Tuesday 3 February 2015

गोष्ट एका स्वच्छ्तागृहाची !


























तुमचा देश तुमच्यासाठी काय करु शकतो हे विचारु नका; तुम्ही तुमच्या देशासाठी काय करु शकता हे विचारा.” …जॉन एफ. केनडी

जॉन फित्झगेराल्ड केनडी, यांना लोक जॅक केनडी किंवा केवळ जेएफके म्हणून ओळखतात. जानेवारी १९६१ ते नोव्हेंबर १९६३ साली हत्या होईपर्यंत ते अमेरिकेचे ३५वे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. वयाच्या ४३व्या वर्षी, अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झालेले ते दुसरे सर्वात तरुण (थिओडर रुझवेल्ट यांच्यानंतर) अध्यक्ष होते, व २०व्या शतकात जन्मलेले पहिले अध्यक्ष होते. आजतागायत, केनडी हे एकमेव रोमन कॅथलिक अध्यक्ष व पलित्झर पुरस्कार विजेते अध्यक्ष आहेत. जेएफके हे आजपर्यंतच्या सर्वात लोकप्रिय व सर्वात वादग्रस्त अमेरिकी अध्यक्षांपैकी एक असल्यामुळे त्यांची वेगळी ओळख करुन द्यायची गरज नाही. मात्र त्यांचे वरील विधान ऐतिहासिक तसेच प्रेरणादायी आहे; कारण सरकार किंवा देश नावाच्या व्यवस्थेकडून आपण जेव्हा काही अपेक्षा करतो तेव्हा आपलेही त्या व्यवस्थेप्रती काही कर्तव्य आहे हे आपण नेहमी विसरतो! त्यामुळे वरील अवतरण ख-या अर्थाने डोळे उघडते! आम्ही वर्षभरापूर्वी सुरु केलेल्या एका लहानशा उपक्रमासंदर्भात मला वरील विधान आठवले जो आता पथदर्शी मानला जात आहे व जेएफके यांचे विधान त्या उपक्रमाने सार्थ ठरवले आहे. आम्ही तीन वर्षांपूर्वी पुण्यातील एक सार्वजनिक स्वच्छतागृह दत्तक घेतले त्यासंदर्भात मी बोलत आहे.

मला प्रामाणिकपणे सांगावसं वाटतं की आम्ही जे काही केलं ते काही अतिशय महान होतं असं मला वाटत नाही किंवा त्यामुळे माध्यमांनी किंवा स्थानिक प्रशासकीय संस्था किंवा शासनकर्त्यांनी त्याची दखल घ्यावी असं नाही मात्र काही गोष्टी सहज घडतात. ते केवळ एका लहानशा कंपनीने चांगल्या हेतूने आपला समाज, आपला परिसर अधिक चांगला बनविण्यासाठी उचललेले एक पाऊल होते! ज्यांना याची पार्श्वभूमी माहिती नाही त्यांच्यासाठी थोडीशी आधीची माहिती किंवा फ्लॅशबॅक देतो

चार वर्षापूर्वी मी खांद्याला दुखापत झाल्यामुळे नेहमीसारखं सकाळी बॅडमिंटन खेळू शकत नव्हतो, त्यामुळे मित्रांशी चहासोबत गप्पाटप्पा मारायला वैशालीत जात असे. माझ्या घरापासून ते एफसी रोडवरील वैशालीपर्यंत, मी कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप चौक ओलांडून जात असे. या ठिकाणचे एक सार्वजनिक स्वच्छ्तागृह अतिशय दयनीय अवस्थेत होती, त्या  स्वच्छतागृहाच्या  बांधकामाचीही तशीच अवस्था होती व वापरही तसाच होता; तिथून इतकी दुर्गंधी यायची की रस्ता ओलांडताना तिथून जावसंही वाटत नसे. रहदारीच्या वेळी त्या स्वच्छ्तागृहच्या बाजुने रस्ता ओलांडणं ही अतिशय मोठी अडचण होती. या परिसरातल्या रहिवाशांनाही मनपा कडे तक्रार करुन हे स्वच्छ्तागृह हटविण्याची मागणी केली होती कारण तिचा उपयोग होण्यापेक्षा ती जास्त त्रासदायकच ठरली होती! त्यामुळे एक दिवस मी त्यासंदर्भात काहीतरी करायचं ठरवलं. मी मनपा मधल्या माझ्या काही मित्रांना संपर्क केला व त्या स्वच्छ्तागृहाची इतकी वाईट अवस्था का आहे अशी विचारणा केली? अपेक्षेप्रमाणे, निधीची कमतरता, अपुरे मनुष्यबळ अशाप्रकारची कारणे देण्यात आली; म्हणून मी विचारले की मी तिची देखभाल केली तर? मला खात्री आहे की यामुळे मी वेडा आहे किंवा विनोद करतोय असंच त्यांना वाटलं असेल, मात्र मी गांभीर्याने बोलतोय असे म्हटल्यावर व माझा निर्धार पाहिल्यानंतर संबंधित अधिकारी म्हणाले की मला त्यासाठी अर्ज करावा लागेल कारण कुणा व्यक्तिने किंवा संस्थेने आतापर्यंत असे केलेले नाहीम्हणजे आत्तपर्यंत कुणीही स्वतःहून अचानक सार्वजनिक स्वच्छ्तागृह दत्तक घेण्यासारख्या विचित्र गोष्टीची विनंती केलेली नाही

मी तात्काळ माझ्या कार्यालयातून त्या सार्वजनिक स्वच्छ्तागृहाची मोफत, अगदी कोणती जाहिरातही न करता देखभाल करेन असा प्रस्ताव पाठवला! त्यावेळी मला माहिती नव्हतं की मी त्यासाठी काय व कसं करणार आहे, त्यामुळे मी माझ्या काही सहका-यांसोबत एक छोटीशी बैठक घेतली. माझ्या सहका-यांना त्यावेळी ही कल्पना म्हणजे बॉसच्या डोक्यातलं नवीन खूळ असंच वाटलं असेल मात्र त्यांनी मान्य केलं कारण शेवटी बॉस हा बॉस असतो! सार्वजनिक स्वच्छ्तागृह सुस्थितीत ठेवण्यासाठी आपण किमान तिची डागडुजी करुन तिथे एक पूर्णवेळ सफाई कर्मचारी ठेवू शकतो असे आम्ही ठरवले! मात्र असा अर्ज करुन जवळपास तीन महिन्यांनंतरही मनपाच्या अधिका-यांकडून काहीच उत्तर मिळाले नाही. मी रोज त्या स्वच्छ्तागृह वरुन चौक ओलांडून जात होतो, तिची देखभाल करण्याचा विचार दिवसेंदिवस बळकट होत चालला होता!

त्यानंतर एक दिवस एका कार्यक्रमात मला संदीप खर्डेकर व खासदार वंदना चव्हाण भेटल्या. सार्वजनिक वर्तनासंदर्भातील समस्यांविषयी अनौपचारिक चर्चेदरम्यान मी त्या सार्वजनिक स्वच्छ्तागृह संदर्भात केलेल्या अर्जाविषयी व मला मनपाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचं सांगितलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते दोघे जण लगेच कामाला लागले व मला वंदना दीदींकडून कॉल आला की महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात याविषयावर चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. खासदारांनीच हस्तक्षेप केल्याने सूत्रे वेगाने हालली व मला श्री सुरेश जगताप, उप आयुक्त, घन कचरा व्यवस्थापन यांच्याकडून पत्र आले की आम्ही त्या स्वच्छ्तागृहाची देखभाल करु शकतो मात्र त्यावर कोणतीही जाहिरात करता येणार नाही तसेच मनपाचे प्रभाग पातळीवरील आरोग्य निरीक्षक वेळोवेळी त्याची तपासणी करतील. आम्ही त्या प्रभागाच्या नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांना संपर्क केला व त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आम्ही त्या स्वच्छ्तागृहाची प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी गेलो तेव्हा आणखी एक अडचण समोर आली; तिथे पाणी पुरवठाच होत नव्हता! मी माधुरी मॅडमना सांगितलं की मी एक लहानशी टाकी बसवू शकतो मात्र दररोज तिथे पाणी कुठून आणू, रोज टँकरनी पाणी आणणं अशक्य होतं. यावर त्या म्हणाल्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था होईल व त्यांनी खरंच आठवडाभरात ती केली. आता मूलभूत सगळ्या गोष्टी तिथे होत्या, व बांधकाम क्षेत्रातच असल्याने डागडुजी करणं फारसं अवघड नव्हतं. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात टाईल्स बसविणे, नळजोडणी, रंग-रंगोटी, सिन्टॅक्सची छोटी टाकी बसविणे इत्यादी कामे झाली.

आणखी एक गोष्ट म्हणजे, स्वच्छ्तागृहाच्या आजूबाजूची जागा व्यवस्थित वापरली गेली पाहिजे असे मला वाटत होते, कारण तिचे रुपांतर कचरापेटीत झाले होते व तिथे दारुच्या बाटल्यांपासून ते विविध प्रकारचा कचरा टाकला जायचा! म्हणून तिथे आम्ही फुलांचा वाफा फुलवायचं ठरवलं व पुन्हा जगताप सर व माधुरी मॅडमकडून परवानगी घेतली. आम्ही रातराणीसारखी फुलझाडे लावली म्हणजे तिच्या वासामुळे वातावरण आणखी चांगले वाटेल व त्याचा खरोखर उपयोग झाला. त्यानंतर आम्ही सफाई कर्मचा-याचा शोध घ्यायला सुरुवात केली, ज्याची फारसं आकर्षक नसलेलं काम करायची इच्छा असेल कारण त्याला सर्वप्रकारच्या लोकांना तोंड द्यावं लागणार होतं. आम्हाला एक शिक्षण सोडलेला मात्र चुणचुणीत मुलगा मिळाला, त्याला महिन्याला दहा हजार पगार द्यायचं ठरवण्यात आलं. आम्ही त्याला काम समजावून सांगितलं, साफसफाईसाठी साहित्य दिलं व थोडंसं प्रशिक्षणही दिलं. दर वीस मिनिटांनी तो स्वच्छ्तागृह स्वच्छ करेल तसंच लोकांनाही ते स्वच्छ ठेवण्याच्या व तिचा गैरवापर न करण्याच्या सूचना देईल असं ठरवण्यात आलं. यामुळे आणखी एक समस्या समोर आली की लोक त्याचं का ऐकतील? म्हणून आम्ही संबंधित अधिका-याच्या परवानगीने एक लहानसा फलक आतमध्ये लावला की या स्वच्छ्तागृहाची देखभाल संजीवनी करत आहे व इथल्या परिस्थितीसंदर्भात काहीही मदत हवी असल्यास आमच्या दोन कर्मचा-यांचे क्रमांक देण्यात आले होते. आम्ही स्वच्छ्तागृहाच्या बाजूने थोडी शोभेची झाडे लावली, त्यानंतर तिचा संपूर्ण चेहरा मोहराच पालटला.

मी मनपाला हे स्वच्छ्तागृह दत्तक घेण्याविषयी अर्ज केल्यापासून ते हे सर्व होईपर्यंत साडेचार महिने गेले, देखभालीपेक्षा दत्तक घेणे हा शब्दप्रयोग अधिक समर्पक वाटतो; व २८ जानेवारी १४ रोजी आम्ही सर्व संबंधितांच्या उपस्थितीत एका छोटेखानी समारंभाने सुरुवात केली. आम्ही त्याविषयी फारशी वाच्यता केली नाही कारण आधी हा प्रयोग कसा चालतोय ते पाहू मग आपण जे आश्वासन दिले ते आपल्याला पूर्ण करता येते का हे पाहू असा विचार केलाआम्ही तिथे एक प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी वही ठेवली जे लोकांना सुरुवातीला थोडे विचित्र वाटले कारण कोणत्याही सार्वजनिक स्वच्छ्तागृहा तुम्हाला सफाई कर्मचारी तुम्हाला हे स्वच्छ्तागृह कसे वाटले असे विचारताना दिसतो?” मात्र तिथल्या परिस्थितीविषयी तसेच आमच्या प्रयत्नांविषयी चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या व आमचा आत्मविश्वास वाढलादिवस भुर्रकन उडून गेले व अचानक जानेवारीच्या दुस-या आठवड्यात १५ तारखेला मला आठवण झाली की या उपक्रमाला जवळपास एक वर्ष झालं आहे व मी संदीप खर्डेकर यांना संपर्क केला, ते म्हणाले हा वर्धापन दिन साजरा का करु नये? २८ जानेवारी १५ रोजी आम्ही सगळे त्या ठिकाणी जमलो त्यामध्ये पुण्याचे माननीय महापौर दत्ताजी धनकवडे, आमदार मेधा कुलकर्णी, वंदना ताई व माधुरी मॅडम व सुरेश जगताप असे सर्वजण उपस्थित होते. या परिसरातल्या दुकानदारांनी व नागरिकांनी आधी या स्वच्छ्तागृहाचा किती त्रास व्हायचा आणि आता ही किती चांगली सोय झाली आहे अशा प्रतिक्रिया नोंदवल्या व माझ्या मते हीच आमच्या कामाची खरी पावती होती. आता असा निर्णय घेण्यात आला आहे की ही योजना सगळीकडे राबवायची व अधिकाधिक लोकांना/कंपन्यांना पुढे येऊन यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं. माझे मित्र विक्रांत वर्तक व आदित्य जावडेकर यांनी संयुक्तपणे महिलांच्या स्वच्छ्तागृहाच्या देखभालीचा खर्च उचलला आहे. या एका स्वच्छ्तागृहाच्या देखभालीसाठी महिन्याला एकूण १५,००० रुपये खर्च येतो असा आम्ही हिशेब काढला, मला विश्वास वाटतो की एवढा खर्च आपण नक्कीच देऊ शकू! या खर्चातून सफाईचं काम करणा-या मुलाला त्याचं शिक्षण पूर्ण करता येईल हे वेगळं सांगायला नको!

मित्रांनो आम्ही राबवलेल्या वेगळ्या उपक्रमाची जाहिरात करण्यासाठी मी ही माहिती इथे देत नाही; आम्ही केवळ आमच्या मनात जे आलं ते करत गेलो व आम्ही ते करु शकलो कारण आम्ही आमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकला. असं म्हणतात की एखाद्या घराचं स्वयंपाकघर तुम्हाला त्या घराची संस्कृती सांगतं; कोणत्याही शहरातील सार्वजनिक शौचालय तुम्हाला त्या शहराची संस्कृती सांगतं, आता आपल्या मनाला प्रश्न विचारून बघा की आपल्या शहराची संस्कृती काय आहेआपण स्वतःलापूर्वेचं ऑक्सफर्ड किंवाराज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणवतो व आपल्या सार्वजनिक शौचालयांची स्थिती पाहा; बहुतेकांची जशी परिस्थिती आहे ती आपल्यासाठी शरमेची बाब आहे! आपल्या शहराला भेट देणा-या कोणत्याही पाहुण्याची हिंमत झाली व त्याने सार्वजनिक शौचालय वापरलेच तर त्याचे आपल्या शहराविषयी काय मत बनेल? आपल्यापैकी अनेकांनी विदेशी प्रवास केला आहे व तिथल्या स्वच्छतेविषयी आपल्याला फार कौतुक वाटते, आपण कधी विचार केला आहे का की तिथे सार्वजनिक ठिकाणे कोण स्वच्छ ठेवते; दुसरे कुणी नाही तरच लोकच ती स्वच्छ ठेवतात! शेवटी लोक म्हणजे तरी कोण आपणच, जे इथे राहतो! जर आपणही योगदान देऊ शकत असू तर आपण प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर का अवलंबून राहायचंएखादे दिवशी आपल्या घराची साफसफाई करणारा माणूस आला नाही तर आपण सरकारकडून कुणीतरी साफसफाई करण्यासाठी येण्याची वाट पाहात बसतो का? याचप्रकारे रस्ते, शौचालये किंवा कोणतीही सार्वजनिक ठिकाणेही आपलीच आहेत व ती चांगली व्हावीत यासाठी आपण नक्कीच योगदान देऊ शकतोयामुळे किती रोजगार निर्मिती होईल हे सुद्धा पाहा, केवळ पुण्यातच अशी जवळपास आठशे सार्वजनिक शौचालये आहेत व ती अपुरीच आहेत हे सत्य आहे! आपण आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करण्यासाठी वाढदिवसांपासून ते लग्नांपर्यंत कितीतरी गोष्टींसाठी पैसे खर्च करतो मात्र आपण ज्या समाजाचा एक भाग आहोत त्यासाठी मात्र आपण थोडाफार खर्च करायला विसरतो! केवळ स्वच्छ्तागृहाची देखभालच नाही तर आपण तिथे जाण्याचा रस्ता दाखविणारे फलकही लावू शकतो. यामुळे अधिकाधिक लोकांना त्याविषयी समजेल व इकडे तिकडे घाण करण्याऐवजी ते त्या सुविधेचा वापर करतील! इथे शासनकर्त्यांकडून व स्थानिक प्रशासकीय संस्थांकडून एक लहानशी अपेक्षा आहे की त्यांनी अशा संकल्पनांना प्रोत्साहन दिले पाहिजे म्हणजे त्यांच्यावरील कामाचा भार थोडा कमी होईल. लक्षात ठेवा कोणतीही व्यवस्था सामान्य माणसाचे जीवन अधिक चांगले बनविण्यासाठी आहे व सामान्य माणूस स्वतः या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार असेल तर आणखी काय पाहिजे!

यावर्षी हे स्वच्छतागृह दत्तक घेण्याला तीन वर्षे पूर्ण झाली; पण ही केवळ एका स्वच्छ्तागृहाची गोष्ट झाली, मात्र ही प्रत्येक स्वच्छ्तागृहाची गोष्ट होऊ शकते; कोणताही प्रवास कितीही लांबचा असला तरी त्या दिशेने एक पाऊल उचलल्यावर तो सुरुच होतो. हा प्रवास करण्यापासून इतर कुणी नाही तर आपणच स्वतःला रोखून धरत असतो! त्यामुळे व्यवस्थेच्या नावाने बोटे मोडत बसण्यापेक्षा तिचा एक भाग व्हा, असे झाले तरच आपण एक समाज होऊ,  नाही तर आपण केवळ बिनडोक प्राण्यांचा एक कळप होऊ जो स्वतःच आपल्या भविष्याचा घात करेल; आता काय व्हायचं हे तुमच्या हातात आहे!


संजय देशपांडे
 smd156812@gmail.com
संजीवनी डेव्हलपर्स





No comments:

Post a Comment