Monday 14 September 2015

पुण्याचे पाणी पळाले कुठे ?

























मला असं वाटतं पाण्याकडे निरखून पाहिल तर जीवनाचा अर्थ कळेल कारण पाण्याकडून  एखादी व्यक्ती कितीतरी गोष्टी शिकू शकते.” … निकोलस स्पार्क्स

निकोलस स्पार्क्स हा अमेरिकी लेखक व कादंबरीकार आहे. त्याच्या अठरा कादंबऱ्या व दोन ललितेतर पुस्तके प्रकाशित झाल आहेत. त्याच्या काही कादंबऱ्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम विक्री झाली आहे, व त्याच्या दहा भावनाप्रधान-नाट्यपूर्ण कादंबऱ्यांचे चित्रपटात रुपांतर करण्यात आले आहे, जे तिकीटबारीवर अतिशय यशस्वी ठरले आहेत. तो ललितेतर लेखन करणारा लेखक असला तरीही त्याचे वरील शब्द नक्कीच भावनाप्रधान आहेत व आपल्या प्रिय पुणे शहरासाठी एखाद्या कल्पित कथेप्रमाणे आहेत, मी जेव्हा पुणे शहर म्हणतो तेव्हा त्यामध्ये आपल्या प्रशासकांपासून ते शहरातील सामान्य माणसापर्यंत सर्वांचा समावेश होतो! याचे कारण म्हणजे आपण पाणी रोज पाहतो मात्र आपण पाण्यापासून एकही गोष्ट शिकत नाही! अलिकडेच करण्यात आलेल्या पाणी कपातीचे उदाहरण घ्या, पाणी कपात टाळता येणार नाही त्यामुळे त्याविषयी मला काहीही बोलायचे नाही मात्र त्या पाणी कपातीचा काय परिणाम होतो याचं मला नेहमी कुतूहल वाटतं. लहानपणी आम्हाला अनेक म्हणी उदाहरणासह शिकवल्या जायच्या. उदाहरणार्थ काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे एखादी गोष्टी तुमच्या जवळपास असूनही त्यासाठी सगळीकडे शोध घेणे, याचं उदाहण म्हणजे एखाद्या मुलाचं पेन त्याच्या शाळेच्या दप्तरातच असतं, मात्र त्यासाठी तो संपूर्ण शाळेत शोध घेतो! मी जेव्हा नेहमीची पाणी कपात व त्यावरुन होत असलेल्या गदारोळाविषयीच्या बातम्या ऐकल्या तेव्हा मला माझ्या लहानपणीच्या अजुन काही म्हणी आठवल्या त्या म्हणजे बैल गेला आणि झोपा केलातहान लागल्यावर विहीर खोदणे. पहिल्या म्हणीचा अर्थ असा होतो की बैल पळून गेला तरी त्याचा मालक झोपा काढतोय व दुसऱ्या म्हणीचा असा अर्थ होतो की गरज पडल्यावर एखादी गोष्ट करायला लागणे! मला असं वाटतं या म्हणी आपल्यासाठी चपखल आहेत, कारण आपल्याला अशा बातम्या व त्यावरील नेहमीचे आरोप प्रत्यारोप तसंच पाणी पुरवठ्याविषयी वृत्तपत्रांमधील मथळे वाचायची सवय झाली आहे! एकीकडे स्मार्ट शहरासाठी आपल्या शहराला नामांकन मिळाले म्हणून आपण पाठ थोपटून घेत आहोत व दुसरीकडे आपण पाणी पुरवठ्याचे व्यवस्थापनही करु शकत नाही जी कोणत्याही शहराची मूलभूत गरज आहे!

यातला विनोदाचा भाग म्हणजे प्रत्येक स्वयंसेवी संस्थेला, औद्योगिक संघटनांना तसेच महानगपालिकेलाही पाणी कपातीच्या वेळीच पाणी वाचवा यासारख्या मोहिमांची आठवण होते! किंबहुना यावर्षी पावसाने पाण्याच्या दृष्टीने तथाकथित समृद्ध असलेल्या पुणे शहरातील प्रत्येक नागरिकाचे डोळे उघडले आहेत व मला आनंद वाटतो की या वर्षी सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडला आहे! अनेकांना माझी टिप्पणी आवडणार नाही; बऱ्याच जणांना तो पुणेकरांचा अपमान सुद्धा  वाटेल मात्र मला प्रामाणिकपणे असे वाटते की पाण्याच्या बाबतीत आपण त्याच गोष्टींची पुनरावृत्ती करतो! गेल्या काही वर्षातली परिस्थिती पाहा जेव्हा पाऊस चांगला झाला  व मला अगदी स्पष्टपणे आठवते की दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जून महिन्यात व जुलैच्या मध्यापर्यंत पाऊस पडला नव्हता. त्यावेळी आपण पाण्याविषयी आत्तासारखेच मथळे वाचले होते व पाणी वाचविण्याविषयी अशीच ओरड झाली होती! पीएमसी व जिल्हाधिकारी कार्यालयाने नेहमीप्रमाणे बांधकामांना, कार स्वच्छता केंद्रांना, जवळपास सर्व तरणतलाव इत्यादींना पाणी पुरवठा बंद करण्याची घोषणा केली! त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली म्हणून पाणी कपात जाहीर करण्यात आली म्हणजे एक दिवसाआड पाणी पुरवठा जाहीर करण्यात आला! पुन्हा नेहमीप्रमाणे राजकीय नेत्यांनी बांधकामांना पाणी पुरवठा होतच असल्याची ओरड सुरु केली, त्यामुळे प्रशासनाने त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र कार स्वच्छता केंद्रांना होत असलेल्या पाणी पुरवठ्याविषयी कुणी चकार शब्दही काढला नाही, ही केंद्रे कुणाच्या आशीर्वादाने चालतात हे सगळेजण जाणतातच! मला खरोखरच या शहराची व नागरिकांची कीव येते, असे आणखी किती दिवस आपण स्वतःलाच फसवणार आहोत व आरशात दिसणाऱ्या आपल्या प्रतिबिंबाकडे दुर्लक्ष करणार आहोत, तरीही तो चेहरा कुरुप दिसतोय हे आपण स्वीकारत नाही! नंतरच्या महिन्यांमध्ये पावसाची कमतरचा भरुन निघाली, त्यामुळे तोपर्यंत करण्यात आलेल्या सर्व घोषणा सगळे जण विसरले, पाणी वाचवा मोहीम थंड पडली व शहरात पुन्हा पाणी वाया घालवा मोहीम सुरु झाली! म्हणूनच यावर्षी, जूनच्या उत्तरार्धापर्यंत तसेच अगदी जुलैमध्येही पाऊस पडला नाही, तेव्हा हे नेहमीचंच आहे आहे व नंतर पाऊस नक्की पडेल अशा विचाराने त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं! आता ऑगस्ट व सप्टेंबरही संपला आहे व आपण मॉन्सूनच्या परतीच्या सरींवरच अवलंबून आहोत, आपण पाण्याबाबत आतातरी जागरुक झालो आहोत का असा प्रश्न मला पडतो!

पाणी किंवा पाऊस नाही तर आपला त्याविषयीचा दृष्टिकोन ही खरी समस्या आहे, म्हणूनच मी म्हणालो की या वर्षी सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला हे एका अर्थाने चांगलेच झाले, म्हणजे आतातरी आपल्याला पाण्याशिवाय जगणं म्हणजे काय हे समजेल! मी महाराष्ट्रातील पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या विदर्भाच्या ग्रामीण भागातून आलो आहे; त्यामुळे पाणी कमी असेल किंवा अजिबात नसेल तर जीवन कसं असतं हे मला माहिती आहे. वाईट गोष्ट म्हणजे ज्या पाण्याचे दुसरे नाव जीवन असे आहे त्याबाबत पुण्यातच नाही तर संपूर्ण राज्यात आपण भूतकाळातून काहीही शिकलो नाही. यावर्षी परिस्थिती आणखी अवघड आहे व ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामामुळे किंवा इतर घटकांमुळे पावसाचे स्वरुप बदलत चालले आहे, व ही परिस्थिती अशीच राहणार आहे असे तज्ञांचे मत आहे. गेल्या वर्षी प्रत्येक महिन्यात पाऊस पडला व आता मॉन्सूनमध्ये आपल्याला पाण्याचा तुटवडा जाणवत आहे, तर वर्षभर हे पावसाचे पाणी पुरणार आहे का? पावसाचे बदललेले स्वरुप विचारात घेता आपण आत्तापर्यंत पावसाचे पाणी साठविण्यासाठी जी धोरणे वापरत आहोत ती बदलणे आवश्यक आहे (अर्थात आपल्याकडे अशी काही धोरणे अस्तित्वात असतील तर). त्याचशिवाय पाणी वाचवा ही केवळ पाऊस पडत नाही तेव्हा द्यायची एक लोकप्रिय घोषणा नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे! जल संवर्धन ही वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे व या मोहिमेमध्ये समाजाच्या प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे.

दिवाळीमध्ये गेल्यावर्षी, व दरवर्षी  फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची पातळी बरीच कमी झाली, याचे कारण म्हणजे फटाक्यांच्या प्रदूषाणाविषयी शाळकरी मुलांना जागरुक करण्यात आले. याप्रमाणे आपण शाळकरी मुलांना पाण्याचा प्रत्येक थेंब साठविण्याविषयी व त्याची बचत करण्यात त्यांची काय भूमिका आहे याविषयी जागरुक करु शकतो! पाणी बचत निर्देशांसारखे एखादे साधन तयार करा ज्याद्वारे आपल्याला प्रत्येक व्यक्ती दररोज किती पाणी वापरते व त्याविषयी जागरुक झाल्याने तो किंवा ती त्यात किती बचत करु शकतात हे समजेल. शाळकरी मुलांना त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तिच्या जल बचत निर्देशांकाची नोंद करायला व ते शाळेत सादर करायला सांगा व सर्वांत चांगल्या निर्देशांकासाठी विशेष मार्क द्या! तसेच शाळेमध्ये आठवड्यातील किमान एक तास ध्वनीचित्रफितींद्वारे पाणी व त्याचे महत्व, दुष्काळग्रस्त गावांमधील दृश्ये शहरांमधील शाळकरी मुलांना दाखवली तर त्यांना या समस्येचे गांभीर्य समजेल. आपण शाळकरी मुलांसाठी पाणी या विषयावर आधारित प्रश्न मंजूषा, कविता लेखन व निबंध लेखन स्पर्धा आयोजित करु शकतो. थोडक्यात त्यांना पाण्याचे महत्व समजावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले पाहिजेत व हा उपक्रम वर्षभर सुरु असला पाहिजे केवळ पाण्याची कमतरता असेल त्यावेळी नाही!
 त्यानंतर केवळ पीएमसीच नाही तर राज्य सरकारच्या विविध विभागांनीही पाण्याची बचत करणे अपेक्षित आहे. खरे सांगायचे तर आपल्याकडे पाण्याविषयी धोरणे तयार करणारे एकच प्राधिकरण नाही जे पाणी पुरवठा तसेच त्याचा वापर व संवर्धन यासाठी जबाबदार असेल, त्यामुळेच आपण या आघाडीवर अपयशी ठरलो आहोत! आपल्याकडे सध्या अनेक वेगवेगळे विभाग आहेत जे जलसिंचनापासून ते भूजलापर्यंत वेगवेगळे विषय हाताळतात, त्याशिवाय हा विषय हाताळणाऱ्या स्थानिक प्रशासकीय संस्था आहेत तसेच जीवन प्राधिकरण आहे, मात्र कुणी नेमके काय करायचे आहे या खेळात, कुणीच काहीच करत नाही हे तथ्य आहे, नाहीतर आपल्याला आज राज्यभर पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले नसते. या वर्षीची पाणी टंचाई केवळ राज्याच्या एखाद्या विशिष्ट भागात किंवा पट्ट्यात नाही तर जवळपास संपूर्ण राज्यात आहे, चांगला पाऊस पडणाऱ्या पट्ट्यांनाही पाणी टंचाईचा फटका बसला आहे! आतापर्यंत प्रत्येकवेळी चारपैकी एका महिन्यात चांगला पाऊस झाल्याने त्याने पावसाची उणीव भरुन काढली त्यामुळे निसर्गानेच सर्व विभागांचे अपयश झाकले, मात्र असे म्हणतात की नाकर्त्यांना देवही मदत करत नाही; पाण्याच्या बाबतीत आपले कर्तव्य पार पाडण्याबाबत आपण जो नाकर्तेपणा दाखवला आहे, त्यामुळे आता देवानेही आपली साथ सोडल्यासारखी वाटते!

 आता आपल्या राज्यातील प्रत्येक गावासाठी, शहरासाठी व महानगरांसाठी पाण्याचे धोरण तयार करण्याची वेळ आली आहे, ज्यामध्ये स्रोत, मागणी तसेच त्याचा वापर कशाप्रकारे होतो म्हणजेच पिण्यासाठी, औद्योगिक, कृषी इत्यादींचा समावेश होतो, प्रत्येक वापरकर्ता त्यांना जेवढे पाणी वाटून दिले आहे ते योग्यप्रकारे वापरतात का व त्यात बचत करतात का हे तपासले पाहिजे! या आघाडीवर पुणे शहराचे उदाहरण पाहू व त्या आघाडीवर काय परिस्थिती आहे याचे विश्लेषण करु म्हणजे आपण जल व्यवस्थापनात किती मागे आहोत हे आपल्याला जाणवेल! आपल्याला नेमके किती पाणी हवे आहे व आपण ते कसे देणार आहोत हे आपल्याला माहिती नाही. असे सांगितले जाते की पीएमसीला सोळा टीएमसी पाणी आवश्यक आहे किंवा प्रत्येक वर्षी जलसिंचन विभागाला तेवढ्या पाण्याचा उपसा करावा लागतो, मात्र यापैकी वापरकर्ते प्रत्यक्षात किती पाणी वापरतात, किती पाण्याचे संवर्धन केले जाते किंवा किती पाण्याचा पुन्हा वापर केला जातो, याविषयी काही आकडेवारी उपलब्ध आहे का? पाण्याच्या समान वितरणाचे काय कारण, बाणेर किंवा बालेवाडी यासारख्या महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट गावांमध्ये जलवाहिन्यांचे जाळेही नाही, त्यामुळे पीएमसीला जे काही पाणी मिळते ते केवळ शहरातील दोन तृतींश  लोकसंख्येसाठीच वापरले जाते. या क्षेत्रांमध्ये जलवाहिनीचे काम पूर्ण झाले तर काय होईल, त्यानंतर पाण्याचे प्रमाण पुरेल का व आणखी अठ्ठावीस गावे महापालिकेच्या हद्दीत विलीन करायची आहेत त्यांचे काय? शहरामध्ये समाविष्ट होणाऱ्या या नव्या भागासाठी आपण पाणी कुठून आणणार आहोत! पाणी जरी नंतर मिळणार असले तरीही जलवाहिन्यांचे जाळे तयार करायला काय हरकत आहे? पर्यावरणविषयक परवानगीच्या प्रक्रियेमध्ये तांत्रिक समिती विकासकाला प्रश्न विचारते की पाणी पुरवठ्याची काय सोय आहे, टँकरद्वारे पाणी पुरवठा किंवा कूपनलिका हा कायमस्वरुपी पुरवठा मानला जात नाही! या प्रश्नाची उत्तरे विकासकाला कशी देता येतील कारण पाणी, सांडपाणी व विजेसारख्या मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी नियोजन किंवा प्रशासकीय संस्थेची आहे. नाहीतर जोपर्यंत सरकार या जमिनींना पाणीपुरवठा करत नाही तोपर्यंत तो ना विकास विभाग म्हणून घोषित करा म्हणजे कुणीही या जमिनी विकत घेणार नाही. त्याचशिवाय सरकारने विकास शुल्काच्या नावावर कोट्यवधी रुपये घेऊ नयेत, जे बांधकाम व्यावसायिकांना म्हणजेच पर्यायाने सामान्य माणसाला द्यावे लागतात, व त्यानंतरही एकेक बाटली पाण्यासाठी वणवण फिरावे लागते!
त्यानंतर लोकप्रियता मिळविण्यासाठी प्रशासन बांधकाम योजनांना पाणीपुरवठा न करण्यासारख्या अल्पकालीन उपाययोजना करते! शहरातील प्रत्येक हॉटेल, उपहारगृह, अवैध झोपडपट्ट्या, उद्योग किंवा आयटी पार्कना हे का लागू होत नाही, जे बांधकाम उद्योगापेक्षा बरेच अधिक पाणी वापरतात! मला असे वाटते की प्रशासकांनी प्रसिद्धी माध्यमांना चटपटीत बातम्या देण्यासाठी किंवा अडचणीत असलेल्या तथाकथित सामान्य माणसासाठी असे हलक्या दर्जाचे डावपेच करु नयेत! परिस्थितीचा लाभ घेऊन आपण मीटरशिवाय पाणी पुरवठा नाही सारख्या योजना का राबवत नाही! आपण किती पाण्याचा पुरवठा करत आहोत किंवा किती पाणी वापरत आहोत हे माहिती असल्याशिवाय आपण व्यक्तिच्या किंवा सार्वजनिक संस्थेच्या पाण्याच्या वापरावर नियंत्रण कसे ठेवू शकतो? वर्षानुवर्षे पाणी पट्टी”, तेवढीच आहे ती वाढविण्याचा विचार करा तसेच मालमत्ता कराच्या देयकामध्ये जलवाहिन्यांचे जाळे तयार करण्यासाठीचे शुल्क समाविष्ट करा  व त्याचा त्याच कारणासाठी वापर करा

रिअल इस्टेट दृष्टीने सुद्धा पाणी हा फार महत्वाचा मुद्दा आहे कारण पुण्याची वाढ होण्यात येथील मुबलक पाणी पुरवठा हि एक जमेची बाजू आहे म्हणूनच रिअल इस्टेट उदयोगानी सुद्धा या विषयी ग्राहकांमध्ये व सामान्य नागरिकांमध्ये जन जागृतीला हातभार लावलाच पाहिजे!
शेवटचा व अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे दीर्घकालीन जल संवर्धन धोरण तयार करणे व ते अंमलबजावणीच्या योजनेसह जाहीर करणे. हे खरोखरच अतिशय अवघड काम आहे कारण प्रत्येक भागानुसार परिस्थिती वेगळी असेल, किंबहुना काही ठिकाणी नवीन स्रोत तयार करण्यापासून सुरुवात करावी लागेल व त्यानंतर संवर्धनाच्या उपाययोजना स्वीकाराव्या लागतील व त्यांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याचे पाहावे लागेल. जलस्रोतांची त्याचप्रमाणे संवर्धन यंत्रणेची ठराविक काळाने तपासणी केली जावी ज्यामध्ये पावसाच्या पाण्याच्या संवर्धनापासून ते पाण्यावर पुनर्प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांपर्यंत ते शेत तळ्यासारख्या प्रकल्पांना होणारा पुरवठा मोजण्यापर्यंत, प्रत्येक प्रयत्न योग्यप्रकारे कार्य करत असल्याची खात्री केली पाहिजे व त्याची माहिती नोंदवून ती आकडेवारीही आपल्याकडे असली पाहिजे! पाण्याशी संबंधित सर्व बाबी एकाच नियंत्रणाखाली आल्या पाहिजेत, म्हणूनच तसे करण्यासाठी एक यंत्रणा तयार केली पाहिजे. निकोलस स्पार्कच्या म्हणण्याप्रमाणे, पाणी केवळ वाया घालविण्याऐवजी आपण त्याकडून काही शिकले पाहिजे, आपण वर्षानुवर्षे ज्याप्रमाणे पाणी वाया घालवतोय त्याचप्रमाणे घालवत राहिलो तर एक दिवस आपल्याकडे वाया घालवायलाही काही शिल्लक राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे! त्याचसाठी प्रत्येक व्यक्तिचे योगदान अतिशय महत्वाचे आहे, तो किंवा ती कोणत्याही शहरातील, गावातील किंवा महानगरातील असू शकतात, कारण पाण्याला कोणताही धर्म नसतो!

 smd156812@gmail.com



संजीवनी डेव्हलपर्स

No comments:

Post a Comment