Sunday 6 July 2014

गॉडफादर एक विचारधारा !

















प्रत्येक माणूस स्वतःची हाव मोजतो.” …मारिओ पुझो.
माझ्या एका चांगल्या मैत्रिणीने अलिकडेच मारिओ पुझो यांची अत्यंत लोकप्रिय कादंबरी द गॉडफादर वाचली व त्याविषयीचे तिचे मत व्यक्त केले. मी स्वतःही गॉडफादर या व्यक्तिरेखेचा निस्सीम चाहता आहे, व त्याविषयीच्या चर्चेत माझे विचारचक्र सुरु झाले. मी गेल्या तीस वर्षात किमान पंधरावेळा तरी ही कादंबरी वाचली असेन. मी आता अशा पातळीवर पोहोचलो आहे की मी त्या व्यक्तिरेखेचा चाहता आहे, अनुयायी नाही असे म्हणू शकतो! मी आता एखाद्या व्यक्तिरेखेचा चाहता असणे व तिचा अनुयायी होणे यातील फरक सांगू शकतो. या व्यक्तिरेखेचा माझ्यावर मोठा प्रभाव होता व माझ्या कामाच्या अनेक आघाड्यांवर त्याचे प्रतिबिंब दिसून आले, कारण गॉडफादरला त्याच्या स्वाभिमानाइतके प्राणप्रिय काहीही नसते! माझ्या या विचारमंथनातील काही विचार आपल्यासमोर सादर करत आहे...

द गॉडफादर!
हे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो एक परिपक्व, शहाणा, काळजी घेणारा मात्र तितकाच निष्ठूर, हिशेबी माणूस, ज्याला सर्वकाही त्याच्या नियंत्रणात ठेवायला आवडते! तो देवाला भीत असल्याचे दाखवतो मात्र त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांसाठी स्वतः देव बनण्याचा प्रयत्न करतो. ख्रिस्ती धर्मामध्ये गॉडफादर म्हणजे बाप्तिस्म्याच्या वेळी ज्या व्यक्तिच्या नावावर बाळाचे नाव ठेवले जाते व जो आयुष्यभर तुमची काळजी घेतो. मात्र हा शब्द गुन्हेगारी टोळ्यांच्या प्रमुखांनी चुकीच्या अर्थाने घेतला, कारण या मुखवट्याच्या आधारे सामान्य माणसाची सहानुभूती मिळू शकते.

मी वयाच्या तेराव्या वर्षी ही कादंबरी वाचली, अशाप्रकारचे वाचन करण्यासाठी ते कदाचित चुकीचे वयही असेल! कारण कोणतेही तत्वज्ञान तिच्या दोन्ही बाजू समजून न घेता स्वीकारणे धोकादायकच असते, विशेषतः "जगातील प्रत्येक वस्तू ,विकली जाऊ शकते, तुम्हाला फक्त तिची किंमत माहिती असली पाहिजे" यासारखे! एकदा तुम्हाला विक्रीची किंमत समजली की, "मी त्याला असा प्रस्ताव देईन की तो फेटाळू शकणार नाही"! जगात टिकण्यासाठी हा तर्क अतिशय चांगला असला तरी प्रत्येक व्यवहाराच्या दोन बाजू असतात हे तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणूनच प्रत्येक प्रस्तावाचा शेवटही दोन प्रकारे होतो. तुम्ही जेव्हा म्हणता की प्रत्येक गोष्टीची किंमत असते त्याचा अर्थ होतो की तुम्ही ती वस्तू खरेदी करण्यासाठी कितीही किंमत मोजायला तयार आहात! तुम्ही जेव्हा म्हणता की मी त्याला असा प्रस्ताव देईन की तो फेटाळू शकणार नाही, याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्याकडे जे काही आहे ते किंवा जे नाही तेही द्यायला तयार आहात! मात्र तुम्ही जो प्रस्ताव दिला आहे ते त्याला मिळेल याची तुम्ही खात्री करता. एखादे मूलच काय तर किती प्रौढांना या व्यवहारातील किंवा प्रस्तावातील खरा धोका समजेल हा माझा प्रश्न आहे! गॉडफादरचा प्रस्ताव हा दुस-या व्यक्तिसाठी धोका नाही तर एकप्रकारे त्याच्यासाठीच धोका आहे, कारण त्याला हवा असलेला व्यवहार करण्यासाठी तो कोणत्याही पातळीवर जाऊ शकतो किंवा जाईल.
तो सर्वांची काळजी घेतो व प्रेमळ आहे मात्र त्याच्या अगदी जिवलगांपैकी कुणाला मारायची वेळ येते तेव्हा, शरीराचा सडलेला भाग काढून टाकणे आवश्यक असते या शब्दात त्याचे समर्थन करतो! मात्र एखादा भाग सडला आहे व किती सडला आहे हे तोच ठरविणार! जर आपल्यापैकी प्रत्येकानेच गॉडफादर बनण्याचा प्रयत्न केला तर अंधाधुंदी माजेल; कारण शेवटी सर्वात शक्तिशाली व निष्ठूरच राज्य करेल.
गॉडफादर आपली सर्व वाईट कामे सामान्य माणसासाठी शांततेच्या नावाखाली खपविण्याएवढा हुशारही आहे. जगातील प्रत्येक राज्यकर्त्याने लाखो लोकांचा जीव घेणा-या युद्धांचे समर्थन करतानाही असाच युक्तिवाद करतात नाही का? मात्र हेच गॉडफादर या व्यक्तिरेखेचे यश आहे कारण तो बहुतेक पुरुषांच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतो. मी जाणीवपूर्वक पुरुष म्हटले आहे, कारण स्त्रियांना गॉडफादर ही व्यक्तिरेखा कधीच फारशी आवडली नाही. निसर्गतःच पुरुष व स्त्रियांमध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक तसेच जीवनाविषयीच्या दृष्टीकोनात फरक असतो. एकीकडे प्रत्येक पुरुषाला गॉडफादर व्हायला आवडेल, मात्र स्त्रियांना ती कल्पना फारशी आवडणार नाही, प्रत्यक्ष तसे होणे ही तर फार दूरची गोष्ट! एक स्त्री पुरुषाहूनही निष्ठूर होऊ शकते मात्र एखाद्या विशिष्ट कारणाने किंवा हेतूने. माझे वैयक्तिक मत आहे की जगावर अधिराज्य करायचे म्हणून कोणतीही स्त्री निसर्गतःच निष्ठूर नसते व इतिहासानेही माझे म्हणणे योग्य ठरवले आहे. एखाद्या स्त्रिला प्रत्येक पुरुषावर राज्य करायला आवडेल मात्र तिचे मार्ग वेगळे असतील व ते निश्चितच गॉडफादरसारखे नसतील, मग त्याला त्या स्त्रिचे शहाणपण म्हणा किंवा मूर्खपणा! प्रत्येक नियमाला अपवाद असतातच मात्र आपण सर्वसाधारण वर्गाविषयी बोलत आहोत.
गॉडफादर एकीकडे काळजी घेणारा व प्रेमळ असल्याने त्याचा दरारा असलेल्यांना तो परमेश्वराहूनही मोठा वाटतो. तो ज्यांना आपले मानतो त्यांचे रक्षण करण्यासाठी तो कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकतो, मात्र त्याच्या मनात कुठेतरी या मदतीचा जमाखर्च मांडला जात असतो. हिंदीमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहेभगवान के घर देर है अंधेर नही म्हणजेच देवाकडे उशीर झाला तरी न्याय नक्की मिळतो. गॉडफादरकडे न्याय आहे मात्र त्यासाठी किंमतही मोजावी लागते; एखाद्याला ती अनेक वर्षांनी द्यावी लागते किंवा एखाद्याला ती द्यावीही लागणार नाही मात्र किंमत नक्की असते. काहीही मोफत मिळत नाही, गॉडफादरसारख्या माणसासाठी जिथे प्रत्येक गोष्टीची किंमत आहे तिथे त्याच्या सेवा फुकट कशा मिळतील! असे असूनही अनेकांना ज्या व्यवस्थेत ते राहतात तिच्यापेक्षा गॉडफादर प्रिय आहे, याचे कारण म्हणजे व्यवस्था सामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहे!  गॉडफादरच्या व्यक्तिरेखेला जवळपास पन्नास वर्षे झाली आहेत मात्र दुर्दैवाने आपण गॉडफादरच्या यशातून काहीही धडा घेतलेला नाही, संपूर्ण समाजाला रक्षण करण्यासाठी व न्याय देण्यासाठी एका गॉडफादरची गरज लागते हे आपले अपयशच आहे. गॉडफादर हा शब्द इतका प्रचलित झाला आहे की राजकारण, उद्योग, बॉलिवुड अशा सर्व क्षेत्रांमध्ये तो सर्रासपणे वापरला जातो. अनेक यशस्वी लोक मान्य करतात की ते त्यांच्या गॉडफादरमुळे त्या पदावर आहेत! त्यांना कदाचित गॉडफादर या शब्दाचा अर्थही माहिती नसेल मात्र गर्भित अर्थ तोच असतो. आपला आपल्या क्षमतांवरील व व्यवस्थेवरील विश्वास नष्ट होत चालला आहे, नैसर्गिक न्यायासारखी काही गोष्ट अस्तित्वात असते यावर आपला विश्वास नाही, म्हणूनच आपल्याला यशासाठी गॉडफादर लागतो. खरे पाहता गॉडफादरचा कुणीही गॉडफादर नव्हता, त्याने स्वतःसाठीची संधी हेरली व तो गॉडफादर झाला. गॉडफादरचे गुण अंगी बाणवता येत नाहीत ते उपजत असावे लागतात, जेव्हा संधी दिसते तेव्हा ते गुण दिसू लागतात. गुण अंगी बाणवून गॉडफादरसारखे धूर्त, निष्ठूर, हिशेबी होता येत नाही; ते जन्मजातच असावे लागतात. जगण्यासाठी ही तत्वे स्वीकारल्यानंतर तुमचा दृष्टीकोनच तुमच्या जीवनाचे तत्वज्ञान होते.

 अर्थात गॉडफादर त्याच्या व्यवसायाचे प्रशासन ज्याप्रकारे चालवतो त्याचे कौतुक केले पाहिजे. त्याचा व्यवस्थेवर व स्वतःचा व्यवसाय समजून घेण्यावर गाढ विश्वास आहे, प्रत्यक्षात त्याचा व्यवसाय गुन्हेगारी आहे. आश्वासनांचे महत्व तो जाणतो व ती पाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. त्याला माहिती आहे की तुम्ही स्वतःची आश्वासने पाळली नाही तर तुमच्या ग्राहकाच्या तसेच तुमच्या भोवताली असलेल्या सर्वांच्या मनातून उतरता, यामध्ये कर्मचारी, विक्रेते,  ज्यांच्याशी व्यवहार करावा लागतो ते व्यवस्थेतील अधिकारी, किंवा अगदी तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या सामान्य माणसाचा समावेश होतो. गॉडफादर आश्वासन देण्यापूर्वी दोनदा विचार करतो व एकदा आश्वासन दिल्यानंतर ते पाळतो!
 त्याच्या व्यक्तिरेखेचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे त्याचा व्यवसाय गुन्हेगारी आहे मात्र तरीही तो बरोबर व चूक किंवा मी तर म्हणेन की चूक व आणखी चूक यातील अत्यल्प फरक जाणतो! तो अंमली पदार्थांचा प्रचंड नफा असलेला धंदा संपूर्ण तरुण पिढी व्यसनी होईल असे सामाजिक कारण देत नाकारतो; मात्र तसे केल्यास त्या मुलांच्या पालकांच्या मनातील त्याची गॉडफादरची प्रतिमा डागाळेल हे त्यामागचे खरे कारण असते. मला असे वाटते की धोके समजून घेऊन, पैशांची अधिक हाव न करण्याचे शहाणपण व धैर्य त्याच्यात आहे. मी व्यवसायात अनेक महारथी पाहिले आहेत जे त्यांच्या हव्यासापोटी सपशेल अपयशी ठरले व अधिक नफा मिळविण्याच्या नादात चांगल्या चाललेल्या व्यवसायाचा नाश केला! उद्योगात यशस्वी ठरलेल्या व चांगली प्रतिमा असलेल्या कोणत्याही व्यवसायिकाचे यामुळे नक्कीच डोळे उघडतील. फार कमी लोकांना स्वतःच्या क्षमतांची व मर्यादांची जाणीव असते! लोकांशी चांगले संबंध ठेवणे, त्याची सेवा करणा-यांचा आठवणीने व योग्यवेळी आदर-सत्कार करणे, या एका गुणामुळे गॉडफादर लोकांसाठी विशेष ठरतो.

ही व्यक्तिरेखा व तिचा पैसे कमावण्याचा मार्ग याविषयी वादविवाद करताना माझ्या एका चांगल्या मित्राने मला अनेक वर्षांपूर्वी एक प्रश्न विचारला होता, एक चोर अतिशय श्रीमंत आहे, त्याने चोरीकरुन मोठी मालमत्ता जमवली आहे; तो मूळचा ज्या गावचा आहे तिथे रुग्णालयाची नितांत गरज आहे. त्याने आपले नाव दिले जावे वगैरेसारखी कोणतीही अपेक्षा न ठेवता, रुग्णालयासाठी आवश्यक असलेला निधी देण्याची जबाबदारी स्वीकारली तर गावकरी त्याची मदत स्वीकारतील का? मी आजपर्यंत या प्रश्नाचे ठोस उत्तर देऊ शकलो नाही, कारण गावासाठी रुग्णालय आवश्यक आहेच, मात्र लोकांना लुटून मिळालेल्या पैशातून ते उभारले जावे का? तर दुस-या बाजूने विचार केल्यास लुटून मिळालेल्या पैशातून रुग्णालय उभारले तर ते सत्कारणी लागणार नाहीत का! गॉडफादरचे तत्वज्ञान स्वीकारताना आपणही अशाच पेचात पडतो.

यासंदर्भातील आणखी एक रोचक किस्सा म्हणजे कादंबरीवरील आधारित प्रसिद्ध चित्रपटात गॉडफादरची व्यक्तिरेखा साकारणा-या मार्लन ब्रँडो यांनी त्या भूमिकेसाठी मिळालेला ऑस्कर पुरस्कार नाकारला, कारण त्यांना गुन्ह्याचे उदात्तिकरण करायचे नव्हते! माझ्या मित्राने चोर व मंदिराविषयी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणेच ब्रँडोने केले ते चूक किंवा बरोबर हे मला सांगता येणार नाही, तरी त्या कृतीतून गॉडफादर हा परिपूर्ण नव्हता हेच सूचित होतेl!

कोणत्याही सुदृढ समाजाला गॉडफादरची गरज नसते. किंबहुना अशी पात्रे असल्यास सुसंस्कृत माणसे म्हणून आपण अपयशी ठरल्याचे ते प्रतीक आहे. व्यक्तिने स्वतःच्या प्रतिभेवर विश्वास ठेवला पाहिजे, त्यास ओळखले पाहिजे व त्याचा आदर केला पाहिजे. तोपर्यंत असे गॉडफादर तयार होतच राहतील जे आपापल्या क्षेत्रात यशस्वी असतील व आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सत्ता गाजवतील, आणि आपल्याला जाणीवही होणार नाही की आपल्यावर त्यांची सत्ता आहे!


संजय देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स





No comments:

Post a Comment