Tuesday 23 September 2014

एका मताची किंमत !
























मत न देणारा माणूस म्हणजे  स्वत:चे सुरक्षाकवच गमावणारा.” ...लिंडन जॉन्सन.

लिंडन बेन्स जॉन्सन, ज्यांना एलबीजे असे म्हटले जायचे अमेरिकेचे छत्तिसावे अध्यक्ष होते. मला पुण्याचे माननीय जिल्हाधिकारी श्री. सौरभ राव यांच्या कार्यालयातून एसव्हीईईपीच्या बैठकीसाठी संपर्क करण्यात आला तेव्हा माझ्या मनात अमेरिकी अध्यक्षांचे वरील अवतरण आले.  एसव्हीईईपी म्हणजेच मतदारांचे पद्धतशीर प्रशिक्षण व मतदारांचा सहभाग, यासारखी एखादी समिती असते हे मला माहितीच नव्हते! मला जेव्हा या समितीच्या बैठकीसाठी बोलवण्यात आले तेव्हा मी थोडासा गोंधळात पडलो, ही समिती कशासाठी आहे अशी शंका निर्माण झाली, मात्र कामात व्यस्त असल्यामुळे मला या बैठकीला जाता आले नाही, मी माझ्यावतीने उपस्थित राहण्यासाठी माझ्या सहका-यास पाठवले. त्याने मला त्या बैठकीचा जो वृत्तांत दिला तो अतिशय रोचक होता, माननीय जिल्हाधिका-यांनी समाजातील बहुतेक वर्गांसाठी अशा बैठका आयोजित केल्या होत्या व त्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त लोकांना संपर्क करुन, सर्व प्रकारची साधने वापरुन मतदानाविषयी जागरुकता निर्माण करण्याचे आव्हान केले. आम्ही लोकसभा निवडणुकीदरम्यान आमचे सर्व ग्राहक, पुरवठादार/कंत्राटदारांना त्यांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे असे पत्र पाठवले होते व त्या प्रयत्नाचे भरपूर चांगले कौतुक झाले; त्याचप्रमाणे यावेळीही सर्वांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा माननीय जिल्हाधिका-यांनी व्यक्त केली. खरेतर प्रौढ सुशिक्षित लोकांना मतदानासारख्या मूलभूत गोष्टीसाठी आग्रह करावा लागतो ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे! मात्र एक समाज म्हणून आपण तसेच आहोत, आपण एक व्यक्ती म्हणून अतिशय चांगले असू व आपापल्या क्षेत्रात किंवा व्यवसायात यशस्वी असू मात्र संघटितपणे एक समाज म्हणून आपण फारच निष्क्रिय आहोत!
यावेळी लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्याला सामान्य माणसाच्या दृष्टिकोनात अनेक वर्षात मोठा बदल दिसून आला. सुशिक्षित लोक कुणाचाही सत्ता आली तरी काय फरक पडतो असे म्हणून मतदानाकडे पाठ फिरवत असत, मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुटी न घेता रांगेत उभे राहून त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला! आपल्याला त्याचा परिणाम किमान सत्ता बदलातून तरी दिसून आला; हा काही राजकीय स्तंभ नाही व मी कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता नाही, मात्र आपण आपल्यापासून सुरुवात केली तर कोणताही बदल घडणे शक्य आहे! अनेक जण म्हणाले ती एका व्यक्तिची लाट आहे, तर अनेकांना तो सोशल मीडियाचा परिणाम वाटला, काहींना पक्षाच्या प्रचारामुळे ते साध्य झाल्याचे वाटले, मात्र परिणाम सर्वांनाच दिसून आला जो आपण अनेक वर्षात अनुभवला नव्हता हे खरे आहे! सुदृढ समाजाचे पहिले लक्षण म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला त्याच्या जबाबदारीची जणीव असते व कोणत्याही लोकशाही समाजाची मतदान करण्याहून दुसरी कोणती मूलभूत जबाबदारी असू शकते! माझ्या मते  स्वातंत्र्यास अडुसष्ट वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वातंत्र्य म्हणजे काय याचा आपण अर्थ शिकलो आहोत याची ती खूण होती! सुशिक्षित लोकांची नावे मतदार यादीत नव्हती म्हणून निदर्शने करण्यात आली, आपण कधीच विचारही केला नाही की समाजातील तथाकथित पांढरपेशा वर्गातील लोक मतदान करायला इतके उत्सुक असतील! इतकी प्रसिद्धी व गोंधळानंतर लोकांनी मतदान केले, मात्र तरीसुद्धा पुण्यातील मतदानाची टक्केवारी केवळ ५२ % होती जी देशातील मतदानाच्या टक्केवारीच्या जवळपास १०% कमी होती, देशातील टक्केवारीचा आपल्याला नक्कीच अभिमान वाटला पाहिजे! आपल्यालाकडे लोकसभेच्या गेल्या काही निवडणुकांपेक्षा मतदानाची टक्केवारी १०% वाढली असली तरीही देशातील दुर्गम ग्रामीण भागापेक्षा ती अतिशय कमी होती. याचाच अर्थ असा होतो की तथाकथित मागास भागातील लोक पूर्वेचे हार्वर्ड म्हणून ओळखल्या जाणा-या पुण्यापेक्षाही जबाबदार आहेत व पुण्याचा नागरिक म्हणून आपल्यासाठी ही नामुष्कीची बाब आहे!

आता विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की हा राजकीय लेख नाही मात्र तुम्हाला बदल हवा असेल किंवा आपल्याला अधिक चांगले, जबाबदार सरकार हवे असेल तर आपण सर्वप्रथम मतदान करणे आवश्यक आहे. लोकशाही म्हणजे केवळ काहींनी मतदानाची औपचारिकता पूर्ण करुन सरकार स्थापन करणे नाही तर आदर्श परिस्थितीत १००% पात्र मतदारांनी मतदान केले पाहिजे व त्यानंतर जे सरकार सत्तेवर येईल त्यास ख-या अर्थाने लोकशाही सरकार म्हणता येईल. विचार करा जेमतेम ४०% लोक मतदान करतात तेव्हा एकूण मतदानाच्या फक्त ४०% मते असलेले सरकार सत्तेत येते; म्हणजेच त्या पक्षाकडे एकूण मतांपैकी फक्त १६% मते असतात व तरीही तो सत्तेत येतो! याच सरकारने १००% जनतेच्या समस्या सोडवाव्यात अशी आपली अपेक्षा असते! आपण आपली मतदानाची जबाबदारीही पूर्ण करत नाही तर मग सरकार चांगले असावे अशी अपेक्षा करण्याचा आपल्याला काय नैतिक हक्क आहे, आणि ही जबाबदारी पाचवर्षातून फक्त एकदा पार पाडायची असते!

आपले राज्य साक्षरता तसेच स्वतःविषयीच्या जागरुकतेसंदर्भात देशातील अधिक विकसित राज्यांपैकी एक मानले जाते; विशेषतः पुणे ही राज्याची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी मानली जाते. मात्र ही तथाकथित संस्कृती आपल्या मतदानातून कधीही दिसून येत नाही ही विचार करण्याची बाब आहे! शैक्षणिक निकष, एक शहर म्हणून असलेला आपला दर्जा याचा विचार करता पुण्यामध्ये देशातील सर्वाधिक मतदान झाले पाहिजे, जे आत्तापर्यंत कधीही झालेले नाही. किंबहुना आपल्याकडे मतदानाचे प्रमाण राज्यातील गरीब व अविकसित शहरांच्या तुलनेत अतिशय कमी असते. मग आपली साक्षरता किंवा ज्ञान केवळ पुस्तकांपुरते मर्यादित आहे का, कारण आपला लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण त्याचा वापर करत नसू तर काय उपयोग आहे? त्यानंतर आपण वर्षभर वर्तमानपत्रांना विविध नागरी समस्यांविषयी एक जागरुक नागरिक या नावाने पत्र लिहीतो, एवढे केले म्हणजे आपण आपल्या जबाबदा-यांविषयी अतिशय सजग असल्याचे आपल्याला वाटते!  लक्षात ठेवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे वैशाली किंवा रुपालीमध्ये घोळक्यात चहा पिताना आपले मत व्यक्त  करणे नाही, तर या स्वातंत्र्यामध्ये आपण आपली मतदानाची व आपल्या शासनकर्त्यांना निवडण्याची जबाबदारी पार पाडणेही अपेक्षित आहे.

शेवटी आपण मतदान का करतो? आपण मतदान करतो कारण ती आपल्या अस्तित्वाची खूण आहे, आपल्याला एक व्यक्ती म्हणून स्वतःची व समाज म्हणून आपल्या जबाबदारीची जाणीव असल्याची ती खूण आहे. केवळ एका मताने सर्वकाही बदलणार नाही मात्र सर्वांनीच असा विचार केला तर काय होईल असा विचार करा? असा विचार केल्यास कुणी मतदाताच उरणार नाही, त्यावेळी तो समाजातील वाईट तत्वांचा विजय असेल व त्याला मतदान न करणारे जबाबदार असतील. एकप्रकारे मतदानाचा हक्क म्हणजे आपल्याला देण्यात आलेली  आपलेच भविष्य निवडण्याची संधी आहे! लक्षात ठेवा आपण जास्तीत जास्त संख्येने मतदान केल्यास, सत्तेवर येणा-या सरकारवर मतांचा दबाव असेल कारण लोकांनी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्या सरकारवर विश्वास ठेवलेला असतो व ते सरकार त्या सर्व मतदारांना उत्तरदायी असते. म्हणूनच त्या सरकारला चांगले काम करावेच लागते कारण केले नाही तर हेच लोक त्यांना जाब विचारतील.
आपण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे केवळ मतदान करुन व शाई लावलेल्या बोटाची छायाचित्रे फेसबुक किंवा वॉट्स अपवर टाकून आपली जबाबदारी संपत नाही. आपण आपल्या मताचा आदर करत असू तर आपण ज्याला मतदान केले आहे तो किंवा ती तुम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत आहेत का हे तुम्ही पाहिले पाहिजे व त्यासाठी पुढचे पाच वर्षे डोळे उघडे ठेऊन राज्यकर्त्यांवर दबाव ठेवला पाहिजे, जर शहरातील, राज्यातील व देशातील प्रत्येक व्यक्तिला हे समजले व त्याने त्याचे पालन केले तर आपल्या देशाला  ख-या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल. असे म्हणतात की, “प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात धाडसाने केलेल्या एका लहानशा कृतीने होते”, म्हणूनच चला तर मग आपण सर्वजण मतदान करु व केवळ आपल्यासाठीच नाही तर आपल्या भावी पिढ्यांसाठीही बदल घडवून आणू! वरील अवतरणात म्हटल्याप्रमाणे आपण मतदान केले नाही तर आपल्याला स्वतःचे संरक्षण गमवावे लागेल, आणि लक्षात ठेवा ज्या व्यक्तिला स्वतःच्या मताची काळजी वाटत नाही, त्या व्यक्तिची काळजी कोण करेल आणि का करावी?

संजय देशपांडे

 smd156812@gmail.com


संजीवनी डेव्हलपर्स

No comments:

Post a Comment