंदर, समृद्ध सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा असलेल्या देशांच्याबाबतीत जास्त योग्य आहे. आपण मात्र विकासाच्या नावाखाली व हव्यासामुळे निर्माण झालेल्या गरजांसाठी अशा उपदेशांकडेच नाही तर निसर्गाच्या इशा-याकडे सुद्धा दुर्लक्ष केले आहे!
अलिकडेच  वृत्तमानपत्रात पुणे शहरात एक  प्रकारचे रोप नामशेष होत चालल्याची रोपांप्रमाणेच लहानशी बातमी होती, ती लाजाळूच्या झाडाविषयी होती. आपल्यापैकी चाळीशीमध्ये असलेल्या बहुतेकांच्या या झाडाविषयी लहानपणातल्या अतिशय सुंदर आठवणी आहेत, आम्ही लाजाळूच्या झाडाच्या पानांना बोटांनी स्पर्श करुन पानांची प्रतिक्रिया पाहून रोमांचित व्हायचो! स्पर्शामुळे त्याची पाने मिटायची. लाजाळू झाडाच्या वैशिष्ट्यामुळेच ही अतिशय दुर्मिळ व महत्वाची प्रजाती आहे व निसर्गाचा एक चमत्कारच आहे. म्हणूनच मराठीमध्ये त्याला लाजाळू असे नाव देण्यात आले आहे व त्याच्या वैशिष्ट्यांनी अनेक कविंनाही प्रेरणा दिलेली आहे! वर उल्लेख केलेल्या बातमीमध्ये अशी माहिती देण्यात आली होती की मानवी गरजांसाठी जमीनीचा अतिवापर करण्यात आल्याने लाजाळूची झाडे उगवायची अशा जागा नष्ट झाल्या आहेत त्यामुळे पुणे शहरात लाजाळूची फारशी झाडेच उरलेली नाहीत. त्याबरोबरच पूर्वी रस्त्याच्या कडेला किंवा उघड्या जमीनीच्या कोणत्याही कोप-यात किंवा शहरात सगळीकडे विपुल प्रमाणात आढळणारी झुडुपे ,जशी तेरडा, झेंडू यांचे प्रमाणही कमी होत चालले आहे. नेहमीप्रमाणे ब-याच जणांनी ती लहानशी बातमी पाहिलीही नसेल कारण देशाच्या राजकारणाच्या आघाडीवर कितीतरी रोचक घडामोडी सुरु आहेत, त्यामुळे शहरातून लाजाळूचे झाड नामशेष होत चालले आहे यासारख्या बाबींकडे कोण लक्ष देणार व त्याच्याशी आपला काय संबंध! मात्र लहानपणी लाजाळूच्या झाडाला स्पर्श केलेल्या किंवा रस्त्याच्या कडेला उगवलेल्या शेकडो फुलांभोवती फुलपाखरे उडतांना पाहिलेल्या माझ्यासारख्या मंडळींना आज आपण कशाला मुकत आहोत हे नक्की जाणवेल! आपला विकास हे अनेकांसाठी वरदान आहे मात्र त्याचवेळी अशा सर्व प्रजातींसाठी शाप आहे व ते त्यांना होणा-या त्रासाविषयी बोलूही शकत नाहीत!

आणखी एक बातमी अलिकडे पहिल्या पानावर झळकत होती ती म्हणजे माननीय पर्यावरण व वन मंत्र्यांनी राजीनामा दिला, आता बरेच म्हणतील त्यांनी देशातील अनेक प्रकल्पांना पर्यावरणविषयक परवानगी न दिल्यामुळे त्यांना राजीनामा देणे भागच होते. यामागील कारणे काहीही असोत मात्र आता पर्यावरणविषयक परवानगी हा अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांसाठी परवलीचा शब्द झाला आहे. याविषयाशी संबधित नसलेल्या लोकांच्या माहितीसाठी सांगतो की ज्या प्रकल्पांमध्ये बांधकाम क्षेत्राची क्षमता दोन लाख चौरस फुटापेक्षा अधिक आहे त्यांच्यासाठी ईसी म्हणजे एनव्हारनमेंट क्लीअरन्स म्हणजेच पर्यावरणविषयक परवानगी आवश्यक असते म्हणजे सोप्या भाषेमध्ये पर्यावरण व वन मंत्रालयाकडून, ज्यासाठी दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या पातळीवर एमओईएफ असे नाव प्रचलित आहे, त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवावे लागते. रिअल ईस्टेट साठीच्या  इतर कोणत्याही धोरणप्रमाणे याचाही हेतू चांगलाच होता, मात्र नेहमीप्रमाणे त्यासाठी कोणत्याही पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आधीच एनओसीच्या ओझ्याने दबलेल्या या उद्योगासमोर आणखी एक अडथळा निर्माण झाला आहे. मी एक बांधकाम व्यवसायिक म्हणून बोलत नाही तर एक सामान्य माणूस म्हणून बोलत आहे, जो आजूबाजूची परिस्थिती पाहतोय व त्यामागचा तर्क त्याला समजत नाही! कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचा किंवा विकासाचा पर्यावरणावर काय परिणाम होईल याचे विश्लेषण होणे आवश्यक आहे याबाबत काहीही दुमत नाही मात्र हे कोणत्या पातळीवर व्हावे व त्यासाठी किती वेळ लागावा हे देखील निश्चित करणे आवश्यक आहे. किंबहुना आपण जेव्हा मुंबई, पुणे, बंगलोर या महानगरांविषयी बोलतो तेव्हा आपण त्यांच्या विकास योजना आधीच बनवलेल्या आहेत ज्यामध्ये भविष्यात वाढ, लोकसंख्या, कोणत्या कारणासाठी किती जमीन वापरली जाईल म्हणजेच निवासी, औद्योगिक, कृषी किंवा व्यवसायिक कारणाने यासारख्या सर्व तपशीलांचा समावेश आहे. त्याशिवाय पायाभूत सुविधांच्या गरजा निश्चित करण्यात आल्या आहेत व त्यासाठी तरतुदी रस्ते, बागा, मैदाने यांच्या स्वरुपात जागा आरक्षित ठेवून तरतूद करण्यात आली आहे. असे असताना जर कुणी नियोजित वापरासाठी किंवा हेतूने विकास करत असेल तर मग केंद्राकडून पर्यावरणविषयक परवानगी घेण्याची काय गरज आहे? थेट शहरांच्या विकास योजना किंवा प्रादेशिक विकास योजनांसाठीच एमओईएफकडून ईसी का घेतला जाऊ नये? विकास योजनेमध्ये जमीनीचा जो वापर दाखविण्यात आला आहे त्यामध्ये काही बदल करण्यात आल्यास त्यामुळे पर्यावरणावर परिणाम होईल असे एखादी व्यक्ती म्हणू शकते व अशा प्रकरणी मूल्यमापन करणे आवश्यक ठरेल.
एखाद्याने ईसी मिळवण्याचे मान्य केले तरी त्यासाठीच्या प्रक्रियेला अनेक वर्ष लागायची व ती प्रक्रिया अतिशय थकवणारी होती कारण संपूर्ण महाराष्ट्रासाठी केवळ एकाच समितीपुढे सुनावणी चालायची. समितीविषयी पूर्णपणे आदर राखून मला असे सांगावेसे वाटते की त्यांच्या प्रश्नावलीचे कोणताही प्रमाणभूत स्वरुप नाही. सध्याही संपूर्ण राज्यासाठी अशा केवळ दोन समित्या आहेत! त्याशिवाय समितीला केवळ हरकती घेण्याऐवजी प्रकल्पाच्या मूळ नियोजनामध्ये कोणत्या सुधारणा करता येतील याविषयी सूचना देता आल्या पाहिजेत, जे सध्यातरी होताना दिसत नाही. त्यानंतर हरकती पर्यावरणाच्या संवर्धनासंबंधी असल्या पाहिजेत व आजूबाजूच्या पायाभूत सुविधांबाबतच्या सूचनांच्या स्वरुपात असू नयेत, जी प्रत्यक्षात स्थानिक प्रशासकीय मंडळाची जबाबदारी आहे. उदा. प्रकल्पामध्ये जाण्या-येण्याच्या रस्त्याची रुंदी किती आहे व आजूबाजूला एखादी शाळा आहे का व प्रकल्पाच्या आजूबाजूच्या सांडपाण्याच्या वाहिनीच्या जाळ्याची परिस्थिती कशी आहे व पाण्याची व्यवस्था काय आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. जेव्हा कोणताही नवीन प्रकल्प मोकळ्या जमीनीवर उभारला जाणार असतो तेव्हा त्यासाठी या पायाभूत सुविधा आवश्यक असतात मात्र ही स्थानिक सरकारची जबाबदारी नाही का, कारण ते त्यासाठी सर्व प्रकारचे कर व विकास शुल्क आकारते व या सगळ्या बाबींचा विचार करुनच शहराच्या विकास योजना बनविल्या जातात. असे असताना जैवविविधतेचे संवर्धन, आजूबाजूचा निसर्ग तसेच नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा वापर यासारख्या महत्वाच्या पर्यावरणविषयक मुद्यांऐवजी इतर मुद्दे उपस्थिती करण्यात काय अर्थ आहे

हे ईसी मिळण्यासाठी लागणारा वेळ हा एक मुख्य अडथळा आहे; सध्याच्या कामकाजानुसार त्साठी दीड ते दोन वर्षे लागतात व कोणत्याही उद्योगासाठी हा मोठा ताण आहे. आधीच कुणालाही जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज मिळत नाही व ईसी असल्याशिवाय तुम्ही प्रकल्प सुरु करु शकत नाही, त्यामुळे या कालावधीत गुंतवणुकीतून कोणताही फायदा मिळत नाही मात्र दुसरीकडे व्याज वाढतच असते. यामुळे अंतिम उत्पादनाच्या किमतीवर परिणाम होतो, जसा वेळ वाढत जाईल तशी ती वाढते व हे पैसे ग्राहकाच्या खिशातूनच जातात, आता हा राष्ट्रीय अपव्ययच नाही का!  सरकार एकीकडे स्वस्त घरांकरिता विकसकांना आवाहन करत असते किंबहुना ते घरांचे दर वाढवत असल्याचा आरोप करत असते व दुसरीकडे किमती कमी करण्यातील अशा छुप्या अडथळ्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करते. पर्यावरणविषयक परवानगीसाठी प्रत्येक जिल्ह्यात किंवा किमान जेथे वेगाने विकास होतोय त्या प्रत्येक महानगरामध्ये एक समिती का असू नये? एमओईएफ स्थानिक प्रशासकीय संस्थांना पर्यावरणविषयक प्रमाणभूत नियमांचे पालन करुन ईसी देण्यासाठी नियुक्त का करु शकत नाही, ज्यामुळे केवळ अपवादात्मक प्रकरणांमध्येच दिल्लीस जावे लागेल? सध्याच्या मूल्यमापन समित्या ज्या दिरंगाईने काम करतात त्यावर काही नियंत्रण का नाही? कितीतरी प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे, एखाद्या कायद्याचा जाच होऊ लागल्यावर लोक त्यातल्या पळवाटा शोधू लागतात हे सत्य आहे.
कुणीही ईसीच्या किंवा कोणत्याही पर्यावरणविषयक कायद्याविरुद्ध नाही मात्र कायद्याच्या ज्याप्रकारे अंमलबजावणी होत आहे त्यास आक्षेप आहे, त्यामध्येच समस्या आहे! त्याचवेळी सामान्य माणसाचीच नाही तर विकासकांची तसेच या यंत्रणेचा भाग असलेल्या अधिका-यांची पर्यावरणविषयक जागरुकता वाढवणे आवश्यक आहे. त्यांना पर्यावरण संवर्धन म्हणजे केवळ काही अर्ज भरुन व अनेक आराखडे सादर करुन एखाद्या विभागाकडून एनओसी मिळवणे नसून त्याचा नेमका अर्थ समजला पाहिजे!

ईसी मिळविण्यासारख्या यंत्रणांचे आता विश्लेषण करणे व त्यांची पर्यावरण संवर्धनासंबंधीच्या प्रत्यक्ष गरजांशी तसेच सामान्य माणसाच्या गरजांशी सांगड घालणे आवश्यक आहे, ज्याला परवडणारे साधे घर हवे आहे. असे झाले नाही तर प्रकल्पांसाठी ईसी घेण्याची प्रक्रिया सुरु राहील, सामान्य माणसासाठी घरांचे दर वाढत राहतील आणि आपल्यासारखा सुशिक्षित वर्ग या प्रक्रियेमध्ये स्वतःचाच नाश केल्याबद्दल एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत राहतील, पण त्याचवेळी लाजाळूसारख्या प्रजाती शहरातील क्राँक्रिटच्या जंगलांमध्ये नामशेष होत जातील!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स


Wednesday 8 January 2014

पाहिजे, "एक नेता" रिअल इस्टेट उद्योगाला !




















खरा नेता तोच असतो ज्याला मार्ग माहिती असतो, जो मार्गक्रमण करतो व मार्गदर्शन करतो... जॉन सी. मॅक्सवेल

मॅक्सवेल हे एक लेखक, वक्ता व प्रवचनकार आहेत ज्यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहीली आहेत, ज्यांचा मुख्य भर नेतृत्वावर आहे. त्यांनी किती सोप्या पद्धतीने व थोडक्यात नेतृत्वाची व्याख्या केली आहे! कोणताही खेळ, व्यवसाय किंवा उद्योगासाठी आपल्याला एक नेतृत्व हवे असते जो आपला आदर्श ठरु शकेल, जो आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने त्या व्यवसायाचा चेहरा होईल. लोकांना त्याला पाहायला, त्याची नक्कल करायला व त्याचा खेळ खेळायला किंवा त्या विशिष्ट क्षेत्रात जायला आवडेल. आपणही एक दिवस आपल्या हिरोसारखे होऊ असा विचार ते करतील जो प्रत्यक्षात त्या क्षेत्राचे नेतृत्व करत असेल! जसे आपल्याकडे क्रिकेटमध्ये तेंडुलकर आहे, उद्योग क्षेत्रात रतन टाटा; आयटी क्षेत्रात नारायण मूर्ती/अझीम प्रेमजी, विज्ञान क्षेत्रात एपीजे अब्दुल कलाम, चित्रपटात अमिताभ बच्चन, शास्त्रीय संगीतात उस्ताद झाकीर हुसेन आहेत, अशा प्रकारे ही यादी वाढतच जाते ज्यामध्ये देशभरातील अनेक व्यवसायांचा समावेश आहे. जेव्हा पहिली पिढी त्यांच्या निवृत्तीच्या टप्प्यात होती तेव्हा दुसरी पिढी प्रत्येक क्षेत्रातील नेतृत्वाची पोकळी भरुन काढण्यासाठी तयार होती. आता सचिन निवृत्त झाला आहे तर क्रिकेटमध्ये एमएस धोनी आहेच, उद्योग क्षेत्रासाठी कुमारमंगलम बिर्ला, सुनील भारती मित्तल आहेतच, अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रात ही यादी न संपणारी आहे; मात्र त्याला दोन अपवाद आहेत ते म्हणजे राजकारण व रिअल इस्टेट हे सांगायची गरज नाही! यापैकी राजकारण हा कधीच माझा विषय नव्हता त्यामुळे मी केवळ रिअल इस्टेटविषयी बोलणार आहे. अलिकडेच, पुण्यातील रिअल इस्टेट उद्योगाचा सर्वोत्तम समीक्षक असणा-या माझा मित्र रवी याने मला फोन केला व एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाच्या  काही ग्राहकांच्या असंतुष्टेबाबत विचारले व त्यानंतर रिअल इस्टेटचे नेतृत्व कोण करते आणि  या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर कोण आहे याकडे चर्चेचा ओघ वळला. त्या बांधकाम व्यावसायिकाच्या ग्राहकांच्या अडचणींबाबतच्या चर्चेने आमचे संभाषण संपले, मात्र तो विषय माझ्या डोक्यात घोळत राहिला.

आपण जेव्हा एखाद्या व्यक्तिस एखाद्या क्षेत्राचा नेता म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ केवळ आर्थिकदृष्ट्या यशस्वी किंवा परिणाम दाखविणारा असा होत नाही. उदाहरणार्थ आपण जेव्हा सचिन तेंडुलकर भारतीय क्रिकेटचे नेतृत्व करतो असे म्हणतो तेव्हा त्याने किती शतके केली व किती चेंडूत केली, किंवा तो किती कसोटी सामने खेळला याचाच विचार केला जात नाही तर त्याने खेळाचे प्रतिनिधित्व कशाप्रकारे केले व आपल्या सामाजिक प्रतिमेशी त्याचे संतुलन कसे राखले याचाही विचार केला जाईल! त्याने मैदानावरील व मैदानाबाहेरील स्वतःच्या वर्तनाने खेळाला एक उत्तुंग पातळी गाठून दिली आहे, ज्याचा फायदा संपूर्ण खेळाला झाला आहे. श्री. बच्चन यांनी अशीच भूमिका चित्रपटांमध्ये तर श्री. रतन टाटा यांनी विविध उत्पादन उद्योगांमध्ये पार पाडली आहे. टाटांपूर्वी उद्योजकांकडे केवळ पैसे कमावणारे व जनसामान्यांना प्रवेश नसलेल्या हस्तिदंती महालांमध्ये राहणारे लोक अशा नजरेने पाहिले जायचे. मात्र टाटांनी त्यांचा नफा, समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी वापरुन ही प्रतिमा बदलली. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना कोणत्याही सरकारी नियमाद्वारे असे करण्याची सक्ती करण्यात आली नव्हती! त्यांनी स्वतःहून हे केले त्यामुळे कोणत्याही चांगल्या व्यवसायिक संस्कृतीला टाटा संस्कृती असे म्हणतात! या लोकांनी जे काही केले त्यातून पैसे किंवा प्रसिद्धी मिळवली नाही असे नाही, त्यांनी ती कमाईदेखील केली मात्र त्यासोबतच त्यांनी जो आदर मिळवला त्यामुळे सर्व वर्गातील समाजाने त्यांना त्यांच्या क्षेत्रातील नेतृत्व बहाल केले! माझ्या मते कोणत्याही व्यवसाला चांगली कामगिरी करावीच लागते व ते महत्वाचे देखील आहे मात्र त्याचवेळी त्याला व्यवसायास नव्या उंचीवर न्यावे लागते व त्यास प्रतिष्ठा मिळवून द्यावी लागते. एका नेत्याला त्या व्यवसायाचा चेहरा व्हावे लागते व त्या क्षेत्रातील तरुण पिढीला व्यवसायात येण्याची प्रेरणा द्यावी लागते व त्यांचा आदर्श व्हावे लागते!   एखाद्या व्यवसायातील नेता समाजातून केवळ स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण व्यवसायासाठी आदर मिळवतो; थोडक्यात त्या व्यवसायाचा तो प्रतिनिधी होतो! इथे तुम्ही त्या नेत्याला केवळ पैसा किंवा प्रसिद्धीच्या निकषांमध्ये बसवू शकत नाही तर त्यामध्ये अनेक पैलुंचा विचार करावा लागतो. माझ्यासाठी तो केवळ एक यशस्वी नेता म्हणूनच नाही तर एक चांगली व्यक्ती म्हणून समाजाच्या सर्व घटकांकडून जो आदर मिळवतो हे अधिक महत्वाचे आहे, जो स्वतःच्या वर्तनाने लोकांना त्या व्यवसायाचा आदर करायला लावतो; तोच खरा नेता असतो!

आता या आघाडीवर रिअल इस्टेटतील चित्र कसे आहे ते पाहू; रिअल इस्टेट उद्योगामध्ये मोठे व यशस्वी बांधकाम व्यवसायिक किंवा विकासक नाहीत असे नाही. अनेक जण स्वतःचे वर्णन करताना त्यांनी किती दशलक्ष चौरस फूट क्षेत्रावर बांधकाम केले आहे, कशा टाऊनशिप्स वा, अत्यंत आरामदायक प्रकल्प बांधले आहेत हे सांगतील, प्रत्येक महानगरामध्ये आपल्याकडे सर्वोच्च स्थानाचे किमान दहा दावेकरी तरी असतील; अनेक कंपन्यांची संपूर्ण देशात कार्यालये आहेत व दिल्ली, बंगलोर व मुंबईसारख्या शहरांमध्ये त्यांचे प्रकल्प सुरु आहेत! मात्र आपण किमान एक तरी नाव असे घेऊ शकतो का ज्याने उद्योगाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे किंवा जे नाव घेतल्यानंतर सामान्य माणूस म्हणेल की, बांधकाम व्यवसायिक असावा तर असा!” किंवा रिअल इस्टेटमध्ये एक तरी असा उद्योग समूह आहे का ज्याने व्यवहार प्रक्रियेमध्ये स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला आहे की ग्राहकांनी इतर विकासकांना त्यांचे अनुकरण करण्याचा सल्ला द्यावा किंवा तसे करण्याची अपेक्षा करावी? क्रिकेटमध्ये येणा-या प्रत्येक नव्या खेळाडूला सचिन तेंडुलकरने ज्याप्रमाणे इतिहासात आपले नाव कोरले आहे तशी कामगिरी करावीशी वाटते, मात्र रिअल इस्टेट उद्योगात असा एखादा आदर्श आहे का ज्याचे अनुकरण तरुण पिढी करु शकेल, एक दिवस लोकांनी आपल्यालाही अशाच प्रकारे ओळखावे अशी आशा करु शकेल! व्यवसायातील अनेक जण माझ्याशी सहमत होणार नाहीत कारण असे अनेक मोठे व्यवसायिक आहेत ज्यांनी चांगली कामगिरी करुन दाखविली आहे व त्यांच्याकडे आश्वासने पूर्ण करण्याची पार्श्वभूमी आहे व काही समूह जवळपास तीन पिढ्या या व्यवसायामध्ये आहेत. मात्र ऐवढेच पुरेसे आहे का? आपण रिअल इस्टेट उद्योगाच्या नेतृत्वाविषयी बोलत आहोत व एक क्षणभर विचार केला तर जाणवेल की आपली स्थिती राजकारणासारखीच आहे, ज्यामध्ये स्थानिक नेते व राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत व देश त्यांच्याद्वारे चालविला जात आहे, मात्र आपण केवळ एक नाव असे घेऊ शकतो का ज्याचे अनुकरण करता येईल किंवा इतर नेत्यांनी त्यांचे नैतिकता, चारित्र्य व आचरण या आधारावर अनुकरण करावे? रिअल इस्टेटमध्येही अशीच परिस्थिती आहे, उद्योगाची भरभराट होतेय, लोक पैसे कमावताहेत व लोकांनाही त्यांची घरे मिळताहेत व जमीनीच्या मालकांना पैसे मिळताहेत. त्याप्रमाणे मोठ्या मनुष्यबळाला रोजगार मिळतोय व रिअल इस्टेट सर्वाधिक उलाढाल असलेल्या उद्योगांपैकी एक आहे व राज्य तसेच केंद्र सरकारांना विविध करांद्वारे मोठ्या प्रमाणावर महसूल मिळवून देणारा उद्योगही आहे , पण हे सर्व कोणा एका नेत्याशिवाय सुरु आहे हे पण तितकेच सत्य आहे.

किंबहुना रिअल इस्टेट उद्योगामध्ये जेवढे मोठे नाव तेवढेच ते अधिक काळवंडलेले असते असाच भूतकाळातील व वर्तमानकाळातील अनुभव आहे! याची अनेक कारणे आहेत, जमीन अधिग्रहणापासून ते विविध सरकारी संस्थांकडून परवानग्या मिळण्यापर्यंत तसेच तथाकथित काळ्या पैशाबाबत, रिअल इस्टेट उद्योगाला अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते, सामान्य माणसासाठी या उद्योगाची प्रतिमा नेहमी मलीन असण्यामागे हे एक कारण आहे. सामान्य माणसाला विशेषतः मोठ्या शहरांमध्ये जमीनीचा तुकडा खरेदी करुन स्वतः त्यावर घर बांधणे अशक्य आहे या तथ्यातूनच विकासक ही संकल्पना तयार झाली आहे! ही संपूर्ण प्रक्रियाच एवढी अवघड तसेच खर्चिक झाली आहे की कोणत्याही व्यक्तिने जमीनीचा तुकडा खरेदी करुन, एखादा चांगला कंत्राटदार नियुक्त करुन, स्वतःच्या गरजांनुसार स्वतःचे घर बांधून घेण्याचे दिवस आता संपले आहेत. बांधकाम व्यवसायिक होण्यासाठी तुमच्याकडे दोन एम असणे हा निकष आहे एक एमम्हणजे  “मनी”, जमीन खरेदी करण्यासाठी पैसा व दुसराएमम्हणजे  “मसल पॉवर”, म्हणजेच त्या जमीनीवर प्रकल्प उभारण्यासाठी तेथील अडथळे हटवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे बळ! या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दर्जा, ग्राहकांची काळजी, आश्वासने या सर्व बाबी नंतर येतात किंवा अनेक बाबतीत संपूर्ण प्रक्रियेमध्ये लागूच होत नाहीत.

नेतृत्व नसल्यामुळे रिअल इस्टेट किंवा शहर विकासाबाबत योग्य ती धोरणे तयार करण्यासारख्या मूलभूत गोष्टींवर अतिशय वाईट परिणाम झाला आहे. रिअल इस्टेट बाबतची सरकारी धोरणे (काही असल्यास) सातत्याने बदलत असतात, ज्यामुळे विकासकास व पर्यायाने ग्राहकास नेहमी समस्या येतात. इतर कोणत्याही उद्योगामध्ये धोरण तयार करण्यापूर्वी सर्वसामान्यपणे त्या विशिष्ट उद्योगातील नेत्यांशी त्याची चर्चा केली जाते, त्या धोरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाबींचा विचार केला जातो, उद्योगाच्या नेत्यांच्या सूचना विचारात घेतल्या जातात व त्यानंतरच धोरण निश्चित केले जाते. रिअल इस्टेट उद्योगामध्ये केंद्रीय किंवा राज्य पातळीवर अशा प्रकारचे कोणतेही नेतृत्व नसल्याने असे कोणतेही पाऊल उचलले जात नाही व एफएसआयपासून ते इमारतींच्या उंचींपर्यंतची सर्व धोरणे अशा लोकांद्वारे बनविली जातात ज्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही इमारत बांधलेली नाही व ती त्यांच्या मतानुसार बनविली जातात! या व्यक्ती अकार्यक्षम आहेत असे नाही मात्र या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणा-यांचे मत विचारात घेणे आवश्यक आहे व याठिकाणी नेत्याची भूमिका अतिशय महत्वाची आहे कारण तो त्याचे नेतृत्व, त्याचा प्रभाव संपूर्ण उद्योगाच्या हितासाठी वापरु शकतो व रिअल इस्टेट उद्योगात आज नेमका याचाच अभाव आहे! किंबहुना उद्योगातील सर्वोच्च व्यक्तिंवर स्वतःच्या फायद्यासाठी धोरणे बनविण्याचा आरोप होत आहे व यामध्ये सामान्य माणसाच्या हिताकडे दुर्लक्ष केले जाते ज्याला स्वतःचे घर हवे आहे.

केवळ सरकारी धोरणांसाठी किंवा उद्योगामध्ये नव्याने प्रवेश केलेल्यांसाठीच नेतृत्व हवे आहे असे नाही. आज रिअल इस्टेट मनुष्यबळासाठी सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे ज्यामध्ये अकुशल कामगारांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यामध्ये मजुरीची शेकडो कामे, लहान कंत्राटदार व पुरवठादारांचाही समावेश होतो. ते व त्यांचे कुटुंब या उद्योगावर अवलंबून आहेत, एक चांगले नेतृत्व अशा लोकांना चांगल्या लोकांकडे काम करता येईल याची खात्री करेल, ज्या लोकांना अशा कष्टकरी लोकांनी या उद्योगासाठी केलेल्या प्रयत्नांचे मोल जाणवेल. घर ही माणसाची अतिशय मूलभूत व महत्वाची गरज आहे, मग ते शहरी भागातील असो किंवा ग्रामीण भागातील. ही गरज पूर्ण करणा-या उद्योगाला मात्र नेतृत्वच नाही हे सत्य आहे. आपल्याला इतिहास सांगतो की कोणत्याही राज्याची भरभराट एक जाणता राजा असल्याशिवाय होत नाही, त्यामुळे आता रिअल इस्टेटमधील वरिष्ठांनी नेतृत्वाच्या या समस्येचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे व त्यासाठी त्यांनी नेतृत्वाचा खरा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे! एक चांगले नेतृत्व असलेला उद्योग समूह त्यांच्या कामाशी निगडित प्रत्येक घटकाची काळजी घेतो. तो एका वटवृक्षाप्रमाणे असतो, जो जसा जसा वाढत जातो तसा त्याच्याकडे येणा-या प्रत्येकाला छाया तसेच फळे देतो! परिणामी समाज त्या संपूर्ण उद्योगाकडे आदराने पाहतो व रिअल इस्टेटमध्ये सध्या याचाच अभाव आहे, एका वटवृक्षाप्रमाणे दूरदृष्टी व दृष्टिकोन असलेले नेतृत्व या उद्योगाला हवे आहे! या सर्व गोष्टींमुळे केवळ ग्राहक किंवा घर घेणाराच नाही तर संपूर्ण समाज बांधकाम व्यवसायिकांना पैसे कमावण्याचे यंत्र समजतो, ज्यांना काहीही सामाजिक बांधिलकी नाही किंवा व्यवसाय करतांना ते कोणत्याही नैतिक मूल्यांचे पालन करत नाहीत.

रिअल इस्टेट उद्योगामध्ये काम करणे म्हणजे केवळ जमीनीचा विकास करुन पैसे कमावणे नाही तर त्या भिंती उभारणा-या हातांविषयी दृढ आदर निर्माण करणे आवश्यक आहे! त्याचवेळी समाजाने तसेच माध्यमांनी बांधकाम व्यवसायिकांबाबता दृष्टिकोन बदलणे व चांगल्या लोकांचे व त्यांनी या उद्योगासाठी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करायला हवे. कारण या गोष्टी एका वटवृक्षाच्या रोपट्याला खत-पाणी घालतील व त्यातूनच रिअल इस्टेट उद्योगाचे नेतृत्व निर्माण होईल!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स