Sunday 7 May 2017

झालना, बिबट्यांचे माणसातील गाव !





















ज्यांनी बिबट्याला नैसर्गिक अनुकूल वातावरणात कधीच पाहिलेले नाही त्यांना आपल्या भारतीय जंगलातील सर्वात रुबाबदार व देखण्या प्राण्याच्या दिमाखदार हालचाली व त्याच्या रंगसंगतीमधील सौंदर्याची कल्पनाच येणार नाही.” … जिम कॉर्बेट.

जेम्स एडवर्ड "जिम" 'कॉर्बेट (25 जुलै 1875 – 19 एप्रिल 1955) हे ब्रिटीश-भारतीय शिकारी व शोधक होते. नंतर ते वनसंरक्षक, लेखक व निसर्गवादी झाले. त्यांनी भारतातील अनेक नरभक्षक वाघ व  बिबट्यांची शिकार केली. विकीपिडीयामध्ये जिम कॉर्बेट यांची ओळख अशी असली तरीही माझ्या मते त्यांचं एका शब्दात वर्णन करायचं झालं तरजंगल असंच करता येईल. कॉर्बेट निसर्गाशी एवढे एकरूप झाले की ते आणि निसर्ग एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं वाटू लागतं. त्यामुळे जेव्हा ते बिबट्या हा भारतीय जंगलांमधील सर्वात सुंदर प्राणी आहे असं म्हणतात तेव्हा तो हमखास असला पाहिजे याविषयी माझे दुमत नाही. जंगलाविषयी जिम जे म्हणतात त्याला मी दोन कारणांमुळे आव्हान देऊ शकत नाही. एक म्हणजे त्यांनी अनेक वर्षे जंगलात घालवली आहेत व दुसरे म्हणजे तुम्ही तुमच्या गुरुंविषयी शंका घेऊ शकत नाही. आणि मी कॉर्बेट यांना निसर्ग या विषयातील माझे गुरु मानतो. मी इतके वेळा जंगलाला भेट दिली असली तरीही मला बिबट्या फारसा पहायला मिळालेला नाही. मी वाघ अनेकदा पाहिलाय, जरी तो कितीही वेळा पाहिला तरी समाधान होत नाही हे तितकंच खरं आहे !  मी जिम यांच्या वरील अवरणाविषयी अनेक दिवसांपासून विचार करत होतो. तसंच अनेक दिवसांपासून बिबट्याला जंगलात पाहायची इच्छाही होती. मी जेव्हा माझ्या वन्यप्रेमी मित्रांसोबत रणथंबोरला जायचं ठरवलं तेव्हा तिथे वाघ तसंच बिबटे दिसतात हे माहिती होतं. मात्र वाघ किंवा बिबट्या या दोन्हीमध्ये नव्याण्णव टक्के लोक वाघाच्याच मागे जातात व मी सुद्धा त्याला अपवाद नव्हतो. हे अतिशय स्वाभाविकपणे होतं कारण वाघाचं वलय इतर प्राण्यांपेक्षा वेगळं असतं, त्यामुळेच की काय भारतीय जंगलांमधील बिबट्याचे महत्व विशेष ओळखलं जात नाही. त्यामुळे मला जेव्हा वॉट्सऍपवर वन्यप्रेमी गटाकडून जयपूरजवळच्या झालना बिबट्या अभयारण्याविषयी माहिती समजली तेव्हा मी आमच्या रणथंबोरच्या सफारीला जोडून तिथे जायची संधी लगेच घेतली.

ज्यांना जंगलाविषयी फारशी माहिती नाही त्यांना आपल्या देशात जवळपास सगळ्या भागात दिसणाऱ्या बिबट्याचे महत्व किंवा त्याचं वेगळेपण जाणवणार नाही. असं पाहता पुणे जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणावर बिबटे आहेत. बिबट्याने ग्रामीण भागात गुराढोरांवर हल्ला केल्याची किंवा तो दिसल्याची बातमी एक दिवसाआड येत असते. त्यामुळे बहुतेक जण विचारतील की त्यात एवढं काय विशेष आहे व मी त्यांना दोष देत नाही, कारण आपल्याला जंगलांविषयी काहीच माहिती नसते किंबहुना आपण त्याबाबतीत निष्काळजी असतो असंही म्हणता येईल. सर्वप्रथम एक म्हणजे  मनुष्यप्राण्याला  स्वतः सोडून इतर कोणत्याही प्राण्याची काहीही काळजी नसते, त्यामुळे बिबट्याचा विषय तर दूरच राहिला. जे मोजके लोक जंगलात जातात ते मी आधी नमूद केल्याप्रमाणे वाघाची छायाचित्रं घेतात आणि त्यांना आपण जंगल पाहिल्यासारखं वाटतंविशेषतः जिथे वाघाचे अस्तित्व असते तिथे बिबट्या दिसून येणे मुळातच अतिशय अवघड असते. त्यामुळे त्याची छायाचित्रं घेणं त्याहूनही कठीण असते. तो अतिशय झपाट्यानं झाडा-झुडुपांमध्ये  मिसळुन  जातो व  दिसेनासा होतो, म्हणूनच त्याला जंगलामध्ये भूत म्हणतात ते योग्यच आहे. किती दुर्दैव आहे पाहा, इतक्या देखण्या प्राण्याला केवळ वाघाकडून मारले जाण्याची भीती असल्यामुळे तो अतिशय सजग व सतर्क असतो, म्हणून त्याला भूत म्हणतात तर वाघाला मात्र राजाचं बिरुद मिळतं! जिथे वाघ फिरत असतात तिथे बिबटे क्वचितच पाहायला मिळतात कारण वाघाला बिबट्या अजिबात आवडत नाही. याची दोन कारणे असू शकतात, एक म्हणजे तो वाघाच्या शिकारीच्या आड येऊ शकतो व दुसरे म्हणजे तो वाघाच्या बछड्यांना मारतो. वाघाने बिबट्याला मारल्याचे, तसेच बिबट्याचा अतिशय त्वेषाने पाठलाग केल्याचे किंवा त्याला हुसकावून लावल्याचे अनेक किस्से ऐकायला पाहायला मिळतात. मी जंगलात हजारदा वाघाला पाहिलंय मात्र बिबट्या दहा वेळाही दिसला नसेल. अनेकांना व्याघ्र प्रकल्पांमध्येही स्पष्टपणे बिबटे पाहायला मिळतात मात्र तो केवळ योगायोग किंवा नशीब असतं. वाघासारखा बिबट्या कधीही एका ठराविक रस्त्याने किंवा मार्गावरून जात नाही उदा. आमच्या अलिकडच्याच सफारीत आम्हाला नूर नावाची वाघीण पाणवठ्यातून बाहेर येताना व एका दिशेने जाताना दिसली. त्यानंतर गाईड व चालकाने तिचा जवळपास पाच किलोमीटर मागोवा घेत पाठलाग केला व पुढे आम्ही तिला फोटो काढायला गाठू शकलो. अशा प्रकारे वाघांच्या मार्गक्रमणाचा अंदाज बांधता येतो मात्र तुम्ही बिबट्याचा पाठलाग शंभर मीटरही करु शकणार नाही कारण तो कुठल्याही दिशेने जाऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर मी बिबट्याला अगदी जवळून आणि स्पष्टपणे पाहायला अतिशय उत्सुक होतो. मला असं वाटलं होतं की झालना हे बिबट्यांचं अभयारण्य असल्यामुळे मला निवांतपणे बिबटे पाहता येतील. मात्र मला दोन आश्चर्याचे धक्के बसले, एक म्हणजे झालना हे जयपूर शहरातच आणि मुख्य म्हणजे औद्योगिक क्षेत्रात आहे याची मला कल्पना नव्हती व दुसरे म्हणजे हे बिबट्यांचे अभयारण्य असले तरीही बिबटे अजिबात कसलीही काळजी न करता उघडपणे फिरत नाहीत, जे मी विसरलो होतो. झालनाचा प्रवेश अगदी शहरी भागातून होतो. हे आधी जयपुरच्या महाराजा मानसिंह यांचे खाजगी जंगल होते. हा भाग अगदी रणथंबोर सारखाच असला तरीही शहरीकरणात एखाद्या लहान बेटासारखा वाटतो. मला शहराच्या मध्यवर्ती भागात एवढे जंगल जपून ठेवल्याबद्दल राजस्थानच्या वनविभागाचे, नागरी विकास विभागाचे तसेच पर्यटन विभागाचे अभिनंदन करावेसे वाटते. तुम्ही जोपर्यंत झालना अभयारण्यामध्ये प्रवेश करेपर्यंत, तुम्ही प्रत्यक्ष जंगलात प्रवेश केलाय हे तुम्हाला कळत नाही. तसंच बिबट्या जवळपास असल्यावर विविध प्राण्यांनी दिलेले संदेश, प्रत्यक्ष बिबट्या बघणं हे एखाद्या व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ बघण्याइतकंच रोमांचक असणार आहे याची जाणीवही होत नाही. यातच या संपूर्ण व्यवस्थेचे यश आहे. बिबट्याला जगवणे, आजूबाजूच्या शहरी भागात प्रवेश करू न देणे यासाठी दोन गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. एक म्हणजे घनदाट झाडीसह लपण्यासाठी जागा तसंच शिकारीसाठी भरपूर प्राणी बिबट्याच्या जीवनशैलीसाठी अत्यावश्यक आहेत. इथे दोन्ही गोष्टी सहजपणे उपलब्ध आहेत. इथे घनदाट झाडी असलेले डोंगर आहेत, ज्यातील गुहांमध्ये बिबटे राहतात. तसंच बिबट्याच्या उदरभरणासाठी मोर, लंगूर, नील गाय व चितळ आहेत. साहजिकच झालनामध्ये तुम्हाला बिबट्या पाहण्याचा उत्तम अनुभव मिळतो व इथेच तुम्ही मोराने दिलेल्या इशाऱ्यावरून बिबट्याचा पाठलाग कसा करायचा हे शिकू शकता. एरवी तुम्ही चितळ किंवा सांबराच्या इशाऱ्यावरून सहजपणे त्याचा पाठलाग करू शकता. येथे सांबर, हरीण नाहीत व निलगाय ईशारा देत नाहीत त्यामुळे मोर व माकडांच्या आवाजावरूनच बिबट्याचे अस्तित्व शोधता येते.

तरीही भोवताली नजर फिरवत मी जेव्हा झालनामध्ये प्रवेश केला तेव्हा मला तिथे काय थरार अनुभवायला मिळेल याविषयी शंका होती. मी त्या पिवळसर करड्या भूमीतून नजर फिरवत होतो, आजूबाजूला कुणी शत्रू आहे का याचा इशारा देणाऱ्या आवाजांसाठी कान टवकारलेले होते व त्याचे अस्तित्व आजूबाजूला जाणवत होते. मात्र झालनाने मला आश्चर्याचा धक्का दिला. पुढील दोन दिवस आम्ही सतत धुळीनं माखलेल्या रस्त्यांवरून फिरत होतो. या अभयारण्याचे क्षेत्रफळ जेमतेम तीस चौरस किलोमीटरचे आहे, मात्र तरीही ते तुम्हाला आजूबाजूचे शहरीकरण विसरायला लावते. पाणवठ्यावर वाट पाहाणं, मोराचा इशारा, नील गाईंचं जीवाच्या आकांतानं पळणं आणि बिबट्याचं गुरगुरणं हा सगळा रोमांच आम्ही अनुभवला. माझ्यावर विश्वास ठेवा अगदी दिवसा ढवळ्या, जिप्सीमध्ये सुरक्षित असताना रागावलेला बिबट्या भोवताली गुरगुरत फिरत असताना तुमची पाचावर धारण बसते. मला कुमाऊँच्या गावकऱ्यांच्या मनातली भीती आठवली ज्याविषयी जिम कॉर्बेट यांनी त्यांच्या रुद्रप्रयाग्ज लेपर्ड या त्यांच्या पुस्तकात उल्लेख केला आहे. माझा आता त्यावर पूर्णपणे विश्वास बसला आहे, कारण माझ्या अंगावर दिवसाढवळ्या भीतीने शहारा आला. विचार करा कुडाच्या भिंती, व फळ्यांचे दार असलेल्या झोपडीत, मिट्ट अंधारात बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज ऐकून गावऱ्यांची अवस्था कशी झाली असेल. मला जाणीव झाली की झालनामध्ये बिबट्या दिसणे सोपे नाही कारण तो आपल्या स्वभावानुसारच वागणार. म्हणूनच एकदा आम्ही पाणवठ्यापाशी वाट पाहात होतो, त्याचवेळी भोवतालच्या दाट झुडुपांमधून बिबट्याची मादी हळूच डोकावली. तेवढ्यात एका खाजगी गाडीची (त्यांना आत्तापर्यंत परवानगी होती, मात्र नशीबाने 1 मे 17 पासून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली) हालचाल झाली. मादीला पाहण्यासाठी इंजिन सुरु झाले, त्याचवेळी तिचे डोके दिसेनासे झाले व ती जंगलात गुडूप झाली.

येथे वनविभाग संवर्धनाचे प्रयत्न करतो आहे, मात्र थेट जंगलात एक काली मातेचे मंदिर आहे. इथे स्थानिकांना यायची परवानगी आहे, वाईट म्हणजे ते लंगूर, चितळ व नील गाईंसाठी खायला आणतात. मी दर्शनासाठी आलेल्या एका जोडप्याला या प्राण्यांना भजी खाऊ घालताना पाहिलं. ते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये खाद्यपदार्थही टाकून देतात, हे थांबलं पाहिजे. एक लक्षात ठेवलं पाहिजे की झालनामध्ये फक्त बिबटे नाहीत तिथे इतरही बरंच वन्यजीवन आहे. त्यातही नेहमी मोठा रोमांच असतो, इथे आम्हाला मोरांची झुंज पहायला मिळाली. हे दृश्य मी जंगलात कधीही पाहिलं नव्हतं. मी एफबीवर त्याची छायाचित्रं व वर्णन टाकलं होतं ते इथे देतोय  आम्ही त्यांच्याकडे बघत नव्हतो तर दुर्लक्ष करत होतो कारण झालना बिबट्या अभयारण्यामध्ये मोर दिसणं नेहमीचंच होतं. आमचे डोळे पिवळे काळे ठिपके शोधत होते. त्यामध्ये मोराची भूमिका फक्त इशारा देण्यापुरती होती. झालनामध्ये चितळांची संख्या कमी आहे, नीलगायी भरपूर असल्या तरीही इशारा देण्यासाठी त्यांचा काही उपयोग नव्हता म्हणून संपूर्ण भिस्त मोरांवर होती. जेव्हा आम्ही दोन मोर एकमेकांभोवती गोलाकार फिरताना पाहिले तेव्हा आम्हाला हे नेहमीचं दृश्य आहे असं वाटलं. मात्र लवकरच आम्हाला जाणीव झाली की ती मादीवरून चाललेली झुंज होती. पुढची पंधरा मिनिटं आम्ही बिबट्याविषयी विसरून गेलो इतकी अटीतटीची झुंज झाली. त्यांची पिसं एकमेकांमध्ये गुंतली होती व तीक्ष्ण पंजे दुसऱ्याला मारायला सज्ज होते. ही झटापट इतक्या वेगाने सुरु होती की लक्ष केंद्रित करणे अशक्य होते. तरीही वन्यजीवन छायाचित्रण म्हणजे केवळ जास्तीत जास्त तपशील चित्रित करणे नाही तर अचूक क्षण टिपणे! हा देखील असाच एक क्षण होता.”

आम्हाला इथे जंगली ससेही दिसले, त्यातल्या एकाचे अगदी स्पष्ट छायाचित्र काढता आले. अनेक वर्षात मला असे करता आले नव्हते, ससे अतिशय लाजाळू असतात व छायाचित्रासाठी क्वचितच एका जागी थांबतात.

आपण सगळ्यांनीच विशेषतः पुण्यातल्या व महाराष्ट्रातील नगर विकास संस्थांनी झालनाला भेट दिली पाहिजे व झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणातही वन्यप्रदेशाचे कशाप्रकारे संवर्धन करता येईल व त्यासाठी पर्यटनाची कशी मदत घेता येईल हे पाहिले पाहिजे. एकेकाळी हे बिबटे समाजासाठी त्रासदायक ठरले होते व माणूस-प्राण्यातील संघर्ष टिपेला पोहोचला होता, अशावेळी झालनातील बिबटे नष्ट होणे हा एकमेव निकाल ठरला होता. मात्र थोडे सूज्ञपणे केलेले नियोजन व कृतींमुळे, माणूस व प्राणी दोघेही शांतपणे जगू व राहू शकले. मी वर नमूद केल्याप्रमाणे पुण्यातही असे काही भाग आहेत जिथे आपण पर्यटनासह बिबट्यांचे संवर्धन करू शकतोकॉर्बेटने म्हटल्याप्रमाणे बिबट्या हा निःसंशय अतिशय सुंदर प्राणी आहे व अतिशय कठीण परिस्थितीतही तो टिकू शकतो. त्यामुळेच भारतातल्या बऱ्याच ठिकाणी तो अजूनही दिसतो. मात्र आता त्याच्यासमोर एक बलाढ्य शत्रू उभा ठाकल्यानं तो हतबल झाला आहे. हा शत्रू दुसरा कुणीही नसून तुम्ही आणि मीच आहोत, आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या भोवताली बिबट्यांचे वसतीस्थान नष्ट करण्यासाठी जबाबदार आहोत. आपल्यापैकी प्रत्येकाला जोपर्यंत आपला गुन्हा समजत नाही, त्यासाठी आपण शिक्षा स्वीकारत नाही तसेच बिबट्यांच्या संवर्धनासाठी योगदान देत नाही, तोपर्यंत हा देखणा प्राणी हळूहळू नामशेषहोत जाईल.

संजय देशपांडे

Mobile: 09822037109


No comments:

Post a Comment