Tuesday 27 December 2016

जंगल, वाघ आणि मी !






















जंगल हे असे पुस्तक आहे ज्याला सुरुवातही नसते आणि शेवटही नसतो. तुम्हाला आयुष्यात हवं तेव्हा हव्या त्या पानावरून हे पुस्तक उघडा, तुम्हाला ज्ञान मिळवायची उत्कंठा असेल तर तुम्हाला ते अतिशय मनोरंजक वाटेल. तुम्ही कितीही वेळ कितीही समरस होऊन पुस्तक वाचत असला तरीही तुमचा त्यातील रस तसुभरही कमी होणार नाही, कारण निसर्गाला कधीच शेवट नसतो.” … जिम कॉर्बेट.

लहानपणी मी जेव्हा कोठलेही जंगल पाहिलं नव्हतं तेव्हा या महान वन्यप्रेमी, वनसंवर्धक, लेखकाचं लेखन वाचण्यात आलं, (मला जिम कॉर्बेटचा उल्लेख शिकारी किंवा अगदी नरभक्षक वाघांची शिकार करणारा असा सुद्धा करायला आवडत नाही), व त्यामुळेच माझी पावलं जंगलाकडे वळाली आणि तेव्हापासून या जंगलांनी वेडच लावलंय! मी जंगलात येतो तेव्हा मला प्रत्येकवेळी नवीन काहीतरी पाहायला मिळतं आणि इथून जाताना मी एक माणूस म्हणून अधिक समृद्ध होऊन बाहेर पडतो असं वाटतं. मात्र मी आजकाल हिवाळ्यात जंगलात जाणं टाळतो कारण वयोमानानुसार विशेषतः मध्य भारतातल्या थंडीचा जरा त्रास होतो आणि जंगलातल्या धावपळीमुळे शरीर बोलू लागतं. तरीही त्या हिरवाईची ओढ एवढी जबरदस्त असते की मी स्वतःला रोखू शकत नाही, विशेषतः जंगलाचे खऱ्या अर्थाने रक्षक असलेल्या लोकांना मदत करण्यासारखं कारण असेल तर अजिबातच नाही. ताडोबाला भेट देण्याचंही असंच एक कारण होतं. सर्व वन्यजीवप्रेमींसाठी ताडोबा म्हणजे वाघ पाहण्याचं महत्वाचं केंद्र झालं, जिथे आम्ही गाईड तसंच सुरक्षारक्षकांना शक्य ती थोडीफार आमच्या परीने मदत करायचा प्रयत्न करत असतो. यावेळी आम्ही टीएटीआरचे गाईड तसंच मोहार्लीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच्या कर्मचाऱ्यांसाठी २५० जोडी पादत्राणे भेट दिले  ज्यामुळे त्यांना जंगलात वावरणे सोपे होईल. माझ्यासोबत माझी पत्नी अश्विनी व तिचे सहकारी योगेश होते, जे रासा प्रतिष्ठानामार्फत स्वतंत्रपणे जंगलाच्या संवर्धनासाठी काम करतात.  ताडोबाला एका छोटेखानी समारंभात क्षेत्र संचालक श्री. गणपती गरड यांच्या हस्ते ही पादत्राणे वितरित करण्यात आले. श्री. गरड यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत वन्यजीव पर्यटनात गाईडचं काय महत्व असतं हे समजावून सांगितलं. हा भाग पुढे येईलच; या कार्यक्रमाला उप संचालक गाभा क्षेत्र श्री. गोवेकर तसेच इतर पदाधिकारीही उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व गाईड तसंच सुरक्षारक्षक सामूहिक छायाचित्रासाठी एकत्र आले व त्यांनी आम्ही केलेल्या मदतीसाठी आमचे आभार मानले हा खरोखरच अतिशय हृद्य अनुभव होता. खरेतर वनविभागाला या लोकांची काळजी नाही किंवा ते गाईड अथवा सुरक्षा रक्षकांना मदत करत नाहीत असं नाही पण आपण आपापल्यापरीनं केलेली कोठलीही मदत ही स्वागतार्हच असते. कारण शेवटी वनसंवर्धन म्हणजे कुणा एका विभागाचं किंवा सरकारचं काम नाही, आपणही त्या सरकारचा अविभाज्य घटक आहोत. मला खरंच आश्चर्य वाटलं की त्यावेळी दहा महिला गाईडही हजर होत्या. प्रामुख्यानं पुरुषांचं वर्चस्व असलेल्या वन्यजीव क्षेत्रात महिलांची वाढती उपस्थिती खरोखरच महत्वाची आहे आणि त्यानंतर तीन दिवस मी मनसोक्त ताडोबा एन्जॉय केला

नोव्हेंबरची अखेर असूनही ताडोबाला मध्य भारतातली गोठवणारी थंडी सुरु झाली नव्हती. त्यामुळे मी जरा आनंदात होतो कारण मला स्वतःला फार थंडी आवडत नाही आणि दुसरं म्हणजे फक्त वाघच नाही तर इतर प्राणीही जास्त गारठा असेल तर फारसे दिसत नाहीत. ताडोबात उन्हाळ्यात वाघ दिसण्याची शक्यता सर्वाधिक असते कारण पाणवठे आटुन जातात मात्र तरी हिवाळ्यात जंगलाचं एक वेगळंच सौंदर्य असतं, चहुबाजूंनी हिरव्या रंगाच्या सर्व छटा असतात, अगदी प्राण्यांची कातडीही या काळात गडद आणि अधिक रंगीबेरंगी होते. माझ्या या वेळच्या ताडोबाच्या फेरफटक्याचा हा इतिवृत्तांत

पुण्याहून टोयोटा फॉर्च्युनरने एका दिवसात तब्बल ११०० किमी प्रवास करून आम्ही रात्री जरा उशीराच ताडोबात पोहोचलो. फक्त तीन तास झोप घेतल्यानंतर सकाळच्या सफारीसाठी तयार झालो आणि तरीही आम्ही प्रवेशद्वारीपाशी पोहोचलो तेव्हा बहुतेक सफारी निघून गेल्या होत्या, आम्ही जंगलात प्रवेश करणारे बहुतेक शेवटचेच होतो. जंगलात कधी प्रवेश करावा याविषयी नेहमी वाद असतो, बरेच जाणते वन्यजीवप्रेमी सर्वात आधी जायलाच उत्सुक असतात. त्यामागचा तर्क म्हणजे अभयारण्य रात्रभर पर्यटकांसाठी बंद असते. वाघ बहुतेकवेळा रात्री शिकारी करतात त्यामुळे जे लोक आधी जंगलात शिरतात त्यांना वाघ दिसण्याची शक्यता सर्वाधिक असते. एकदा जंगलात वाहनं फिरायला लागली की वाघ मुख्य रस्त्यांपासून आत निघून जातात. मात्र इतक्या जंगलांना भेट दिल्यानंतर मी अशा निष्कर्षाप्रत पोहोचलोय की बहुतेक वाघांना वाहनांची सवय झालेली असते, त्यामुळे एखादा नवीन वाघ किंवा बछडे सोडले तर बाकी वाघ वाहनांची अजिबात पर्वा करत नाहीत. या सफरीतही मला असेच अनेक अनुभव आले जे मी पुढे देणारच आहे. उशीरा प्रवेश केल्यामुळेही वाघ दिसण्याची शक्यता तेवढीच असते कारण सुरुवातीला मागुन येणा-या जिप्सीचा आवाज ऐकून रस्ता सोडुन झुडुपात गेलेला वाघ आता रस्ता सुरक्षित आहे असं वाटून बाहेर येऊ शकतो. आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती झालंय की वाघाला पाला पाचोळा किंवा गवतातून चालण्याऐवजी जंगलातल्या  धुळीच्या रस्त्यांवरून चालायला आवडतं, कारण त्याच्या पंजांना मऊ गादीसारखा भाग असतो. रस्त्यावरून चालताना फारसा आवाज न होता सहजपणे चालता येतं, जे शिकार करताना अतिशय महत्वाचं असतं, तसंच अशाप्रकारे पंजांनाही काटे लागुन इजा होण्याची शक्यता कमी असते.

पहिल्या सफारीसाठी आम्ही उशीरा प्रवेश केला, पण जंगलाची एक सर्वोत्तम बाब म्हणजे तुम्ही जेव्हा फुफुसात रानफुलांचा सुगंध भरून घेता तेव्हा तुमचा सगळा थकवा नाहीसा होतो, त्यादिवशी सकाळी माझंही अगदी तसंच झालं. मात्र डोळ्यांवरची झापड पुरती गेली नव्हती, मी नोव्हेंबरची ताजी थंड हवा आत घेत होतो, अजून सूर्योदय व्हायचा होता, सगळीकडे अजूनही हलकेसे धुकं होतं. आमची जिप्सी बांबूच्या बेटाला वळसा घालत असताना आम्हाला अचानक दोन जिप्सी पुढे थांबलेल्या दिसल्या, त्यातल्या लोकांनी आमच्याकडे पाहून जोरजोरात हात हालवायला सुरुवात केली. त्यांचे हात पाहून मला जाणवलं की आसपास नक्कीच कुठेतरी वाघ असला पाहिजे त्यामुळे डोळ्यावरची झोप कुठल्या कुठे पळून गेली. आम्ही थांबताच समोरून छोटी तारा नावाची वाघीण आली, तिच्या गळ्याभोवती रेडिओ कॉलर होती, आणि तिनं सरळ आमच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. जंगलामध्ये इतक्या वर्षांपासून आल्यानंतर  आता माझा नशीबावर विश्वास बसायला लागला आहे, कारण आम्हाला जंगलात प्रवेश करून जेमतेम पंधरा मिनिटं झाली होती आणि चक्क एक वाघीण माझ्या दिशेनं चालत येत होती. हे दृश्य पाहण्यासाठी लोकांना अनेक दिवस वाट पाहावी लागते आणि अनेकदा वाघाची साधी झलकही न पाहता त्यांना परत जावं लागतं. मी असंख्य वेळा जंगलात वाघ पाहिला असला तरीही प्रत्येक वेळी वाघ पाहण्यातला रोमांच व उत्सुकता वेगळीच असते, विशेषतः तो जेव्हा असा अनपेक्षितपणे तुमच्यासमोर येतो तेव्हा ती अधिकच असते! क्षणभर मला ज्या जिप्सी वाट पाहात होत्या त्यांच्यासाठी वाईट वाटलं कारण आम्हाला वाघीण अगदी समोरून पाहता आली आणि ते आधीपासून थांबले होते पण जंगलात नशीब असं सारखं पारडं बदलत असतं. त्यादिवशी आमचं नशीब बहुदा फारच जोरदार असावं कारण आमचा गाईड व ताडोबाविषयीचे जाणकार बंडू मानकर यांनी ओठांवर बोट ठेवलं व म्हणाले सर, बछडेपण आहेत. जंगलात सर्वात महत्वाची असते ती शांतता, कारण शांततेतच तुमच्या श्रवणशक्तीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि तिथेच आपल्याला जाणीव होते की आपण शहरवासी ऐकणे, पाहणे किंवा वास घेणे यासारख्या नैसर्गिक जाणीवांचा वापर करण्यात किती कुचकामी आहोत. आधी मला काहीही ऐकू आलं नाही, पण जेव्हा बंडूने झुडुपांच्या दिशेनं बोट दाखवलं, तेव्हा मला अगदी अस्पष्ट असा म्यांव असा आवाज ऐकू आला. वाघाचे बछडेही पाळीव मांजरांसारखा आवाज काढतात. वाघीणीनंही तशाच शिट्टीसारख्या आवाजात त्यांना प्रतिसाद दिला. ज्यांना असं वाटतं की वाघ फक्त डरकाळी फोडतो त्यांच्यासाठी सांगतो की वाघीण तिच्या बछड्यांना बोलावण्यासाठी किंवा त्यांना सूचना देण्यासाठी विशिष्ट आवाज काढते, त्यासाठी ती डरकाळी फोडत नाही. तिनं बोलावल्यानंतर अल्लड मुलांप्रमाणे उड्या मारत २/३ महिन्यांची दोन लहान बछडी पाला पाचोळ्यातून रस्त्यावर आली. जंगलानं पुन्हा एकदा मला आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता कारण कितीतरी वर्षांपासून माझी हे दृश्य पाहण्याची इच्छा होती. तुम्ही जितकं अधिक जंगलात जाता तितकं तुम्हाला असं काहीतरी पाहायला मिळावं याची ओढ लागते. तुम्ही कितीही वेळा जंगलात गेला असलात तरीही, तुम्हाला माहिती असतं की तुम्ही काहीतरी अजून पाहिलेलं नाही व तुम्ही हाडाचे वन्यजीवप्रेमी असाल तर जंगल तुम्हाला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही! इथे मी जंगलातलं सर्वोत्तम दृश्य पाहात होतो, एक तरुण वाघीण तिच्या बछड्यांना फेरफटका मारायला घेऊन चालली होती व त्यांना आजूबाजूचं जंगल दाखवत होती, त्यांना आजूबाजूला असलेल्या माणसांची व रोखलेल्या कॅमेऱ्यांची  कसलीच फिकीर नव्हती, जे त्यांची पटापट छायाचित्रं घेत होते, सगळीकडे फक्त कॅमे-यांच्या शटरचा आवाज येत होता !

खरं नाट्य तर त्यानंतर घटलं, बछडे आपल्या आईसोबत गवतात गायब झाल्यानंतर आम्ही जवळपास अर्धा तास वाट पाहिली व आम्हाला जेव्हा वाटलं की आता काही दिसणार नाही तेवढ्यात दोन बछड्यांनी आमच्या जिप्सीच्या मागून रस्ता ओलांडला आणि वाघीण गवतातून पुन्हा लाल मातीच्या रस्त्यावर आली. हिवाळ्यातली ती एक प्रसन्न सकाळ होती, स्वच्छ सूर्यप्रकाश होता, वाऱ्याची मंद झुळूक वाहात होती आणि ती रुबाबदार वाघीण वाळलेल्या गवतातून बाहेर येऊन समोर उभी ठाकली होती आणि हिरव्यागार डोळ्यांनी तुमच्याकडे बघत होती. मी स्वतःशीच म्हटलं की असं काही दृश्य पाहायला मिळणं हे माझं नशीबच आहे. अशाच दृश्यांमुळे आपण पुन्हा पुन्हा जंगलाकडे खेचले जातो, त्याचवेळी पर्यावरणाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे याची जाणीवही होते. हे सगळं पाहात असताना डोळ्यावरची झोप केव्हाच उडाली होती, दिवसाची एक ताजी सुरुवात नव्याने झाली होती.

जेव्हा आम्ही वाघीण बाहेर यायची वाट पाहात होतो, तो जंगलात घालविलेला सर्वोत्तम वेळ होता, या वेळेस तुमची सर्व ज्ञानेंद्रिये सतर्क असतात, तुम्हाला अगदी लहानशी हालचाल किंवा आवाजही ऐकू येतो. याचवेळी तुम्हाला अशा अनेक गोष्टी दिसतात ज्यामुळे तुम्हाला जाणवतं की संयम राखण्याचा फायदाच होतो. अशाच वेळेस एक लहानसं रंगीत फुलपाखरू आमच्या वाहनाजवळच्या सागाच्या झाडावर येऊन बसलं, त्याचे फडफडणारे पंख पाहताना मी क्षणभर वाघीणीला पूर्णपणे विसरून गेलो. हिरव्या झाडाच्या पार्श्वभूमीवर ते फुलपाखरू एखाद्या चित्रफलकासारखं भासत  होतं आणि त्यात हे रंगीबेरंगी फुलपाखरू सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालं होतं, वाघीण पाहण्यासाठी जीव टाकणाऱ्या आजूबाजूच्या वाहनांच्या हालचालींची त्याला तमा नव्हती. जंगल म्हणजे फक्त वाघच नाही तिथे प्रत्येक क्षणाला काहीतरी घडत असतं. जंगलातच तुम्ही आजूबाजूच्या लहानात लहान तपशीलांची नोंद घ्यायला शिकता, या सवयीचा मला माझ्या कामात आणि घरातही अतिशय उपयोग होतो.

त्यानंतर तीन दिवस आम्ही ताडोबा जंगलात फेरफटका मारत होतो, आश्चर्य म्हणजे हिवाळा असूनही आम्हाला अनेक वाघांचं दर्शन झालं. चार ते पाच सफारींमध्येही वाघ दिसला नाही अशी ज्यांची तक्रार असते त्यांच्यासाठी मला काही माहिती द्यावीशी वाटते (आम्ही ताडोबातून निघाल्यानंतर तीन-चार दिवसांनी असं झालं). याचं कारण असं आहे की वणवे लागू नयेत म्हणून उन्हाळ्यापूर्वी वन विभाग जंगलातल्या सर्व रस्त्यांवर पडलेला पाला पाचोळा व फांद्या काढून टाकतो. अनेक कामगार दिवसभर सगळ्या रस्त्यांवर हे साफसफाईचं काम करत असतात, माणसांची सतत वर्दळ असल्यामुळे प्राणी, वाहनांच्या मार्गापासून दूर जंगलात खोलवर निघून जातात. त्यामुळे जंगलाला भेट देताना अभयारण्याविषयी असे तपशील माहिती असणे अतिशय महत्वाचे आहे. दुसरं म्हणजे हवामानाचा अंदाज, जर हवामान ढगाळ असेल तर वन्य प्राण्यांच्या दर्शनासाठी तसंच छायाचित्रणासाठी हे चांगलं नाही. माझ्या मते जंगलात कोणतंही हवामान चांगलंच असतं, पण जे पहिल्यांदा जंगलात आले आहेत त्यांची वाघ पाहण्याची उत्सुकता मी समजू शकतो. त्यामुळे पदरी निराशा येऊ नये म्हणून कोणत्याही अभयारण्याला भेट देण्यापूर्वी ही माहिती महत्वाची आहे.

ताडोबानंतर माझा पुण्याला परतायचा बेत होता. मात्र मला मध्यप्रदेशातल्या पेंचमधून मित्राचा कॉल आला, की इतक्या लांब आला आहेस तर थोडं पुढे ये की ! मला मध्यप्रदेशातल्या गोठवणाऱ्या थंडीचा त्रास होतो तरीही मी तिथे जायचा मोह टाळू शकलो नाही कारण पेंचमध्ये हिवाळ्यातला अनुभव सर्वोत्तम असतो. पेंचला भेट दिलेल्या अनेकांना जंगल आवडतं पण वाघाच्या बाबतीत मात्र त्यांच्या पदरी निराशा येते. पण माझ्या बाबतीत मात्र उलटं होतं, मी पेंचला भेट दिली तेव्हा प्रत्येक वेळी मला वाघाचं अद्भुत दर्शन झालं आहे, यावेळीही पेंचनं मला निराश केलं नाही. जे लोक वाघ पाहाणं नशीबी नव्हतं अशी तक्रार करतात विशेषतः त्यांच्यासाठी मी एक उत्तम अनुभव सांगतोआपण जेव्हा जंगलात जातो तेव्हा वाघाची एक झलक तरी दिसावी अशी आपली तीव्र इच्छा असते. पण आपण कधी विचार केलाय का एवढ्या विस्तीर्ण जंगलात एका प्राण्याला शोधण्यासाठी काय करावं लागतं? माझ्या अनुभवाप्रमाणे वाघ दिसणं हे नशीब, संयम आणि अनुभव यांचं मिश्रण आहे! मी पेंचमध्ये नुकत्याच दोन सफारी केल्या आणि संध्याकाळच्या सफारीत आम्ही जेव्हा जंगलाच्या फारशा माहिती नसलेल्या भागात फिरत होतो तेव्हा आम्हाला एक जिप्सी दिसली जिचं टायर पंक्चर झालं होतं म्हणून आम्ही मदत करायला थांबलो. त्या जिप्सीचा गाईड म्हणाला की त्यानं समोरच्या घाणेरीच्या झुडुपांमध्ये वाघाचं गुरगुरणं ऐकलं. आमचा गाईड हेमराज अतिशय अनुभवी होता तो म्हणाला की हा प्रसिद्ध कॉलरवाल्या वाघीणीचा प्रदेश आहे व ती संध्याकाळी ५च्या सुमाराला येते. म्हणून आम्ही थांबून वाट पाहायचा निर्णय घेतला. खरंतर बाजुच्या झाडांवर माकड वाट पाहात होते व चितळांचा एक कळप निवांत चरत होता. साधारण पन्नास फुटांच्या गवताच्या पट्ट्यानंतर घाणेरीची झुडपं होती. साधारण ४५ मिनिटं वाट पाहिल्यानंतर आधीची जिप्सी कंटाळुन निघून गेली, त्यानंतर अचानक माकड वाघ पाहिल्यावर जसं ओरडतं तसं विशिष्ट आवाजात चित्कारलं आणि चितळांचा कळप जीव खाऊन पळाला, म्हणजे दोघांनाही वाघाचे अस्तित्व जाणवले होते आणि त्यांनी त्याला पाहिलंही होतं. घाणेरीच्या झुडुपातून सुप्रसिद्ध कॉलरवाली वाघीण गवतामध्ये आली, रुबाबात आमच्याकडे पाहिलं आणि रस्ता ओलांडून जवळपासच्या तळ्यावर गेली, पाणी पिऊन जंगलात निघुन गेली. या वाघीणीनं नुकताच तीन बछड्यांना जन्म दिला होता, तिनं पेंच अभयारण्याला आत्तापर्यंत तब्बल २६ वाघांची देणगी दिली आहे. त्यामुळे तिचं योगदान मोलाचं आहे, तिच्या बछड्यांच्या सुरक्षेसाठी तिला रेडिओ कॉलर लावण्यात आली, म्हणून तिचं नामकरण कॉलरवाली वाघीण असं झालं. अशा प्रकारे वाघ पाहताना अनुभव, संयम आणि जंगलाची खडान् खडा माहिती असल्याने फरक पडू शकतो. हेमराजनं त्या क्षणी त्या भागाची माहिती तसंच वाघीणीची वेळ लक्षात ठेवली व तिचा वापर केला.  गाईडकडून हीच अपेक्षा असते विशेषतः जेव्हा पर्यटक नियमितपणे जंगलात येणारे नसतात तेव्हा. त्याचवेळी गाईडने त्याचे कौशल्य पर्यटकांना जंगलाचे बारकावे समजून सांगण्यासाठी वापरले पाहिजे उदाहरणार्थ इतर प्राण्यांनी वाघाला जवळपास पाहिल्यानंतर त्यांच्या वर्तनात होणारे बदल, यासारख्या माहितीमुळे पर्यटकांच्या मनात जंगलाविषयी कुतुहल निर्माण होते. त्याप्रमाणे पर्यटकांनीही संयम ठेवला पाहिजे व त्यांना नेमून दिलेल्या गाईडवर भरवसा ठेवला पाहिजे, कारण गाईड व चालक विविध प्राण्यांचे इशारे ऐकल्यानंतर एकाच ठिकाणी थांबतात तेव्हा बऱ्याच जणांना पेट्रोल वाचवण्यासाठी ते वेळ वाया घालवतात असं वाटतं.

मी पुण्याला परत आल्यानंतर एफबीच्या ग्रूपवर काही छायाचित्र टाकली. सँक्च्युरी किंवा क्लॉ किंवा अतुल धामणकरांचा ताडोबा वाईल्ड इमेजसारखे काही खरोखर अतिशय चांगले ग्रूप आहेत, भारतीय जंगलांविषयी माहिती, ज्ञान घेण्यासाठी हे अतिशय चांगले माध्यम आहे. एका ग्रूपमध्ये कुणा व्यक्तिने वाहतुकीची कोंडी व वाघ पाहण्यासाठी पर्यटकांची उडालेली झुंबड अशी छायाचित्रे टाकली होती. मी त्या अभयारण्याचे नाव सांगणार नाही पण मला असे वाटते की माननीय सर्वोच्च न्यायालयाने अभयारण्याच्या पर्यटनावर निर्बंध घालण्याचा जो निर्णय घेतला त्याचा हा परिणाम आहे. ताडोबाचेच उदाहरण घ्या, अभयारण्याच्या व्यवस्थापनासाठी सर्व चांगले अधिकारी जिवापाड मेहनत करतात तरीही पर्यटनासाठी खुले मार्ग अतिशय कमी आहेत. त्यामुळे अभयारण्यात वाहने एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा येतात विशेष एखाद्या भागात वाघाची हालचाल जाणवली तर असे हमखास होते. मोहार्ली ते कोळसा रेंजचा मार्ग बंद करण्यात आला आहे त्यामुळे बरीच वाहने एकाच विभागात फिरत असतात. तुम्ही पर्यटकांनाही दोष देऊ शकत नाही कारण ते इतक्या लांबून फक्त वाघाला पाहायला आलेले असतात, त्यामुळे वाघ समोर येतो तेव्हा त्याला पाहण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरु असते. यासंदर्भात गाईड तसंच जिप्सीचालकांची भूमिका अतिशय महत्वाची असते कारण त्यांना पर्यटकांची वाघ दाखवण्याची मागणीही पूर्ण करायची असते मात्र त्याचसोबत प्राण्यांची शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यायची असते. सर्व वन्यजीवप्रेमींच्या भावनांविषयी व जंगलातल्या सर्व प्रजातींविषयी आदर राखत मला वैयक्तिकपणे असं वाटतं की जंगलात पहिल्यांदा येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला वाघ पाहायला मिळाला पाहिजे. त्यामुळे त्याला जंगलात पुन्हा पुन्हा येण्याची ओढ लागेल आणि हे किती सुंदर ठिकाण आहे कळू लागेल. त्यानंतरच आपल्याला त्यांच्या मनात वनसंवर्धनाविषयीच्या जबाबदारीचे बीज रुजवता येईल, त्याची पहिली पायरी म्हणजे वाघ पाहणे! वन्यजीव पर्यटनाचा हा पैलू माननीय सर्वोच्च न्यायलयाच्या नजरेस आणून द्यावा म्हणजे जंगलाचा प्रत्येक भाग पर्यटकांसाठी खुला होईल व हे लोक जंगलांच्या संवर्धनासाठी नंतर मदत करतील. मात्र पर्यटन अशाप्रकारे नियंत्रित केले जावे की ही मौजमजा त्रासदायक ठरणार नाही. अधिक वन कर्मचारी व जागरुकतेमुळेच हे शक्य होईल. जंगलाचा मोठा भाग बंद करणे किंवा पर्यटनावर कडक नियमांचे निर्बंध घालणे हा उपाय नाही कारण  हे पर्यटकच जंगलाचे डोळे, नाक व कान आहेत. अनेकदा वनविभागाला कळण्यापूर्वी पर्यटकच जखमी प्राण्याविषयी माहिती देतात, असे अनेक फायदे असतात. यामुळे सतत पाळत ठेवली जाते, शिकारी लोकांच्या कारवायांनाही आळा बसतो; किंबहुना आपण रात्रीच्या सफारींचा विचार करू शकतो कारण शिकार बहुतेकवेळा रात्रीच होते. आपण चालक परवान्यासाठी परीक्षा घेतो तशी परीक्षा घेऊन नियमितपणे येणाऱ्या पर्यटकांना विशेष परवाना देण्याचा व त्यानंतरच त्यांना रात्रीच्या सफारींची परवानगी देण्याचा विचार करू शकतो.

जंगल नावाच्या पुस्तकाचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकाची आहे, किमान माझ्या जंगलाच्या सफरींमधून तरी मी हेच शिकलो. जिम कॉर्बेटसारखा महान वन्यजीवप्रेमीही आपल्याला अनेक वर्षांपूर्वी हेच सांगून गेला. सर्व वन्यजीवप्रेमींनी वनसंवर्धन करण्यासाठी आपले भेदभाव विसरून, आपण सरकार आहोत किंवा खाजगी क्षेत्र आहोत याचा विचार न करता एकजूट होऊन काम करायची वेळ आली आहे. जंगलात लाखो प्रजाती राहतात व वाघ त्यात सर्वोच्च स्थानी आहे, ही जंगलेच नाहिशी झाली तर आपल्या जगण्यातलं सौंदर्य किंवा आपल्या जगण्याचं उद्दिष्टच संपेल, एवढंच मी जाणतो.


संजय देशपांडे


Mobile: 09822037109