Wednesday 24 February 2016

शोध , पोलिसातल्या माणसाचा.... !























बहुतेक मध्यवर्गीय गौरवर्णीयांची पोलीसांशी गाठ पडलेली नसते जे नेहमीच शंकेखोर, उद्धट, भांडखोर व क्रूर असतात.  … बेंजामिन स्पॉक

बेंजामिन मॅकलेन स्पॉक हे अमेरिकी बालरोग तज्ञ होते ज्यांचे बेबी अँड चाईल्ड केअर हे पुस्तक, १९४६ साली प्रकाशित झाले व ते त्या काळातील सर्वाधिक खपाचे पुस्तक होते. त्यातून मातांना संदेश देण्यात आला आहे की "तुम्हाला जेवढं वाटतं त्यापेक्षा अधिक माहिती असतं. बेंजामिन यांच्या पोलिसांविषयीच्या अवतरणातून आपल्याला समजतं की सामान्य माणसाच्या मनातली पोलीस दलाविषयीची प्रतिमा अमेरिकेसारख्या प्रगत व सुसंस्कृत देशामध्येही आपल्यापेक्षा फार काही वेगळी नाही! विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशात एक गोष्ट मात्र सर्वत्र समान आहे ती म्हणजे पोलीस दलाची प्रतिमा व ती कशी आहे हे सांगायची गरज नाही! दहापैकी केवळ एक व्यक्ती पोलीसांविषयी चांगले बोलत असेल व ते देखील खाजगीत. या प्रतिमेचाच विचार करून संजीवनीला पोलीस दलासाठी काहीतरी करावसं वाटलं! मी याच विचाराने पोलीस महासंचालकांना पत्र लिहीलं, आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी केवळ मला प्रत्युत्तरच लिहीलं नाही तर प्रतिसाद दिला. परिणामी मला पुण्याच्या सहआयुक्तांनी संपर्क केला व सामान्य लोकांच्या नजरेत पोलीसांची प्रतिमा बदलण्यासाठी किंबहुना सुधारण्यासाठी काय करता येईल याविषयी चर्चा करण्यासाठी बोलावलं.

मी कुणी चमत्कार घडवून आणणारा संत महात्मा नाही, मला तसे व्हायचेही नाही. मात्र मला असे वाटते की आपण टीका करण्यात नेहमी पुढे असतो मग ती सरकार नावाच्या बिनचेहऱ्याच्या संघटनेची असो किंवा पोलीसांची असो, मात्र यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी जेव्हा काहीतरी करायची वेळ येते तेव्हा आपल्यापैकी कितीजणं पुढाकार घेतात हा प्रश्न आहे

आता इथे बरेच जण प्रश्न विचारतील की पोलीसांना दया का दाखवायची, त्यांना त्यांचे काम करण्यासाठी पैसे मिळतात; काहीजण असेही म्हणतात की आम्ही कर भरतोय व आपल्या कराच्या पैशांतून त्यांचा पगार दिला जातो त्यामुळे त्यांनी आपली सेवा केलीच पाहिजे! आपण सर्वजण कर भरतो व आपल्या सर्वांवर कुणाची ना कुणाची सेवा करायची जबाबदारी असते. मात्र काही कामे इतरांपेक्षा वरचढ असतात उदाहरणार्थ लष्कर व पोलीस. त्यांना बँकेचा लिपिक किंवा कनिष्ठ अभियंत्याऐवढे पैसे मिळतात. मात्र लष्कराच्या जवानाला किंवा पोलीसांना त्यांचे काम करताना त्यांचा जीवही गमवावा लागतो, इतर किती नोकऱ्यांमध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तिच्या जीवाला धोका असतोम्हणूनच ही कामे विशेष आहेत व ही कामे करणारी माणसेही! म्हणूनच माझ्या मनात पोलीसांना त्यांचे वलय पुन्हा मिळावे यासाठी काहीतरी करण्याचा विचार आला, मला असे म्हणायचे नाही की त्यांचे वलय पूर्णपणे नष्ट झाले आहे मात्र दहापैकी नऊ लोक जेव्हा एखाद्या संघटनेविषयी नकारात्मक बोलतात तेव्हा नक्कीच कुठेतरी काहीतरी गडबड आहे. ही प्रतिमा कोणत्याही जाहिरातींनी सुधारणार नाही, तसेच पोलीस विभागाला तशीही जाहिराती देण्याची परवानगी नसते, केवळ आपल्या स्वतःच्या कृतींमधून तसे करणे शक्य आहे. हे करण्यासाठी पोलीस शिपायाहून अधिक चांगली व्यक्ती कोण असू शकते, पोलीस दलातील सर्वात कनिष्ट श्रेणीचा हा कर्मचारी प्रत्यक्ष रस्त्यावर असतो व यालाच लोकांना तोंड द्यावे लागते!  म्हणूनच मी असा प्रस्ताव दिला की आपण शिपायांसाठी व पोलीस उप निरीक्षकांसाठी व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करू. माझा मित्र अनुज खरे व त्याच्या चमुच्या मदतीने आम्ही हे करणार होतो ज्याने वनरक्षकांसाठी अशाच प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते

खरेतर आम्हाला त्याचा कितपत परिणाम होईल याची खात्री नव्हती कारण वनरक्षकांची गोष्ट वेगळी होती, पोलीस दलाप्रमाणेच त्यांनाही अत्यंत टोकाच्या परिस्थितीत काम करायला लागतं तसंच कामामध्ये समाविष्ट धोके पोलीस दलाप्रमाणेच असतात तरीही पोलीसांना विशेषतः शहर पोलीसांना अनेक लोकांना तोंड द्यावे लागते वनरक्षक मात्र सामान्य माणसापासून दूर जंगलात असतात. त्यामुळेच आम्ही संपूर्ण प्रशिक्षणाचा भर संवाद कौशल्यावर तसेच ते करत असलेल्या कामाचे महत्व समजावून घेण्यावर दिला. नंतरचा भाग दलात नुकत्याच समाविष्ट झालेल्या तरुणांसाठी होता. ही नवीन पिढी अधिक शिकलेली आहे, पूर्वी हवालदार जेमतेम १२वी उत्तीर्ण असत व त्यांना धड मराठीही बोलता येत नसे, इंग्रजीचा तर गंधही नसे. मात्र आता या नव्या पिढीला संगणक व्यवस्थित हाताळता येतो, बरेच जण विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. मात्र काहीवेळा शिक्षण हा एक शाप ठरतो, शिपायाची नोकरी ही केवळ सरकारी नोकरी आहे ही बाब सोडली तर ती सोपी नाही. जेव्हा या तरुणांना जाणवतं की त्यांचे मित्र आरामात एसी कार्यालयात बसून काम करत आहेत तेव्हा कुठेतरी नैराश्य यायला लागतं. पोलीसांच्या कामाचे तास ठरलेले नसतात; अपेक्षांचं प्रचंड ओझं असतं, सुट्ट्या मिळत नाहीत, कौटुंबिक आयुष्य उरत नाही व त्यांना सरकारकडूनही अतिशय निकृष्ट सुविधा मिळतात! या सर्वांमुळे तुम्हाला जाणीव होते की तीन सिंह असलेला खाकी गणवेश घालणे ही फार काही आनंददायक बाब नाही व तिथेच तुम्हाला निराशा येऊ लागते. परिणामी तुम्ही हसणे विसरता, तुमच्याकडे जे कोणी येईल त्याच्यावर तुम्ही रागाचे खापर फोडता, सामान्यपणे हा राग तुमच्याकडे येणाऱ्या सामान्य नागरिकावर काढला जातो किंवा तुम्ही कोणत्या तरी व्यसनाच्या आहारी जाता! 

पुण्याचे सह पोलीस आयुक्त श्री सुनील रामानंद यांनी केवळ आमची संकल्पना ऐकूनच घेतली नाही तर लगेच डीसीपी श्री. तुषार दोशी यांना संपर्क केला व प्राथमिक चर्चेनंतर शहराचा पश्चिम भाग नियंत्रित करणाऱ्या झोन १ मधील पोलीसांच्या चमूसाठी आम्ही पहिले सत्र आयोजित केले! त्यानंतर विख्यात फिटनेस ट्रेनर श्री. अरुण यादव, फोर्ब्ज मार्शल मधील कार्यकारी कर्मचारी तसेच आरोग्य देखभाल व स्वच्छता या विषयातील तज्ञ श्रीमती मेघना पेठे यांनाही सहभागी करून घेतलं. अनुज व आनंद कोलारकर यांनी स्वतःहून संघाची उभारणी व संवाद याविषयावर तर वन्य जीवनासंदर्भात जागरुकता या विषयावर आयएफएस अधिकारी व मुख्य वन संरक्षक (फॉरेस्ट कंझरव्हेटर) असलेल्या श्री. नितीन काकोडकर यांनी वन्य जीवनाविषयी त्यांचे अनुभव सांगायचे ठरवले व राज्यातील वन्य जीवनाचा वारसा याविषयी अतिशय सुरेख सादरीकरण दिले. मी इथे सहभागी झालेल्यांचा काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया देत आहे ज्यामुळे तुम्हाला प्रशिक्षणाचा काय परिणाम झाला हे कळेल. पहिल्या दिवशी सकाळी साधारण पन्नास एक पुरुष व महिला पोलीस जमा झाले, त्यांच्या चेहऱ्यावर जरा गोंधळलेले भाव होते, कारण नेमकं कशाचं प्रशिक्षण असणार आहे हे त्यांना माहिती नव्हतं. आम्ही दरवाजावर होतो व सहभागी झालेल्यांचं स्वागत करत होतो व ते नेहमीच्या गंभीर चेहऱ्यानं आत येत होते, त्यावर अजिबात हसू नव्हतं (असंही तुम्ही कधीही हसऱ्या चेहऱ्याचा पोलीस पाहिला आहे का ते मला सांगा?)! जेव्हा डीसीपी तुषार दोशी तसेच क्रेडई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलालजी कटारिया यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाला सुरुवात झाली तेव्हा आम्ही या प्रशिक्षणाची संकल्पना समजावून सांगितली, मात्र तरीही सहभागी झालेले पोलीस कर्मचारी इथे काय शिकणार आहेत याची त्यांना कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा सहभागींचे स्वागत करण्यासाठी पुन्हा दरवाजावर गेलो, तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य होते व प्रत्येक जण आम्हाला गुड मॉर्निंग म्हणत होता! प्रशिक्षणामध्ये आम्ही त्यांना मुद्दाम विचारलं की पोलीस ठाण्यात येणाऱ्या व्यक्तिचं तुम्ही कधी हसून स्वागत केलं आहे का किंवा त्यांना गुड मॉर्निंग म्हटलं आहे का? आम्हाला कधीच नाही असं उत्तर मिळालं ज्याचं आम्हाला आश्चर्य वाटलं नाही! अनुजनं त्यांचे संघ बनवले व त्यांना खेळ खेळायला लावले. ज्यामध्ये काहींना पोलीसांची, काहींना गुन्हेगाराची तर इतर सहभागींना ते एकमेकांशी कसे वागतात याचे निरीक्षण करण्याची भूमिका देण्यात आली होती. आपण लोकांशी कसे वागतो याचे प्रतिबिंब पाहायला मिळाल्यानंतर हास्याची कारंजी उडत होती मात्र त्यासोबत त्यांना आपल्या त्रुटीही समजल्या! वन्य जीवन वारसा या विषयावरील सादरीकरणात त्यांनी पांढरा वाघ म्हणजे काय, साप उडतो का असे अनेक प्रश्न विचारले व श्री काकोडकर यांनीही प्रत्येकाची आनंदाने उत्तरे दिली! सुदृढ मन व शरीर तसेच आपण परिसर स्वच्छ ठेवला तर आपली कामाची जुनी जागाही किती चांगली दिसू शकते या विषयावरील व्याख्यान अतिशय महत्वाचे होते! या सत्रांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न तसेच एकूण वातावरण अतिशय औत्सुक्याचे तसेच उत्साहाचे होते. जेव्हा एका पोलीस शिपायाने जनुकीय बदलांविषयी चर्चा केली तसेच माणसाची उत्क्रांती माकडापासून झाली असेल तर या प्रक्रियेमध्ये विकासाचे मधले टप्पे हरवले का असे विचारले तेव्हा मी आश्चर्यचकितच झालो! याआधी कधीही न अनुभवलेले ज्ञान त्यांना मिळत होते मग ते आरोग्याविषयी असो, स्वच्छता, वन्यजीवन किंवा व्यवस्थापन या विषयाचे असो! हे केवळ कायदा, न्याय याच्या प्रशिक्षणाहून वेगळे होते, त्यांना एक अधिक चांगला माणूस म्हणून घडविण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांना जाणवले. समारोपाच्या सत्रात आम्ही त्यांना काय वाटले हे व्यक्त करायला सांगितले. पुढील वर्षी निवृत्त होणाऱ्या एका शिपायाने सांगितले की तो त्याच्या कारकिर्दीत असंख्य प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला मात्र हे प्रशिक्षण सर्वोत्तम होते व पहिल्यांदाच पोलीसातल्या माणसाला केंद्रस्थानी ठेवून कार्यक्रम तयार करण्यात आला होताएका शिपायाने सांगितले की आत्तापर्यंत केवळ डीजी किंवा आयुक्तच पोलीस विभागाचे ब्रँड दूत आहेत असे त्याला वाटायचे, मात्र आज त्याला जाणीव झाली की तो त्यांच्या विभागाचा सर्वोत्तम दूत आहे!

महिला शिपाईही अतिशय आनंदी होत्या, केवळ गस्त घालणे तसेच गुन्हे नियंत्रण याशिवाय इतर बाबींचे ज्ञानही किती आवश्यक आहे याची जाणीव झाल्याचे त्या म्हणाल्या, तसेच या प्रशिक्षणामुळे अतिशय ताजेतवाने वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले! त्या लाजत असेही म्हणाल्या की, “सर कृपया आमच्या वरिष्ठांना असे परिसंवाद दर सहा महिन्यांनी आयोजित करायला सांगा, यामुळे आम्हाला अतिशय आनंदी व तणावमुक्त वाटले!” इथे मला आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे या कार्यक्रमासाठी श्रेयस हॉटेल व मंदार चितळे व त्यांच्या चमूने जेवणाची सोय केली होती. त्यांना सर्व सहभागींची अतिशय चांगली बडदास्त ठेवली. सर्व सहभागी जेवणाचा दर्जा व बडदास्त पाहून अतिशय आश्चर्यचकित झाले कारण कोणत्याही प्रशिक्षणात किंवा बंदोबस्ताच्या वेळीही त्यांची एवढी काळजी घेतली जात नाही! अनेक जणांनी कामाच्या वेळी त्यांना येणारे अनुभव सांगितले ज्यामुळे ते यंत्रणेबाबत थोडे निराश झाले व चिडले होते. मात्र इथे त्यांनी मान्य केलं की ते आपल्या कामाकडे अधिक सकारात्मकपणे पाहतील व चेहऱ्यावर हास्य ठेवतील! या प्रशिक्षणाचा सकारात्मक परिणाम म्हणजे सहभागींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या व या प्रक्रियेमध्ये त्यांचा कामाविषयीचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट झाला!

मला असे वाटते की त्या ज्येष्ठ शिपायाने जे सांगितले त्यातून अशा प्रशिक्षणाची गरज व्यक्त होते, म्हणजेच पोलीसातल्या माणसावर लक्ष केंद्रित करणारे प्रशिक्षण. आपण सर्वजण पोलीसांनी नेहमी सतर्क असावे, कर्तव्य बजावण्यासाठी नेहमी उपलब्ध असावे अशी अपेक्षा करतो मात्र पोलीसातल्या माणसाप्रती आपल्या कर्तव्याकडे साफ दुर्लक्ष करतो! सामान्य माणूस व पोलीसांमधील दरी वाढण्याचे हेच मुख्य कारण आहे, कारण दोघेही दुसऱ्यात सुधारणा झाली पाहिजे असा विचार करतातआमच्या प्रयत्नांना यश आलं किंवा नाही हे काळच सांगेल मात्र आम्ही किमान प्रयत्न केला हे महत्वाचं! मला, अनुज व आमच्या चमूला अतिशय समाधान वाटलं की आमच्या अंगावर खाकी गणवेश नसला तरीही काही काळ आम्हीही पोलीस दलाचा एक भाग झालो होतो. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांमध्येही एक पोलीस दडलेला आहे, मात्र इतरांनी आपले कर्तव्य करावे अशी आपण अपेक्षा करतो! आपण जर आपल्यातला पोलीस समजावून घेतला व जागा केला तरच आपल्याला कोणत्याही पोलीसातला माणूस शोधण्याचा अधिकार आहे! यात सर्वात महत्वाचे होते ते म्हणजे डीजी श्री. प्रवीण दीक्षित यांनी असे प्रयत्न आवश्यक आहेत हे समजावून घेतले तसेच मला वॉट्सऍप करून, त्यांचा ईमेल पत्ता तसेच सेल क्रमांक सहभागींना देण्याची परवानगी दिली म्हणजे ते प्रशिक्षणाविषयीच्या प्रतिक्रिया थेट त्यांना पाठवू शकतील!
सर्वात शेवटी, एका तरुण शिपायाचा अनुभव आवर्जुन सांगावासा वाटतो. दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणाच्यावेळी माझ्याशी बोलताना तो जेमतेम तिशीतला शिपाई म्हणाला, ”सर गेल्या दहा वर्षांच्या सेवेत आज पहिल्यांदा चेहऱ्यावर हसू घेऊन घरी गेलो व झोपलोही हसतच, प्रशिक्षणातले आमचे सांघिक खेळ व विविध क्षण आठवत होतो, मला इतक्या आनंदात पाहून माझ्या बायकोला अतिशय आश्चर्य वाटलं"! मला असं वाटतं आमच्या प्रयत्नांबद्दल करण्यात आलेलं हे सर्वोत्तम कौतुक होतं किंवा प्रतिक्रिया होती; मी देखील त्याला प्रत्युत्तरादाखल फक्त हसलो, कारण एका पोलीसानं दिलेल्या या प्रतिक्रियेला मी याहून अधिक चांगली प्रतिक्रिया काय देऊ शकत होतो!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स






No comments:

Post a Comment