Thursday 28 July 2016

शोध, जय नावाच्या वाघाचा !






















निसर्गात काहीही योगायोगाने घडत नाही”… रिस्टॉटल

या महान तत्त्ववेत्त्यानं किती नेमक्या शब्दात निसर्गाविषयी किती महत्वाची गोष्ट सांगितली आहे; अलिकडेच निसर्गप्रेमी लोकांमध्ये एका बातमीवरून भरपूर गदारोळ झाल्याने मला हे अवतरण आठवले! विदर्भातल्या एका जंगलातून जय नावाचा एक वाघ नाहीसा झाला त्याविषयी ही बातमी होती. जंगलात सगळीकडे त्याचा शोध घेऊन झाला, समाज माध्यमांवरही त्याविषयी माहिती देण्यात आली. कोणत्याही प्राण्यासाठी आत्तापर्यंत इतका शोध घेतला नव्हता. या शोधात स्वयंसेवी संघटना, वन अधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, गावकरी व अगदी पोलीस विभागाचाही समावेश होता. क्लॉ नावाच्या वन्यजीव छायाचित्रकारांच्या एका गटाने जयविषयी काही ठोस माहिती/पुरावा म्हणजेच छायाचित्रे किंवा तो शेवटचा कुठे दिसला यासारखी माहिती देणाऱ्या व्यक्तिला ५०,००० रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. कदाचित काही जणांना आश्चर्य वाटेल की, एक वाघ नाहीसा झाला तर त्यात काय एवढं मोठसं? आपल्या देशात अंदाजे दोन हजार वाघ असताना एखादा नाहीसा झाला तर काय फरक पडणार आहे! तसंच आपण दररोज वाघ किंवा इतर वन्य प्राणी शिकार किंवा रस्त्यावरील अपघात, तसंच प्रदेशांवरून होणारी भांडणे यासारख्या शेकडो कारणांनी मारले गेल्याच्या बातम्या ऐकत नाही का? त्यात आता आणखी एका वाघाची भर पडली आहे व त्याचं नाव जय आहे, बस्स!
अशा अजाण आत्म्यांना मी दोष देत नाही कारण त्यापैकी बहुतेक महानगरांमध्ये किंवा शहरांमध्ये राहतात, त्यांना आधीच रोजच्या जगण्याच्या अनेक चिंता असताना, त्यात आणखी दूर कुठल्या तरी जंगलात एक वाघ नाहीसा झाल्यामुळे त्यांनी चिंता करावी अशी अपेक्षा आपण करू शकत नाही! तरीही या विषयावरून एवढा गदारोळ का झालाय व हा जय कोण आहे याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. जे राष्ट्रीय अभयारण्य किंवा व्याघ्र प्रकल्पांना नियमितपणे भेट देतात त्यांना माहिती आहे की कान्हा अभयारण्य किंवा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प किंवा रणथंबोर किंवा कॉर्बेट यासारखी विविध अभयारण्ये संरक्षित क्षेत्रे आहेत व विविध कारणांनी चर्चेत असतात.. त्याचवेळी काही लहान व्याघ्र प्रकल्पही आहेत जे लोकांना फारसे माहिती नसले तरी, वन्यजीवप्रेमींमध्ये बरेच लोकप्रिय आहेत. या व्याघ्रप्रकल्पांची संकल्पना देशभरात वाघांचं व त्यांच्या आजूबाजूला असलेल्या जंगलाचं संरक्षण व संवर्धन करण्यासाठी १९७२ साली मांडण्यात आली. हे प्रकल्प देशभरात पसरलेल्या जंगलांचे राखीव भाग असतात, ज्यामध्ये वन विभागाला वन्यजीव संरक्षणासाठी अनेक अधिकार दिले जातात. या क्षेत्रांमध्ये वाघ केंद्रस्थानी असतो व यामुळे वाघासोबतच जंगलांमधील इतर प्रजातींचे रक्षण होईल याची खात्री सरकार करू शकते. सुरुवातीला असे केवळ बारा प्रकल्प होते, मात्र ते अतिशय उपयोगी ठरल्याने, आता व्याघ्रप्रकल्पांतर्गत जवळपास पन्नासहून अधिक अभयारण्ये किंवा व्याघ्रप्रकल्प आहेत. या व्याघ्र प्रकल्पांसाठी कायदेशीर अधिकार देण्यासोबतच, स्थानिक सरकारांना भरपूर निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे, म्हणजे ते हा निधी व्याघ्रप्रकल्पांतर्गत वाघांच्या संवर्धनासाठी वापरू शकतील. मी जेव्हा वाघांचे संवर्धन हा शब्द वापरतो तेव्हा त्यात फक्त वाघच नाही तर तो जिथे जगतो त्या संपूर्ण परिसराचे संवर्धन असा अर्थ अभिप्रेत आहे. त्यामध्ये जंगलातील झाडाझुडुपांसह तिथल्या स्थानिक लोकांची काळजी घेण्याचाही समावेश होतो, मग ते जंगलात किंवा आजूबाजूला राहणारे आदिवासी असतील किंवा गावकरी असतील. इथे पुण्यात माझ्या दहाव्या मजल्यावरच्या घरात बसून मला वाघ फार आवडतो असं म्हणणं सोपं आहे. मात्र ज्या भागात वाघाचा दिवसंरात्र वावर असतो, तिथे कुडामातीच्या झोपडीत राहून मला वाघ फार आवडतो असं म्हणणं अवघड आहे, बरेच जण ते करू शकत नाहीत! म्हणून मनुष्य व प्राण्यांमधील संघर्ष टाळणे हे व्याघ्रप्रकल्प नियंत्रित करणाऱ्या वनविभागाचे मुख्य काम आहे, कारण अशा संघर्षात प्राण्याचा पराभव होणार हे निश्चित असते!
आता तुम्हाला व्याघ्रप्रकल्प म्हणजे काय व वाघांच्या संवर्धनामध्ये वनविभागाची काय
भूमिका असते हे समजलं असेल. आजकाल पर्यटनामध्ये वन्यपर्यटन ही एक फॅशनच 
झाली आहे, याविषयी पूर्णपणे आदर राखत मी फॅशन हा शब्द वापरलाय, कारण तिथ
अत्याधुनिक कॅमेरे घेऊन जायचे आणि वाघांची छायाचित्रे समाज माध्यमांवर टाकायची 
अशी आजकाल पद्धत झाली आहे. डिजिटल कॅमेऱ्यांमुळे पूर्वी रिळाच्या कॅमेऱ्यामुळे जेवढे
 अवघड जायचं तेवढं छायाचित्रण अवघड राहिलेलं नाही व ते स्वस्तही झालं आहे
व्याघ्र प्रकल्पांमध्ये सफारीसाठी जाणं खार्चिक असतं मात्र आपल्या देशात अनेक तरूण 
नवश्रीमंत आहेत ज्यांना ते परवडू शकतं. मात्र त्यासोबत अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे 
जंगलात जाणारे, तसंच छायाचित्रणासोबतच वन्यजीवांच्या संवर्धनासाठी बरंच काही करणारे 
अनेक जण आहेत हे देखील खरे आहे. या वन्यजीव पर्यटनामुळे व्याघ्र प्रकल्पांना मिळणारं मोठं 
उत्पन्न जंगलांच्या कल्याणासाठी वापरलं जातं जे तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच अधिकाधिक
 लोकांनी जंगलात जावं यावर देशभरातल्या सर्व राज्यांमधील पर्यटन तसंच वनविभागाचा भर 
असतो. वन्यजीवप्रेमींना तसंच पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पांकडे आकर्षित करण्यासाठी वाघांशिवाय 
आणखी चांगला ब्रँड अॅम्बेसेडर कोण असू शकतो! म्हणूनच प्रत्येक अभयारण्यामध्ये एखादा वाघ
 तिथलं विशेष आकर्षण असतो. कान्हा अभयारण्यात मुन्ना नावाचा वाघ आहे, त्याच्या 
कपाळावरील काळ्या पट्ट्यांमधून कॅट अशी अक्षरे नैसर्गिकपणे तयार झाली आहेत. ताडोबामध्ये
बाघडोह नावाचा वाघ आहे व रणथंबोरमध्ये सुलतान आहे, त्याला माणसांवर हल्ला केल्यामुळे
 ताब्यात ठेवण्यात आलं होतं. या मुद्द्यावरूनही समाज माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली व 
मिश्र प्रतिक्रिया उमटल्या. कॉर्बेटमध्ये शर्मिली नावाची वाघीण आहे व पेंच व्याघ्र प्रकल्पांत 
कॉलरवाली नावाची वाघीण आहे, तिने गेल्या काही वर्षात बारा बछड्यांना जन्म दिला आहे, 
जंगलासाठी हे अतिशय मोठं योगदान आहे. बांधवगढ व्याघ्र प्रकल्पामध्ये बी२चार्जर असे
 दोन अतिशय मोठे वाघ आहेत व नागझिरामध्ये देंडू नावाचा वाघ आहे. या बहुतेक वाघांची 
नावं जंगलातल्या गाईडनी ठेवली आहेत. ही नावं त्यांच्या सवयी किंवा वाघ ज्या परिसरात
 नेहमी फिरत असतो त्याच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत! पट्याच्या वाघिणीला 
कॉलरवाली असं नावं पडलंय कारण तिला रेडिओ कॉलर लावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 
नागपुरजवळच्या उमरेड खरंडला या तुलनेने नव्या व्याघ्र प्रकल्पाचं मुख्य आकर्षण आहे 
जय नावाचा एक मोठा नर वाघ. वर उल्लेख केलेल्या वाघांना प्रसिद्धी मिळण्याचे 
कारण म्हणजे, ते जयसारखे आकाराने मोठे आहेत व दुसरे म्हणजे पर्यटकांना 
त्यांना पाहायची सवय लागलेली असते व ते नेहमी सहजपणे दिसतात त्यामुळे 
त्यांची छायाचित्रे घेता येतात; बहुतेक पर्यटक वाघांची एक झलक पाहायला मिळावी 
यासाठी व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात. जेव्हा एखादा वाघ नियमितपणे व सहजपणे 
दिसतो, तेव्हा ते अभयारण्य त्या वाघाच्या नावाने ओळखला जाणे स्वाभाविक आहे! 
अशाचप्रकारे युकेडब्ल्यूएस या टोपणनावाने ओळखले जाणारे उमरेड खरंडला अभयारण्य 
जयसाठी प्रसिद्ध होते. धष्टपुष्ट शरीर, त्याला साजेसा भारदस्त चेहरा, झुपकेदार आयाळ, 
पर्यटकांच्या कॅमेऱ्यांमुळे न दचकणारा जय लवकरच वन्यप्रेमींचा लाडका झाला, युकेडब्ल्यूएसच्या
 हजारो पर्यटकांनी आत्तापर्यंत प्रत्येक समाज माध्यमांवर जयची छायाचित्रे टाकली आहेत!

मात्र गेल्या पाच एक महिन्यांपासून युकेडब्ल्यूएसमध्ये जय दिसत नसल्याच्या बातम्या यायला लागल्या. पहिले काही आठवडे कुणालाच यात काळजी करण्यासारखं काही वाटलं नाही कारण जंगलाचं क्षेत्रं बरंच मोठं असतं त्यामुळे नर वाघ सगळीकडे फिरत असतात. सामान्यपणे नर वाघ ५० चौ.कि.मी. ते १०० चौ.कि.मी. क्षेत्रात शिकारीसाठी फिरू शकतो. अनेकदा वाघ एका दिवसात ३० किमी चालू शकतो त्यामुळे काही दिवस एखादा वाघ दिसला नाही तर त्यात काही विशेष नाही. तसंच वाघ समागमाच्या काळात वाघीणीच्या मागे असतो तेव्हा त्याला एकांत हवा असतो, त्यामुळे जयचं न दिसणं वावगं नव्हतं. मात्र हळूहळू दिवस जाऊ लागले व तरीही जय दिसला नाही, तेव्हा पर्यटकांना विशेषतः नियमितपणे येणाऱ्यांना जय दिसत नसल्याबद्दल काळजी वाटायला लागली. जय नेहमी दिसायचा व तो जवळपास चार महिन्यांपासून दिसत नसल्यामुळे परिस्थिती नक्कीच चिंताजनक होती. वनविभागाकडेही जयविषयींच्या चौकशींचा मारा सुरु झाला व समाज माध्यमांवरही जयला काय झालं याविषयी चर्चा सुरु झाल्या. याविषयी अनेक तर्क मांडले जात आहेत, वाघ एका अभयारण्यातून दुसऱ्या अभयारण्यात जाऊ शकतात, विशेषतः विदर्भामध्ये अजूनही अशाप्रकारचे काही मार्ग अस्तित्वात आहेत. हे मार्ग किंवा पट्टे दोन जंगलांमधल्या भागांना जोडतात, वन्य प्राणी याच मार्गाने एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जातात. या पट्ट्यांमध्ये मानवी वस्ती नसते किंवा माणसे याचा फारसा वापर करत नाहीत, त्यामुळे या पट्ट्यांतून जायला प्राण्यांना सुरक्षित वाटतं. वाढत्या शहरीकरणामुळे असे अनेक पट्टे नष्ट झाले आहेत; पन्नास साठ वर्षांपूर्वी भारतातल्या बहुतेक भागांमध्ये जंगले अशा पट्ट्यांनी जोडलेली होती व प्राणी त्यातून बराच लांबचा प्रवास करू शकत व त्यामुळे त्यांना जगणं आणखी सोपं होतं. अलिकडच्या काळात कान्हातली एक वाघीण जवळपास १५० किमीचा प्रवास करून पेंच व्याघ्र प्रकल्पात सापडली. त्यामुळे असा एक तर्क मांडला जात होता की जयसुद्धा प्रवास करत पेंच किंवा ताडोबात किंवा दुसऱ्या एखाद्या जवळच्या अभयारण्यात गेला असेल. मात्र तिथल्या वन कर्मचाऱ्यांनी किंवा स्थानिकांनी असा कोणताही नवीन मोठा वाघ त्यांच्या भागात दिसला नसल्याचं सांगितलं. तसंच जयसारखा मोठा वाघ सहज कुणाच्याही नजरेतून सुटणार नाही, कारण इतक्या लांबचा प्रवास करताना कुणालातरी तो नक्कीच दिसला असता किंवा त्याच्याविषयी काही सांगितले असते हे स्वाभाविक आहे.

त्याशिवाय जयला दोनदा रेडिओ कॉलर लावली होती; वन विभाग विशेष वाघ किंवा बछडे असलेल्या वाघिणींसाठी रेडिओ कॉलर वापरतात म्हणजे त्यांना रेडिओ सिग्नद्वारे त्यांची हालचाल किंवा ठिकाणावर लक्ष ठेवता येतं. जयच्या बाबतीत या रेडिओ कॉलरचाही काही उपयोग झाला नाही व वन विभाग व रेडिओ कॉलर लावण्याच्या कामाचे निरीक्षण करणाऱ्या संस्थेदरम्यान आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. या संस्थेनं असंही सांगितलं की अति उच्च विद्युतदाबाच्या वाहिन्यांच्याभोवती प्राणी फिरत असतील तर रेडिओ कॉलर काम करत नाही, हा सगळा भाग औष्णिक विद्युत प्रकल्पांचा असल्यामुळे अशा विद्युतवाहिन्या सगळीकडेच असतात! मात्र तांत्रिक जाणकार व्यक्ती हा युक्तिवाद स्वीकारायला तयार नाहीत, अशी परिस्थिती असेल तर ही अडचण इतर वाघांच्या बाबतीत का आली असा त्यांचा प्रश्न आहे. आणखी एक तर्क म्हणजे शिकार, मात्र एवढ्या मोठ्या वाघाला मारणं सोपं काम नाही. शिकारीच्या बहुतेक प्रकरणात स्थानिकांचा सहभाग असतो, कारण त्यांनाच वाघ नेमक्या कुठल्या भागात असेल याविषयी माहिती असते, म्हणजेच शिकार झाली असती तर त्यामध्ये बऱ्याच जणांचा सहभाग असता व कुणीतरी काहीतरी बोलले असते. आणखी एक तर्क म्हणजे नैसर्गिक मृत्यू, जय नैसर्गिक मृत्यू होण्यासाठी फारच तरूण होता मात्र सर्पदंश किंवा दुसऱ्या वाघाशी झालेल्या झटापटीत मृत्यू होण्याची शक्यता असते. रेडिओ कॉलर असली किंवा नसली तरीही मृतदेह दिसून आला असता कारण वन विभागाचे कर्मचारी जंगल विस्तीर्ण असलं तरीही त्याचा कानाकोपरा शोधत आहेत. वाघ केवळ शिकारीसाठी सावज कमी असेल किंवा पाणी पुरेसं नसेल तरच दुसऱ्या जंगलात स्थलांतर करतो, मात्र जयच्या बाबतीत ही दोन्हीही कारणं नव्हती. वाघाच्या स्थलांतराचं आणखी एक कारण म्हणजे गावकऱ्यांचा फार हस्तक्षेप असेल तर त्यांच्या हालचालींमुळे वाघांना त्रास होतो. कधी पाळीव प्राणी त्यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी शिरतात, तर कधी माणसे झाडे कापण्यासारख्या अवैध कामांसाठी तिथे जातात! जयच्या बाबतीत शिकारीपासून ते स्थलांतरापर्यंत कोणताही तर्क लागू न झाल्यामुळे, वनविभागाने एक व्यापक शोधमोहीम हाती घेतली व त्यामध्ये स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करून घेतलं. एखाद्या हरवलेल्या वन्यप्राण्याला शोधण्यासाठीची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी शोधमोहीम असावी!

डिस्नेचा काही दिवसांपूर्वी फाईंडिंग निमो नावाचा एक अत्यंत सुंदर चित्रपट येऊन गेला; त्यात एक बाबा मासा आपल्या हरवलेल्या मुलाचा संपूर्ण पॅसिफिक समुद्रात कसा शोध घेतो याची गोष्ट होती. तो निमेशनपट होता, त्यामुळे समुद्रात एक लहानसा मासा शोधणं सोपं होतं, मात्र जेव्हा एका वाघाला हजारो चौरस किमीच्या जंगलात शोधायचं असतं तेव्हा आपल्याला आपल्या तंत्रज्ञानाच्या मर्यादा जाणवतात. जय हरवल्यामुळे वनविभागाच्या किंवा वन विभागातील यंत्रणेच्या त्रुटी स्पष्टपणे समोर आल्या. पोलीसांचं जसं खबरींचं जाळं असतं तसं आपण पैसे देऊन खबरींचं जाळं का तयार करू शकत नाही, जे वन विभागासाठी काम करतील व व्याघ्र प्रकल्पात व आसपासच्या परिसरात बाहेरून आलेल्या लोकांच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवतील? वन विभाग कर्मचाऱ्यांचं अपुरं संख्याबळ व तंत्रज्ञानामुळे पूर्ण जंगलावरही लक्ष ठेवू शकत नाही, त्यामुळे एखाद्या वाघावर लक्ष ठेवणं तर लांबच राहीलं. म्हणून एक वेगळा दक्षता विभाग असला पाहिजे व आपल्याला वाघांची खरंच काळजी वाटत असेल तर सरकारने वन विभागाला सशक्त केलं पाहिजे! त्याचशिवाय वन्यजीवांवर लक्ष ठेवण्यासाठी हवाई टेहळणी व द्रोण कॅमेऱ्यांचा वापर करता येईल, ही कदाचित अतिशयोक्ती वाटेल मात्र आपल्याकडे जेमतेम २००० वाघ राहिले असतील तर हा खर्चही करणं आवश्यक आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे. त्याचशिवाय आपण वाघांसारख्या प्राण्यांमध्ये मायक्रोचिप घालण्याचा विचारही करू शकतो, मी काही इलेक्ट्रॉनिक्स विषयातला तज्ञ नाही मात्र बाँडपट अशा उपकरणांविषयी आपल्या ज्ञानात बरीच भर पाडतात, आपण ती इथे का वापरून पाहू शकत नाही? त्याचवेळी वन्यजीव पर्यटनासाठी संपूर्ण जंगल खुलं करा कारण वन्यजीवप्रेमी हे वन विभागाचे एकप्रकारे डोळे व कान असतात. त्यांच्यामुळेच जय नाहीसा झाल्याचं लक्षात आलं व त्याचा शोध घेण्यासाठी यंत्रणेला हालचाल करणं भाग पडलं! सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्यातरी निर्णयामुळे व्याघ्र प्रकल्पांचा केवळ २०% भाग पर्यटकांसाठी खुला केला जातो व त्यामुळेच प्राणी हरवल्यास त्याकडे दुर्लक्ष होतं. वाघ संरक्षण कक्षाचे प्रमुख असलेले पंतप्रधान यात लक्ष घालतील का व याविषयी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागतील का, म्हणजे वाघांच्या संवर्धनाच्या दिशेनेच एक पाऊल टाकले जाईल? पर्यटनामुळे वन्यजीवनात अडथळा निर्माण होऊ शकतो. मात्र योग्य प्रकारे निरीक्षण करून, वाहनांची संख्या नियंत्रित ठेवून व पुरेसे कर्मचारी संख्याबळ असेल तर आपण संपूर्ण जंगल पर्यटकांसाठी खुलं करू शकतो. शेवटी आपणच जंगलाचे मुख्य, राखीव व पर्यटन असे विभाग पाडले आहेत; मात्र वाघांसाठी ते केवळ एकच जंगल आहे!

जय हरवण्यामागचं कारण काहीही असेल, मात्र त्याचा जर अनैसर्गिक मृत्यू झाला असेल तर वन्यजीवनाचं ते मोठं नुकसान आहे! देशात गेल्या वर्षभरात जवळपास ५० वाघांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. बहुतेक प्रकरणांमध्ये मानवी अतिक्रमण किंवा संघर्ष हे मुख्य कारण होतं. एकीकडे आपण वाघांची लोकसंख्या वाढत असल्यामुळे आनंदी आहोत व दुसरीकडे आपण त्यांचे मृत्यू रोखू शकत नाही, अशावेळी वाघांच्या संवर्धनाच्या बाबतीत पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशीच परिस्थिती होईल.  महान तत्त्ववेत्त्याच्या वरील अवतरणात म्हटल्याप्रमाणे, जयचं नाहीसं होणं हा निव्वळ योगायोग नाही; तो आपल्यासाठी धोक्याचा इशारा आहे. मात्र आपण तो इशारा समजून घेतला पाहिजे, आज जयचं असं झालं उद्या बागडोह किंवा कॉलरवालीच्या बाबतीतही होऊ शकतं. हळूहळू वाघ नावाची प्रजातीच जंगलातून नामशेष होईल. म्हणूनच फार उशीर होण्याआधी कामाला लागू व अशी एक यंत्रणा तयार करू ज्यात जय हरवणार नाही तर आनंदाने त्याच्या हक्काच्या जंगलातच म्हातारा होईल, निसर्ग त्यासाठीच तर आहे!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स






No comments:

Post a Comment