Wednesday 3 December 2014

माझा जंगलाचा तुकडा !























प्रत्येक वेळी मी जेव्हा एखादे गर्द हिरवे भव्य झाड पाहतो, तेव्हा ते मला संयम शिकवते. मी प्रत्येक वेळी गवताच्या डुलणा-या पात्यांकडे पाहतो तेव्हा ते मला वा-याच्या सुरांवर नृत्य करायला शिकवते... कार्ल सॅगन.

कार्ल एडवर्ड सॅगन हा अमेरिकी खगोलशास्त्रज्ञ, विश्वरचनाशास्त्रज्ञ, खगोल भौतिकशास्त्रज्ञ, खगोल जैवशास्त्रज्ञ, लेखक, विज्ञानाचा प्रचारक, खगोल शास्त्र व इतर नैसर्गिक शास्त्रांमध्ये वैज्ञानिक संज्ञापक व बरेच काही होता! त्याच्या वरील विधानातून प्रत्येक वैज्ञानिकाला निसर्गाविषी असलेला आदर दिसून येतो. माझे निसर्गाविषयी मत व्यक्त करायचे शब्द सामर्थ्य  सॅगनच्या जवळपासही नाही मात्र मी निसर्गाचे सर्वोत्तम रुप असलेल्या जंगलात असतो तेव्हा माझ्या भावना नेहमी तशाच  काहीश्या असतात. तुम्ही जंगलात काहीही पाहा मग ते पक्षांचे सौंदर्य असो किंवा निळेशार आभाळ असो किंवा वा-याच्या तालावर डुलणारी जंगली फुले असोत किंवा विस्तीर्ण कुरणांमध्ये धावणारे हरिण असो किंवा एखाद्या मूक निरीक्षकाप्रमाणे आजूबाजूची स्थिती शांतपणे न्याहाळणारे झाड असो; प्रत्येक घटक तुम्हाला काहीतरी सांगत असतो, किंबहुना कार्लने म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जीवनाविषयी काहीतरी शिकवत असतो! मी नुकताच पुण्याजवळच्या कडबनवाडी या लहानशा गवताळ प्रदेशात गेलो होतो. तिथे गेल्यावर मी माझ्या ५०० मिमीच्या k^ मेरा लेन्स विसरल्याचे लक्षात आल्यानंतर थोडासा वैतागलो. मात्र मी स्वतःला विचारले मी इथे का आलोय? फक्त छायाचित्रे काढायला की निसर्गाचा आस्वाद घ्यायला? आणि मग गवताळ प्रदेशात व स्थानिक लोक ज्याला चिंकारा म्हणून ओळखतात त्या हरिणांच्या  सान्निध्यात गेल्यावर, सूर्य उगवल्यानंतर थंडीतील धुके नाहीसे होते त्याचप्रमाणे माझा वैताग नाहीसा झाला!
 यंदाचा हिवाळा माझ्यासाठी सुवर्णयोगच म्हणावा लागेल कारण ताडोबा व कान्हाची मोठी सफर करुन आल्यानंतर मला परत पुण्यापासून जवळच असलेल्या कडबनवाडी जंगलाला भेट देण्याची संधी मिळाली, अनेक पुणेकरांना असे कोठले जंगल त्यांच्या इतके जवळ आहे हे माहितीही नसेल! गेल्या काही वर्षात प्रामुख्याने महानगरांमध्ये वन्यजीव पर्यटन अतिशय लोकप्रिय झाले आहे, विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या शहरातील उच्चभ्रू वर्गामध्ये किमान एकातरी राष्ट्रीय अभयारण्याला भेट देणे ही प्रतिष्ठेची बाब झाली आहे! यामुळे दोन गोष्टी साध्य होतात, एक म्हणजे तुम्हाला तुम्ही निसर्गप्रेमी असल्यासारखे व निसर्गासाठी काहीतरी केल्यासारखे वाटते व दुसरे म्हणजे तुम्ही वाघ पाहिल्याची बढाई मारु शकता व संध्याकाळच्या सोशल पार्ट्यांमध्ये वाघ वाचवा वगैरेंसारख्या मुद्यांवर अधिकारवाणीने बोलू शकता! कारण काहीही असले तरी यामुळे कान्हा, ताडोबा, रणथंबोर, पेंच, बांधवगड, कबिनी व इतर अनेक ठिकाणे सिंगापूर व दुबईसारखी लोकप्रिय पर्यटनस्थळे झाली आहेत हे देखील खरे आहे. या पर्यटकांनी केलेल्या खर्चामुळे स्थानिकांना थोडीफार मदत होते ही या पर्यटनाची सकारात्मक बाजू म्हणता येईल. म्हणूनच त्याविषयी तक्रार करण्यासारखे काहीही नाही. मात्र केवळ वाघ पाहणे किंवा वर उल्लेख केलेल्या सर्वोत्तम अभयारण्यांपैकी एकाला भेट देणे म्हणजे निसर्गप्रेमी असणे आहे का? पुण्यासारखे शहर चहू बाजूंनी पश्चिम घाटांनी व गवताळ प्रदेशांनी वेढलेले असल्याने वन्यजीवनाच्या बाबतीत तिथे बरेच पाहण्यासारखे आहे, मात्र त्यासाठी वन्यजीवन म्हणजे नेमके काय हे आपण समजून घेणे आवश्यक आहे? उदाहरणार्थ पुण्यासारख्या काँक्रीटच्या जंगलात राहताना तुमच्या घरात किंवा कार्यालयातून किती वेळा पक्षांचा किलबिलाट ऐकला आहे हा प्रश्न स्वतःला विचारा, गाय किंवा म्हैस यासारखे पाळीव प्राणी व कबुतर किंवा कावळ्यासारख्या पक्षांशिवाय तुम्ही किती पक्षी किंवा किडे किंवा प्राणी पाहिले आहेत? तुम्ही किती वेळा स्वच्छ निळे आकाश पाहिले आहे व शुद्ध प्राणवायूने भरलेली ताजी हवा अनुभवली आहे? तुम्ही किती वेळा आकाशाकडे पाहून चमकणारे तारे मोजण्याचा प्रयत्न केला आहे? तुम्ही किती वेळा वा-यामुळे गवतावर तयार होणा-या लाटा किंवा गडद रंगाचे एखादे जंगली फूल पाहण्यासाठी थांबला आहात? तुम्ही एखाद्या फुलपाखराच्या मागे धावण्याचा अखेरचा प्रयत्न कधी केला होता किंवा तुमच्या मुलांना तसे करताना पाहिले होते? एखाद्या धुळीने माखलेल्या रस्त्यांवर प्राण्यांच्या पाउलखुणा शोधत व तुमच्या ज्या रस्त्यावरुन चालत आहात त्यावरुन आधी कोण चालत गेले आहे याचा अंदाज बांधण्याचा शेवटचा प्रयत्न कधी केला होता हे आठवतंय का? मला खात्री आहे की आपल्या दैनंदिन जीवनात आपण हे प्रश्न विचारायचे विसरुनच गेलोय आणि या लहान लहान गोष्टींचे महत्वही विसरलो आहोत. निसर्गाच्या सान्निध्यात राहणे म्हणजे काय हे आपण विसरलो आहोत, ते आपले सर्वात मोठे नुकसान आहे. जीवन म्हणजे फक्त रुपयांची उलाढाल, पेंटहाउस, कार, अद्ययावत् सेलफोन नाही, जीवन पैशांमध्ये मोजता येत नाही, ते आपल्या आजूबाजूला असलेल्या निसर्गातच असते. पैसा व त्यामुळे ज्या गोष्टी खरेदी करता येतात त्या महत्वाच्या आहेतच, मात्र या प्रक्रियेमध्ये आपण जगणेच विसरलो तर त्यांचा काय उपयोग आहे?
 अशावेळी कडबनवाडीसारखे लहानसे जंगल आपल्या पैशाभोवती फिरणा-या जीवनात थोडाफार बदल घडवू शकतात. आपल्याला वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कान्हासारख्याच जंगलात जायची वा त्यासाठी लांबचा प्रवास करायची गरज नाही, थोडेसे चौकस राहिले व थोडा शोध घेतला तर वेगवेगळ्या स्वरुपातील जंगल आपल्या शेजारीच आहे! मात्र या जागा फारशा प्रसिद्ध नाहीत किंवा त्या व्हाव्यात यासाठी कुणी प्रयत्न करत नाही ही एक समस्या आहे. कान्हा व ताडोबासारखी जंगले प्रसिद्धीच्या झोतात का असतात? त्याचे एक कारण म्हणजे तिथे वाघ आहेत व दुर्दैवाने आपल्या देशातील सर्व वन्यजीव पर्यटन वाघांवर केंद्रित आहे. मात्र सर्व स्वयंसेवी संस्था तसेच सरकारी यंत्रणेने सामान्य माणसाला सर्वप्रथम जंगलांचे महत्व समजून सांगण्याची वेळ आली आहे. आपण जेव्हा जंगल म्हणतो तेव्हा त्यामध्ये कडबनवाडीसारखे गवताळ भाग किंवा भीमाशंकरसारखे सदाहरित जंगल किंवा भिगवणसारखे जलाशय किंवा फणसाडसारख्या किनारपट्टीच्या भागातील जंगलांचा व पश्चिम घाटांचाही समावेश होतो, यातली कितीतरी आपल्या पुण्याच्याच जवळपास आहेत! त्याप्रमाणे आपल्या राज्यातील बहुतांश जिल्हे वनसंपदेच्या बाबतीत सुदैवी आहेत कारण त्यांच्याकडे थोडीफार का होईना वनजमीन आहे. या वनजमिनी सरपटणा-या, सस्तन प्राण्यांपासून ते पक्षांपर्यंत अनेक वन्य पशुपक्षांचे वसतीस्थान आहेत, आपण अशा सर्व जागा शोधून त्या जनमानसात प्रिय केल्या पाहिजेत. यामुळे दोन किंवा तीन गोष्टी साध्य होतील सर्वप्रथम जागा गुप्त नैसर्गिक खजिनाच आहेत, ज्या व्यक्ती मोठ्या अभयारण्यांना भेट देऊ शकत नाहीत त्या इथे येऊन जंगल अधिक चांगल्याप्रकारे समजावून घेऊ शकतील, दुसरे म्हणजे पर्यटनामुळे या ठिकाणांच्या आजूबाजूला राहणा-या लोकांना पैसा मिळेल व या ठिकाणांचे संवर्धन व्हायला मदत होईल, नाहीतर या ठिकाणांना लोकसंख्या वाढ, शहरीकरण यासारख्या विविध कारणांमुळे जंगलतोडीचा मोठा धोका आहे!  आणि तिसरे म्हणजे प्रत्यक्ष जंगलात जाणे हा त्याविषयीची जागरुकता वाढविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.  अधिकाधिक लोक कडबनवाडीसारख्या ठिकाणांद्वारे जंगलात पोहचले तर आपल्या आजूबाजूला अशा ठिकाणांची किती नितांत गरज आहे हे त्यांना अधिक चांगल्याप्रकारे समजावून देता येईल. जंगलांच्या प्रसिद्धीसाठी लाखो रुपये खर्च करुन जे साध्य होणार नाही ते अतिशय स्वस्तात व थेट मार्गाने साध्य होईल!

 मात्र त्यासाठी अशा ठिकाणी आपल्याकडे व्यवस्थित पायाभूत सुविधा हव्यात. त्याची सुरुवात करण्यासाठी लोकांना आपल्या आजूबाजूला अशा जागा आहेत हे कसे समजेल याचा विचार केला पाहिजे? त्यासाठी वन विभाग व पर्यटन विभागाने एकत्रितपणे काम करुन अशा ठिकाणांची एक यादी तयार केली पिहिजे व त्यांचे नकाशे, छायाचित्रे, तिथे काय पाहायचे इत्यादी माहिती असलेली एक पुस्तिका छापली पाहिजे. ही माहिती संबंधित संकेतस्थळावरही प्रकाशित करता येईल व त्यामध्ये वेळोवेळी बदल करता येतील. अशा ठिकाणी जाण्याचा मार्ग दाखवणारे फलक महामार्गावर तसेच आतील रस्त्यांवर असले पाहिजेत म्हणजे लोकांना तिथे व्यवस्थित पोहोचता येईल. उदा. पुण्याहून सोलापूरला जाणा-या महामार्गावर विविध निवासी वसाहतींचा म्हणजेच काँक्रीटच्या जंगलांचा रस्ता दाखवणारे शेकडो फलक दिसतात मात्र खरेखुरे जंगल असलेल्या कडबनवाडीला जाण्यासाठी कुठे वळाचे हे दाखविणारा एकही फलक नाही! त्यामुळेच हे ठिकाण मुख्य रस्त्याच्या इतके जवळ आहे हे सामान्य माणसाला कसे समजणार? त्यानंतर जंगलाच्या सुरुवातीलाच एखादे माहिती केंद्र, प्रसाधनगृह  किंवा उपहारगृह वगैरेसारख्या पायाभूत सुविधा सहज सुरु करता येतील कारण इथे जमिनीची समस्या नाही. आपण निवासाची व्यवस्था करण्याचाही विचार करु शकतो ज्यामुळे व्यावसायिक वन्यजीवप्रेमींची मोठी सोय होऊ शकेल, त्यांना रात्री किंवा भल्या पहाटे जंगलात जाता येईल कारण तेव्हाच प्राणी दिसण्याची अधिक शक्यता असते! इथे आपण अमेरिकेसारख्या देशाकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे, तिथे अगदी दुर्गम भागातील पर्यटन स्थळीही सर्व पायाभूत सुविधा चांगल्या स्थितीत उपलब्ध असतात. इथे आपल्याला स्थानिकांना हाताशी घेता येईल व या सर्व सेवा त्यांच्या उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत होऊ शकतात. स्थानिक तरुण पर्यटकांचे मार्गदर्शक म्हणून काम करु शकतात, त्यांना जंगलाची माहिती देऊ शकतात. त्यासाठी त्यांना थोडेफार प्रशिक्षण द्यायची गरज आहे ज्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था उपलब्ध आहेत. आपण स्थानिक झाडे-झुडपे व प्राण्यांची छायाचित्रे प्रदर्शित करु शकतो त्यासाठी आपण तिथे येणा-या पर्यटकांकडूनच छायाचित्रे घेऊ शकतो व मला खात्री आहे की ते अगदी हस त खेळत ही छायाचित्रे देतील. माहिती केंद्रावरच सायकली उपलब्ध करुन सायकल सफरीचाही विचार करता येऊ शकतो, ज्यामुळे पर्यटकांना निसर्गात फारसा हस्तक्षेप न करता त्याच्या जवळ जाण्याची संधी मिळेल. तसेच तो उत्पन्नाचा आणखी एक स्त्रोत होईल. आपण राज्यभरातील अशा सर्व ठिकाणांच्या छायाचित्रांची वार्षिक स्पर्धा आयोजित करु शकतो, ज्यामुळे अधिकाधिक लोक अशा ठिकाणांना भेट देतील व जनतेला अशा ठिकाणांची माहिती करुन देण्याचा तो उत्तम मार्ग आहे.

 आपण पुण्यातील व आजूबाजूच्या गावांमधील शाळांची मदत घेऊन शाळेतील मुलांच्या अशा जागी सहली आयोजित करु शकतो तसेच विविध पर्यटन संस्थांशी विशेषतः वन्यजीव पर्यटन आयोजित करणा-या नेचर वॉक किंवा पगमार्क यासारख्या संघटनांसह संयुक्त प्रकल्प राबविण्यासाठी करार करु शकतो. यामुळे आपल्याला समाजातील एका मोठ्या वर्गापर्यंत पोहोचायला मदत होईल. त्याचवेळी ही जंगले आजूबाजूला सुरु असलेल्या शहरीकरणामध्ये सुरक्षित ठेवणे, या जंगलांच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी व अतिक्रमण होऊ नये याची काळजी घेण्यासाठी पुरेसे कर्मचारी देणेही अतिशय महत्वाचे आहे! कडबनवाडीसारख्या जंगलात आपण पथदर्शी प्रकल्प राबवू शकतो व तिथे पर्यटकांसाठी सर्व सोयी उपलब्ध करुन देऊ शकतो व त्यानंतर असेच प्रकल्प आपण इतर ठिकाणी राबवू शकतो. आपल्या आजूबाजूला असलेल्या अशा अनेक कडबनवाड्यांसाठी आपण कितीतरी गोष्टी करु शकतो. हे काम करण्यासाठी कुणाची तरी नेमणूक व्हावी असेच प्रत्येकाला वाटत असते, पण खरंतर जंगलांवर प्रेम करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तिची आहे, कुणीतरी येऊन ही कामे करेल अशी अपेक्षा करत बसण्यात काय अर्थ आहे!
सरते शेवटी, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकासाठीच जंगलांचा एका तुकडा अतिशय आवश्यक आहे! खरंतर तो जंगलाचा तुकडा आपल्यातच आहे, ज्याला आपल्यापैकी बहुतेकांनी कुलूपबंद करुन ठेवलंय व आपण त्याची किल्लीही विसरुन गेलोय. कडबनवाडीसारखी ठिकाणं आपल्यासाठी हे कुलूप उघडण्याचं काम करतील. इथे केवळ एकदा भेट दिल्यानं आपल्याला जाणीव होईल की आपल्या जगण्यासाठी नाचरं गवत, शीळ घालणारा वारा, निळं आकाश, पक्षांचा किलबिलाट किती आवश्यक आहे! या सर्व गोष्टींमुळेच आपण सजीव आहोत, नाहीतर आपण जी उपकरणे वापरतो त्यात आणि आपल्यात काहीच फरक उरणार नाही!  

संजय देशपांडे      

संजीवनी डेव्हलपर्स


No comments:

Post a Comment