Thursday 4 February 2016

घर,शोध एका सुखाचा !



















"स्वतःच्या मालकीच्या चार भिंतीत राहण्यासारखे दुसरे सुख नाही”… जीन ऑस्टन.

घराच्या हजारो व्याख्या आहेत मात्र ही व्याख्या मला विशेषत्वाने इथे द्याविशी वाटली कारण मला वाटतं प्रामुख्याने याच कारणामुळे प्रत्येक व्यक्ती त्याचे किंवा तिचे घर घेते! आपण खरेदी करतो त्या कोणत्याही उत्पादनापेक्षा घराची गोष्ट वेगळी असते कारण तेच केवळ एक असे उत्पादन आहे जे आपल्याकडे येत नाही तर आपण त्याच्याकडे जातो व आपल्यापैकी बहुतेकांसाठी ते आयुष्यात एकदाच खरेदी केले जाते! म्हणून आपल्या खरेदीपैकी घर ही सर्वात मौल्यवान गोष्ट असते व आपल्यापैकी प्रत्येकाने दोन कारणांसाठी ते खरेदी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे; एक म्हणजे तुम्हाला तिथे अगदी स्वतःचे खाजगी क्षण अनुभवता येतात मग ते आनंदाचे असतील किंवा दुःखाचे व दुसरे म्हणजे दिवसाअखेरीस आपल्या सगळ्यांनाच अशी एक जागा हवी असते जी कुटुंबासोबत आपलं आनंदानं स्वागत करेल, यासाठी घराशिवाय दुसरे योग्य ठिकाण कोणते असू शकते!

घर म्हणजे आपल्याला सुरक्षा व आसरा देणाऱ्या फक्त चार भिंती नाहीत तर या चार भिंतींमधल्या वातावरणाने त्याला घरपण येतं, नाहीतर तुरुंगालाही चार भिंती असतातच की आणि तिथेही सुरक्षा मिळते! पण घरपण देणारे वातावरण व अशी भावना निर्माण होण्यासाठी आपलं स्वतःचं घर असणं आवश्यक आहे; आपण चार भिंती असलेली जागा विकत घेऊ शकतो, त्याला उंची फर्निचरने सजवू शकतो मात्र त्याला घर बनविणे हे फक्त आपल्याच हातात आहे! त्यासाठी प्रत्येकाने उघड्या डोळ्यांनी निवड केली पाहिजे कारण नेमकं सर्वोत्तम घर कशामुळे बनतं हा प्रश्न मी स्वतःला नेहमी विचारतो? त्यासाठी नियोजन, बांधकामाचा दर्जा, ठिकाण, नाते आणि हो सर्वात शेवटचे म्हणजे आर्थिक नियोजन या सगळ्या घटकांचा योग्य ताळमेळ बसला पाहिजे! त्याचशिवाय बरेच काही संपूर्ण प्रक्रियेवरही अवलंबून असते म्हणजेच घराचा व्यवहार कसा केला जातो यावर. याला आणखी एक पैलू आहे, ज्याचा उल्लेख करायला मला फारसं आवडत नाही ते म्हणजे घराचे गुंतवणूक मूल्य, कारण माझ्यासाठी घर ही फक्त गुंतवणूक नाही, ज्याप्रमाणे मी माझ्या मुलांना गुंतवणूक म्हणू शकत नाही, त्याचप्रमाणे घराचा गुंतवणूक म्हणून मला विचार करावासा वाटत नाही. ती एक भावना आहे, अनुभव आहे व आपण जेव्हा भावनांचा विचार करतो तेव्हा त्यांची किती दरवाढ होईल याची मोजणी करत नाही! एखाद्या व्यक्तिने घर खरेदी का करावे या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक जण वेगवेगळे देऊ शकेल, मला असे वाटते की भाड्याच्या घरात राहणेही काही चुकीचे नाही मात्र आपण भाड्याच्या घराला स्वतःचे घर म्हणू शकतो का या प्रश्नाचे उत्तर मला मिळालेले नाही. मी स्वतः माझ्या आयुष्यातला एक मोठा काळ वसतिगृहात घालवलाय व महाविद्यालयीन दिवसांत तसेच उमेदवारीच्या काळात दोन-तीन जणांसोबत भाड्याने खोली घेऊनही राहिलोय. मी राहायचो चे वसतिगृह ज्या रस्त्यावर आहे तेथुन जाताना मला अजूनही छानच वाटते. मात्र भाड्याच्या घरात आपलेपणाची किंवा मालकीची भावना नसते, मनातून कुठेतरी आपल्याला माहिती असते की आपण राहात असलेले घर भाड्याचे असल्याने एक दिवस आपण या चार भिंतींमध्ये पुन्हा येणार नाही! मात्र जोपर्यंत आपण आपले घर निश्चित केलेले नसते तसेच आपण कुठे काम करणार आहोत हे ठरवले नसते, तोपर्यंत भाड्याचे घर हा नक्कीच चांगला पर्याय आहे.

आपण रिअल इस्टेटला उद्योग म्हणतो जो घर नावाचे उत्पादन बनवतो, मात्र हे उत्पादन मला नेहमीच अचंबित करते कारण त्याची इतर कोणत्याही उत्पादनाशी तुलना करता येत नाही. बहुतेक लोक आयुष्यात एकदाच घर खरेदी करतात व त्यामागील भावनिक मूल्यामुळेच इतर कोणत्याही उत्पादनाच्या विरुद्ध घर अतिशय विशेष उत्पादन होते! मात्र त्याच वेळी आपलं स्वप्नातलं घर नेमकं कसं असावं याविषयी लोक गोंधळलेले असतात कारण त्याचे बरेच निकष असतात, ठिकाण, सुविधा, कामाच्या ठिकाणी जाण्याची सोय, मुलांचे शिक्षण व सर्वात शेवटचा पर्याय म्हणजे आर्थिक बाजू तसेच कोणता बांधकाम व्यावसायिक निवडायचा; असे कितीतरी पैलू आहेत. आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे आता रिअल इस्टेट ही विक्रेत्यांची मक्तेदारी असलेली बाजारपेठ राहिलेली नाही तर ती ग्राहकांची बाजारपेठ झाली आहे, म्हणूनच घर खरेदी करण्याची ही सर्वात योग्य वेळ आहे. मी एक बांधकाम व्यावसायिक आहे म्हणून हे म्हणत नाही, तर उघड्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहा, तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये असंख्य पर्याय व प्रस्ताव दिसतील जे आधी नव्हते हे वास्तव आहे!

तुम्हाला घर खरेदी करायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही शहर व त्याचा विकास, म्हणजेच ज्याला आपण शहराची वाढ म्हणतो ती समजावून घेतली पाहिजे व त्यानंतर घराचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे कारण त्यामुळे ठिकाण निवडण्यातला बराचसा गोंधळ टाळता येईल. रिअल इस्टेटच्या बाबतीत बोलायचे झाले तर आता पुण्याचेही प्रामुख्याने पूर्व व पश्चिम बाजू असे वर्गीकरण झाले आहे. अनेक वर्षांपासून सांस्कृतिक दरीच होतीच जेथे पूर्व भागात प्रामुख्याने देशाच्या विविध भागातून आलेल्या व व्यावसायिक वर्गातील लोकांचे वास्तव्य होते तर पश्चिम भागात अधिक प्रमाणात नोकरदार व स्थानिकांचे वास्तव्य होते व आहे. एका संपूर्ण लेखात संपूर्ण शहराचा आढावा घेणे शक्य नाही, कारण आता ते एक निवांत निवृत्तीवेतनधारकांचं गाव राहिलेलं नाही तर ते एक महानगर होत चाललंय, म्हणूनच शहराच्या पश्चिम भागाचा सर्वप्रथम आढावा घेऊ. मी इथे प्रसिद्ध नागरी नियोजक, हर्ब केन यांचे अवतरण देत आहे, त्यातून आपल्याला आपले शहर समजावून घेण्यास मदत होईल, “एक शहर त्याच्या लांबी व रुंदीतून मोजता येत नाही, तर त्याच्या दृष्टीचा विस्तार व स्वप्नांच्या उंचीद्वारे मोजले जाते”...

माणसाचा मूळ स्वभाव हा भटका आहे मात्र प्रत्येक भटक्याला एक ना एक दिवस कुठेतरी स्थिर व्हावेच लागते व ज्या ठिकाणाबद्दल तुम्हाला अतिशय जिव्हाळा वाटतो ते ठिकाण म्हणजे तुमचे शहर; मला असे वाटते शहराची ही सर्वात सोपी व्याख्या आहे! मी स्वतः अनेकदा अनेक शहरांना भेट दिली आहे व त्याबाबतीत मी अतिशय नशीबवान आहे असं मला वाटतं कारण तुम्ही जोपर्यंत वेगवेगळी ठिकाणं पाहात नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतःहून त्याची तुलना करता येणार नाही. तुम्ही चांगल्या शहराची व्याख्या कशी कराल, रस्ते, वसाहती, मॉल्स, उद्योग नेमकं कशामुळे एक महान शहर घडतं? मला असं वाटतं एक महान शहर त्यातल्या लोकांमुळे घडतं व याबाबतीत पुणे देशातील अनेक शहरांना अगदी महानगरांनाही मात देईल! आता स्मार्टपणाच्या निर्देशांकावर आपल्याला संपूर्ण देशात दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन देण्यात आले आहे. यामुळे अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात येथे होईल ज्यांचा शहराच्या विकासासाठी लाभ होईल, त्यापैकी एक म्हणजे इथे नव्याने स्थापन होणाऱ्या कंपन्यांच्या रुपाने नवीन रोजगार येईल.

शहराची संस्कृती हा तिचा सर्वात महत्वाचा कणा असतो व शहरातून मिळणाऱ्या शिक्षणातूनच ही संस्कृती विकसित होत असते; कौतुकाने पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात असंख्य शैक्षणिक संस्था आहेत ज्या आपल्या समाजाचे भविष्य घडवत आहेत व स्वाभाविकपणे त्यामुळे संपूर्ण शहराच्या संस्कृतीवर त्याचा अतिशय चांगला परिणाम होतो! पुण्याचा पश्चिम भाग शिक्षणाच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे म्हणजेच आपण शहराचा पश्चिम भाग पाहिला तर बंगलोर-मुंबई बायपासला लागून असलेला चांदणी चौक ते किवळे या साधारण २० किलोमीटरच्या पट्ट्यात जवळपास सत्तर शैक्षणिक संस्था आहेत. सिंबॉयसिस, इंदिरा, डीवाय पाटील, जेएसपीएमएस अभियंत्रिकी व अशाच इतरही अनेक महाविद्यालयांचा यामध्ये समावेश होतो! शेवटी कोणताही उद्योग वाढण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज असते व संपूर्ण देशात पुण्यात कुशल मनुष्यबळाची संख्या सर्वाधिक आहे. हाच भाग हिंजवडी आयटी पार्क या माहिती तंत्रज्ञान पट्ट्यासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये देशातील काही सर्वात मोठ्या आयटी कंपन्या आहेत व जवळपास तीन लाख लोक त्यात काम करतात! त्यानंतर पिंपरी चिंचवड औद्योगिक वसाहत तसेच तळेगाव व चाकण पट्ट्यात मर्सिडीज व फोर्डसारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्या अगदी शहराच्या जवळच आहेत! महामार्गाच्या या पट्ट्यातच प्रत्येक ऑटोमोबाईल ब्रँडची सर्विस स्टेशन तसेच शोरुम आहेत, त्यामुळे पश्चिमेकडील भागाला सर्वाधिक मागणी आहे. पुण्यातील रिअल इस्टेट उद्योग हा नेहमीच आयटी उद्योग किंवा ऑटो क्षेत्रावर अवलंबून राहिलेला आहे व अलिकडेच शिक्षणामुळेही पुणे रिअल इस्टेटसाठी अतिशय महत्वाचे क्षेत्र झाले आहे. पुण्याच्या पश्चिमेकडील भागात या तिन्ही घटकांचे मोठ्याप्रमाणावर अस्तित्व आहे. पश्चिम भागाचा आणखी एक महत्वाचा तरीही लपून राहिलेला घटक म्हणजे इथे झोपडपट्ट्यांचे किंवा अवैध बांधकामांची टक्केवारी सर्वात कमी आहे व बऱ्याच हिरव्या व खुल्या जागा आहेत ज्यामुळे आपल्याला पर्यावरण स्वच्छ ठेवायला मदत होते! त्याचशिवाय पश्चिम भाग मुंबईला अतिशय चांगल्याप्रकारे जोडला असल्याने या भागातील विकासात त्याची भूमिका अतिशय महत्वाची आहे! बाणेर किंवा वाकड या पश्चिम उपनगरांमधून द्रुतगती मार्गाने नवीन मुंबई स्वतःच्या गाडीने सुद्धा अगदी दीड तासांच्या अंतरावर आहे, यामुळे बराच वेळ वाचतो मग तुम्हाला कार्यालयात पोहोचायचे असो किंवा एखाद्या व्यावसायिक बैठकीला उपस्थित राहून घरी परत यायचे असो.

 मला असे वाटते यामुळेच रिअल इस्टेट क्षेत्राची बरीच प्रदर्शने सुद्धा केवळ पश्चिम भागावर लक्ष केंद्रित करूनच आयोजित करण्यात येत आहेत, म्हणजे ग्राहक शहराच्या पश्चिम भागात उपलब्ध असलेल्या पर्यायातून निवड करू शकतो. नवीन वर्ष सुरु झालं आहे, पहिला महिना आधीच संपलेला आहे. मागील वर्ष रिअल इस्टेटसाठी अतिशय अस्थिर होते; केवळ बांधकाम व्यावसायिकांसाठीच नाही तर ग्राहकांसाठीही, कारण खरेदी करावी किंवा नाही, किंमती आणखी कमी होतील का, तसेच तुमचा व्यवहार चांगला आहे का, ताबा लगेच मिळेल याची खात्री आहे का यासारखे कितीतरी प्रश्न असतात! रिअल इस्टेटमधील प्रत्येक व्यक्ती यावर्षी वातावरण अधिक स्थिर असेल अशी अशा करत आहे व याचा अर्थ केवळ किंमती स्थिर असतील असे नाही तर रिअल इस्टेटशी, पायाभूत सुविधांशी संबंधित धोरणे तसेच मुख्य गोष्ट म्हणजे रोजगार सुरक्षेबाबत स्थिरता असेल अशी आशा आहे. घरांवर अनेक आकर्षक प्रस्ताव दिले जात आहेत मात्र नेहमीच मूलभूत गोष्टींचा विचार करणे कधीही उत्तम; उघड्या डोळ्यांनी खरेदी करा, आजूबाजूला बाजारांती दरांशी तुलना करा, चटई क्षेत्र विक्रीयोग्य अनुपात (कार्पेट सेलेबल रेशो) यासारखे छुपे तपशील पाहा व दरांची तुलना करा. लक्षात ठेवा घराचे ठिकाण व दर महत्वाचा आहे मात्र योग्य वेळी त्याचा ताबा दिला जाईल व विक्रीनंतरची सेवा दिली जाईल याचे आश्वासनही तितकेच महत्वाचे आहे, म्हणूनच ज्यांनी पूर्वीही चांगली सेवा दिली असेल व जे लोक तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध असतील त्यांच्याशीच व्यवहार करण्यातच शहाणपण आहे! सर्वात शेवटचे म्हणजे तुम्ही किती रकमेला घर खरेदी करत आहात, मग ती आगाऊ रक्कम असेल किंवा कर्ज असेल किंवा ईएमआय नाही किंवा लगेच ताबा घ्या किंवा आठ वर्षात पैसे भरा यासारख्या योजना असतील; एक गोष्ट निश्चित आहे की कुणीही विकासक धर्मदाय कामासाठी व्यवसायात आलेला नाही व असण्याचे कारणही नाही! बाजारातील परिस्थिती उत्तम आहे व ज्याप्रमाणे ऑटोमोबाईल क्षेत्राची गाडी पुन्हा रुळावर आली असून त्याचा वेग वाढतोय, त्याचप्रमाणे रिअल इस्टेट क्षेत्राचीही परिस्थिती सुधारतेय. वैयक्तिकपणे मी मालमत्ता दर अत्यंत वेगाने वाढण्याचे समर्थन करत नाही कारण तो फार काळ टिकत नाही, त्याऐवजी स्थिर व संथ वेगच चांगला असतो जो रिअल इस्टेट क्षेत्रात सध्या जाणवतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, जमीन मर्यादित आहे व लोकसंख्या सातत्याने वाढतेय त्यामुळेच रिअल इस्टेट किंवा गृहबांधणी हा नेहमी मागणी असलेला उद्योग राहणार आहे. शेवटी आपले स्वतःचे घर कधी व कुठे खरेदी करायचे हे आपल्यावर आहे, चला तर मग निर्णय घ्या व रिअल इस्टेटमध्ये ग्राहकांसाठी अनुकूल असलेल्या काळाचा जास्तीत जास्त लाभ करू घ्या, कारण असे क्वचितच घडते!

संजय देशपांडे


संजीवनी डेव्हलपर्स


No comments:

Post a Comment