Tuesday 19 September 2017

आपत्ती विरहीत शहर का स्मार्ट शहर ?




















या जगात अनेक वाईट गोष्टी घडतात, उदाहरणार्थ युद्ध व आजार. मात्र या परिस्थितींमधूनही सामान्य माणसांच्या असामान्य कर्तुतृत्वाच्या कथा समोर येतातडार्यन कॅगन.
डार्यन ए. कॅगन हे अमेरिकी दूरचित्रवाणी पत्रकार आहेत, आधी ते सीएनएन या वृत्तवाहिनीसाठी वृत्त निवेदक म्हणून काम करत होते. कॅगन यांनी 1994 ते 2006 या काळात, अटलांटा, जॉर्जिया येथील सीएनएनच्या जागतिक मुख्यालयात मुख्य वृत्त निवेदक व प्रतिनिधी म्हणून काम केले. जवळपास चार वर्षांपूर्वी उत्तरांचलमध्ये पूर आला तेव्हा त्याविषयी विचार व्यक्त करताना मी वरील अवतरण वापरले होते. मात्र काही अवतरणे तुम्ही कधीही वापरली तरी तुम्हाला त्यातून बरेच काही शिकायला मिळते. कॅगन यांचे वरील अवतरणही तसेच आहे. सुदैवाने यावेळी मी कोणत्याही आपत्तीच्या संदर्भात लिहीत नाही. मला बीएनसीएने (पुण्यातील नामवंत स्थापत्यशास्त्र महाविद्यालय) आपत्तींच्या संदर्भात विकासकांचा दृष्टिकोन मांडण्यासाठी आमंत्रित केले होते त्याविषयी बोलतोय. माझ्यासाठी ही अतिशय उत्तम संधी होती, कारण शहरात कोणती आपत्ती आली तरी केवळ बांधकाम व्यावसायिकांना दोषी धरले जाते.  माध्यमे तसेच सामान्य जनतेला असा विश्वास असतो की शहराच्या बाबतीत काहीही वाईट घडण्यामागे बांधकाम व्यावसायिक, राजकारणी तसेच भ्रष्ट सरकारी अधिकारी यांचेच साटेलोटे असते (कुणी दुखावले गेल्यास मला माफ करा, मात्र हे शब्द माध्यमांचेच आहेत). या पार्श्वभूमीवर मला एक बांधकाम व्यावसायिक म्हणून आपत्ती, बचाव कार्य व घ्यायची खबरदारी याविषयी बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ही विशेष संधी होती म्हणून मी ती लगेच स्वीकारली. तुम्ही जे बोललात ते शब्दबद्ध करणे नेहमी अवघड असते म्हणून मी माझे विचार तुम्हाला अक्षररूपी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण ते मोठ्या संख्येने वाचकांपर्यंत पोहोचते. आपत्तींविषयी जागरुकता निर्माण करणे ही पहिली पायरी अतिशय महत्वाची असते व आपण नेमके तिच्याचकडे दुर्लक्ष करतो. आपत्तीला तोंड देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ती टाळणे; मात्र तुम्हाला ज्याविषयी माहिती नाही त्याला टाळणार कसे असा प्रश्न मला विचारावासा वाटतो.

इथे मी आपल्या जातक कथेतून एक सुंदर कथा शेअर करतो. मला व्यक्तिशः असे वाटते की आपण पंचतंत्र, विशेषतः निती व जातक कथांमधील कथा वाचल्या व त्यात जे लिहीले आहे ते आत्मसात केले तर आपल्याला बहुतेक आपत्ती टाळता येतील. त्यापैकी घनदाट जंगलात एका बेटावर एक नावाडी राहायचा. तो नदीच्या दोन्ही तिरांना प्रवाशांची ने-आण करून आपली उपजीविका चालवत असे. बाहेरील जग व गावादरम्यान ही नदी वाहात होती. एक दिवस एक पंडित गावात आला व बोटीत बसला. नावाड्याने नाव वल्हवायला सुरुवात केली. काहीवेळाने पंडिताने नावाड्याला विचारले की तू वेद वाचले आहेत का. अर्थातच नावाड्याने खजिल होऊन उत्तर दिले, नाही. त्यावर पंडित म्हणाला, अरे काय हे, तू तुझ्या आयुष्याचा बराच वेळ वाया घालवला आहेस. बोट मध्यावर पोहोचल्यावर पंडिताने विचारले तू उपनिषदे  वाचली आहेस का, पुन्हा नावाडी उत्तरला नाही. पंडित आश्चर्याने म्हणाला, अरे देवा तू  तर निम्मे आयुष्य वाया घालवले आहेस. दरम्यान अचानक वादळ सुरु झाले. नाव पाण्याच्या भोवऱ्यात शिरली व गोते खाऊ लागली. नाव उलटू शकते हे समजल्याने, नावाड्याने पंडिताला विचारले त्याला पोहता येते का. घाबरलेल्या पंडिताने उत्तर दिले, नाही त्याला पोहता येत नाही. हे ऐकून नावाडी म्हणाला, पंडितजी माफ करा पण तुमचे तर संपूर्ण आयुष्य वाया गेले आहे.

ही गोष्ट इथेच संपते. त्याचप्रमाणे आपण आपत्तीविषयी बोलतो किंवा चर्चा करतो, आपल्याकडे तात्विक पातळीवर सगळं काही असतं. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन समिती असते, तिच्यात प्रत्येक विभागातील सरकारी अधिकारी तसंच अनेक तथाकथित तज्ञ असतात. तरीही आपत्ती येत राहतात व प्रत्येक वेळी त्या टाळण्यात तसेच आपत्तीनंतरच्या व्यवस्थापनात यंत्रणा अपयशी ठरते ही वस्तुस्थिती आहे. त्या कथेतल्या पंडिताप्रमाणे आपल्याकडे सगळे पुस्तकी ज्ञान आहे मात्र ते ज्ञान आपत्तीच्या वेळी क्वचितच उपयोगी पडते. आपत्ती टाळण्यासाठी किंवा तिला तोंड देण्यासाठी आपण आपत्ती म्हणजे काय व तिचा आपल्यावर कितीप्रकारे परिणाम होईल हे आधी समजून घेतले पाहिजे. विस्ताराने सांगायचे तर आपत्तींचे पुढीलप्रकारे वर्गीकरण करता येईल 1. नैसर्गिक आपत्ती म्हणजेच पूर, भूकंप, चक्रिवादळ वा दुष्काळ2. मानवनिर्मित आपत्ती म्हणजे आग, इमारत कोसळणे इत्यादी3. सार्वजनिक आरोग्यविषयक आपत्ती म्हणजेच स्वाईन-फ्लू किंवा डेंगीसारखे साथीचे रोग, आता पटकी व प्लेग हे आजार संपले आहेत.4. पर्यावरणविषयक आपत्ती उदाहरणार्थ संपूर्ण शांघाय शहराचे कामकाज वायू प्रदूषणामुळे ठप्प झाले होते व चीनमध्ये सगळीकडे काहीवर्षांपूर्वी प्रचंड गदारोळ झाला होता. दिल्लीमध्येही असेच झाले होते. त्यानंतर भूस्खलनासारखे प्रकार घडतात ज्यामुळे मालमत्तेचे नुकसान होते. त्याचशिवाय ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्येही जंगलात लागणारे वणवे हे नेहमीचे दृश्य आहे. कॅलिफोर्नियात अलिकडेच लागलेल्या एका वणव्याने राज्याचा संपूर्ण पश्चिम भाग व्यापला होता5. शेवटचे म्हणजे दहशतवादी हल्ले ही देखील आधुनिक काळातील आपत्तीच आहे. एक अभियंता तसेच एक विकासक म्हणून मला आपल्या शहराची व्यवस्थित ओळख आहे. चक्रिवादळ किंवा भूकंप सोडले तर जवळपास इतर सर्व आपत्ती या मानवनिर्मित असतात किंवा त्या निर्माण होण्यासाठी मानवी घटक कारणीभूत असतो असे मला वाटते. मुळा/मुठा नद्यांवर पुरेशी धरणे आहेत, मात्र धरणाच्या पाण्याचा विसर्ग करताना नियोजनाचा अभाव, जलप्रवाहातील अतिक्रमणे (म्हणजेच संपूर्ण शहरात नदी पात्रे, नाले/ओढ्यांवरील अतिक्रमणे) तसेच पुरेशी झाडे नसल्यामुळे पुरासारख्या आपत्ती निर्माण होतात, केवळ जास्त पाऊस पडल्यामुळे नाही.

जेव्हा आपल्याला माहिती असते की जवळपास 80% आपत्ती या मानवनिर्मित असतात तर त्या टाळण्यासाठी आपण काय करत आहोत? याचे उत्तर म्हणजे आपण केवळ सराव संचलन करणे, अहवाल तयार करणे, आकाशवाणी/दूरचित्रवाहिनीवर आपत्तीविषयक (हास्यास्पद)जाहिराती देण्यातच समाधान मानतो. मात्र आपण आपत्ती टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करत नाही. उदाहरणार्थ आपल्या शहरातील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी पाहा ज्यामुळे वायूप्रदूषण होते. आपल्यासमोर दिल्ली किंवा शांघायमधल्या प्रदूषणाची उदाहरणे आहेतच. तरीही पुण्यातील रस्त्यांवर दररोज हजारो नवीन वाहने गर्दी करतच आहेत. या नवीन वाहनांची संख्या कमी करण्यासाठी आपण काय करणार आहोत ज्यातून कित्येक टन कार्बनडायऑक्साईड बाहेर सोडला जातो व हवा प्रदूषित होते व तीच हवा आपण श्वासादारे घेतो? शहरात अगदी मोडकळीला आलेल्या अवस्थेतील शेकडो वाड्यांचे उदाहरण घ्या, केवळ वाडेच कशाला अशा अनेक इमारती आहेत ज्यांचे संरचनात्मक लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिका किंवा नागरी संस्था नोटीस काढतात किंवा माध्यमांमध्ये जाहीर करतात की संरचनात्मक लेखापरीक्षण केले जाईल मात्र प्रत्यक्षात ते कोण करते. एखादी इमारत असुरक्षित असल्याचे आढळल्यास त्याचा काय परिणाम होतोआपल्या, राज्यकर्त्यांना अवैध बांधकामे नियमित करण्यासारख्या लोकप्रिय घोषणा करायला आवडतात मात्र कुणालाही सार्वजनिक सुरक्षेशी थेट संबंधित, लोकप्रिय नसलेल्या घोषण करायला आवडत नाहीत. अशा घोषणा कडू औषधाच्या मात्रेप्रमाणे असतात, त्यांची चव कितीही वाईट असली तरीही ते घेतल्याशिवाय तुम्हाला बरे वाटणार नाही ही वस्तुस्थिती आहे. आणखी एका ठिकाणी काही दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे ते म्हणजे पर्वतीच्या टेकडीभोवतालच्या तसेच सिंहगड रस्त्यापर्यंतच्या झोपडपट्यांमध्ये. या टेकडीच्या उतारावर मोठ्याप्रमाणावर अवैध बांधकामे करण्यात आलेली आहेत, त्यामुळे मोठे भूस्खलन होऊन हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो. या झोपडपट्ट्यांच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याने जमिनीची धूपही बरीच झालेली आहे. इथे कोणतीही सुरक्षा/अडथळा घालणारी भिंत नाही जी टेकडीवरून येणारे पाणी झोपडपट्टीपासून दूर सुरक्षित दिशेला वळवू शकेल. त्याचवेळी पर्वती टेकडीच्या दुसऱ्या दिशेने, टेकडीवर तसेच पायथ्याशी मोठ्याप्रमाणावर इमारतींचे बांधकाम सुरु आहे. मी काही कुणी भूशास्त्रज्ञ नाही. मात्र या इमारतींच्या पायासाठी अवजड यंत्रांनी टेकडी खणल्यामुळे, टेकडीच्या दगडांच्या संरचनेत प्रचंड कंप निर्माण होऊन, त्यामुळे भूस्खलन होण्याची शक्यता वाढते असे मला वाटते. शहरात सर्वत्र पसरलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये एखादी आग लागली तर ती देखील रौद्र रूप धारण करू शकते. अशा ठिकाणी अग्निशमनदलाची गाडी पोहचू शकेल असे रस्तेही नाहीत. अग्निशामक यंत्रेही नसतात, अशी परिस्थिती असताना आपण आणखी काय अपेक्षा करू शकतो. अशा वेळी नागरी प्रशासन एखादी दुर्घटना घडून गेल्यानंतर सार्वजनिक निवेदन प्रकाशित करते की जो वाडा किंवा इमारत पडली तिला धोकादायक असल्याबद्दल नोटीस देण्यात आली होती. तेथील रहिवाशांना इशारा देण्यात आला होता, मात्र एवढेच पुरेसे आहे का? आपल्या अशी एखादी तरतूद करता येणार नाही का की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या इमारतीचे संरचनात्मक लेखापरीक्षण करून घेतले नाही तर तुम्हाला नेहमीपेक्षा दहापट जास्त मालमत्ता कर भरावा लागेल? नाहीतर अशा इमारतींचा किंवा झोपडपट्ट्यांचा पाणीपुरवठा किंवा वीजपुरवठा जोपर्यंत त्या सुरक्षित जागी स्थलांतरित होत नाहीत तोपर्यंत खंडित करता येणार नाही का? अर्थातच नाही, कारण आपल्याला फक्त लोकप्रिय निर्णय घ्यायचे असतात. आपण दुर्घटनेपूर्वी किंवा नंतर पायाभूत सुविधा देण्यासाठी तयार नाही ही वस्तुस्थिती आहे.

मी जेव्हा दुर्घटनेच्या वेळच्या पायाभूत सुविधा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ आपल्याकडे विविध प्रकारची सांख्यिकी (अचूक) असली पाहिजे उदाहरणार्थ आपत्ती होण्याची शक्यता असलेली संभाव्य ठिकाणे, तसेच अशा आपत्तींमध्ये किती लोक प्रभावित होण्याची शक्यता आहे, त्याशिवाय तिथून बाहेर पडण्याचे रस्ते व सुटकेची साधने याविषयी माहिती असली पाहिजे. लक्षात ठेवा आपण जेव्हा एखाद्या आपत्तीला तोंड देत असतो तेव्हा डेटा अतिशय महत्वाचा असतो. त्याचप्रमाणे असा सर्व डेटा सार्वजनिकपणे जाहीर करा व लोकांना ते किती ओधकादायक परिस्थितीत जगत आहेत याची जाणीव करून द्या; दुर्दैवाची बाब म्हणजे ही कुणाची जबाबदारी आहे हे कुणालाच माहिती नसतंसरकार आपत्तींविषयी जागरुकतेच्या नावाखाली आकाशवाणीवर काही अतिशय बालीश जाहिराती देते ज्यामध्ये अगदी सर्वसाधारण व अगदी मूलभूत माहिती असते उदाहरणार्थ पूर आल्यावर, उंच ठिकाणी जा वगैरे. या संपूर्ण आपत्ती व्यवस्थापनामध्ये तात्पुरता निवारा हा अतिशय कमजोर दुवा आहे. यासाठी कायमस्वरुपी निवारे बांधणे आवश्यक आहे जे तात्पुरते वापरता येतील व ते संपूर्ण शहरात तसेच भोवताली विखुरलेले पाहिजेत तसेच त्यांची व्यवस्थित देखभाल झाली पाहिजे. आपत्तीतून वाचलेल्या लोकांना राहता येईल अशी एकतरी वसाहत शहरात आहे का हे मला दाखवून द्या, ज्यात स्वच्छ व पुरेशी शौचालये असतील, पुरेसे अन्नपदार्थ असलेले स्वयंपाकघर असेल, तसेच गंभीर इजांवर उपचार करणारे योग्य त्या वैद्यकीय सुविधा असलेले केंद्र हवे तसेच आपत्तीग्रस्तांना राहता येतील अशा खोल्या हव्यात; तसेच या निवाऱ्यांमध्ये साथीचे रोग वगैरे पसरले तर अशा परिस्थितीत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी संसर्गरोध सुविधाही हव्यातमात्र वस्तुस्थिती अशी आहे की तात्पुरता निवारा म्हणून पुणे महानगरपालिकेच्या शाळा किंवा पत्र्याच्या घरांचा वापर केला जातो, ती देखील अतिशय दूरवर असतात जिथे कुणीही व्यक्ती जाणार नाही. कारण पूरग्रस्त भागांमधील बहुतेक लोक हे चतुर्थ श्रेणीतील कामगार असतात व त्यांना अशा तात्पुरत्या निवाऱ्यातून त्यांच्या कामावर जाणे शक्य नसेल तर ते जीव धोक्यात घालून आहे तिथेच राहतील ही वस्तुस्थिती आहे. आपण आपत्तीच्यावेळी निवाऱ्यासाठी सुविधांसाठी राखून ठेवलेल्या जागा (किमान त्यापैकी काही) वापरू शकतो, या सर्विस अपार्टमेंटसारख्या असतील व एखाद्या व्यावसायिक संस्थेद्वारे त्यांची देखभाल केली जाईल. यासाठी आधी अशा कायमस्वरुपी निवाऱ्यांचा एक नमुना तयार करा ज्यामध्ये वर नमूद केलेल्या सर्व सुविधा असतील, हे स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने करता येईल. त्यानंतर आपण एक धोरण तयार करू शकतो, टीडीआरच्या मोबदल्यात विकासक त्याच्या प्रकल्पाच्या सुविधा क्षेत्रांमध्ये अशा सुविधा उभारून देईल व पुणे महानगरपालिकेला हस्तांतरित करेल. आपण विकासकाला त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी देऊ शकतो ज्याच्या मोबदल्यात त्याला टीडीआर किंवा अशा विकासकाच्या इतर प्रकल्पांमध्ये काही शुल्कामध्ये सवलत दिली जावी. अशी सवलत साधारण 30 वर्षांसाठीच्या देखभाल खर्चाच्या अनुपातानुसार देता येईल. आपण पुणे महानगरपालिकेच्या विद्यमान शाळांभोवती असलेल्या जागांचा वापर करण्याचा तसेच इमारतीवर आणखी मजले चढविण्याचा विचारही करू शकतो ज्यांचा वापर बचाव कार्यात निवाऱ्यासाठी करता येईल. त्याचप्रमाणे आपण आराखड्यातील सध्याच्या खुल्या जागांचा वापर करू शकतो तसेच नव्या विकास योजनेमध्ये काही जागा खुल्या ठेवू शकतो ज्याठिकाणी भूकंप वगैरेसारखी आपत्ती आल्यास लोकांना एकत्र जमता येईल. आणखी एक गोष्ट म्हणजे अशा आपत्ती बचाव कार्यातील निवाऱ्यांचा/केंद्रांचा पत्ता मोबाईल ऍपवर उपलब्ध करून द्या. म्हणजे काही आणीबाणी निर्माण झाल्यास लोक प्रशासनाला त्रास न देता किंवा इकडे-तिकडे न जाता स्वतःहून तेथे जाऊ शकतील.

लोकांना आपत्तींविषयी जागरुक करणे एक अतिशय महत्वाचा पैलू आहे. आपत्तीदरम्यान काय करायचे एवढेच नाही तर आपत्ती टाळण्यासाठी काय केले पाहिजे हे देखील अधिक महत्वाचे आहे. या आघाडीवर आपण क्रेडईसारख्या विकासकांच्या संघटना तसेच शहर नियोजनकर्त्यांना व अभियंतांना सहभागी करून घ्यायचा विचार करू शकतो ते विविध उपाययोजना जनतेपर्यंत पोहोचवतील. त्याचवेळी या विषयी व्यावसायिक लोकांचा सल्ला किंवा सूचना विचारात घ्या. कारण नावाडी व पंडिताच्या गोष्टीप्रमाणे केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर व्यावहारिक अनुभवही महत्वाचा असतो, विशेषतः आपत्तींना तोंड देताना तो अधिक महत्वाचा असतो. आपत्ती मुक्त शहर असणे सर्वोत्तम व ती प्रत्येकाची जबाबदारी आहे, कारण जेव्हा चक्रिवादळ किंवा भूकंप होतो तेव्हा तो आपली जात, धर्म किंवा पदानुसार वर्गीकरण करत नाही. म्हणूनच आपत्तींना तोंड देणे ही आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे.


संजय देशपांडे


संजीवनी डेव्हलपर्स


No comments:

Post a Comment