Wednesday 3 May 2017

रणथंबोर, वाघांचे वस्तीस्थान !




















भारतामध्ये, पारपत्र किंवा ओळख पत्र नसतात तसेच विविध धर्मांचा पगडा मोठा असतानाही, काळं पाणी ओलांडलेली काही माणसं त्याला अपवाद असतात- मला असं वाटतं भगवी वस्त्र घातलेला एखादा साधू किंवा हातात वाडगा घेऊन फिरणारा एखादा भिक्षेकरी किंवा टोपीवर व अथवा छातीवर चांदीचे क्रॉस मिरवणारा एखादा माणूस, अगदी खैबर खिंडीपासून ते केप कॉमोरिनपर्यंत बिनदिक्कतपणे भटकंती करू शकतो, त्यांना कुणीही कुठे किंवा कशाला जायचंय असं विचारणार नाही.… जिम कॉर्बेट.

जिम कॉर्बेट यांचे वरील अवतरण द मॅन इटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मधील आहे. या पुस्तकात  ते माणूस व प्राण्यांमधील संस्मरणीय चकमकीच्या आठवणी सांगतात. त्याचप्रमाणे या प्रवासात जिथे चकमकी घडल्या त्या भूमीविषयी काही रोचक माहितीही सांगतात. जंगलाचा विषय सुरु करण्यासाठी हे अतिशय वेगळे अवतरण असले तरीही आपण दोन गोष्टी समजून घेतल्याशिवाय कोणत्याही जंगलाचे संरक्षण करता येणार नाही. एक म्हणजे जंगलाची भाषा व दुसरे म्हणजे  जंगलातील व जंगलाभोवतीच्या लोकांची मानसिकता जे जंगलाचे एक प्रकारे रक्षक किंवा भक्षक पण असतात. जिम कॉर्बेट यांना या दोन्ही गोष्टी अतिशय चांगल्याप्रकारे समजल्या होत्या, एवढेच नाही तर त्यामध्ये त्यांचा हातखंडा होता कारण आयुष्याचा बहुतेक काळ त्यांचे वास्तव्य जंगलातच होते. लहानपणापासूनच ते माझा आदर्श आहेत तसेच जंगलांच्या अधिकाधिक जवळ येण्याचे कारणही. एप्रिल अखेर आली की आमच्या वन्यजीवप्रेमी मंडळींचा गट (काही सम आवड असणारेमित्र) जंगलाच्या आमच्या वार्षिक भेटीसाठी सज्ज होतात. यावेळी रणथंबोर तसेच झालना बिबट्या अभयारण्य या फारशा माहिती नसलेल्या ठिकाणाला भेट दिली, ज्याचा अनुभव मी पुढे देणारच आहे. मला माझी चौदा वर्षांपूर्वीची मे महिन्यातली भेट आठवली. मी निस्सीम वन्यजीवप्रेमी असूनही मला मोकळेपणाने सांगावसं वाटतं की जंगल पाहून अतिशय उदास वाटलं असं रणथंबोर हे पहिलंच जंगल होतं. राजस्थानातला अतिशय कडक उन्हाळा होता. मी आत्तापर्यंत ज्या जंगलांना भेट दिलीय त्यात अगदी मेळघाटातही उन्हाळ्यात सगळी पाने गळून पडली तरी एक हिरवी छटा कायम असते. रणथंबोरमध्ये मात्र तुम्हाला सगळीकडे पिवळ्या व करड्या रंगाच्या छटा दिसतात. इथे जास्त उंच झाडं दिसतच नाहीत, सगळीकडे झुडुपं व खुरटी झाडं असतात व या पार्श्वभूमीवर लाल दगडातला रणथंबोर किल्ला दिमाखात उभा असतो! उन्हामुळे सांबराचा फरचा कोटही जीर्णशीर्ण झालेला असतो. मात्र मी जेव्हा जोगी महाल व राजबाग तलाव पाहिला, तसंच आजूबाजूच्या भागात भटकंती केली तेव्हा मला रणथंबोरमध्ये देशाच्या इतर भागातील कोणत्याही जंगलापेक्षा वाघांची सर्वाधिक छायाचित्रे का घेतली जातात हे जाणवलं. उन्हानं तळपणाऱ्या काळपट करडी छटा असलेल्या या प्रदेशात प्रथमदर्शनी भकास वाटलं तरीही तो पिवळ्या काळ्या पट्ट्यांसाठी अतिशय सुरेख कॅनव्हास बनतो. त्यातच रणथंबोर किल्ल्यामुळे प्रत्येक छायाचित्राला एक सुरेख पार्श्वभूमी मिळते व ते अतिशय संस्मरणीय होतं. त्यानंतर मी रणथंबोरच्या जंगलाच्या  प्रेमात पडलो कारण प्रत्येक करड्या रंगात एक हिरवी छटा असते याची मला जाणीव झाली.

आमची यावेळची सहलही त्याला अपवाद नव्हती. मी माझ्या मित्रांना हे जंगल पहिल्यांदा पाहिल्यानंतर मला कसं वाटतं व 44 अंश सेल्सिअस तापमानासाठी, तसंच तुमच्या जीपला वेढणाऱ्या धुळीच्या लोटांसाठी तयार राहा अशी कल्पना दिली होती. दिल्लीला उतरल्यानंतर आग्र्याला जाण्याच्या रस्त्यावर आम्हाला जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल तसंच आमच्या लष्करातल्या एका मित्रामुळे आग्रा हवाई तळ पाहायला मिळाला. आम्ही सवाई माधोपूरला पहाटे 2 वाजता पोहोचलो, जो रणथंबोरचा एक प्रकारे शेजारी आहे. जंगल सफारी पहाटे सहा वाजता सुरु होणार होती त्यामुळे आम्हाला पाच वाजता उठणं भाग होतं. मी जेमतेम दोन तास झोपून तयार झालो. डोळ्यांवर झोप होती मात्र मन प्रसन्न होतं. मी आधीही सांगितल्याप्रमाणे जंगलातली ताजी ऑक्सिजननं भरलेली हवा तुमचा थकवा घालवून टाकते. त्याचशिवाय वाघच नाही तर इतरही प्राण्यांचा (मात्र मनात कुठेतरी वाघाचाच विचार सुरु असतो) शोध घ्यायच्या विचारानं झोप कुठल्या कुठे पळून जाते. रणथंबोरमध्ये वाघ पाहण्यासाठी निघालेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ती 10 मार्गांमध्ये विभागली जातात. आम्हाला मार्ग 2 देण्यात आला होता. ही मार्ग व्यवस्था गाईड व जिप्सी चालकांना फारशी आवडत नाही कारण अभयारण्याचे अधिकारी त्याची धोरणे सतत बदलत असल्यामुळे गोंधळ होतो अशी त्यांची प्रतिक्रिया होती. मुख्य तक्रार अशी होती की ज्या मार्गावर सर्वाधिक वाघ दिसतात ते मार्ग अभयारण्याचे अधिकारी बंद करतात. यामुळे अनेक पर्यटकांना वाघ दिसत नाही व ते त्याचसाठी तर जंगलात आलेले असतात. रणथंबोरला येण्यापूर्वी आम्हाला माहिती मिळाली होती की एक व दोन मार्गावर रणथंबोरचं मुख्य आकर्षण असलेल्या दोन वाघिणी बछड्यांसोबत आहेत, त्यामुळेच आम्ही या मार्गाची निवड केली होती. केवळ वाघच नाही तर इतरही अनेक प्रजाती न दिसण्याची निराशा टाळण्यासाठी जंगलाला भेट देण्यापूर्वी त्याविषयी आधी माहिती घेणे अतिशय महत्वाचे आहे. एक म्हणजे उन्हाळ्यातली पाण्याची परिस्थिती, जर एखाद्या मार्गावर किंवा विभागात पुरेशी पाणतळी किंवा पाण्याचे नैसर्गिक स्रोत नसतील तर बहुतेक प्राणी त्या भागातून निघून जातात त्यामुळे तुम्हाला फक्त झाडंच न्याहाळत बसावी लागतात. त्याचप्रमाणे अतिशय महत्वाचा घटक म्हणजे बछडे असलेल्या वाघिणीविषयी माहिती किंवा एखाद्या विशिष्ट वाघाने नुकतीच शिकार केली असल्यास त्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे कारण याच दोन मुख्य कारणांमुळे वाघ जंगलामध्ये एका विशिष्ट भागात जास्त वेळ राहतो. वाघ एकाच भागात राहिल्यास तो दिसण्याची शक्यता जास्त असते. त्याप्रमाणे रणथंबोरच्या कडक उन्हाळ्यात संपूर्ण जीवनचक्रच पाणवठ्याभोवती फिरत असते त्यामुळे सर्वाधिक घडामोड इथेच होते. या पाणवठ्यांच्याभोवती पँगोलीन, ससा किंवा मुंगूस यासारखे लहान प्राणी व पक्षी पाहणे शक्य आहे. त्यामुळे वाघ दिसावा म्हणून अशा मार्गांवर किंवा भागांमध्ये फिरणे महत्वाचे आहे. याच कारणामुळे पर्यटक नंतर तक्रार करतात की त्यांना त्यांच्या सफारीमध्ये वन्यप्राणी अजिबात दिसले नाहीत कारण ज्या भागातून बहुतेक प्राण्यांनी जंगलाच्या इतर विभागात किंवा भागांमध्ये स्थलांतर केले आहे तेथेच ते फिरत राहतात.

त्याचदिवशी मी अर्ध्या दिवसाची सफारी घेतली होती. इथे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये काही दुर्मिळ क्षण हमखास टिपता येतात. अर्ध्या किंवा पूर्ण दिवसाची सफारी घेतली तर बाकीच्या सफारीमधल्या वाहनांना बाहेर पडावं लागलं तरीही तुमच्या वाहनाला अगदी दुपारीही जंगलात थांबता येतं. यातला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे तुमच्या जिप्सीला मार्गाचं किंवा विभागाचं बंधन राहात नाही, ती जंगलातल्या पर्यटकांसाठी खुल्या भागात कुठेही फिरू शकते. मात्र सामान्य सफारीच्या वाहनांकडून मिळालेली माहिती अतिशय महत्वाची असते, कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या सफारीचा मार्ग बदलू शकता, त्यामुळे तुम्हाला वाघ किंवा प्राणी हमखास दिसू शकतात. अर्थात तुम्ही जेव्हा अर्धा किंवा पूर्ण दिवसाचं आरक्षण करता तेव्हा तिथल्या वन्य जीवनाची काय परिस्थिती आहे याची व्यवस्थित माहिती करून घ्या. नाहीतर ही सफारी महाग असल्याने तुमचे पैसे वाया जाऊ शकतात. अगदी पूर्ण दिवसाची सफारी घेऊनही वाघ किंवा इतर प्राणी न दिसलेले लोकही मला भेटले आहेत. लक्षात ठेवा व्यवस्थित माहिती घेतली असली, तसंच पूर्ण दिवसाची सफारी असली तरीही जंगल विस्तीर्ण असल्याने वाघ नशीबानीच दिसतो. त्यामुळेच माझा असा सल्ला आहे की फक्त वाघावर लक्ष केंद्रित करू नका, त्याऐवजी तुम्ही जास्तीत जास्त वन्य जीवन पाहण्याचा प्रयत्न करा. विशेषतः रणथंबोरसारख्या जंगलामध्ये उन्हाळ्यात दुपारी प्रचंड उष्मा असल्याने सगळे प्राणी पाणवठ्यापाशी किंवा सावलीच्या शोधात जातात.

स्वाभाविकपणे जंगलातल्या पाणवठ्यांवर वाघांचा पहिला हक्क असतो. वाघ बहुतेकवेळा दुपारी पाण्यापाशी किंवा जवळपास सावलीत विश्रांती घेत असतात. विशेषतः शिकारीचे कच्चे मांस खाल्ल्यानंतर वाघाच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण होते. म्हणूनच थंड वाटावे यासाठी तो पाण्यात जाऊन बसतो. अशावेळी वाघाला काही उपद्रव न करता तुम्ही तासन् तास छायाचित्रे काढू शकता. पाणवठ्यावर आल्यावर त्यात वाघ बसलेला पाहून इतर प्राण्यांच्या प्रतिक्रिया बघायला मजा येते. पाण्यातही वाघ शक्यतो झाडांची सावली असलेल्या भागात बसतो, डोके थोडेसे पाण्याच्या वर ठेवून बाकी शरीर पूर्णपणे पाण्यात बुडालेले असते. यामुळेच इतर प्राण्यांना अतिशय धक्का बसतो कारण पाणवठ्याच्या अगदी जवळ येईपर्यंत इथे वाघ बसलेला आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही, प्रत्येक प्राणी वाघ पाहून वेगळी प्रतिक्रिया देतो. अशाच एका पाणवठ्यावर दोन नर वाघ आरामात पहुडले होते व त्यांची भरपूर छायाचित्रे काढल्यानंतर मी कॅमेरा बाजूला ठेवला व इतर प्राण्यांचे निरक्षण करू लागलो. चितळांचा एक कळप पाणवठ्याकडे चालला होता, त्यांनी वाघांना पाहिल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढला, त्यानंतर संपूर्ण कळप पाणी न पिता पळत सुटला. कोतवालासारख्या पक्षांना मात्र वाघ आपल्याला काहीही करणार नाही याची खात्री असल्यामुळे ते आरामात असतात. एक मोर दबक्या पावलांनी आला, पाण्याकडे पाहात बराच वेळ वाट पाहिली व पाणी न पिता परत निघून गेला. एक लांडोर आली व ती वाघाकडे बघत होती. शेवटी तिच्या तहानेने भीतीवर मात केली. तिने पाणवठ्याच्या  वाघ बसलेल्या विरुद्ध कोपऱ्यातुन  जाऊन पाणी प्यायले व पळून गेली. वाघाला यापैकी कोणत्याही प्राण्यांमध्ये काहीही रस नव्हता तरीही तो कुतुहलाने लांडोरीकडे बघत होता. मी जंगलातली ही खास दृश्य पाहण्यात गुंगून गेलो होतो. प्राण्यांच्या या निरीक्षणामुळेच आम्हाला वाघ शोधायला अनेक वेळा मदत झाली. आमच्या एका सफारीमध्ये चालकाला एक सांबरांचा कळप दिसला. सगळ्यांच्या शेपट्या ताठ झालेल्या व उथळ भागातील एका पाणवठ्याच्या दिशेने ते काळजीपूर्वक चालले होते. आम्हाला समजलं की सांबरांना पाण्यात काय धोका आहे हे समजलं नव्हतं तरीही एका सांबराने अचानक इशारा दिला होता. आम्हाला खात्री पटली की सांबराला वाघ प्रत्यक्ष दिसल्याशिवाय ते इशारा देत नाही. त्यामुळे आम्ही पाणवठ्याच्या दिशेने निघालो. आम्हाला पाण्यातून नुकताच बाहेर येत असलेला वाघ दिसला. याच सगळ्या अनुभवांमुळे जंगलाचा अनुभव संस्मरणीय होतो कारण तुम्हाला जंगलाची भाषा समजू लागलेली असते. मला वाटते की जंगलाचा हाच खरा अनुभव आहे. वाघाची छायाचित्रे घेणे हा एक भाग झाला व संपूर्ण जंगल त्याच्या सान्निध्यात कसे वागते हे अनुभवणे म्हणजे जंगल जाणून घेणे, जंगल जगणे, यामुळे तुम्ही जंगलावर मनापासून प्रेम करू लागता व तुम्हाला जंगलात पुन्हा पुन्हा यायची ओढ लागते.

त्यानंतर दुसऱ्या जिप्सीतले आमचे इतर मित्र आमच्यासोबत आले व त्यांनी आम्हाला नूर नावाच्या एका वाघिणीसोबत बछडे दिसल्याचे सांगितले. ज्यांना व्याघ्र प्रकल्पांविषयी फारशी माहिती नसते त्यांना सांगतो, सर्व जंगलांमधील व्याघ्र प्रकल्पांची सर्वोच्च प्रशासकीय संस्था असलेल्या व्याघ्र प्राधिकरणाने वाघांना त्यांच्या क्रमांकाने ओळखले जावे त्यांच्या नावाने नाही असा निर्णय घेतला आहे. तांत्रिकदृष्ट्या हे तर्कशुद्ध असले तरीही टी19 किंवा टी 60 अशा नावांनी हाक मारण्यापेक्षा स्थानिकांनी किंवा गाईडने वाघांना नावं दिलेली असल्यामुळे ते अधिक ओळखीचे वाटतात. केवळ क्रमांक वापरल्यानंतर आपण वाघासारख्या रुबाबदार प्राण्याविषयी नाही तर कुणा यंत्राविषयी बोलतोय असं वाटतं. तरीही अनेक ठिकाणी गाईड, जिप्सीचालक व अगदी जंगलाचे सुरक्षा रक्षकही वाघांना त्यांनी दिलेल्या नावानेच हाक मारतात. त्यामुळे आम्ही आमच्या मित्रांनी सांगितलेल्या ठिकाणी लगेच गेलो आणि आश्चर्य म्हणजे आम्हाला तिथे नूर तिच्या जेमतेम सात ते आठ महिन्यांच्या बछड्यांसोबत दिसली. या वयाचे बछडे अतिशय खेळकर असतात व आई आरामात सावलीत पहुडलेली असताना ते तिच्या अवतीभोवती खिदळत असतात. बछड्यांसोबत असलेल्या वाघिणीचं वागणं पाहणं अतिशय रोचक असतं कारण त्यांना सुरक्षित ठेवून त्यांना खाऊ घालणं असं अतिशय अवघड काम तिला करायचं असतं. त्यानंतर बछडे जेव्हा वयाने वर्षाहूनही लहान असतात ते चित्त्याचे भक्ष्य ठरू शकतात, त्यामुळे तिला बछड्यांना जवळपास ठेवूनच शिकारीसाठी जावं लागतं. वाघ होणं हे काही सोपं नसतं. असं म्हणतात की वाघ पन्नास वेळा प्रयत्न करतो तेव्हा त्याला एकदा शिकार मिळते. रणथंबोरच्या कडक उन्हाळ्यात जंगलात फिरून, सावज शोधून त्याची शिकार करणं हे अतिशय थकवणारं असतं. यावेळी दौऱ्यात आम्हाला नूर अनेकदा तिचे बछडे तसेच इतर वाघिणींसोबत दिसली, सावजाचा पाठलाग करताना ती खरोखरच दमलेली दिसत होती.आम्हाला टी19 नावाची एक वाघीण तिच्या जेमतेम दोन महिन्यांच्या बछड्यांसोबत पाहायला मिळाली, ते साधारण मोठ्या मांजरीच्या आकाराचे होते, मात्र वयात येणाऱ्या वाघाची सगळी वैशिष्ट्य त्यांच्यात होती. बछडी एवढी लहान असताना वाघीण अतिशय सतर्क असते व इथे तर ती शिकारीसाठी आली होती. टी19 (ऐकायला किती कंटाळवाणं वाटतं) एका सांबर हरिणाच्या शिकारीपाशी सावलीत आरामात बसलेली होती व तिच्या नजरेच्या टप्प्यात तिचे दोन बछडे होते. मी वाघाचे इतके लहान बछडे पूर्वी कधीच पाहिले नव्हते. केवळ शिकारीमुळे वाघिणीनं त्यांना असं उघड्यावर आणलं होतं, एरवी तिनं असं कधीच केलं नसतं.

आम्ही एका नर वाघाला असंच बसलेलं पाहिलं तेव्हा आम्हाला एक धक्कादायक अनुभव आला. त्यांच्या पंजामध्ये काहीतरी पांढरी वस्तू होती. झुडुपांमधून दुरून पाहताना तो एखादा मारलेला बगळा असावा व वाघ त्याच्या पिसांशी खेळतोय असं वाटलं. मात्र जेव्हा वाघ उघड्यावर आला तेव्हा मला धक्काच बसला, त्याच्या तोंडात कणकेची प्लॅस्टिकची पिशवी होती, त्यामुळे तो शहरातल्या रस्त्यांवरच्या भटक्या कुत्र्यांसारखा दिसत होता. हे कुणा पर्यटकांच्या वाहनामुळे झाले नव्हते. सुरक्षा रक्षकाने सांगितले की आरटीआरमध्ये मार्ग 2वर भैरोजी मंदिर आहे व स्थानिक आदिवासी अजुनही चोरून तिथे दर्शनासाठी येतात व असा कचरा करून जातात, त्याचाच हा परिणाम होता. इथे जिम कॉर्बेटची जंगलाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांविषयीची समज अतिशय महत्वाची ठरते. त्यामुळे आपल्याला लोकांना जुनाट परंपरांमुळे जंगलांचे नुकसान करू नका याची जाणीव करून देता येईल. आपला धर्म व वन्य जीवन वेगळं ठेवण्याची वेळ आता आली आहे नाहीतर आम्हाला दिसलेलं दृश्य सर्रास दिसू लागेल. वनविभाग गावकऱ्यांना जागरुक करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊ शकतो, त्याचशिवाय अशी ठिकाणं स्वच्छ ठेवण्यासाठी किमान काही कर्मचारी नियुक्त करू शकतो. कोणत्याही शस्त्रांशिवाय, पायी फिरून गस्त घालणाऱ्या वनरक्षकांना पुरेशी मदत देणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जंगलांमध्ये सगळ्याच वनरक्षकांकडे इतरांच्या संपर्कात राहण्यासाठी वॉकी-टॉकीसारखी बिनतारी संदेश यंत्रणा सुद्धा नसते. वाघ जंगलात वावरत असताना अशाप्रकारे पायी गस्त घालणे वनरक्षकांना धोकादायक वाटते व ही चिंता त्यांनी मला बोलून दाखवली आहे. आपल्याला नॅशनल जिओग्राफिक चॅनलमध्ये दिसते की इतर सर्व देशातल्या वनरक्षकांकडे अतिशय आधुनिक साधनं असतात. त्यांच्याकडे चार चाकी वाहनांनी गस्त घालण्यापासून ते बंदुकींपर्यंत सर्व काही सुसज्ज असते. मग आपणच आपल्या रक्षकांना अशी साधने का देत नाही हा मोठा प्रश्न आहे. मात्र तरीही आपण या वन रक्षकांनी आपला जीव धोक्यात घालून वाघ तसंच वन्य जीवनाचे रक्षण करावे अशी अपेक्षा करतो!

त्यानंतरचे चार दिवस भुर्रकन् उडून गेले कारण शेवटचे दोन दिवस आम्हाला झालना बिबट्या अभयारण्याला भेट द्यायची होती. ते जयपूरसारख्या शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. त्याविषयी मी एक वेगळा लेख लिहीनच. हे अभयारण्य मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाप्रमाणे शहरी भागाने वेगढलेले असूनही अतिशय छान ठेवण्यात आले आहे. मित्रांनो आपल्यापैकी अनेकांनी त्यांच्या आयुष्यात कधीच जंगलाला भेट दिलेली नसते. अगदी जवळपासची वनराईही पाहिलेली नसते, मी दोन कारणांसाठी असे करण्याची शिफारस करतो. एक म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात तुम्हाला स्वतःविषयी अनेक गोष्टींची विशेषतः तुमच्या शारीरिक मर्यादांची जाणीव होते. मनुष्यप्राणी स्वतःला अतिशय प्रगल्भ व हुशार प्रजाती मानतो. मात्र एका लहानशा मुंगीचं उदाहरण घ्या व ती किती सुंदर वारूळ तयार करते ते पाहा. विचार केला तर त्यासाठी कोणतीही ऑटो-कॅड ड्रॉईंग नसतात, सल्लागार नसतो किंवा जेसीबीसारखी यंत्रसामग्रीची मदत नसते. तरीही एक लहानशी मुंगी तिच्यापेक्षा लाखोपटींनी मोठे वारूळ उभारते. आपण मात्र तब्बल सहा वर्षांच्या काळात सगळ्या आधुनिक साधनसामग्रींची मदत घेऊन बुर्ज खलिफासारखी इमारत उभारतो व स्वतःला महान समजतो! आता स्वतःलाच प्रश्न विचारा की अधिक प्रगल्भ व हुशार कोण आहे, माणूस की मुंगी? अशा अनेक उदाहरणांमध्ये तुम्हाला जंगल शिकायला मिळते व दुसरे म्हणजे तुम्ही तुमच्या ज्ञानेंद्रियांचा विशेषतः निरीक्षण शक्तिचा अधिक परिणामकारकपणे वापर करायला शिकता

लक्षात ठेवा, जंगलात काही घटना कोणत्याही हेतूशिवाय घडत नाही. तुम्हाला जंगल खऱ्या अर्थानं उपभोगायचं असेल तर तुम्ही तुमची सगळी ज्ञानेंद्रिये सतर्क ठेवली पाहिजेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या समोर घडणाऱ्या गोष्टींचा उलगडा होईल! म्हणूनच तुम्हाला जंगलात जे शिकायला मिळतं ते तुम्हाला कोणत्याही महाविद्यालयात किंवा संस्थेतही शिकायला मिळणार नाही असं मला वाटतं. त्यासाठी प्रत्येकाने किमान एकदा तरी जंगलाला भेट दिली पाहिजे. त्यासाठी आधी जंगलांचे संवर्धन करणे आवश्यक आहे, कारण वन्य जीवनच उरले नाही तर आपण आपल्या सर्वोत्तम शिक्षकाला मुकू. त्याचसोबत आपल्या भविष्याचे दरवाजेही बंद होतील!


संजय देशपांडे

Mobile: 09822037109




No comments:

Post a Comment