Wednesday 10 August 2016

मैत्री दिवस आणि नागपंचमी !






















तुम्ही काय साजरं करता, यावरून तुम्ही ज्या समाजात राहता तो कसा आहे ठरतं!”… अरिस्टॉटल.

या महान तत्ववेत्त्याची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, ज्याने अतिशय साध्या सोप्या शब्दातून जीवनाचे तत्वज्ञान मांडले आहे. पुण्यातल्या एका आघाडीच्या दैनिकात अलिकडेच आलेल्या एक बातमीने मला सणांविषयीचे हे वरील विधान आठवले. ज्यांना हिंदू संस्कृतीबद्दल थोडीफार माहिती आहे ते श्रावण महिन्याचे महत्व जाणतात. या महिन्यापासून सणवार व व्रतवैकल्यांना सुरुवात होते. या महिन्यात अनेक लोक शंकराचा म्हणून सोमवार, सूर्याचा म्हणून रविवार असे उपवास करतात. श्रावणची सुरुवात होते ती नागपंचमी या विशेष सणापासून, श्रावणाच्या या पाचव्या दिवशी गावताल्या सगळ्या बायका नागोबाची पूजा करतात. या दिवशी बायका हातावर मेहंदी काढतात, नवीन कपडे घालतात, वेगवेगळे खेळ खेळतात व नागोबाच्या आरत्या म्हणतात. एक लहान मुलगी हे सगळं पाहून विचारते की काय चाललं आहे? हे ऐकून आई उत्तर देते की आज नागपंचमी आहे म्हणून मी मेहंदी लावली आहे. मुलगी विचारते नागपंचमी म्हणजे काय? आता आईनं तिला समजून सांगायला हवं होतं मात्र या गुगलच्या जमान्यात कुणी कुणाला समजावून सांगायच्या फंदात पडत नाही, म्हणून आईनं मुलीला उत्तर दिलं की आज नागोबाचा वाढदिवस आहे म्हणून आपण तो साजरा करतोय. त्या लहान मुलीला अतिशय आनंद झाला व ती म्हणाली चल मग आपण नागोबासाठी केक आणू! त्या दैनिकाच्या शहरातल्या किरकोळ घटनांची नोंद घेणाऱ्या स्तंभात हा लेख प्रसिद्ध झाला होता. तो वाचून अनेकांना त्या लहान मुलीच्या भाबडेपणाची गंमत वाटून नंतर त्यांनी त्या विषयाचा विचार सोडून दिला असेल. मी सुद्धा तेच केलं असतं मात्र नागपंचमीच्याच दिवशी अख्खं जग दुसरंच काहीतरी साजरं करत होतं ज्याचा नागपंचमीशी काहीच संबंध नव्हता ते म्हणजे फेंडशिप डे!

एफबी, वॉट्स-अॅप, चॅट-ऑन, इन्स्टाग्राम तसंच ट्विटर असताना, आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देणं, त्यांच्यासोबत छायाचित्रं काढणं अगदी सोपं झालंय. त्यामुळे त्यादिवशी ही सगळी समाज माध्यमं छायाचित्रं, मैत्रीचे संदेश यांनी ओसंडून वाहात होती. मात्र त्याच दिवशी नागपंचमी असल्याचं कुणाच्या गावीही नव्हतं. मी किशोरवयीन मुलांना दोष देत नाही कारण शहरी जीवनात त्यांना साधं गांडुळही दिसणं दुरापास्त झालं आहे त्यामुळे नागोबाचं दर्शन होणं दुर्मिळच. मात्र चाळीशीत असलेल्या तसंच लहान खेड्यांमधून किंवा गावांमधून आलेल्या माझ्या पिढीला नागपंचमीसारखे सण अगदी लख्ख आठवतात! त्यानंतर मी फेसबुक वर आज नागपंचमी असल्याचा संदेश दिला व नागांविषयी थोडी माहिती लिहीली त्यामुळे त्यादिवशी नागपंचमी असल्याची अनेकांना जाणीव झाली! हा प्रामुख्याने शेतकऱ्यांचा सण आहे ज्याचा नाग सर्वात जवळचा मित्र असतो. आपल्या देशात जिथे जवळपास पन्नास हजार लोक सर्पदंशामुळे मरण पावतात तिथे साप माणसाचा मित्र कसा असू शकतो असे बरेच जण विचारतात! अनेक लोक सर्पदंशामुळे मरण पावतात व इतर अनेक जणांना त्याचा त्रास होतो हे खरं असलं तरीही साप उंदरांना खातात व पिकांचे रक्षण करतात. उंदरांनी धान्य खाल्ल्यामुळे किती नुकसान होतं हे तुम्ही फक्त गुगल करा म्हणजे तुम्हाला उंदीरच मानवजातीचा सर्वात मोठा शत्रू आहे याची जाणीव होईल, उंदरामुळे पसरणारे साथीचे रोग हा तर एक स्वतंत्र विषय आहे.  उंदरांमुळे आपल्याला सर्पदंशासारखा थेट काही धोका नसल्यामुळे त्यांना खाऊन साप आपलं कसं रक्षण करतात याची आपल्याला जाणीव होत नाही. मात्र आपल्या पूर्वजांना याची जाणीव झाली होती, म्हणूनच त्यांनी त्याचे आभार मानण्यासाठी नागपंचमी सण साजरा करायला सुरुवात केली. आता तुम्हाला समाज म्हणून नागपंचमीचं काय महत्व आहे व आपल्या पूर्वजांच्या शहाणपणाची तसंच त्यांचं निसर्गाशी जे नातं होतं त्याची जाणीव झाली असेल!

नागपंचमीच्या या पैलुबद्दल विचार करताना मी इतर सणांचा विचार करू लागलो ज्यामध्ये आपण निसर्गाचे आभार मानतो, त्यातल्या विविध घटकांचा उत्सव साजरा करतो. मला आश्चर्य वाटलं की आपल्या भारतातला प्रत्येक महत्वाचा सण वा उत्सव कोणत्या ना कोणत्या प्राण्याशी, झाडाशी, पाण्याशी किंवा अग्निशी संबंधित आहे, म्हणजेच निसर्ग देवतेशी संबंधित आहे. आजकाल पर्यावरण संवर्धन, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या गोष्टींनी जागतिक महायुद्धापेक्षाही गंभीर स्वरूप धारण केलं आहे, अशा युगात आपल्या अशा सणांना खरंतरं विशेष महत्व आहे! बैल पोळा हे अशाच सणाचे एक उदाहरण आहे, या बैलाचा शेअर बाजाराल्या बुलशी, केवळ बाँबे स्टॉक इक्स्चेंज बाहेरचा बैलाचा पुतळा सोडला तर काहीही संबंध नाही. या दिवशी शेतकरी त्यांच्या बैलांची विशेष काळजी घेतात व त्यांना रंगीबेरंगी झूल पांघरतात, त्यांच्यासाठी गोडधोड करतात. एरवी शेतात प्रचंड मेहनत करणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी कामाला जुंपलं जात नाही, प्रत्येक शेतकरी आपली बैलजोडी अख्ख्या गावातून वाजत गाजत मिरवतो. संध्याकाळी जेव्हा ते घरी परतात तेव्हा शेतकऱ्याची बायको त्यांचं औक्षण करते व त्यांचं जेवण झाल्यानंतरच संपूर्ण घरदार जेवतंहे सगळं लिहीताना सगळ्या जुन्या आठवणी आश्रूंच्या रुपात डोळ्यातून ओसंडल्या. हे दृश्य आता फक्त स्मृतींमध्येच राहीलं आहे, मी खरोखरच अतिशय सुदैवी आहे की आपल्या बैलाशी असलेलं नातं, प्रेमाचे बंध साजरा करणारा सण मला अनुभवता आला. या बाबतीत तरुण पिढी खरंच दुर्दैवी म्हणावी लागेल कारण ते कुठल्या   आनंदाला मुकले आहेत हेच त्यांना माहिती नाही!

अशाच सणाचं आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे वट सावित्री (वट म्हणजे वडाचं झाड), या दिवशी बायका वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात व पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात; निसर्गाप्रती आदर व्यक्त करणारा हा किती छान सण आहे! वडाचं झाड हे निसर्गचक्रातलं सर्वात महत्वाचं झाड आहे, त्याचं आयुष्य सर्वाधिक असतं, त्याचा विस्तार मोठा असतो, पक्षांपासून ते किटकांपर्यंत अनेक प्रजाती या झाडावर जगत असतात. आपल्या शीतल छायेनं ते सगळ्यांची काळजी घेतं, एक बहारदार वटवृक्षाकडे पाहिलं तरीही जीव सुखावतो. म्हणूनच मानवी जीवनात या झाडाला अनन्यसाधारण महत्व आहे! वट सावित्री सणाचा संबंध फक्त वडाच्या झाडाशी असला तरीही माणसाच्या आयुष्यात झाडांची भूमिका अतिशय महत्वाची असल्यामुळे त्यांचे एकप्रकारे प्रतिकात्मक आभार मानण्याची ही पद्धत आहे. जेव्हा एखादी बाई नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते तेव्हा त्याचा अर्थ त्याचं आयुष्य वडाच्या झाडासारखं मोठं असावं, त्याच्याकडून सर्वांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा असते! वडाच्या झाडासारखं आयुष्य मिळावं यापेक्षा आणखी कोणती चांगली मनोकामना तुम्ही तुमच्या जीवन साथीदारासाठी करू शकता? यातून आपल्या पूर्वजांनी झाडांचं आपल्या आयुष्यातलं महत्व किती चांगल्याप्रकारे जाणलं होतं व त्याच्या संवर्धनाचे वेगवेगळे उपाय कसे केले होते हे सुद्धा समजतं; ज्या झाडाला तुमची बायको तुमच्या दीर्घायुष्यासाठी साकडं घालते तेच तुम्ही कसं कापाल!

मी जेवढा या पैलुचा जास्त विचार करू लागलो तेवढं हिंदू परंपरेतील आपल्या सणवारांचं निसर्गाच्या प्रत्येक घटकाशी किती घट्ट नातं आहे हे जाणवत गेलं. आपल्या देवी, देवतांचीही प्रतिकात्मक वाहनं प्राणी असतात किंवा ते त्यावर आरूढ झालेले असतात म्हणजेच शिवाचा नंदी, विष्णू शेषनागाखाली विश्रांती घेत असतात, माँ शेरावाली म्हणजेच दुर्गेचं वाहन वाघ आहे, आता तिच्याच वाहनाला कोण मारणार! शेवटचे म्हणजे दत्त गुरुंच्या भोवती कुत्री दिसतात. कुत्रा आपल्याला जीवनाचा एक अविभाज्य घटक असून तो आपला सर्वोत्तम मित्र व रक्षक आहे. महाराष्ट्रातल्या बैल पोळ्याप्रमाणे दक्षिणेत हत्तींशी संबंधित सण असतात, ज्यामध्ये हत्तींना सजवलं जातं व लोक दिवसभर त्यांची पूजा अर्चना करतात. त्यानंतर आपण होळी या सणाला कसे विसरू शकतो, प्रामुख्याने देशाच्या उत्तर भागात हा सण मोठा साजरा करतात व हा रंगांचा उत्सव आहे; हे रंग आपल्याला निसर्गाच्या सौंदर्याची जाणीव करून देतात. होळी हा अग्निचाही सण आहे, ज्यामध्ये आपण आपल्यातले सर्व दुर्गुण जाळून टाकतो. आपला सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे दिवाळी, हा दिव्यांचा उत्सव आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस, त्यादिवशी आपण गायींची पूजा करतो. ज्या देशात कृषीवर आधारित अर्थ व्यवस्था आहे, त्यात गाई जीवनरेखेसारख्या आहेत व त्यांचे आभार मानण्यासाठी देशाच्या सर्वात महत्वाच्या सणाच्या पहिल्या दिवशी त्यांची पूजा करण्यापेक्षा आणखी चांगली पद्धत कोणती असू शकते!

मी या सणांविषयी जेवढा अधिक विचार करतो तेवढा माझा आपल्या पूर्वजांविषयीचा आदर दुणावतो. त्यांना निसर्गाचं, त्यातल्या प्रत्येक घटकाचं महत्वं समजलं होतं. म्हणूनच त्यांनी या घटकांचा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. यामुळे एकप्रकारे या घटकांचं संवर्धनच होत गेलं, मग नद्या असोत किंवा समुद्र, अग्नि, झाडे किंवा वाघ! एवढंच नाही तर आपल्याकडे रक्षाबंधनासारखा सणही आहे जो बहीण-भावातलं प्रेम जपतो तसंच दिवाळी पाडवा पती-पत्नितले बंध आणखी घट्ट करतो! हिंदू परंपरेत गुरु-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे, गुरु तुमच्या जीवनाला अर्थ देतो, ते परिपूर्ण करतो म्हणूनच गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपण गुरुला वंदन करतो. ही परंपरा प्रत्येक स्वरुपातील गुरुचं किती महत्व आहे हेच अधोरेखित करते!

आपल्या या सणांच्या पार्श्वभूमीवर, पाश्चिमात्य संस्कृतीकडूनही आपल्याकडे फ्रेंडशिप डे, टीचर्स डे, मदर्स डे, फादर्स डे यासारखे अनेक उत्सव आले आहेत! ज्या नात्यांची मूल्ये आपण विसरलो आहोत त्यांची आठवण राहावी म्हणून हे दिवस साजरे करतात व आपणही त्यांचं अंधानुकरण करतो. त्याशिवाय आता जगभरात पर्यावरण दिवस किंवा अर्थ डे साजरा केला जातो, याद्वारे निसर्गाचं संवर्धन करायच्या आपल्या जबाबदारीची जाणीव आपल्याला होणं अपेक्षित आहे. मात्र आपण जर आपले नागपंचमी किंवा वट सावित्री यासारखे पारंपरिक सण त्यामागची भावना लक्षात घेऊन साजरे केले असते, तर आपल्याला कोणताही पर्यावरण दिवस साजरा करायची गरजच पडली नसती! हे सर्व दिवस साजरे करण्यात वाईट काहीच नाही, मात्र आपल्याला जो समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे त्यात दर महिन्याला असा किमान असा एक तरी सण आहे जो आपल्याला निसर्गाशी जोडतो. आपण केवळ त्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे तरच आपला देश जगण्यासाठी एक चांगलं ठिकाण होईल; नाहीतर आपले सगळे सण समारंभ इतिहासाच्या पुस्तकात उरतील. आपण फक्त फादर्स डे किंवा मदर्स डेला, आपल्या मुलांच्या वॉट्स- अॅवरच्या शुभेच्छांची वाट पाहात राहू. रिस्टॉटलनी म्हटल्याप्रमाणे त्यासाठी आपणच जबाबदार असू कारण आपले सणही तसेच असतील


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स




No comments:

Post a Comment