Tuesday 11 April 2017

स्मार्ट सिटी आणि नैराश्यावर उतारा !




















मला असं वाटत नाही की कुणी कधीही सतत आनंदी असू शकतो, अर्थात याला मूर्खांचा अपवाद आहे. प्रत्येकाला अधून मधून नैराश्य येतंच…  रुब गोल्डबर्ग.

रुबेन गॅरेट ल्युसियस "रुब" गोल्डबर्ग हा अमेरिकी व्यंगचित्रकार, शिल्पकार, लेखक, अभियंता, व संशोधनकर्ता होता. गोल्डबर्ग यांची गुंतागुंताची उपकरणांचे आयुष्य दाखवणारी व्यंगचित्रमालिका अतिशय लोकप्रिय होती. ही उपकरणे साधे काम, आडवळणाने, किचकटपणे कसे करायचे हे दाखवतात. या व्यंगचित्र मालिकांमुळे अशाच प्रकारच्या कुठल्याही यंत्राला किंवा प्रक्रियेला रुब गोल्डबर्ग यंत्रे असा शब्द प्रचलित झाला. गोल्डबर्गला त्याच्या आयुष्यात अनेक सन्मान मिळाले, त्यामध्ये १९४८ साली त्यांच्या राजकीय व्यंगचित्रांसाठी मिळालेला पलित्झर पुरस्कार व १९५९ साली मिळालेले बॅनशीज सिल्व्हर लेडी अवॉर्ड यांचा समावेश होतो. एवढे मानसन्मान नावावर असताना त्यांना थोडसं नैराश्य येण्याचाही अनुभव असणे स्वाभाविक आहे आणि नैराश्य म्हणजे काय हे त्यांना नेमकं समजलंही आहे असं त्यांच्या वरील शब्दांवरून वाटतं. मला नैराश्य या शब्दाचे बऱ्याच काळापासून कुतूहल आहे आणि काही महिन्यांपूर्वी या विषयीच्या एका लहानशा बातमीनं माझं लक्ष वेधून घेतलं. त्यामध्ये जगभरातल्या जनतेच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेनं यावर्षीच्या कार्यक्रमांमध्ये नैराश्य या विषयावर भर देण्याचं ठरवल्याचं म्हटलं होतं. जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी एखाद्या माणसाला भेडसावणाऱ्या आजाराविषयी अशी घोषणा करते, मात्र यावर्षी पहिल्यांदाच या संघटनेने नैराश्याला आजार किंवा विकार म्हणून मान्यता दिली. मी काही कुणी डॉक्टर किंवा मनोविकारतज्ञ नाही, मात्र मानसशास्त्र हा नेहमीच माझ्या  आवडीचा विषय राहिला आहे. ज्याप्रमाणे पर्यावरणाचा संबंध जीवनाच्या प्रत्येक पैलुशी असतो, त्याचप्रमाणे मानसशास्त्र ही वैद्यकीय विज्ञानाची शाखा आहे जिचा जीवनाच्या प्रत्येक पैलूशी संबंध आहे. म्हणूनच मानसशास्त्र रिअल इस्टेट उद्योगासाठी सुद्धा महत्वाचे आहे.

नैराश्याविषयी बोलायचं तर मला पित्त झालंय हे आपण जितक्या सहजपणे म्हणतो तितक्याच सहजपणे आजकाल समाजामध्ये नैराश्य या शब्दाचा वापर केला जातो, त्यात सर्व लिंगाच्या व वयांच्या व्यक्तिंचा समावेश होतोआपल्याला ज्या अतिप्रसिद्धी व्यक्तिंचा हेवा वाटतो ते सुद्धा नैराश्याने ग्रस्त आहेत. अलिकडेच लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची एक ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर पाहिली गेली, ज्यात ती आपल्या नैराश्याविषयी बोलली होती. आपण घरी किंवा कामाच्या ठिकाणी अनेकदा आपल्या मित्रांना बोलताना ऐकतो किंवा विचारतो, “मला आज अतिशय निराश वाटतंय किंवा तू आज इतका निराश का दिसतोयस”. अगदी किशोरवयीन व्यक्तिंपासून ते वृद्धांपर्यंत सगळेजण हा शब्द अनेकदा वापरत असले तरीही किती जणांना त्याचे नेमके कारण माहिती असते? त्याविरुद्ध लढा देणं किंवा त्यावर उपचार करणं या तर पुढच्या गोष्टी झाल्या. नैराश्य हे अनेक आजारांचे कारण झाले आहे त्यामध्ये रक्तदाब वाढणे/कमी होणे, मधुमेह, अर्धशिशी व इतरही अनेक रोग त्यामुळे होतात. नैराश्य म्हणजे माणसाच्या मनोवस्थेतील तात्पुरते बदल नाही तर ती एक दीर्घकाळ टिकणारी मानसिक स्थिती आहे ज्यामुळे शरीराचे अतोनात नुकसान होते. याच कारणाने जागतिक आरोग्य संघटनेनेही त्याची दखल घेतली व नैराश्य हे जगभरातील माणसांपुढे असलेले एक आव्हान असल्याचे जाहीर केले. आता कुणीही असा प्रश्न विचारेल की एक बांधकाम व्यावसायिक, अभियंता म्हणून माझा याच्याशी काय संबंध आहे कारण रिअल इस्टेट, स्मार्ट शहर, पर्यावरण हे सामान्यपणे माझ्या लेखनाचे विषय असतात. मात्र कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा जवळचा संबंध आहे व मी जसा याविषयी विचार करतो तशा या बाबी एकप्रकारे नैराश्याला कारणीभूत असल्याचे मला वाटते. त्याचसाठी आपण नैराश्याची व्याख्या काय आहे व त्यामुळे माणसाचे काय नुकसान होते हे समजून घेतले पाहिजे. सामान्य ज्ञान किंवा साध्या तर्कानुसार नैराश्य म्हणजे एखाद्या व्यक्तिभोवतालच्या वातावरणाचा परिणाम किंवा प्रभावामुळे  होणारी मनाची स्थिती असं म्हणता येईल. आपण जेव्हा भोवतालच्या असं म्हणतो तेव्हा त्यामध्ये आपल्या कामाचे ठिकाण, आपले घर व सार्वजनिक ठिकाणे तसेच आपले या सर्व ठिकाणच्या लोकांशी असलेले नाते यांचा समावेश होतो. हा सगळ्या आपल्या जीवनाचा एक भाग झालेला असतो जे आपल्याला नैराश्यपूर्ण वाटत असते
जेव्हा एखादी व्यक्ती ती निराश झालीय असं म्हणते, तेव्हा त्याचे अनेक अर्थ होतात, तिच्या जीवनात असुरक्षितता असू शकते, दैनंदिन जीवनाचा कंटाळा आला असू शकतो किंवा बहुतेक वेळा ती व्यक्ती अनेक आघाड्यांवर नकारात्मकतेमुळे किंवा अपयशामुळे हताश झालेली असू शकते. व्यक्तिपरत्वे नैराश्याची कारणे बदलू शकतात मात्र त्यांचा परिणाम एकच असतो ते म्हणजे नकारात्मक मानसिकता, जी निराश व्यक्तिच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतेआपण तथाकथित लोकप्रिय किंवा श्रीमंत व्यक्तिंमधील असुरक्षिततेची भावना थोडीशी बाजूला ठेवू, आपल्या पुणे शहरातल्या सामान्य माणसाभोवतालच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैराश्यावर थोडं लक्ष केंद्रित करू. चांगली नोकरी मिळण्यापासून ते घर घेण्यापर्यंत तुमच्या विविध इच्छा-अकांक्षा पूर्ण करण्याच्या धडपडीत तुम्हाला अनेक गोष्टींमुळे नैराश्य येऊ शकते. रिअल इस्टेटमध्ये बांधकाम व्यवसायिकही नैराश्यातून सुटू शकत नाहीत. विशेषतः ज्यांना वैध मार्गाने घरे बांधून थोडे पैसे कमवायचे आहेत ते इमारत बांधण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या मंजुरींच्या संपूर्ण प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यामुळे सहजपणे निराश होऊ शकतात. विचार करा बांधकाम व्यावसायिकांची ही परिस्थिती असेल तर जे लाखो ग्राहक आपला कष्टाचा पैसा अशा प्रकल्पांमध्ये गुंतवून जोखीम पत्करतात त्यांची काय परिस्थिती होत असेल. माझ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या एका मित्रानं अलिकडेच मला सामान्य नागरिकांना अवैध बांधकामांविषयी जागरुक करण्यासाठीच्या मोहिमेत मदत करण्याची विनंती केली. त्यावेळी माझ्या मनात आलेली पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही अवैध बांधकामांचा मार्ग निवडता तेव्हा तुम्हाला येणारे नैराश्य. तुम्हाला सतत भीती वाटत असते किंवा तुमच्यावर तणाव असतो कारण तुम्ही काहीतरी अवैध केल्याचे किंवा तुम्ही अवैध इमारतीत घर खरेदी केल्याचे तुम्हाला माहिती असते. यामुळे तुम्ही नैराश्याला बळी पडता.
नैराश्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे तुम्ही सरकारी यंत्रणेला वैतागता. गाडी चालवण्याचा परवाना वेळेवर मिळत नाही, वीज देयक चुकीचे मिळते, मालमत्ता देयकावर नाव बदलण्यासारख्या लहान सहान कामांसाठी सरकारी कार्यालयात अनेकवेळा चकरा माराव्या लागतात. अशा अनेक गोष्टींमुळे अगदी कणखर मनाच्या व्यक्तिही वैतागू शकतात व त्यांना नैराश्य येऊ शकते. इथे आपण तथाकथित मध्यम व उच्च मध्यम वर्गाबद्दल बोलतोय, गरीबांच्या बाबतीत तर नैराश्याची कारणं कितीतरी अधिक असतात. पीएमटीची बस वेळेत न मिळाल्यानं कार्यालयात जायला उशीर होतो, स्वस्त धान्याच्या दुकानात आवश्यक गोष्टींचा तुटवडा असतो, पाणी पुरवठा होत नाही, शाळेची फी, वाढता वैद्यकीय खर्च अशी हजारो कारणं असतात ज्यामुळे एखाद्या व्यक्तिला नैराश्य येतं. या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा स्मार्ट शहराविषयी बोलतो तेव्हा त्याचे उद्दिष्ट केवळ मोफत वाय-फाय किंवा सुशोभिकरण असू नये. तर नागरिकांचं दैनंदिन जीवन कशाप्रकारे सहज-सोपं होऊ शकेल याचा विचार झाला पाहिजे. असं झालं तरच नैराश्यविरोधात खरं संरक्षण मिळेल. मोफत वाय-फाय, सुशोभिकरण या गोष्टींचं महत्व कुणीही नाकारत नाही, मात्र त्याचवेळी चांगले शिक्षण तसेच सार्वजनिक आरोग्य या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. या पार्श्वभूमीवर मी आमच्या घरचेच एक उदाहरण देतो. आमच्याकडे काम करणाऱ्या बाईंनी मुलाच्या आजारापणात उपचारासाठी व त्याच्या शाळेची फी भरण्यासाठी सावकाराकडून कर्ज घेतले होते. आता तो ते पैसे परत मिळावेत म्हणून त्यांना दिवस-रात्र त्रास देत होता, त्यामुळे त्यांची मनःशांती पूर्णपणे नष्ट झाली होती व परिणामी त्यांना नैराश्य आले होते. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही आजूबाजूच्या लोकांशी बोलल्यावर प्रत्येकालाच काही ना काही समस्या आहेत ज्यामुळे त्याला किंवा तिला आयुष्यात निराश वाटत असतेआपल्या भोवताली असलेल्या बहुतेक व्यक्ती शिक्षण व आरोग्यासारख्या मूलभूत गोष्टींसाठी काळजीत (निराश) असताना आपण कोणत्या प्रगतीविषयी बोलत आहोत. स्मार्ट शहर या योजनेत काही वावगं नाही स्मार्ट शहराचं यश मोजायचं असेल तर मात्र आपलं उद्दिष्ट नैराश्य-मुक्त शहराचं असावं.
आणखी एका गोष्टीवर विचारच होताना दिसत नाही ती म्हणजे नैराश्याविषयी जागरुकता; आपले सरकार स्थानिक संस्थांसह शौचालये बांधणे किंवा स्वाईफ्लू किंवा डेंगीसारख्या आजारांविषयीच्या जागरुकता मोहिमेवर लाखो रुपये खर्च करते, मात्र नैराश्य या विकाराविषयी व त्यामुळे एकूणच देशाचे किती नुकसान होते याचा कुणीही विचार करत नाही.  नैराश्य आलेल्या रुग्णाला तो आजारी आहे हे माहितीही नसते व व्यवस्थापनाच्या तत्वांनुसार; केवळ निरोगी व आनंदी मनच अपेक्षित परिणाम साधू शकते. विचार करा जेव्हा समाजामध्ये अगदी वाहन चालकापासून ते एखाद्या कंपनीच्या सीएमडीपर्यंत सगळेजण जाणता किंवा अजाणता निराश असतात तेव्हा त्यांची उत्पादकता किती कमी होईल व यामुळे होणारे नुकसान किती प्रचंड असेल. नैराश्यवरचा रामबाण उपाय म्हणजे आनंद, प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी असते त्यामुळे आपला आनंद आपणच शोधायचाय. त्यासाठी गरज आहे ती संवादाची व स्वतःला समजून घेण्याची. स्मार्ट शहराचा विचार करताना असा संवाद घडवून आणणं तसंच लोकांना ज्यातून आनंद मिळेल असे उपक्रम राबवणं, लोकांना अशा संधी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. आपल्याला लोकांसाठी अशा जागा तयार कराव्या लागतील जिथे समाजाच्या प्रत्येक वर्गातील लोक एकत्र येऊ शकतील व एकमेकांशी संवाद साधू शकतील, देवाण घेवाण करू शकतील, काहीतरी सादर करू शकतीलसंवाद साधण्याशिवाय आनंद शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एखादा छंद जोपसणे मग हा छंद जर निसर्गाशी निगडीत असेल तर आणखी उत्तमआता क्षणभर तुमचे डोळे बंद करा व आपल्या स्मार्ट शहरात अशी किती ठिकाणं आहेत याचा विचार करा व अशी ठिकाणं असली तरीही त्यांचा हेतू साध्य होईल अशा परिस्थितीत ती आहेत का? आपल्याला अशा ठिकाणी प्रदूषण व अतिक्रमणं दिसतात, उदाहरणार्थ नदीकाठी फेरफटका मारायचा विचार केला तर नदीची परिस्थिती पाहूनच तुम्हाला आणखी नैराश्य येईल. नदीकाठी डोळे बंद करूनही फेरफटका मारणं शक्य नसतं कारण सगळ्या प्रकारच्या प्रदूषणांचा दर्प तुमच्या नाकापर्यंत पोहोचतोच. त्याचशिवाय दाटीवाटीने लावलेल्या गाड्या, पाणीपुरीवाले/पावभाजीवाल्यांच्या गाड्या, जोडीला कचऱ्याचे ढीग तुमचा फेरफटका अशक्य करून टाकतात. निराश मनाला थोडा तजेला मिळेल यासाठी दुर्दैवानं आपल्याकडे अशा जागा नाहीत जिथे नुसता फेरफटका मारता येईल, असल्या तरी त्यांची संख्या फारच कमी आहे हे कटू सत्य आहे. त्यामुळे तुमच्याकडे एकच पर्याय उरतो मॉलमध्ये जा, पैसे खर्च करा आणि घरी येताना डेबिट कार्डच्या बिलांकडे पाहात आणखी निराश व्हा. त्यातच खिशात पैसे नसतील तर आपल्याला हवं ते खरेदी करता येत नाही या भावनेनं आणखी नैराश्य येतं.
स्मार्ट शहर निर्मात्यांविषयी पूर्णपणे आदर राखत असं म्हणावसं वाटतं की, मोफत वाय-फायसारख्या सुविधांमुळे सामान्य माणसाचं आयुष्य आणखी सोपं झालं तरच त्याचा उपयोग आहे. नाहीतर वाय-फायमुळे माणसं समाज माध्यमांवर जास्त वेळ घालवून आणखी एकलकोंडी होतील, एका आभासी जगात वावरू लागतील जिथे सोबतीला फक्त नैराश्य असेल. आपल्याला खरी गरज आहे खुल्या मैदानांची, उद्यानांची, नाट्यगृहांची व विविध सार्वजनिक ठिकाणांची जिथे लोक एकत्र येऊ शकतील व एकमेकांशी संवाद साधू शकतील. इथे ते कला सादर करतील, त्यांचे छंद जोपासतील तसंच इतरांच्यासोबत मनमोकळं हसतील, यातूनच एक निकोप समाज विकसित होईल. हे सगळं लवकर व्हायला हवं कारण आपल्याकडे फार थोडा वेळ आहेआपण एक गोष्ट स्वीकारली पाहिजे की आपल्यापैकी प्रत्येक जण या ना त्या कारणामुळे निराश होतोच, त्यामुळे या सर्वात भयंकर विकाराला लढा देण्यासाठी एकत्र यायची जबाबदारीही आपलीच आहे. आपल्याला याची जाणीव लवकर झाली नाही तर स्मार्ट शहर व्हायच्या आधी हे नैराश्यग्रस्त शहर झालेलं असेल.

संजय देशपांडे


Mobile: 09822037109


No comments:

Post a Comment